काँग्रेस पक्षाने तीनवेळा निवडणूक चिन्ह का बदललं?

काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ऋजुता लुकतुके,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी.

शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या पक्षाला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आलं आहे.

यानंतर पक्षाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून पोस्ट करण्यात आलीय, त्यात म्हटलंय की, "महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे."

"महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!" असंही या पोस्टमध्ये म्हटलंय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षालाही शिवसेनेतील बंडानंतर नवीन चिन्ह मिळाला होता.

या सगळ्या घडामोडींमुळे पक्ष आणि त्याचं निवडणूक चिन्ह हा विषय सध्या पुन्हा चर्चेला आलाय. अशावेळी जाणून घेऊया एका जुन्या भारतीय पक्षाबद्दल ज्याचं चिन्ह एकदा नाही तर तीनदा बदललंय.

इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे या पक्षाचं अधिकृत नाव. पण, सुरुवातीपासूनच लोकांमध्ये काँग्रेस हेच नाव अधिक रुजलेलं. काँग्रेस ही सामायिक ओळख असली तरी हा पक्ष 1885मध्ये त्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत अनेक गटांमध्ये विभागला गेला आहे. आणि अनेक वेळा फुटला आहे.

अगदी अलीकडची उदाहरणं ममता बॅनर्जींचं तृणमूल काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचं देता येईल. पण, या दोन उदाहरणांच्या पलीकडेही पक्षात दोनवेळा अशी बंड झाली की, पक्षाचा चेहरामोहरा बदलला आणि निवडणूक चिन्हही…आपण विचार करतोय 1969 आणि पुन्हा 1979मध्ये झालेल्या पक्षफुटीचा.

आणि दोन्ही वेळा फुट पाडणारी किंवा मूळ पक्षातून बाहेर पडणारी व्यक्ती होती इंदिरा गांधी. असं नेमकं त्यावेळी काय घडलं होतं?

काँग्रेस ते काँग्रेस(आर) ते काँग्रेस(आय)

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खरंतर स्वातंत्र्यपूर्व काळात 1885 मध्ये स्वातंत्र्य चळवळ संघटित करण्यासाठी झाली. त्या दृष्टीने दरवर्षी पक्षाचं अधिवेशन भरायचं.

यात ब्रिटिश राजवटीविरोधात काय भूमिका घ्यायची, आंदोलनांची दिशा काय असेल यावर ठराव मांडले जायचे.

आधीच्या फळीत महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले या नेमस्त नेतृत्वानंतर कालौघाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल असं जहाल नेतृत्व पक्षाला लाभलं.

भारतीय काँग्रेस, निवडणूक चिन्ह

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पं. नेहरूंनी काँग्रेसला पहिलं पक्ष चिन्ह दिलं

आणि पुढे 1920 नंतर महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचा संघटनेवरचा अंमल सुरू झाला. 1945मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाची घडी बसवण्यातही राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असणार हे ओघाने आलंच. स्वतंत्र भारतात 1951मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक आणि राज्य पातळीवरही निवडणुका पार पडल्या. तिथेही राष्ट्रीय काँग्रेस महत्त्वाचा पक्ष होता.

स्वातंत्र्या नंतरच्या 75 वर्षांच्या काळात काँग्रेसनं तब्बल सात वेळा स्वबळावर बहुमत मिळवलंय. तीनदा सत्ता स्थापन करणाऱ्या आघाड्यांचं नेतृत्व केलंय. आणि एकूण 54 वर्षं देशावर राज्य केलंय.

पण, इथं आपण काँग्रेसचा उल्लेख करतोय ती काँग्रेस मात्र वेळोवेळी बदललीय. आणि तीन वेळा त्यांचं पक्ष चिन्हही बदललंय. कसं ते बघा.

काँग्रेस (ओ) चं पक्षचिन्ह - बैलजोडी आणि मानेवर नांगर

इथं काँग्रेस ओ म्हणजे काँग्रेस ऑर्गनायझेशन. पक्ष चिन्हाची सुरूवात नेमकी कशी झाली आणि त्याची गरज का होती याचा ओझरता उल्लेख आपण सोपी गोष्ट क्रमांक 627 मध्ये केला आहे. 1951मध्ये जेव्हा पक्ष चिन्हाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी सहकाऱ्यांशी संगनमत करून नांगरणारी बैलजोडी हे आपलं चिन्ह निवडलं.

स्वतंत्र भारतात 80 टक्क्यांच्यावर लोक शेतकरी किंवा शेतीवर अवलंबून होते. हरित क्रांतीची हाक काँग्रेसनं देशाला दिली होती. अशावेळी बैलजोडी हे चिन्ह नेहरूंना समर्पक वाटलं. पुढे 1952 ते 1969च्या काळात पक्षाचं हेच चिन्ह राहिलं.

काँग्रेस (आर) चं पक्षचिन्ह - गाय वासरू

लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर 1966मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधान झाल्या. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक पक्षाने लढली ती 1967मध्ये.

या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. पण, मताधिक्य कमी झालं. इंदिरा यांची संभावना पक्षातलेच आणि पक्षाबाहेरचेही काही लोक 'गुंगी गुडिया' म्हणजे फक्त नावापुरतं बुजगावणं असलेलं नेतृत्व अशी करत होते.

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Photo Division

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधींमुळे काँग्रेसमध्ये दोनदा मोठी फूट पडली

पण, 1967च्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधी यांनी गिअर बदलला. आणि काँग्रेस पक्ष तसंच देश चालवतानाही स्वतंत्र बाणा दाखवून दिला.

त्यातून त्यांचे पक्षातल्या जुन्या नेत्यांबरोबर वारंवार खटके उडत होते. त्यांनी अचानक राष्ट्रपती पदाचे अपक्ष उमेदवार वराहगिरी वेंकट गिरी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तर अर्थमंत्री मोरारजी देसाई यांना विश्वासात न घेता बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णयही पुढे दामटवला. इतरही काही निर्णय पक्षातल्या इतर नेत्यांना दुखावणारे होते.

म्हणून मग तेव्हाचे काँग्रेस ओ चे पक्षप्रमुख निजलिंगप्पा यांनी इंदिरांवर कारवाई करत त्यांना पक्षातून काढून टाकलं.

इंदिरा बाहेर पडल्या त्या आपल्याबरोबर समविचारी काँग्रेस नेत्यांना घेऊन. त्यांनी काँग्रेस - आर म्हणजे रिक्विझिशनिस्ट गट स्थापन केला. रिक्विझिशनिस्ट म्हणजे स्वतंत्र मागणी करणारे. नाव जरी काँग्रेस - आर असलं तरी लोक या काँग्रेसला नवी काँग्रेस म्हणून ओळखायचे. आणि आधीची काँग्रेस आता जुनी झाली.

लौकिकार्थानेही ती जुनीच झाली. कारण, मोरारजी देसाई, स.का. पाटील असे नेते असले तरी या पक्षाचं अस्तित्वच पुढे राहिलं नाही. हळूहळू हे नेतेही फुटले.

पक्षचिन्हाबद्दल बोलायचं झालं तर इंदिरा फुटून बाहेर पडल्या होत्या. त्यांनी चिन्हावर दावा केला नाही. 1971च्या निवडणुकीत त्यांनी नवं चिन्ह घेतलं गाय आणि वासरू. हे वासरू गायीला बिलगलेलं आणि तिचं दूध पित आहे.

नव्या काँग्रेसला यातून जिव्हाळा अपेक्षित होता. 1971 नंतर आणखी एक निवडणूक पार पली. आणि काँग्रेसमध्ये आणखी एक स्थित्यंतर आलं.

काँग्रेस (आय) चं पक्षचिन्ह - हाताचा पंजा

इंदिरा गांधी यांच्याबरोबरच नव्या काँग्रेसमध्ये त्यांचा मुलगा संजय गांधी यांचंही नेतृत्व उदयाला येत होतं.

या दोघांनी ज्या पद्धतीने पक्ष आणि राज्य चालवलं यावरून पक्षात पुन्हा कुरबुरी सुरू झाल्या. इंदिरा यांचा गरिबी हटावचा नारा तोपर्यंत गाजत होता.

पण, संजय यांनी राबवलेल्या कुटुंब कल्याण कार्यक्रमात महिलांवर कुटुंब नियोजनासाठी जबरदस्ती होत असल्याचे आरोप झाले.

राष्ट्रीय काँग्रेस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोरारजी देसाईंशी इंदिरांचे मतभेद होते

एकूणच पक्षांतर्गत वातावरण खराब होतं. त्यातच 1971च्या निवडणूक प्रचारा दरम्यान सरकारी मालमत्ता आणि यंत्रणेचा वापर केल्याचा खटला त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राज नारायण यांनी दाखल केला.

1975 मध्ये या खटल्याचा अलाहाबाद कोर्टाचा निर्णय इंदिरा यांच्या विरोधात गेला. कोर्टाने इंदिरा पुढची सहा वर्षं कुठलंही संविधानिक पद भूषवू शकणार नाहीत, असाही निर्वाळा दिला.

राज्यसभा किंवा लोकसभेचे सदस्य असल्याशिवाय पंतप्रधानपद भूषवता येत नाही. आणि कोर्टाच्या निर्णयानंतर त्या यातल्या कुठेही प्रतिनिधित्व करू शकत नव्हत्या.

पण, इंदिरा यांनी राजीनाम्याला नकार दिला. त्या सर्वोच्च न्यायालयात लढणार होत्या. लोकांचा वाढता विरोध बघून त्यांनी लोकसभा बरखास्त करून टाकली. देशात आणीबाणी लागू केली.

दोन वर्षांच्या आणीबाणीनंतर झालेली 1977ची निवडणूक काँग्रेसनं गमावली. इंदिरा गांधीही हरल्या. त्यातून काँग्रेसमध्ये पुन्हा विरोध झाला. आणि 1979मध्ये इंदिरा पुन्हा एकदा काँग्रेसमधून बाहेर पडल्या.

यावेळी त्यांनी इंदिरा काँग्रेस हा स्वतंत्र गट स्थापन केला. नव्या गटाचं चिन्ह घेतलं हाताचा पंजा. हाताचा पंजा हा प्रसंगी कठीण वज्रमूठ किंवा एरवी लोकांना आधार देणारा आणि एकतेचं प्रतीक मानला गेला. आताचं पक्षचिन्ह हे इंदिरा काँग्रेसला अशा पद्धतीने मिळालंय. आणि आता आपण काँग्रेस म्हणून ओळखतो ती खरी इंदिरा काँग्रेस आहे.

तर असा आहे काँग्रेसचा बैलजोडी, गाय वासरू आणि हाताचा पंजा असा पक्षचिन्हाचा प्रवास.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)