जवाहरलाल नेहरूंचे शेवटचे दिवस कसे होते?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
1962 च्या युद्धामुळे जवाहरलाल नेहरू पूर्णपणे कोसळले होते. त्या धक्क्यातून ते कधीही सावरले नाही. त्याची शारीरिक ताकद, बौद्धिक कौशल्य, आणि तेज इतिहासजमा झालं होतं.
नेहरू निराश आणि थकलेले दिसत होते, त्यांचे खांदे वाकले होते, त्यांचे डोळे झोपाळू दिसायला लागले होते. त्यांच्या चालण्यात एक प्रकारचा संथपणा आला होता.
इंडियन एक्स्प्रेसचे वृत्तसंपादक ट्रेवर डायबर्ग लिहितात, "एका रात्री नेहरू अचानक थकलेले वाटले, निराश आणि म्हातारे दिसायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या आणि त्यांचं तेज ओसरायला लागलं."
8 जानेवारी 1964 ला भुवनेश्वरला काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात ते भाषण करायला उठले तेव्हा त्यांचा तोल गेला आणि ते कोसळले. मंचावर बसलेल्या इंदिरा गांधींनी धावत जाऊन त्यांना सावरलं.
नेहरूंच्या शरीराच्या उजव्या भागात पक्षाघात झाला होता. पुढचे काही दिवस नेहरू ओडिशाच्या राज भवनातच राहिले. त्यांची तब्येत थोडी सुधारली मात्र काँग्रेसच्या अधिवेशनात सामील होऊ शकतील इतकीही सुधारली नव्हती.
लालबहादूर शास्त्री झाले विना विभागाचे मंत्री
12 जानेवारीला इंदिरा गांधी आणि नेहरू दिल्लीला परतले. नेहरूंनी त्यांचे रोजचे कामाचे तास 17 वरून 12 वर आणले.
डॉक्टरांनी बळजबरी केल्यावर दुपारची झोप घ्यायला सुरुवात केली. नेहरूंचा आजार किती गंभीर आहे हे बाहेरच्या लोकांना सांगितलं नाही.
26 जानेवारीच्या कार्यक्रमात भाग घेण्याइतपत त्यांची तब्येत सुधारली. फेब्रुवारीत ते संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही ते उपस्थित होते. मात्र त्यांनी तिथे बसूनच भाषण केलं.

फोटो स्रोत, Getty Images
तत्कालीन गृहमंत्री गुलजारीलाल नंदा आणि अर्थमंत्री टीटीके कृष्णमचारी त्यांना दैनंदिन कामात मदत करत होते.
22 जानेवारीला अचानक लालबहादुर शास्त्रींना विन खात्याचे मंत्री म्हणून शपथ देण्यात आली. त्याच दरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनने 'नेहरूनंतर कोण?' या विषयावर एक सर्वेक्षण केलं होतं. त्यात शास्त्रींना पहिलं, कामराज यांना दुसरं आणि इंदिरा गांधींना तिसरं स्थान तर मोरारजी देसाईंना चौथं स्थान मिळालं.
नेहरूंची शेवटची पत्रकार परिषद
15 एप्रिलला इंदिरा गांधी अमेरिकेला गेल्या. त्या तिथून 29 एप्रिलला परत आल्या. त्याच दिवशी शेख अब्बदुल्लाह त्यांना भेटायला आले होते.
दुपारी इंदिरा गांधी त्यांचं स्वागत करण्यासाठी पालम विमानतळावर गेल्या. अब्दुल्लाह यांनी नेहरूंना पाहताच कडकडून मिठी मारली. ते दोघं एकमेकांना 11 वर्षांनंतर भेटले होते. नेहरूंची अवस्था पाहून शेख अब्दुल्लाह यांना धक्का बसला होता.
13 मे रोजी नेहरू आणि इंदिरा गांधी एका बैठकीत भाग घेण्यासाठी मुंबईला गेले. 22 मे रोजी नेहरूंनी सात महिन्यात पहिल्यांदा पत्रकर परिषद घेतली होती. 38 मिनिटं झालेल्या या पत्रकार परिषदेत दोनशेपेक्षा अधिक पत्रकारांनी भाग घेतला होता.
एम.जे.अकबर त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, "नेहरू दिसत तर बरे होते, त्यांचा आवाज क्षीण झाला होता. नेहरूंनंतर कोण हा प्रश्न अनेकदा विचारला गेला."

फोटो स्रोत, Getty Images
शेवटी नेहरू चिडून म्हणाले, "मी इतक्या लवकर मरू इच्छित नाही."
नेहरूंनी असं म्हणताच सर्व पत्रकारांनी त्यांना उभं राहून अभिवादन केलं. दुसऱ्याच दिवशी ते आणि त्यांची मुलगी तीन दिवसांसाठी हेलिकॉप्टरने देहरादूनला गेले. ते 26 मे ला परत आले.
अकबर पुढे लिहितात, "त्या दिवशी नेहरूंनी त्यांच्या टेबलवर ठेवलेल्या सगळ्या फायलींचा निपटारा केला. ते लवकर झोपायला गेले. रात्री त्यांची झोप अनेकदा उघडली. त्यांचा सहायक नत्थूने त्यांना झोपेची गोळी दिली. नत्थू पंतप्रधानांच्या बाजूला असलेल्या एका पलंगावर झोपले होते."
नेहरूंची मोठी धमनी फुटली
27 मे ला सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी नेहरूंचे डोळे उघडले. त्यांना वेदना होत होत्या पण त्यांनी दोन तास नत्थूला जागं केलं नाही. जेव्हा नत्थू जागा झाला तेव्हा एका सुरक्षारक्षकांनी डॉक्टर आणि इंदिरा गांधींना बोलवायला गेले.
जानेवारीमध्ये जेव्हा त्यांना पक्षाघात झाला तेव्हापासून डॉक्टर बेदी तीन मूर्ती भवनातच रहायचे. जेव्हा इंदिरा गांधी आणि डॉक्टर बेदी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा नेहरू भंजाळलेले दिसले. बेदींनी त्यांना विचारलं, काय झालं? त्यानंतर काही क्षणातच नेहरू बेशुद्ध झाले. जेव्हा डॉक्टर बेदींनी तपासलं तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की त्यांची मोठी धमनी फुटली होती.
इंदिरा गांधी आणि नेहरूंचा रक्तगट एकच होता. म्हणून बेदींनी इंदिरा गांधीच्या शरीरातून रक्त काढलं आणि नेहरूंना रक्त देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या आधीच ते कोमामध्ये गेले.
कॅथरीन फ्रँक यांनी इंदिरा गांधीचं चरित्र लिहिलं होतं. त्या लिहितात, "यादरम्यान इंदिरा गांधींनी राजीव गांधींना तार केली. तेव्हा ते इंग्लंडमध्ये होते. त्यांनी संजय गांधींनाही तार पाठवली. तेव्हा ते काश्मीरमध्ये होते. तसंच त्यांनी कृष्णा हथीसिंग आणि विजयलक्ष्मी पंडित या दोन आत्यांनाही फोन केला. त्यावेळी त्या मुंबईत होत्या. दिल्लीमध्ये त्यांनी फक्त कृष्णा मेनन यांना फोन केला. ते तातडीने तीन मूर्ती भवनात पोहोचले."
बुद्ध जयंतीच्या दिवशी निधन
27 मे ला एक वाजून 44 मिनिटांनी नेहरूंनी शेवटचा श्वास घेतला. कोमात गेल्यावर त्यांना शुद्धच आली नाही.
त्यावेळी इंदिर गांधी आणि कृष्ण मेनन त्यांच्याबरोबर होते. संपूर्ण दुपार आणि संध्याकाळी ते नेहरूंच्या पार्थिव शरीराजवळ बसले होते.
नेहरूंची लहान बहीण विजयालक्ष्मी पंडित यांनी 'द स्कोप ऑफ हॅपीनेस' मध्ये लिहितात, "मुंबईहून दिल्लीला जाणारं शेवटचं विमान त्या दिवशी निघालं होतं. महाराष्ट्र सरकारचं विमान त्या दिवशी मुख्यमंत्री वापरत होते. मी राष्ट्रपती राधाकृष्णन यांना फोन केला. त्यांनी माझ्यासाठी विमानाची व्यवस्था केली. जेव्हा आम्ही तीन मूर्ती भवनला पोहोचलो तेव्हा लोकांची इतकी गर्दी होती की आम्हाला खूप अंतरावर उतरावं लागलं."
"जेव्हा मी माझ्या भावाचा चेहरा पाहिला तेव्हा तो सुंदर आणि निर्मळ दिसत होता. ते नेहमी म्हणायचे की मला बुद्ध जयंतीला मृत्यू यायला हवा. बुद्धासाठी त्यांच्या मनात विशेष भावना होत्या. बुद्धाचा ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी त्यांना मरण आलं. बुद्ध जयंतीच्या दिवशीच आमचा भाऊ आम्हाला सोडून गेला."
अंत्यदर्शनासाठी तीन मूर्ती भवनाचे दरवाजे उघडले
नेहरूंचं निधन झाल्यावर तीन मूर्ती भवनाचा कोपरा न कोपरा लोकांनी भरून गेला. सगळ्यांत आधी तिथे टीटीके कृष्णमचारी आणि बाबू जगजीवनराम पोहोचले होते. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते.
थोड्याच वेळात नेहरू मंत्रिमंडळात दुसरे सदस्यही आले. दोन ते तीन वाजताच्या मध्ये तीन मूर्ती भवनाच्या खालच्या खोलीत मंत्रिमंडळाची बैठक झाली. गुलजारीलाल नंदा काळजीवाहू पंतप्रधान होतील असा निर्णय तिथे घेण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
कॅथरीन फ्रँक लिहितात, "त्यादिवशी तीन मूर्ती भवनात प्रत्येकजण दु:खात होता. अपवाद होता तो मोरारजी देसाई आणि कामराज यांचा. ते दु:खात असण्याऐवजी सावध होते. नेहरूंच्या खोलीबाहेर ते अशा पद्धतीने लोकांचं स्वागत करत होते जणू ते एखाद्या राजनैतिक बैठकीत आहेत."
जसा अंधार झाला तसं लिली, झेंडू, गुलाब आणि भारताच्या तिरंग्यात नेहरूंचं पार्थिव शरीर लपेटलं आणि त्यांच्या शयनकक्षातून तीन मूर्ती भवनाच्या समोरच्या वऱ्हाड्यांत आणलं.
त्यावेळी प्रचंड उकाडा होता. त्यामुळे त्यांचं पार्थिव बर्फाच्या लादीवर ठेवलं होतं. त्याचवेळी नेहरूंच्या बहिणी आणि पश्चिम बंगालच्या राज्यपाल पद्मजा नायडू तिथे पोहोचल्या. त्या रात्री तीन मूर्ती भवनात कोणीही झोपलं नाही. तिथले सगळे गेट उघडण्यात आले होते.
इंदिरा गांधींनी केले अंत्यसंस्कार
संजय गांधी काश्मीरहून 28 मेला सकाळीच दिल्लीला पोहोचले होते. नेहरूंच्या अंत्यसंस्काराची सगळी व्यवस्था इंदिरा गांधींनी केली होती.
इंदर मल्होत्रा यांनीही इंदिरा गांधींचं चरित्र लिहिलं होतं. त्यात ते लिहितात, "त्यांनी तीन मूर्ती भवनमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नोकरांच्या कपड्यांकडेही लक्ष दिलं. नेहरू गेल्यावर ते अतिशय दु:खी होते. निधन झाल्यावर त्यांनी काही खाल्लं नाही. इंदिरा गांधींनी त्यांना घरी जाऊन अंघोळ दाढी करून यायला सांगितलं. माझे वडील स्वच्छताप्रिय होते. अशा दिवशी त्यांच्या आसपास कोणतीही घाण राहू नये असं इंदिरांनी त्यांना सांगितलं."
नेहरूंचं पार्थिव एका कॅरेजवर ठेवलं होतं. पांढऱ्या खादीचे कपडे घालून इंदिरा गांधी आणि संजय गांधी एका कारवर स्वार झाले. प्रचंड उन्हात ते घामाने डबडबले होते.

फोटो स्रोत, Getty Images
राजीव गांधी तेव्हापर्यंत दिल्लीला पोहोचले नाही. यमुना नदीच्या किनाऱ्यापर्यंतचं पाच किलोमीटर अंतर कापायला तीन तास लागले. रस्त्याच्या आजूबाजूला मिळून साधारण वीस लाख लोक जमले होते.
एका हेलिकॉप्टरने त्यांच्या अंत्ययात्रेवर पुष्पवर्षाव करण्यात आला होता. अंत्यसंस्काराची पूर्ण व्यवस्था पाहण्यासाठी 8000 पोलीस आणि 6000 सैनिकांना तैनात करण्यात आले होते.
एम. जे. अकबर लिहितात, "इंदिरा शेवटी त्यांच्या वडिलांच्या चरणाशी गेल्या. त्यांनी त्यांच्या पायाशी गंगाजल शिंपडलं आणि त्याच्या वडिलांच्या पायाशी चंदनाचं लाकूड ठेवलं. त्या तिथे 8 मिनिट चकार शब्दही न बोलता उभ्या राहिल्या. नंतर त्यांनी आपल्या लाडक्या 'पापू'ना शेवटचं पाहिलं आणि त्या खाली उतरल्या.
संजय गांधीनी दिला मुखाग्नी
नेहरूंनी त्यांच्या मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलं होतं की त्यांचा अंत्यसंस्कार कोणत्याही धार्मिक पद्धतीने करू नये तरीही त्यांचा अंत्यसंस्कार हिंदू धर्माच्या पद्धतीने करण्यात आला.
हा निर्णय इंदिरा गांधींचा होता. कॅथरीन फ्रँक लिहितात, "या निर्णयाने इंदिरा गांधींना खूप त्रास झाला. त्यांच्यावर कोणी धार्मिक नेत्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी दबाव टाकला होता. कारण भारतीय लोकांना धर्मनिरपेक्ष अंत्यसंस्कार फारसे रुचले नसते. नेहरूंचं पार्थिव चंदनाच्या लाकडावर ठेवलं होतं. वैदिक मंत्रोच्चार आणि द लास्ट पोस्टच्या बिगुलच्या सुरावटीत 17 वर्षीय संजय गांधींनी मुखाग्नी दिला.
विशेष ट्रेनने अस्थी अलाहाबादला नेण्यात आल्या
अंतिम संस्कार झाल्यानंतर नेहरूंच्या अस्थी एका विशेष ट्रेनने त्रिवेणी संगमावर अर्पण करण्यासाठी अलाहाबादला नेण्यात आल्या.
या प्रवासाला साधारणत: दहा तास लागतात. मात्र त्या दिवशी या प्रवासाला पंचवीस तास लागले. ट्रेन प्रत्येक स्टेशनवर थांबली. तिथे हजारो लोकांनी नेहरुंना श्रद्धांजली वाहिली.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रवासाचं वर्णन इंदिरा गांधींच्या सहकारी उषा भगत यांनी त्यांचं पुस्तक इंदिराजी मध्ये लिहिलं. त्या म्हणतात, "सगळ्या खिडक्या काचेच्या होत्या. प्रत्येक स्टेशनवर लोक फुलांच्या पाकळ्या उधळत होते. अलीगढ स्टेशनवर शेख अब्दुल्लाह ट्रेनमध्ये चढले. आम्ही लोकांनी 'सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा' हे गाणं म्हटलं. त्यानंतर शांति पाठ केला. आमच्या बरोबर मणिबेन, जमनालाल बजाज, केसी पंत, विजयालक्ष्मी पंडित, कृष्णा हथीसिंग होत्या. इतक्या संख्येने लोक आले की लोकांच्या हाताच्या दबावाने खिडकीची काच फुटली. अलाहाबाद स्टेशनवर दलाई लामाही आले होते."
संगमावर नेहरूंच्या अस्थीशिवाय त्यांची पत्नी कमला नेहरूंच्या अस्थीसुद्धा अर्पण करण्यात आल्या. तीस वर्षांआधी कमला नेहरूंच्या अस्थी स्वित्झर्लंडहून आणल्या होत्या. त्या आनंद भवन किंवा दिल्लीतल्या यॉर्क रोडच्या घरात ठेवल्या जात असत.
भारतभर अस्थींचं वितरण
नेहरूंनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की त्यांच्या अस्थी भारताच्या प्रत्येक राज्यात विमानाद्वारे भारतभर उधळण्यात याव्यात.
काश्मीरमध्ये इंदिरा गांधी स्वत: तो अस्थीकलश घेऊन गेल्या. श्रीनगरमध्ये एका छोट्या विमानावर त्या चढल्या आणि वायुसनेचे एक अधिकारी एन. शास्त्री यांच्या मदतीने त्यांनी या अस्थी उधळल्या जिथे नेहरुंच्या पूर्वजांचा जन्म झाला होता.
इतर अस्थींना भारतीय वायुसेनेतर्फे शेतकरी जिथे काम करायचे तिथे उधण्यात आलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








