NCERTच्या पुस्तकांमधून गुजरात दंगलींचा धडा वगळल्याने इतिहास बदलेल का?

पुस्तक

फोटो स्रोत, CHRISTIAN ENDER

    • Author, रॉक्सी गागडेकर छारा
    • Role, बीबीसी गुजराती

बारावीत राज्यशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 2002 च्या गुजरात दंगलींविषयी NCERTच्या पुस्तकांमध्ये यापुढे काहीही आढळणार नाही.

27 फेब्रुवारी 2002 रोजी अयोध्येहून परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या S-6 कोचमध्ये गोध्रा स्टेशनवर आग लागली होती. यात 59 कारसेवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली.

एनसीईआरटीच्या बारावी राज्यशास्त्राच्या पुस्तकात नवव्या प्रकरणात या दंगलींचा उल्लेख आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनसीईआरटी आपल्या पुस्तकामधून गुजरात दंगलींप्रमाणेच आणीबाणीशी संबंधित प्रकरणसुद्धा काढून टाकत आहे.

BBC ने एनसीईआरटीकडून पुस्तकात करण्यात येणाऱ्या बदलांची नेमकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण एनसीईआरटीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्रासह अनेक माध्यमांनी अलीकडेच या बदलांबाबत बातम्या दिल्या आहेत.

बीबीसी गुजरातीने, अभ्यासक्रम बदलणे आणि गुजरात दंगलींशी संबंधित भाग काढून टाकण्याच्या मुद्द्यावर शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार आणि 2002 च्या दंगल पीडितांशी चर्चा केली.

पण, त्याआधी एनसीईआरटीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात गुजरात दंगलींबद्दल काय शिकवलं जात होतं, हे जाणून घेऊया.

पुस्तकात काय होतं आणि काय बदललं?

एनसीईआरटीच्या इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातला 9वा धडा हा भारतीय राजकारणातील अलीकडच्या घडामोडींवर आधारित होता. यामध्ये 1990 आणि त्यानंतरच्या काळातील भारतीय राजकारणाची माहिती देण्यात आली होती.

पुस्तक

फोटो स्रोत, ANDREW AITCHISON

या धड्यात विद्यार्थ्यांना भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा, मंडल आयोग इत्यादी विषयांची माहिती देण्यात आली होती.

धड्यात त्या काळातील युतीच्या राजकारणाच्या गोष्टींचा तपशीलवार समावेश करण्यात आला होता आणि गुजरात दंगलींविषयीही माहिती देण्यात आली होती.

या प्रकरणात जातीयवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीविषयी उहापोह करण्यात आला होता. तसंच देशातील हिंदुत्वाच्या राजकारणाची सुरुवात, अयोध्या प्रकरण, बाबरी मशीद पाडणे, पुढे गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसचा S-6 डबा जाळणे आणि त्यानंतर उफाळलेल्या धार्मिक दंगली इत्यादी विषयांचाही समावेश होता.

विद्यार्थ्यांना मूळ मुद्दे अधिक चांगल्या प्रकारे समजावे, यासाठी या धड्यात तत्कालीन इंग्रजी आणि हिंदी प्रिंट मीडियाच्या मथळ्यांचे पेपर कटिंगही वापरण्यात आले होते. ज्यात 'गुजरात बर्निंग: अॅन आय फॉर अॅन आय ब्लाइंड्स गांधीनगर', 'गुजरात कांड में कोई कसर नहीं छोडी', 'गुजरात कांड', 'अ ब्लॉट-पीएम' यासारख्या हेडलाईन्सचे कटिंग्ज पुस्तकात वापरले गेले होते.

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे काही बोलले होते तेही या प्रकरणात दिलं होतं. वाजपेयी यांनी मोदींना 'राजधर्माचं पालन झालं पाहिजे' असं म्हटलं होतं.

हे सर्व तपशील यावर्षीपासून काढून टाकण्यात आले आहेत.

नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्राची घटना घडली होती. त्यावेळी अयोध्येहून अहमदाबादला परतणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसच्या S-6 बोगीला गोध्रा येथे आग लागली, ज्यात 59 कारसेवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळला होता.

याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही बरीच टीका झाली होती.

सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या हिंसाचारात 790 मुस्लीम आणि 254 हिंदू मारले गेले होते. 223 लोक बेपत्ता आणि 2500 जखमी झाले होते. शिवाय शेकडो कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं.

गुजरात दंगलीची भीषणता आणि लोकांच्या दुर्दशेचं एक ज्वलंत चित्र अजूनही लोकांच्या मनात कोरलं आहे. हात जोडून मदतीची याचना करत रडत उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीचा हा फोटो होता. त्यांचं नाव कुतुबुद्दीन अन्सारी. या फोटोने गुजरातमधील हिंसाचाराकडे देशासोबतच साऱ्या जगाचं लक्ष वेधलं होतं.

पुस्तकातील बदलाच्या पार्श्वभूमीवर बीबीसीने याच कुतुबुद्दीन अन्सारी यांचंही मत जाणून घेतलं. ते म्हणाले, "या गोष्टी पुस्तकातून काढून टाकल्या तर काय होईल? या दंगलींमुळे आमच्यासारख्या अनेकांना अतोनात त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रत्येक समाजातील लोक 2002 ची दंगल पुढची अनेक वर्षे लक्षात ठेवतील."

ज्यांना ही दंगल आणि त्यातील वेदना जाणून घ्यायच्या आहेत त्यांना या पुस्तकांची गरज नाही हे कळेल, असंही ते म्हणाले.

अन्सारी सध्या अहमदाबादमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. गुजरात दंगलीच्या विनाशाचा दुसरा चेहरा आणि त्यांचे हिंदू मित्र अशोक मोची यांच्यासोबत मिळून धार्मिक ऐक्यासाठी काम करतात.

गुजरात दंगल

फोटो स्रोत, Getty Images

अन्सारी यांच्या मते गुजरात दंगलीची माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहील. त्यामुळे पुस्तकात बदल करून त्याचा काहीही परिणाम होणार नाही.

2002 सालच्या गुजरात दंगलीत अहमदाबादच्या नरोडा पाटिया भागात मोठा नरसंहार झाला होता. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या नरोडा पाटिया प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीसमोर सलीम शेख हे मुख्य साक्षीदार होते. या दंगलीत सलीम शेख यांच्या कुटुंबातील अनेक जणांचा मृत्यू झाला होता.

बीबीसी गुजरातीशी बोलताना ते म्हणाले, "आम्ही नरोडा पाटिया प्रकरणी ज्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे तेच आता सत्तेत आहेत."

"या प्रकरणी या पक्षाचे आमदार आणि नेत्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. आता या लोकांकडे सत्ता असल्याने ते इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. नरोडा पाटियाच काय त्यांना तर ताजमहालचा इतिहासही बदलायचा आहे. आपण काय करू शकतो?"

नरोडा पाटियामधील दंगलीत ठार झालेल्यांचा अधिकृत आकडा 97 असला तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं सलीम शेख यांचं म्हणणं आहे.

सरकार अशा ऐतिहासिक चर्चेला घाबरतं का?

पुस्तकातून गुजरात दंगलींविषयक धडा काढून टाकण्यामागे कारण काय, असा प्रश्न बीबीसीने ई-मेल करून एनसीईआरटीला विचारला. त्यावर प्रतिसाद मिळालेला नाही.

मात्र, एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला सांगितलं, "ही संपूर्ण प्रक्रिया मी पदभार स्वीकारण्यापूर्वी पार पडली आहे. त्यामुळे मला तपशीलाची माहिती नाही." सकलानी यांची फेब्रुवारी 2022 मध्ये नियुक्ती झाली होती.

सकलानींपूर्वी एनसीईआरटीचे संचालक श्रीधर श्रीवास्तव यांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला प्रतिक्रिया देताना म्हटलं, "हा एनसीईआरटीचा निर्णय आहे आणि आता सार्वजनिक झाला आहे. मला एवढंच सांगायचं आहे."

गुजरात विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रमुख अरुण वाघेला यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मला वाटतं अभिलेखागारात माहिती येत नाही आणि घटनेला 30 वर्ष होत नाही, तोवर तो इतिहास अभ्यासक्रमात शिकवला जाऊ नये."

"कोणत्याही घटनेच्या 30 वर्षांनंतर त्याची सर्व माहिती सरकारी पुस्तकांमधून ओपन सोर्समध्ये येते. गुजरात दंगलीवर सध्या शैक्षणिक चर्चा होऊ नये, असं मला वाटतं कारण त्याची माहिती अजूनतरी ओपन सोर्समध्ये उपलब्ध नाही."

'पुस्तकात नसलं तरी सांगितलं गेलं पाहिजे'

सामाजिक शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक गौरांग जानी यांनी विद्यार्थ्यांना गुजरात हिंसाचारासह अनेक सामाजिक विषयांवर शिकवलं आहे. याविषयी बोलताना जानी यांनी शिक्षकांच्या निष्ठेबद्दल सांगितलं.

ते म्हणतात, "2002 च्या दंगलीबद्दल विद्यार्थ्यांशी बोलणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे, जरी ती पुस्तकात नसली तरी."

जानी पुढे म्हणतात, "विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर या दंगलीत थेट सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि हा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमातील तो धडा त्यांच्या त्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेच्या मार्गातला अडथळा होता जो त्यांना सध्याच्या परिस्थितीत निर्माण करायचा होता आणि म्हणूनच तो धडा काढून टाकावा लागला."

गौरांग जानी म्हणतात, "हा एनसीईआरटीचा विषय आहे. पण गुजरातच्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्याबद्दल कधीही माहिती नव्हती. आता विशेष तपास पथक आदींच्या तपासातही सर्वांना क्लीन चिट देण्यात आली आहे. अशा स्थितीत त्यावेळी घडलेल्या प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात काहीच गैर नाही. यापुढे गुजरात दंगलींप्रमाणे 1975 च्या आणीबाणीविषयीसुद्धा शिकवलं जाणार नाही. त्यामुळे या विषयावर चर्चा होत नाहीय. कुणी याला विरोध करत नाहीय," असंही गौरांग जानी म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)