एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यात नक्की काळबेरं आहे - अजित पवार

फोटो स्रोत, Facebook/Ajit Pawar
"105 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही आणि 40 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होते, यात नक्की काहीतरी काळंबेरं आहे," असं वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदेंच्या सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं.
यावेळी अजित पवारांनी शिवसेना फुटण्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, "शिवसेनेतून ज्या ज्या नेत्यांनी बंड केलं, त्यांच्यासोबत जे आमदार गेले, ते पुढे कधीच निवडून आले नाहीत. शिवसेना सोडणाऱ्या नेत्यासोबत शिवैसनिक जात नाही, असा इतिहास सांगतो."
एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करतानाच्या देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात नेहमीचा उत्साह दिसला नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला. तसंच, एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत, हे वारंवार सांगण्याची वेळ का येते? असा प्रश्नही अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून विचारला.
तसंच, शिंदेंमध्ये पात्रता होती, मग देवेंद्रजींच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना एकच खातं का दिलं होतं? असा प्रश्नही अजित पवारांनी विचारला.
निधी वाटपावरील आरोपांना अजित पवारांचं उत्तर
विधानसभेत भाषणादरम्यान अजित पवारांनी त्यांच्यावरील आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरील निधी वाटपात भेदभाव केल्याच्या आरोपांना उत्तरं दिली.
अजित पवार म्हणाले, "मी काम करत असताना सहसा असा भेदभाव कधीच करत नाही. आमदार निधी पाच कोटी केला. अजिबात भेदभाव केला नाही. शेवटी आपल्या सगळ्यांमुळे हे आघाडीचं सरकार होतं."
एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याला सुमारे 12 हजार कोटी रुपयांचा निधी दिला, अशी माहिती अजित पवारांनी विधानसभेत दिली.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
अजित पवार पुढे म्हणाले, "सभागृहाला आणि महाराष्ट्राला मला सांगायचाय की, मी अजिबात भेदभाव करणारा माणूस नाही. कुठल्याही निर्णयावर मुख्यमंत्री अंतिम हात फिरवतात. पण असं सांगण्यात आलं की राष्ट्रवादीमुळे हे झालं."
"शिवभोजनमध्ये 1200 केंद्र मंजूर केले. 401 केंद्र शिवसेना आमदार-खासदारांच्या शिफारशीवरून मंजूर केलेत," असं अजित पवारंनी सांगितलं.
शिवसेनेतील बंडखोर आमदारांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये किती निधी दिला, याचा पाढाच अजित पवारांनी वाचून दाखवला.
"एकनाथ शिंदेंना 366 कोटी, संदिपान भुमरेंना 167 कोटी, दादा भुसेंना 306 कोटी असा सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघांमध्ये निधी दिला. उदय सामंतांना कधी मोकळ्या हातानं पाठवलं नाही," असं अजित पवार म्हणाले.

फोटो स्रोत, Facebook/Ajit Pawar
"ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात दाखवलं की, राष्ट्रवादीकडे अर्थ विभाग असल्यानं, अगदी तुम्हीच नाही काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनीही तसा आरोप केला, पण मला वाद वाढवायचा नव्हता. पण कारण नसताना राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं मधल्या काळात घडलं, ते मनातून काढून टाकावं," असंही अजित पवार म्हणाले.
'उद्धव ठाकरेंना विश्वासात घेतलं असतं तर समाधान मिळालं असतं'
अजित पवार म्हणाले, "एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातलेच आहेत. रिक्षा चालकापासून इथपर्यंत पोहोचले, हे येड्यागबाळ्याचं काम नाही. हे सर्व मिळवत असताना, उद्धव ठाकरेंना विश्वासात घेऊन केलं असतं तर त्यातून वेगळं समाधान पाहायला मिळालं असतं."
अजित पवार पुढे म्हणाले, "चांगल्या कामात आमचं सहकार्य राहील, मात्र जिथं राज्याचं हित पाहिलं जाणार नाही, लोकांवर अन्याय होईल, तिथे विरोधक म्हणून तुमच्यासमोर आणून देण्याचा प्रयत्न करू.
"राजकीय मतमतांतरं असू शकतात, विचारधारा वेगळी असू शकते, पण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विरोधक म्हणून भूमिका पार पाडण्यामध्ये कुठेच कमी पडू देणार नाही, याची ग्वाही महाराष्ट्राला मी करून देतो."
बहुमत सिद्ध केल्याबाबत मी सुद्धा वैयक्तिक अभिनंदन करतो, असं शेवटी अजित पवार म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








