एकनाथ शिंदे बंड : गुलाबराव पाटलांनी शिवसैनिकांना 'असा' दिला गुंगारा, मंत्रालयातून पळाले ते थेट गुवाहाटी गाठली

गुलाबराव पाटील

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्राचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे स्वत:ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मानणारे आणि कट्टर शिवसैनिक म्हणवून घेत असत. विधिमंडळात विरोधकांना तितक्याच आक्रमकपणे उत्तर देणारे नेते म्हणूनही ओळखले जातात.

मात्र, शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडात तेही सामिल झाले आहेत. शिवसैनिकांच्या हातावर तुरी देत गुलाबराव पाटलांनी मुंबईतून गुवाहाटी गाठलीय.

गेल्या चार दिवसांमध्ये गुलाबराव पाटलांनी घेतलेली भूमिका सर्वांनाच कोड्यात टाकणारी आहे.

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातलं आजवरचं सर्वात मोठं केलं आणि राज्यात विशेषतः शिवसेनेत खळबळ उडाली.

मुंबईत राहिलेल्या नेत्यांनी या बंडाच्या विरोधात भाषा केली, तर काहींनी सावध भूमिका घेतली. गुलाबराव पाटीलही सावध भूमिका घेत होते. पण नंतर मात्र गुलाबराव पाटील थेट गुवाहाटीला जाऊन पोहोचले.

नितीन देशमुख, कैलास पाटील या दोन शिवसेना आमदारांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी किती 'त्रास' झाला याचं वर्णनही केलं.

हे सगळं ऐकायला जितकं थरारक वाटतं, तितकं गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांचा प्रवासही थरारक आहे. एखाद्या सिनेमाला किंवा कादंबरीत शोभावं असे प्रकार करत हे आमदार मुंबईतून बाहेर पडले आहेत.

गुलाबराव पाटील त्यातलेच एक. त्यांचा गुवाहाटीला जाण्यासाठी शिवसैनिकांना कसा गुंगारा दिला, ते पाहूया.

गुलाबराव पाटील

फोटो स्रोत, Facebook/Gulabrao Patil

फोटो कॅप्शन, गुलाबराव पाटील

त्याचं झालं असं, मंगळवारी (21 जून) रात्री उशीरा गुलाबराव पाटील गायब आहेत आणि नॅाट रिचेबल झालेत, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्यांना मिळाली.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत पहिल्या दिवशी बंडखोरी करण्यामध्ये गुलाबराव पाटील नव्हते. त्यानंतर गुलाबरावांना यांना शोधण्यासाठी शिवसैनिकांना कामाला लावण्यात आलं.

दक्षिण मुंबईतील विभागप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी शोधमोहीम सुरू केली. शिवसेना आमदार सेंट रेजिसमध्ये होते. पण पाटील तिथे नव्हते. त्यांना रात्रभर शोधण्यात आलं. परंतु ते सापडले नाहीत.

बुधवारी (22 जून) सकाळी पाटील सरकारी बंगल्यावर असल्याची माहिती मिळाली. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ त्यांच्या बंगल्यावर पोहोचले.

पाटील यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेत पाटील यांनी सेना नेत्यांना मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे असं सांगितलं.

पाटील यांना भेटलेले सेना नेते नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "आम्ही पाटील यांना मुख्यमंत्र्यांकडे चला असं सांगितलं. पण ते म्हणाले मला मंत्रालयात काम आहे. सिडकोत काम आहे."

त्यानंतर पाटील मंत्रालयात गेले. तिथे त्यांनी आपली सरकारी गाडी सोडून खासगी गाडीने मंत्रालय सोडलं.

कार्यकर्ते पाटील यांची वाट पहात होत. पण पाटील कुठेच सापडले नाहीत.

सेना नेते सांगतात, "गुलाबराव पाटील मंत्री आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे यावं अशी आमची इच्छा होती. पण त्यांनी आम्हाला मंत्रालयात काम असल्याचं खोटं सांगितलं. त्यानंतर ते नॅाट रिचेबल झाले. मग काहीच संपर्क होऊ शकला नाही."

पाटील वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांच्यावर आम्हाला जबरदस्ती करायची नव्हती. आम्ही विनंती करायला गेलो होतो.

पण त्यांची इच्छा असेल तर आम्ही काय करणार. त्यानंतर पाटील बुधवारी रात्री उशीरा गुवाहाटीला पोहोचले.

एकनाथ शिंदेंचं बंड

शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिलीय. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक मानले जातात. मात्र, त्यांच्याच बंडामुळे शिवसेना पक्षात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय.

एकनाथ शिंदेंचा ठाणे जिल्ह्यातल्या राजकारणात दबदबा आहे. किंबहुना, ठाण्यातील शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे असं समीकरण जवळपास तयार झालंय. त्यामुळे या बंडांच्या बातमीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, FACEBOOK

आधी राज्यसभेच्या निवडणुकीत आणि नंतर विधान परिषदेत महाविकास आघाडीला मिळालेल्या धक्क्यानंतर सावरण्याचा वेळ मिळतो न मिळतो तोच एकनाथ शिंदेंचा फोन नॉट रिचेबल आला.

सकाळ उजाडयाच्या आत बातम्या पसरल्या की एकनाथ शिंदे सुरतमध्ये आहे. त्यांच्यासोबत 11 आमदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक ठेवलेली असतानाच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मनसुब्यांचे तीन तेरा वाजवले.

सुरतहून एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटीत पोहोचले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 40 च्या वर आमदार असल्याचा दावा सुरुवातीला केला होता. पण काही दोन आमदार त्यांची साथ सोडून उद्धव ठाकरेंकडे परत आले.

दुसरीकडे, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत 21 आमदार असल्याचा दावा केला होता. पण नंतर खासदार विनायक राऊत यांनी 18 आमदार असल्याबाबत वक्तव्य केलं होतं. यामुळे आमदारांच्या एकूण संख्येबाबत संभ्रम होता.

मात्र, एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने पाठवलेल्या आमदारांच्या यादीनुसार शिवसेनेचे एकूण 37 आमदार त्यांच्यासोबत आहेत. तर 9 अपक्ष आमदारही सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. म्हणजे एकूण 46 आमदार आता शिंदे गटात असल्याचे दिसते आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)