'एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद भाजपमुळेच गेले,' संजय राऊत यांचे वक्तव्य #5मोठ्या बातम्या

व

विविध वृत्तपत्र आणि न्यूजपोर्टलवर आलेल्या महत्त्वाच्या बातम्या

1. 'एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद भाजपमुळेच गेले,' संजय राऊत यांचा सामनातून गौप्यस्फोट

"शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद हुकले ते फक्त भाजपने शब्द फिरवल्यामुळेच. तोच भाजप त्यांना महाशक्ती वाटत आहे", असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक' सदरात म्हटलं आहे.

राऊत लिहितात, "एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचं अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटना ठाम असते. श्री. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. ते नक्कीच झाले असते, पण त्यांचे मुख्यमंत्रिपद कोणी रोखले? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे.

"शिवसेनेचे चाळीसच्या आसपास आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. ते आधी सुरतला जाऊन राहिले. नंतर गुवाहाटीला पोहोचले. या सगळ्यांचे नेतृत्व शिंदे करत असले तरी या नाट्याचे खरे सूत्रधार भाजपचे दिग्दर्शक आहेत," हे शिंदे यांनीच उघड केले.

"भाजपची महाशक्ती आपल्या पाठीशी आहे अशी कबुलीच त्यांनी दिली. सुरतमधील 'ला मेरेडियन' हॉटेलात शिवसेना आमदारांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील भाजपचे लोक उपस्थित होते. गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा फुटीर आमदारांच्या सरबराईसाठी वापरण्यात आली," असं राऊत यांनी म्हटलंय.

"सुरतवरून हे बिऱ्हाड खास विमामाने आसामची राजधानी गुवाहाटी येथे हलवण्यात आले. आसामच्या भाजप सरकारने या बिऱ्हाडाची सर्व व्यवस्था केली. या सर्व प्रकरणाशी जर भाजपचा संबंध नव्हता, हा शिवसेनेचा अंतर्गत मामला होता, तर मग या बिऱ्हाडाची इतकी कडेकोट व्यवस्था कारण काय?," असा सवाल संजय राऊत यांनी केला.

2. राष्ट्रपतीपदासाठी मुर्मू यांना 'बसप'चा पाठिंबा; मायावती यांची घोषणा

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने (बसप) घेतला आहे, ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

द्रौपदी मुर्मू

फोटो स्रोत, IPRD

पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी लखनौत सांगितले, की आमचा पक्ष राष्ट्रपती निवडणुकीबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. आमच्या पक्षाच्या चळवळीत आदिवासी समाजाला विशेष स्थान आहे. पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत असा निर्णय आम्ही घेत आहोत.

मायावती यांनी सांगितले, की आदिवासी समाजातील सक्षम व मेहनती महिला देशाच्या राष्ट्रपतिपदी असाव्यात म्हणून बसपने मुर्मू यांना पाठिंब्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, त्या कोणत्याही दबावाशिवाय काम करू शकतील का, हे आगामी काळच सांगेल. कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या सरकारने आदिवासींच्या हितासाठी योग्य निर्णय घेतला, तर बसपला मोठे मोल चुकवावे लागले तरी आम्ही दबाव, भीती न बाळगता विनासंकोच पाठिंबा देतो.

3. इंग्लंडला दौऱ्यावर असलेल्या रोहित शर्माला कोरोनाची लागण

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. 1 जुलै रोजी इंग्लड विरुद्ध भारताचा कसोटी सामना आहे. या सामन्यासाठी रोहित खेळू शकेल का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रोहित शर्मा

फोटो स्रोत, LAKRUWAN WANNIARACHCHI/AFP/Getty Image

फोटो कॅप्शन, रोहित शर्माने दुसऱ्या टी-20 सामन्यात वेगवान शतक ठोकलं

सध्या भारतीय टीम इंग्लड दौऱ्यावर आहे. भारतीय टीमच्या वैद्यकीय पथकाने सर्व खेळाडूंची रॅपिड अॅंटिजन टेस्ट घेतली त्यात रोहित शर्मा हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून तो आता आयसोलेशनमध्ये आहे. ही बातमी अमर उजालाने दिली आहे.

4. राज्यात तलवारींचा साठा जप्त

राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणतेही विघ्न घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा हायअलर्ट झाली आहे, आयबीएन लोकमतने ही बातमी दिली आहे.

तलवार

फोटो स्रोत, Getty Images

मात्र अशातच राजकीय तणावपूर्ण वातावरणात जालना शहरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत विविध प्रकारच्या 9 धारदार तलवारी आढळून आल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाल्मिकनगर परिसरात छापा मारून पोलिसांनी तलवारीचा मोठा साठा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली होती.

5. अब्दुल सत्तार आज मतदारसंघात परतणार

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत शिवसेनेचे 35 पेक्षा अधिक आमदार सोबत नेले आहे. गेल्या आठवड्याभरापासून आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीतील एका हॉटेलमध्ये हे आमदार थांबले आहेत.

दरम्यान पहिल्यांदाच या आमदारांपैकी एक आमदार आपल्या मतदारसंघात परतणार आहे. विशेष म्हणजे फक्त परतणारच नाही तर शिंदे गटात सामील झाल्याचा शक्तिप्रदर्शन सुद्धा केला जाणर आहे.

सिल्लोडचे आमदार तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे हेलिकॉप्टरने आज आपल्या मतदारसंघात परतणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला असून, त्यासाठी पोलिसांकडे परवानगी सुद्धा मागीतीली असल्याचे बोलले जात आहे, अशी बातमी एबीपी माझाने दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)