अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' फ्लॉप होण्याची 3 कारणं...

फोटो स्रोत, YRF
- Author, मधू पाल
- Role, बीबीसी हिंदीसाठी
मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर आणि अभिनेता अक्षय कुमार यांचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः सपाटून आपटला. तज्ज्ञांच्या मते हा चित्रपट या वर्षातला एक मोठा फ्लॉप चित्रपट ठरू शकतो.
एवढा व्याप करूनही चित्रपट काही चालला नाही.
अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट मागच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता.
हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीचं अनेक कारणांमुळे वादात सापडला होता. यातलं पहिलं कारण होतं पृथ्वीराज नावासमोर सम्राट न लावणं. शेवटी करणी सेनेची ही मागणी पूर्ण करत चित्रपटाचं नाव सम्राट पृथ्वीराज करण्यात आलं.
दुसरं कारण म्हणजे या चित्रपटात सम्राट पृथ्वीराजच्या मुख्य भूमिकेत असणारा अक्षय कुमार गुटख्याच्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर ट्रोल झाला होता.
हा चित्रपट प्रमोट करण्यासाठी बरेच कार्यक्रम झाले. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीपासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यात आली. इतकंच नाही तर चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला. आता एवढं करून सुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.
पाच दिवसांत कमावले फक्त 47 कोटी
प्रसिद्ध चित्रपट विश्लेषक गिरीश वानखेडे बीबीसी हिंदीशी बोलताना सांगतात की, अक्षय कुमारचा प्रसिद्ध चित्रपट 'सम्राट पृथ्वीराज' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला दिसत नाही.
हा चित्रपट 3 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई 10.5 कोटी होती. तर दुसऱ्या दिवशीची कमाई होती 12. 5 कोटी. या चित्रपटाने तीन दिवसांत फक्त 39 कोटींची कमाई केली आहे.
पहिल्या दिवसाची कमाई, पुढच्या सोमवारपर्यंत राहिली तर चित्रपट हिट झाला असं म्हटलं जातं. पण या चित्रपटाबाबत तसं झालं नाही. या चित्रपटाचं सोमवारचं कलेक्शन 5 कोटी होतं. जे खूपच कमी होतं.

फोटो स्रोत, Puneet Barnala/BBC
पहिल्या दिवसापासून कमाई निम्म्यावर आली तर चित्रपट आपटला असं मानलं जातं. सोमवारी या चित्रपटाचं कलेक्शन 5 कोटी होतं, तेच मंगळवारपर्यंत 4 कोटींवर आलं. एकूण 5 दिवसांत या चित्रपटाने 47 कोटींची कमाई केली आहे.
चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवरचं कलेक्शन पाहता याला फ्लॉप चित्रपट म्हणता येईल. जर बॉक्स ऑफिसवर 5 दिवसांत अवघ्या 47 कोटींची कमाई झाली असेल, तर याचा अर्थ चित्रपटाचं बजेट 300 कोटी असताना निर्मात्याच्या वाट्याला कमी आलं.
या वर्षांतला सर्वांत फ्लॉप चित्रपट?
बॉक्स ऑफिसचा हिशेब देताना गिरीश सांगतात की, "जर हा चित्रपट थोडासा जरी हिट व्हायचा असेल तर बॉक्स ऑफिसवर त्याचं कलेक्शन 250 कोटी असायला हवं होतं. म्हणजे मग सॅटेलाइट आणि डिजीटल राईट्स देऊन आणि बॉक्स ऑफिसवरचं कलेक्शन देऊन हा चित्रपट हिट होऊ शकला असता.
"पण 47 कोटी कमवायलाही या चित्रपटाला धडपड करावी लागली, तर मग काय म्हणायचं. येत्या काही दिवसात कितीही संघर्ष केला तरी हा चित्रपट 75 कोटींच्या पुढे काही जाणार नाही. आणि जर एवढीसुद्धा कमाई करता आली नाही तर मात्र हा या वर्षातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपटात ठरेल."
लोकांचा रिजेक्शन रेट खूप वाढलाय
प्रख्यात चित्रपट समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार रामचंद्रन श्रीनिवासन बीबीसी हिंदीशी बोलताना सांगतात, "आजकाल बरेच बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होत आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड मधील चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, 'द कश्मीर फाइल्स' आणि भूल भुलैया 2 या चित्रपटांनी या वर्षी चांगला व्यवसाय केला आहे.
"KGF 2 आणि RRR बद्दल बोलायचं झालंच तर हे हिंदी डब चित्रपट होते पण तरीही ते हिट झाले. आता अशी परिस्थिती आहे जिथे खूप कमी चित्रपट हिट होतायत, अशात चित्रपटांचा कंटेंट जो याआधी कधीच पाहिला गेला नसेल असा असावा. त्याचा दर्जाही तितकाचं चांगला असावा जो सम्राट पृथ्वीराजमध्ये नव्हता."
लोक सोशल मीडियावर RRRच्या मेकिंगची चर्चा करताहेत. RRR सुद्धा हिस्टोरिकल फिक्शन आहे. तेच सम्राट पृथ्वीराज हा आरआरआरच्या तुलनेत खूपच मागे आहे. जेव्हा दोन चित्रपटांची तुलना होते तेव्हा लोक स्वतःचं मत मांडत असतात.
कोरोना नंतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सची चलती आहे ज्यामुळे लोकांचा रिजेक्शन रेट वाढलाय. उदाहरण म्हणून बघायचं झालं तर, जर मला ओटीटी वर एखादा सीन किंवा गाणं आवडलं नाही तर मी ते फॉरवर्ड करतो आणि कमीत कमी वेळेत चित्रपट बघतो. अशा वेळी लोकांना थिएटरमध्ये खिळवून ठेवायचं असेल तर कंटेंट चांगला असावा नाहीतर लोक बघायला येणार नाहीत.
प्रत्येकवेळी प्रपोगंडा कार्ड चालेलंच असं नाही
रामचंद्रन श्रीनिवासन सांगतात की, "तुम्ही लोकांना चित्रपट पाहण्यासाठी कितीही विनवण्या करा, पण चित्रपटात दमच नसेल तर लोक पैसे का खर्च करतील? नुकताच प्रदर्शित झालेला 'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट पाहिला तर त्यात ते सर्व आहे, ज्याला आपण सिनेमा म्हणत नाही. यात कोणताही ड्रामा नसल्याचं सांगितलं गेलं."

फोटो स्रोत, HaryanaGov
या चित्रपटाने लोकांना वास्तवाच्या अगदी जवळ आणलं. द कश्मीर फाईल्स ची गोष्ट आपल्या इतिहासात दिसत नाही असं लोकांना वाटलं. म्हणून लोक चित्रपट बघायला गेले. हीच आयडिया 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाने वापरली. ही गोष्ट आपल्या इतिहासात नाही असंही त्यांनी सांगितलं. पण त्यांचं हे प्रपोगंडा कार्ड चाललं नाही. प्रत्येक वेळी असं कार्ड चालेलचं असं नाही."
गंगेची आरती करून आणि डुबक्या मारून काहीही साध्य होत नाही.
फिल्मी प्रोपोगंडाचा संदर्भ देत विश्लेषक गिरीश वानखेडे म्हणतात की, "सम्राट पृथ्वीराजसाठी जे मार्केटिंग कँपेन व्हायला हवं होतं ते निष्प्रभावी असायला हवं होतं. तुम्ही गंगेची आरती करताय किंवा गंगेच्या पाण्यात डुबक्या मारताय किंवा मग मोदीजी आणि शहाजी या चित्रपटाचं प्रमोशन करत असतील. तर हे सर्व पाहता हा एक अतिशय प्रोपोगंडा असलेला चित्रपट वाटतो. आणि लोकांना असे चित्रपट आवडत नाही, ज्याच्या जाहिरातीतूनचं राष्ट्रीयत्व दिसून येतं.
"राजकारण्यांचा संबंध कट्टर हिंदूत्वाशी असल्याचं दिसतं. शिवाय, या चित्रपटाबाबत ऐतिहासिक तथ्यही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. लोकांना या चित्रपटात रस नसण्याचं हे देखील एक कारण आहे."
56 वर्षीय अभिनेता जर 26 वर्षांच्या भूमिकेत
चित्रपटाच्या अपयशाचं तिसरं कारण सांगताना रामचंद्रन म्हणतात, "आता लोक जागरूक झालेत. एक काळ असा होता जेव्हा लोक जितेंद्र आणि धर्मेंद्र यांना कॉलेज स्टुडंट समजायचे. हे हिरो 40 वर्षांचे होऊनही कॉलेजच्या तरुणांची भूमिका करायचे. अमीर खानने 3 इडियट्समध्येही कॉलेज स्टुडंटचा रोल केला होता. तसं बघितलं तर आमीर कॉलेज स्टुडंट वाटलासुद्धा. पण आजच्या प्रेक्षकांना सिनेमात रिअॅलिटी बघायची आहे. जर 56 वर्षांचा अभिनेता 26 वर्षांच्या भूमिकेत राहिला, तर लोकांना त्यात विचित्रपणा नक्कीच जाणवेल.
"आणि अक्षयला इंडस्ट्रीत बरीच वर्षे झाली आहेत. तो इंडस्ट्रीत आला तेव्हा 26 वर्षांचा होता, कदाचित त्यावेळी तो या भूमिकेत फिट बसला असता, पण आता हे शक्य नाही. ही भूमिका एखादया तरुण अभिनेत्याने करायला हवी होती, असं प्रेक्षकही म्हणत आहेत. आपल्या इंडस्ट्रीतल्या बड्या कलाकारांनी काही वेगळ्या भूमिका साकारण्याची गरज आहे हे मान्य करायला हवं."
अभिनेत्यांच्या वयाबद्दल आणि त्यांनी निवडलेल्या भूमिकांबद्दल रामचंद्रन श्रीनिवासन म्हणतात की, "अलीकडेच अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही कबूल केलं की, मेरी कॉम या चित्रपटात नॉर्थ ईस्टची मुलगी असती तर तो चित्रपट अधिक चांगला झाला असता. कदाचित मी त्यांची ही संधी हिरावून घेतली."

फोटो स्रोत, MIB/India
"मला वाटतं प्रियंका जे काही बोलली ते खरंच आहे. आज सर्वांनाच माहिती आहे आणि तुम्हालाही समजत असेल की बरेचसे चित्रपट चालत नाहीयेत. अक्षयबद्दल बोलायचं झालं तर त्याचा बच्चन पांडे फ्लॉप ठरला होता. आणि आता सम्राट पृथ्वीराजने अपेक्षेपेक्षा ही कमी कमाई केली.
"या गोष्टी पाहता, लोकांना रिअॅलिटीच्या जवळ जायचंय हे आता उघड आहे. जेव्हा सम्राट पृथ्वीराजचा ट्रेलर लाँच झाला तेव्हा लोकांनी अक्षयच्या मिशीची तुलना थेट बाला या कॅरेक्टरशी केली. हाऊसफुल 3 मधल्या बालाची व्यक्तिरेखा कॉमिक होती. एक्सप्रेशन कदाचित तेच असल्यामुळे लोकांनी हाऊसफुल 4 येतोय असं म्हटलं. लोक सोशल मीडियावर मजा घेत ट्रोल करत आहेत."
सम्राट पृथ्वीराज या चित्रपटात अक्षय कुमार सोबतच मानुषी छिल्लर संयोगिताच्या भूमिकेत आहे. अभिनेता संजय दत्त काका कान्हाच्या भूमिकेत तर अभिनेता सोनू सूद चांदवरदाईच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








