अमित शाह : 'इतिहासकारांनी केवळ मुघलांचीच चर्चा केली', #5मोठ्याबातम्या

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'इतिहासकारांनी केवळ मुघलांचीच चर्चा केली' - अमित शाह

"भारतातील बहुतांश इतिहासकारांनी केवळ मुघलांचीच चर्चा केली. त्यांनी पांड्य, चौला, मौर्या, गुप्ता आणि अहोम राज्यकर्त्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केलं." अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.

'महाराणा : सहस्त्र वर्ष का धर्म योद्धा' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यानिमित्ताने ते दिल्लीत बोलत होते.

अमित शाह म्हणाले, "मला इतिहासकारांविषयी बोलायचं आहे. आपल्याकडे अनेक राजवटी होऊन गेल्या. परंतु इतिहास लिहिणाऱ्यांनी या राजवटींची इतिहासात नोंद करण्याची वेळ आली तेव्हा मुघल राजवटीची चर्चा केली. पांड्य राजवट 800 वर्षे होती, आसाममध्ये अहोम राजवट 50 वर्षे होती. खिलजीपासून औरंगजेबपर्यंत अनेकांना त्यांनी पराभूत केलं. त्यांनी आसामला स्वतंत्र ठेवलं."

ते पुढे म्हणाले, "पल्लव साम्राज्य 600 वर्षे चाललं, चालुक्य साम्राज्य 600 वर्षे तर मौर्यांनी 550 वर्षे अफगाणिस्तानापासून श्रीलंकेपर्यंत राज्य केलं. सातवाहनने देखील 500 वर्षे राज्य केलं. गुप्त राजवटीने 400 वर्षे. समुद्र गुप्तने पहिल्यांदा भारत संकल्पनेला वास्तवात साकारण्याचा प्रयत्न केला आणि यशही मिळवलं. पण यावर ग्रंथ लिहिण्यात आले नाहीत." लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

"टीका न करता अभिमानास्पद इतिहास आपण सांगायला हवा. चुकीचा इतिहास आपोआप मागे पडेल. सत्य समोर येईल. यासाठी खूप लोकांनी काम करण्याची गरज आहे," असंही अमित शाह म्हणाले.

2. नुपूर शर्मा यांना मुंबईतील पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी समन्स

वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या नुपूर शर्मा यांना आता भिवंडी पोलिसांनी समन्स जारी केलं आहे. 13 जूनला नुपूर शर्मा यांनी मुंबईतील भिवंडी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे.

नुपूर शर्मा

फोटो स्रोत, TWITTER

रझा अकादमीचे सदस्य अहमद सगीर अहमत मलिक यांनी 30 मे रोजी नुपूर शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्याने भाजपनेही नुपूर शर्मा यांना बडतर्फ केलं आहे.

तसंच भाजपने निलंबित केलेले दुसरे प्रवक्ते नवीन जिंदल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना 15 जून रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. झी 24 तासने हे वृत्त दिलं आहे.

रझा अकादमीचे भिवंडीचे महासचिव शरजील रझा कादरी यांनी मुस्लीम समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.

3. आम्हाला मत न दिलेल्या अपक्षांना निधी का द्यायचा? - विजय वडेट्टीवार

राज्यसभेची निवडणूक 10 जूनला विधिमंडळात पार पडली. 285 आमदारांनी यासाठी मतदान केलं. सहाव्या जागेची लढत अटीतटीची ठरली. यात शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा विजय झाला.

महाविकास आघाडीकडे संख्याबळ आणि अपक्षांची साथ असूनही काही आमदार फुटले असा दावा नेत्यांकडून केला जातोय. अपक्ष फुटल्यानेच भाजपला फायदा झाला असंही महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत.

विजय वडेट्टीवार

फोटो स्रोत, FACEBOOK/VIJAY WADETTIWAR

ज्या अपक्षांनी महाविकास आघाडीला मतं दिली नाहीत त्यांना निधी देणार नाही, अशी भूमिका आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे.

ते म्हणाले, "अपक्ष आमच्यासोबत होते. पण दगाफटका झाला. आम्ही माहिती घेत आहोत असे कोणते आमदार आहेत. आमच्यासोबत राहून निधी घ्यायचा आणि मत विरोधकांना करायचं मग आम्ही निधी कशासाठी देऊ?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

4. निवडणूक कशी जिंकायची हे फडणवीस यांनी शिकवलं - रामदास आठवले

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर विविध पक्षांच्या नेत्यांकडून राजकीय प्रतिक्रिया येत आहे. भाजपची रणनीती आणि शिवसेनेचा पराभव का झाला यासंदर्भातही अनेक वक्तव्य केली आहेत.

रामदास आठवले

फोटो स्रोत, @RAMDASATHAWALE

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखवली. निवडणूक कशी जिंकायची हे फडणवीस यांनी शिकवलं. बड्या बड्या वाघांना त्यांनी मान खाली घालायला लावली." लोकमतने हे वृत्त दिलं आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. त्या म्हणाल्या, "कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही सिनेमा फ्लॉप होतो. पण अमिताभ बच्चन हे अमिताभ बच्चन आहेत. आमचे नेते 50 वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. अर्धी वर्षे ते विरोधात आणि अर्धी वर्षे ते सत्तेत होते. केंद्र सरकार दडपशाही करते. ही निवडणूक आहे. आपण काहीवेळा जिंकतो, काहीवेळा हारतो."

5. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, मुंबईत सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना बाधितांच्या आकडेवारीचा आलेख कमी होताना दिसत नाहीय. गेल्या 24 तासांत राज्यात 2 हजार 922 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.तर एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.

या रुग्णांपैकी 1 हजार 765 रुग्ण हे एकट्या मुंबईतून आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98 टक्के आहे. मृत्यूदर 1.87 टक्के आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे.

राज्यात सध्या 14 हजार 858 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. 10 हजार 47 सक्रिय रुग्णांची नोंद मुंबईत करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)