सम्राट पृथ्वीराज चौहान : एक ना अनेक कहाण्या; काय खरं, काय खोटं?

मोहम्मद गोरी आणि पृथ्वीराज चौहान

फोटो स्रोत, PUNEETBARNALA/BBC

फोटो कॅप्शन, मोहम्मद गोरी आणि पृथ्वीराज चौहान
    • Author, विकास त्रिवेदी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"मुलांनो, सामाजिक शास्त्राचं पुस्तक काढा. धडा दुसरा. आज आपण भारताच्या इतिहासाचा टर्निंग प्वाईंट ठरणाऱ्या घटनेविषयी जाणून घेणार आहोत. धड्याचं नाव आहे 'नवे राजे आणि त्यांची राज्यं'… नीट वाचा आणि लक्षात ठेवा. यात महाराज पृथ्वीराज चौहान यांचीही गोष्ट आहे आणि दिल्लीचीही."

एनसीईआरटीच्या सातव्या वर्गात पृथ्वीराज चौहानांविषयी शिकवताना शिक्षक काहीशी अशीच सुरुवात करतात.

मात्र, शाळेत शिकवलेला हा इतिहास पुढे मोठं झाल्यावर लक्षात ठेवणं किती कठीण असतं याचं ताजं उदाहरण म्हणजे एका चित्रपटात महाराज पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणारा अक्षय कुमार हा अभिनेता.

'सम्राट पृथ्वीराज चौहान' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय म्हणतो, "दुर्दैवाने आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी फक्त दोन किंवा तीन ओळी लिहिलेल्या आहेत. आक्रमण करणाऱ्यांविषयी लिहिलं आहे. पण, आपल्या राजांविषयी दोन-दोन ओळीच लिहिलेल्या आहेत. आपले राजे-महाराजेही महान पराक्रमी होते.

त्यांचा इतिहास सर्वांसमोर आणा. सिनेमाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी ज्यावेळी मला गोष्टी सांगितल्या त्यावेळी मला जाणवलं की पृथ्वीराज चौहान यांच्या कितीतरी गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. मी त्यांना म्हणालो सुद्धा की डॉक्टर साहेब हे सर्व खरं आहे ना? काल्पनिक तर नाही?"

तेव्हा चला तर मग आपणही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की महाराज पृथ्वीराज चौहान यांच्याविषयीच्या कथा खऱ्या आहेत की काल्पनिक? शिलालेख आणि इतिहासाच्या पानांमध्ये पृथ्वीराज चौहानांविषयी काय सांगितलं आहे आणि त्यांच्या काही कथा-कहाण्यांना कल्पना म्हणणारे आणि त्यांना वास्तव मानणारे काय दावे करतात?

'पृथ्वीराज रासो'

चित्रपट, टेलिव्हिजनवरच्या मालिका, आजी-आजोबांच्या गोष्टी किंवा अगदी नातलगांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरसुद्धा तुम्ही महाराज पृथ्वीराज चौहान यांच्याविषयीच्या ज्या काही गोष्टी ऐकल्या आहेत त्या याच 'पृथ्वीराज रासो'तून उगम पावल्याची दाट शक्यता आहे.

'पृथ्वीराज रासो' एक दीर्घ काव्य आहे. आदिकाळात म्हणजेच सन 1000-1400 दरम्यान हे दीर्घकाव्य रचल्याचं मानलं जातं. हिंदी साहित्य चार भागांमध्ये विभागण्यात आलं आहे - आदिकाळ, भक्तीकाळ, रीतीकाळ आणि आधुनिककाळ. साहित्य इतिहासाच्या याच विकासक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्याला आदीकाळ म्हटलं जातं.

व्हीडिओ कॅप्शन, 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमातला इतिहास किती खरा, किती काल्पनिक?

'पृथ्वीराज रासो' या कवितेत महाराज पृथ्वीराज चौहान यांची गोष्ट सांगितलेली आहे. चंद बरदायी यांनी ही कविता रचल्याचं म्हटलं जातं.

ही कहाणी काहीशी अशी आहे, "पृथ्वीराज अजमेरचे महाराज सोमेश्वर यांचे पुत्र होते. दिल्लीचे महाराज अनंगपाल यांची कन्या कमला यांच्याशी सोमेश्वर यांचा विवाह झाला. त्यांच्या दुसऱ्या मुलीचं लग्न कन्नौजचे महाराज विजयपाल यांच्याशी झालं. त्या दोघांचा पुत्र म्हणजे जयचंद. अनंगपाल यांनी पृथ्वीराज या नातवाला दत्तक घेतलं.

यामुळे जयचंद दुखावला. यानंतर जयचंदने एक यज्ञ आयोजित करून कन्या संयोगिता हिचा स्वयंवर ठेवला. पृथ्वीराज या यज्ञाला गेले नाहीत. यामुळे संतापलेल्या जयचंदने पृथ्वीराज यांची मूर्ती सभागृहाच्या प्रवेशद्वारावर ठेवली. संयोगिताला पृथ्वीराज आवडायचे. तिने प्रवेशद्वारावर ठेवलेल्या मूर्तीला हार घालून प्रेमाची कबुली दिली. यानंतर पृथ्वीराजांनी लढाई करून संयोगिताला दिल्लीला आणलं."

पृथ्वीराज चौहान

फोटो स्रोत, PUNEETBARNALA/BBC

फोटो कॅप्शन, पृथ्वीराज चौहान

पृथ्वीराज रासोनुसार, "पृथ्वीराज यांचं संयोगितावर विशेष लक्ष असायचं. याच दरम्यान मोहम्मद घोरीने चढाई केली. पृथ्वीराज यांनी घोरीला पराभूत केलं आणि नंतर सोडून दिलं. घोरी पुन्हा चालून आला आणि पृथ्वीराज यांना कैद करून गझनीला घेऊन गेला. त्यांच्या मागोमाग कवी चंद बरदायीदेखील पोहोचले. चंद यांच्या इशाऱ्यावरून पृथ्वीराज चौहान यांनी शब्दभेदी बाण चालवून आधी घोरीला ठार केलं आणि नंतर एकमेकांना मारून मरण पावले."

पृथ्वीराज रासोतली ही गोष्ट लोककथांमधूनही दिसून येते. मात्र, काहींच्या मते ही गोष्ट नसून वास्तव आहे. मात्र, हिंदी साहित्यातील अनेक सुप्रसिद्ध अभ्यासक आणि इतिहासकारांचा यावर विश्वास नाही.

'पृथ्वीराज रासो' कधी रचण्यात आलं?

आचार्य रामचंद्र शुक्ल हिंदी साहित्याचे इतिहासकार आणि गाढे अभ्यासक होते. 1884 साली त्यांचा जन्म झाला आणि 1941 साली त्यांचं निधन झालं.

'हिंदी साहित्य का इतिहास' या आपल्या पुस्तकात आचार्य शुक्ल लिहितात, "पृथ्वीराज रासोतली वर्षं (संवत) ऐतिहासिक तथ्यांशी जुळत नाही. त्यामुळे पृथ्वीराज यांच्या काळातच ते रचण्यात आलं का, याविषयी साशंकता आहे. याच कारणांमुळे अनेक अभ्यासकांनी पृथ्वीराज रासो सोळाव्या शतकात (सन 1500-1600) लिहिण्यात आलेला बनावट ग्रंथ असल्याचं म्हटलं आहे. रासोमध्ये चंगेज, तैमूर यासारख्या नंतरच्या काळातील काही शासकांची नावं आहेत. त्यामुळेही संशय बळावतो."

एका ऐतिहासिक वास्तवाच्या माध्यमातून आचार्य शुक्ल यांचं म्हणणं जाणून घेऊया.

1177 ते 1192 हा पृथ्वीराज चौहान यांच्या राजवटीचा काळ. तेव्हा चंद बरदायी किंवा त्यांची मुलं 'पृथ्वीराज रासो'मध्ये जवळपास 200 वर्षांनंतर आलेल्या तैमूरचा उल्लेख कसा करू शकतात?

आचार्य रामचंद्र शुक्ल

फोटो स्रोत, BOOKCOVER

फोटो कॅप्शन, आचार्य रामचंद्र शुक्ल

प्रसिद्ध इतिहासकार आणि हिंदी लेखक रायबहादूर पंडीत गौरीशंकर हिराचंद ओझा यांनीदेखील 'पृथ्वीराज रासो'ला काल्पनिक साहित्य म्हटलं आहे.

आचार्य शुक्ल लिहितात, "पृथ्वीराज यांच्या राजसभेतील काश्मिरी कवी जयानक यांनी संस्कृतमध्ये 'पृथ्वीराज विजय' हे काव्य रचलं होतं. मात्र, हे संपूर्ण काव्य उपलब्ध नाही. या 'पृथ्वीराज विजय'मधील घटना इतिहासानुसार अचूक वाटतात. यात पृथ्वीराज यांच्या आईचं नाव कर्पूरदेवी आहे. हांसीच्या शिलालेखांमध्येही हा उल्लेख आढळतो."

हांसी हरियाणातील हिस्सार जिल्ह्यात येतं. महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या किल्ल्यामुळेही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. इथे आढळलेल्या शिलालेख किंवा दानपत्र आणि नाण्यांचा 'पृथ्वीराज रासो'मधील वर्षांशी (संवत) मेळ बसत नाही.

उदाहरणार्थ चंद बरदायी यांनी पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यातील युद्धाविषयी संवत 1115 म्हणजेच 1080 साली लिहिलं. मात्र, शिलालेख आणि फारसी इतिहासानुसार घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यात 1191 साली युद्ध झालं. भारतीय इतिहासातील पुस्तकातही हेच वर्ष नमूद करण्यात आलं आहे.

'पृथ्वीराज रासो'च्या समर्थनार्थ आणि विरोधातील दावे

'पृथ्वीराज रासो'च्या समर्थनार्थही अभ्यासकांनी मंत मांडली आहेत. मात्र, त्याआधी शक संवत, विक्रम संवत आणि इंग्लिश कॅलेंडर यांच्यात काय फरक आहे, हे जाणून घ्यायला हवं.

शक संवत इंग्लिश कॅलेंडरहून 78 वर्षं मागे तर विक्रम संवत 57 वर्षं पुढे आहे.

पंडित मोहनलाल विष्णूलाल पंड्या, बाबू श्याम सुंदर दास आणि डॉ. दशरथ शर्मा हिंदीचे गाढे अभ्यासक मानले जातात. 'पृथ्वीराज रासो' वास्तव असल्याचं यांचं म्हणणं आहे.

पृथ्वीराज यांची कचेरी, ठिकाण - भिवानी, हरियाणा

फोटो स्रोत, HARYANAGOV

फोटो कॅप्शन, पृथ्वीराज यांची कचेरी, ठिकाण - भिवानी, हरियाणा

पंड्या यांच्या मते, "पृथ्वीराज रासोमध्ये संवतचा फरक 90-91 वर्षांच्या फरकाच्या नियमानुसार आहे आणि हा फरक चुकून नव्हे तर जाणीवपूर्वक ठेवण्यात आला आहे."

आपली बाजू मांडताना पंड्या पृथ्वीराज रासोतील एका ओळीचा हवाला देतात.

"एकादस सै पंचदह विक्रम साक अनंद…" यात साक अनंदचा अर्थ शून्य आणि नंद म्हणजे 9 म्हणजेच 90 रहित विक्रम संवत असा आहे.

मात्र, अचानक 90 वर्षं कसे कमी केले, असा सवाल आचार्य शुक्ल आणि इतर अभ्यासक विचारतात.

आचार्य शुक्ल त्यांच्या पुस्तकात लिहितात, "नंदवंशी क्षूद्र होते आणि म्हणून त्यांच्या राजवटीचा काळ राजपूतांनी वगळला, हा पंड्या यांनी केलेला दावा केवळ काल्पनिक आहे. कारण आजवर कुठूनही कुठल्याही प्रचलित विक्रम संवतातून काही वर्ष वगळण्यात आल्याचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही. एखाद्या समकालीन कवीने पृथ्वीराज रासोची रचना केली असती तर त्याचे थोडेथोडकेच अंश सापडले असते."

डॉ. नागेंद्र आणि डॉ. हरदयाल यांनी संपादित केलेल्या 'हिंदी साहित्य' या पुस्तकातही याबाबत अधिक माहिती मिळते.

या पुस्तकात म्हटलं आहे, "पृथ्वीराज रासोमध्ये अरबी-फारसी शब्दांचा वापर आढळतो, असाही एक दावा तो बनावट असल्याचं मानणारे करतात. मात्र, कवी चंद बरदायी हे मूळचे लाहोरचे होते आणि तो भाग मुस्लिमांच्या प्रभावाखाली आलेला होता. त्यामुळे भाषेत अरबी-फारसी शब्द येणं अपरिहार्य असल्याचं म्हणत रासो समर्थक हा दावा फेटाळतात."

असं असूनही केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहता 'पृथ्वीराज रासो'मधील घटनांचा इतिहासाशी मेळ बसत नसल्याचं बहुतेक अभ्यासकांना वाटतं.

'पृथ्वीराज रासो'चा लेखन काळ आणि वाद

ही सगळी पार्श्वभूमी बघता एवढं दीर्घ 'पृथ्वीराज रासो' कुणी लिहिलं आणि कधी लिहिलं, असा प्रश्न तुमच्या मनात उद्भवू शकतो.

गौरीशंकर ओझा यांच्या मते, "पृथ्वीराज रासो 1600 विक्रम संवत म्हणजे 1545 साली लिहिलेलं आहे. म्हणजेच पृथ्वीराज चौहान यांच्या शासन काळाच्या 351 वर्षांनंतर."

आचार्य शुक्ल लिहितात, "पृथ्वीराज यांचे पुत्र गोविंदराज किंवा हरिराज यांच्या कुणा वंशजाकडे चंद नावाचा कुणी भट कवी असावा ज्याने त्यांचे पूर्वज पृथ्वीराज यांच्या शौर्याविषयी लिहिलं असावं, असं वाटतं. हे सगळं त्या काळातलं असल्याचं मानत रासो या नावाने ही इमारत उभारली असावी."

तज्ज्ञांच्या मते भाषेच्या पातळीवरदेखील 'पृथ्वीराज रासो'त तथ्य आढळत नाही. रासोतली भाषा काही ठिकाणी आधुनिक वाटते तर काही ठिकाणी प्राचीन, असंही सांगितलं जातं.

मात्र, पृथ्वीराज रासोमध्ये 12 व्या शतकातली संयुक्ताक्षरमय अनुस्वारांत भाषा आढळते आणि त्यामुळे हा बाराव्या शतकातील ग्रंथ असावा, असं वाटत असल्याचं हजारी प्रसाद द्विवेदी यांचं म्हणणं होतं.

विश्वनाथ त्रिपाठी हे आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी यांचे शिष्य आणि हिंदीतले एक सुप्रसिद्ध अभ्यासकही आहेत.

'हिंदी साहित्य का सरल इतिहास' या आपल्या पुस्तकात विश्वनाथ त्रिपाठी लिहितात, "पृथ्वीराजांचा निर्मिती काळ आणि त्याचं मूळ स्वरूप हे सर्वाधिक वादग्रस्त आहे आणि म्हणूनच रासोची तारीख, व्यक्तींची नावे आणि घटना यांचा इतिहासाशी मेळ बसत नसल्याचं लक्षात आल्यावर डॉ. बूलर यांनी ते प्रकाशित न करण्याची शिफारस केली."

पृथ्वीराज चौहान

फोटो स्रोत, TWITTER/MIB_INDIA

फोटो कॅप्शन, पृथ्वीराज चौहान

हे तेच डॉ. बूलर आहेत ज्यांना 1875 साली काश्मीरमधून जयानक भट्ट यांनी संस्कृतमध्ये लिहिलेलं 'पृथ्वीराज विजय' मिळालं होतं. 'पृथ्वीराज विजय'मध्ये पृथ्वीराज चौहानांविषयी जी माहिती मिळते ती इतिहास आणि तारखांनुसार वास्तवाच्या अधिक जवळची वाटते.

'पृथ्वीराज रासो'चा प्रसार करण्याचं श्रेय ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी आणि इतिहासकार स्कॉलर कर्नल जेम्स टोड यांनाही जातं. कर्नल टोड राजस्थानात तैनात होणाऱ्या अगदी सुरुवातीच्या ब्रिटीश अधिकाऱ्यांपैकी एक होते.

1829 सालच्या 'Annals and Antiquities of Rajasthan' या आपल्या पुस्तकात त्यांनी 'पृथ्वीराज रासो'तील गोष्टीचाही समावेश केला आहे. शिवाय, पृथ्वीराज चौहान यांचा 'अंतिम हिंदू शासक' असा शब्दप्रयोगही अनेकदा केलेला आहे.

पृथ्वीराज चौहान : सत्य काय आहे?

'पृथ्वीराज रासो'च्या खरेपणावरच साशंकता असेल तर पृथ्वीराज चौहानांविषयी खरी माहिती कोणती, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं उत्तर इतिहासकार आणि 'पृथ्वीराज विजय' यांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

सतिश चंद्र मध्ययुगीन भारताचे सुप्रसिद्ध इतिहासकार मानले जातात. त्यांनी 'मध्यकालीन भारत' या आपल्या पुस्तकात महाराज पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी लिहिलं आहे.

या पुस्तकातील पाचव्या अध्यायात सतिश चंद्र लिहितात, "गुजरातमधील राजांच्या अधिपत्याखाली राहिलेल्या चौहानांनी दहाव्या शतकाच्या शेवटच्या वर्षात नदौल येथे राजधानी वसवली. याच वंशातील विग्रहराज या शासकाने चित्तोढवर कब्जा करत अजयमेरू म्हणजेच अजमेर शहर वसवलं. विग्रहराज यांनी 1151 साली तोमरांच्या तावडीतून धिल्लिका म्हणजेच दिल्ली काबीज केली.

चौहान राजांमध्ये सर्वांत प्रसिद्ध राजा होते पृथ्वीराज तृतीय. ते 1177 सालच्या आसपास गादीवर बसले. त्यांनी तात्काळ साम्राज्य विस्ताराचं धोरण स्वीकारत अनेक छोटी राजपूत राज्यं जिंकून घेतली. गुजरातच्या चालुक्य राजाविरोधातल्या संघर्षात त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे ते गंगेच्या खोऱ्याकडे वळले."

पृथ्वीराज चौहान

फोटो स्रोत, TWITTER/MIB_INDIA

फोटो कॅप्शन, पृथ्वीराज चौहान

सतिश चंद्र आपल्या पुस्तकात सांगतात, "पृथ्वीराज यांनी बुंदेलखंडची राजधानी महोबाविरोधात मोहीम उभारली. याच संघर्षात आल्हा आणि ऊदल हे दोन प्रख्यात वीर ठार झाले." मात्र, प्रचलित लोककथा आणि महोबामध्ये आजही जे आल्हा खंड सांगितलं जातं त्यात पृथ्वीराज यांच्यासोबतच्यात लढाईत ऊदल ठार झाला होता आणि त्याचा सूड उगवण्यासाठी आल्हाने महाराज पृथ्वीराज चौहानांशी युद्ध केलं आणि त्यात त्यांचा पराभव करून गुरूंच्या सांगण्यावरून त्यांना जीवदानही दिलं, असं नमूद आहे.

पुस्तकात लिहिलं आहे, "कन्नौजचे राजे जयचंद यांनी या संघर्षात महोबाच्या चंदेल राजाला मदत केली होती. दिल्ली आणि पंजाबची सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नांचा गहडवाल राजांनीही मुकाबला केला होता. याच वैरामुळे पंजाबमधून गझनवींना हुसकावून लावण्यात राजपूर राजे एकत्र येऊ शकले नाही."

हे तेच राजे जयचंद होते ज्यांच्याविषयी 'पृथ्वीराज रासो'मध्ये अनेक कारणांवरून पृथ्वीराज यांचं त्यांच्याशी वैर असल्याचं सांगितलेलं आहे.

घोरी आणि पृथ्वीराज यांच्यात पहिलं युद्ध

अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून जवळपास 400 किमी अंतरावर एक प्रांत आहे - घोर.

याच प्रांतावरून शहाबुद्दीन मोहम्मद ऊर्फ मोईजुद्दीन मोहम्मद बिन साम याला मोहम्मद घोरी हे टोपणनाव पडलं. संपूर्ण भारत आजही शहाबुद्दीन मोहम्मदला याच नावाने ओळखतो.

मोहम्मद घोरी 1173 साली गझनीच्या गादीवर विराजमान झाले. 1178 साली घोरीने वाळवंटाच्या मार्गाने गुजरातमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा तो प्रयत्न फसला. मग घोरीने संपूर्ण तयारीनिशी 1190 पर्यंत लाहोर, पेशावर आणि सियालकोटवर कब्जा केला.

इकडे चौहान राजांची ताकदही वाढली होती. त्यांनी चढाई करून आलेल्या अनेक तुर्की राजांना पराभूत करून किंवा ठार करून हुसकावून लावलं होतं.

सिक्के

फोटो स्रोत, OBJECTS OF TRANSLATION BOOK

तिकडे काळ दोन विस्तारवादी राजांची वाट बघत होता. मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात 1191 साली तराईनमध्ये (कर्नाल, हिरयाणा) पहिला संघर्ष झडला. दोघांनीही तबरहीनवर (भटिंडा) दावा केला आणि यावरून ही लढाई झाली.

इतिहासकारांच्या मते पृथ्वीराज चौहानांच्या सैन्यापुढे मोहम्मद घोरीच्या सैन्याचा निभाव लागला नाही. मोहम्मद घोरीचा जीवही एका तरुण शिपायाने वाचवला. पृथ्वीराज चौहान यांनी तबरहीनच्या दिशेने आगेकूच केली. तब्बल 12 महिन्यांच्या घेराबंदीनंतर त्यांनी तबरहीनवर विजय मिळवला. पृथ्वीराज यांनी पंजाबमधून मोहम्मद घोरीच्या सैन्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला नाही.

त्यामुळे मोहम्मद घोरी दुसऱ्या युद्धाच्या तयारीला लागला.

1192 सालचे तराईन युद्ध : पृथ्वीराज चौहानांचं काय झालं?

1192 सालचं हे युद्ध भारताचा इतिहास बदलणार होतं.

मोहम्मद घोरी 1 लाख 20 हजार सैनिकांसह चढाई करून आल्याचं बोललं जातं. त्याच्याजवळ एक भव्य घोडदळ असलेलं सैन्य आणि 10 हजार घोडेस्वार धनुर्धर होते.

इतिहासकार सतिश चंद्र लिहितात, "पृथ्वीराज यांच्या यापूर्वीच्या विजयात त्यांचा सेनापती असलेला स्कंद एका वेगळ्या युद्ध मोहिमेवर होता. पृथ्वीराज यांना घोरीच्या संकटाचा अंदाज येताच त्यांनी इतर राजांना मदत मागितली. अनेकांनी मदत केली. केवळ महाराज जयचंद यांनी नकार दिला."

जयचंद यांनी महाराज पृथ्वीराज चौहान यांना मदत नाकारली, यामागंच कारण संयोगिताशी केलेलं लग्न नसून जुनं वैर असल्याचंही पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे जयचंद यांनी मदत नाकारली. यात काहीही विशेष नव्हतं.

पृथ्वीराज यांच्या भूमिकेत अक्षय कुमार

फोटो स्रोत, YRF/TRAILERGRAB

फोटो कॅप्शन, पृथ्वीराज यांच्या भूमिकेत अक्षय कुमार

सतिश चंद्र यांच्या मते, "पृथ्वीराज यांनी 3 लाखांचं सैन्य मैदानात उतरवलं. यात मोठ्या प्रमाणावर घोडेस्वार होते आणि 300 हत्ती होते. संख्येने भारतीय सैन्य जास्त होतं. मात्र, नेतृत्व मोहम्मद घोरीचं अधिक चांगलं होतं."

युद्धात मोठ्या प्रमाणावर भारतीय सैनिक ठार झाले.

सतिश चंद्र यांच्या मध्यकालीन भारताच्या पुस्तकात लिहिलं आहे, "पृथ्वीराज चौहान युद्धातून बचावले. मात्र, सिरसाजवळ पकडले गेले. तुर्की सैन्याने हांसी, सरस्वती आणि समाचे किल्ले सर केले. पुढे अजमेरवरही चढाई करत त्यावरही ताबा मिळवला. पृथ्वीराज यांना काही काळ अजमेरवर शासन करण्याची परवानगी देण्यात आली."

याचा पुरावा त्या काळातील नाण्यांवरही आढळतो. या नाण्यांवर एका बाजूला तारीख आणि 'पृथ्वीराज देव' कोरलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला 'श्री मोहम्मद साम' कोरलेलं आहे.

सतीश चंद्र यांच्या 'मध्यकालीन भारत' या पुस्तकात पान क्रमांक 68 वर लिहिलं आहे, "काही दिवसांनी पृथ्वीराज यांना कथित षड्यंत्राच्या आरोपावरून ठार करण्यात आलं. त्यांच्या जागी त्यांच्या मुलाला राजगादीवर बसवण्यात आलं. काही काळाने पृथ्वीराज यांचा मुलगा रणथंबोरला निघून गेला आणि तिथे एका नवीन सशक्त चौहान साम्राज्याची पायाभरणी केली. अशाप्रकारे दिल्लीचा भाग आणि पूर्व राजस्थान तुर्की शासकांच्या अधिपत्याखाली गेला."

तराईनच्या युद्धानंतर मोहम्मद घोरीने कुतुबुद्दीन ऐबक सारख्या सरदारांकडे दिल्लीचा कारभार सोपवून गझनीला परतला.

1194 साली तो पुन्हा भारतात परतला. यावेळी त्याचा सामना महाराज जयचंद यांच्याशी झाला. जयचंद जवळपास लढाई जिंकणार असतानाच एक बाण लागून त्यांचा मृत्यू झाला.

मोहम्मद घोरीने आपली शेवटची मोहीम 1206 साली खोखरीविरोधात राबवल्याचं इतिहासात नमूद आहे. या युद्धात मोठा रक्तपात झाला. मात्र, युद्धावरून गझनीला जाताना परतीच्या वाटेवर असणाऱ्याला घोरीची एका कट्टरपंथी मुस्लिमाने हत्या केली.

पृथ्वीराज चौहान : एक ना अनेक कहाण्या

महाराज पृथ्वीराज चौहान यांचा काळ म्हणजे हिंदी साहित्यातला आदीकाळ किंवा वीरगाथा काळ म्हणून ओळखला जातो. याचाच अर्थ त्याकाळी जे काही लिहिलं जात होते ते राजांच्या पराक्रमाचं वर्णन करण्यासाठी लिहिलं जात होतं.

तसंच भारतासारख्या विश्वास आणि आस्थेने भरलेली परंपरा असलेल्या देशात महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या कथा इथेच संपत नाही.

इतरही अनेक कागदपत्रांमध्ये महाराज पृथ्वीराज यांच्याशी संबंधित अनेक कथा आढळतात. मग ते काश्मीरमध्ये डॉ. बूलर यांना मिळालेला 'पृथ्वीराज विजय' असो किंवा 'ताज अल मासीर', 'तबकात-ए-नासिरी', 'पृथ्वीराज प्रबंध', 'प्रबंध चिंतामणी' आणि 'पुरातन प्रबंध संग्रह'.

प्रत्येक लिखित दस्ताऐवज पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी नवी गोष्ट सांगतो. उदाहरणार्थ प्रबंध चिंतामणी हे जैन दस्ताऐवज. महाराज पृथ्वीराज चौहान अनेक दिवस झोपायचे आणि हल्ला झाल्यास कुणी कितीही उठवण्याचा प्रयत्न केला तरी ते उठत नसतं, असं या प्रबंध चिंतामणीत म्हटलेलं आहे.

पृथ्वीराज चौहान

फोटो स्रोत, BBC/PUNEETBARNALA

फोटो कॅप्शन, पृथ्वीराज चौहान

टेक्सास विद्यापीठात इतिहासाच्या प्राध्यापिका असणाऱ्या प्रो. सिंथिया टॅलबोट यांनीही 'द लास्ट हिंदू एम्परर' हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकात प्रो. सिंथिया डॉ. बूलर यांना काश्मीरमध्ये मिळालेलं 'पृथ्वीराज विजय' हे पुस्तक सत्याच्या अधिक जवळ असल्याचं म्हणतात. खरंतर यात 1192 च्या पराभवाचा उल्लेख नाही. मात्र, या पुस्तकाचं नावच 'पृथ्वीराज विजय' असल्याने यात नमूद गोष्टी बरोबर वाटतात.

हसन निजामी यांनी लिहिलेल्या 'ताज-अल-मासीर' या फारसी दस्ताऐवजांमध्ये मोहम्मद घोरीला महान योद्धा म्हटलं आहे. यात 1191 च्या त्याच्या पराभवाविषयी काहीही लिहिलेलं नाही. मात्र, बंडखोरी केल्याने पृथ्वीराज चौहान यांना मृत्यूदंड सुनावण्यात आल्याचं नमूद केलेलं आहे.

मात्र, तथ्य पडताळून बघितल्यास फारसी दस्ताऐवजांमध्ये 'तबकात-ए-नासिरी' सत्याच्या अधिक जवळ असल्याचं जाणवतं. याचे लेखक मिनहाज सिराज जुनैनी सुशिक्षित कुटुंबातील होते आणि त्यांना इतिहासाचं उत्तम ज्ञानही होतं.

मिनहाज यांनी घोरीच्या अपयशांविषयीही लिहिलं आहे आणि पृथ्वीराज चौहान यांच्याकडून झालेल्या पराभवाविषयीदेखील लिहिलेलं आहे. मिनहाज यांच्या लेखनात हांसीचाही उल्लेख येतो. जिथून मिळालेले पुरावे अस्सल आहेत आणि काल्पनिक नसून वास्तव आहेत.

पुस्तकांच्या पलीकडचं जग

प्रो. सिंथिया लिहितात, "पृथ्वीराज चौहान या ऐतिहासिक पात्राक्विषयी माहिती मिळणं फार अवघड आहे. कारण त्याकाळातील खूप कमी गोष्टी आज उरल्या आहेत किंवा उपलब्ध आहेत."

मात्र, या सर्व ऐतिहासिक दस्ताऐवज किंवा पुस्तकांपासून दूर अजमेर येथील पृथ्वीराज स्मारकात महाराज पृथ्वीराज चौहान यांचा मोठा पुतळा उभारला आहे. त्यांच्या हातात धनुष्य आहे आणि ते घोड्यावर स्वार होऊन निशाणा साधत आहेत.

पुतळ्याखाली उभे असलेले लोक हात जोडून नमस्कार करताना दिसतात. यापैकी बहुतांश लोकांसाठी महाराज पृथ्वीराज चौहान यांच्याविषयी 'पृथ्वीराज रासो'मध्ये लिहिलेली आणि अक्षय कुमार अभिनित सिनेमात दाखवलेली प्रत्येक गोष्ट खरी आहे.

आपल्या मुलाखतीत अक्षय कुमारने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना इतिहासाची पुस्तकं नव्याने लिहिण्याचं आणि बॅलेन्स करण्याचं आवाहन केलं आहे.

आणखी एका मुलाखतीत त्याने 'सम्राट पृथ्वीराज चौहान' या सिनेमाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या सिनेमासाठी '18 वर्षं अभ्यास' केल्याबद्दल त्यांचं कौतुकही केलं आहे.

इतिहास आणि ऐतिहासिक नायक यांच्याशी निगडित तथ्यांवरून कायमच वाद होत आले आहेत. त्यात नवं काही नाही. मात्र, गरज आहे ते इतिहासाला वर्तमानातील निकष आणि नॅरटिव्हच्या चश्म्यातून न बघता केवळ इतिहासाच्याच आरशात बघण्याची.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)