You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदे यांना या बंडात भाजपची मदत, शरद पवारांची अप्रत्यक्षपणे टीका
एकनाथ शिंदे यांच्या बंडात त्यांना भाजपची साथ असल्याची अप्रत्यक्ष टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "एकनाथ शिंदेंच्या व्हीडिओत त्यांना एका राष्ट्रीय पक्षाची मदत असल्याचा उल्लेख आहे. कोणता राष्ट्रीय पक्ष शिंदेंसोबत आहे, हे सांगायची गरज नाही. देशात भाजप, बसपा, काँग्रेस, सपा, सीपीआय, सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस हे अधिकृत राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यामुळे मग यात कुणाचा हात आहे, हे सांगायची गरज नाही," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"आमदार परतले की वस्तुस्थिती स्पष्ट करतील. सगळे आमदार परत येतील याची मला खात्री आहे. त्यानंतर गुवाहाटीला जाण्याची कारणेही समोर येतील. बंडखोरांना इथं विधानसभेच्या प्रांगणात यावंच लागेल. आता विधानसभेत लढाई होईल. इथं आल्यावर भाजप बंडखोरांना मार्गदर्शन करेल असं वाटत नाही. मतदारसंघातही त्यांना तोंड द्यावं लागेल," असंही पवार म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडात भाजपचा एकही बडा नेता दिसला नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वेळापूर्वीच म्हटलं होतं.
याविषयी बोलताना पवार यांनी म्हटलं, "अजित पवारांनी स्थानिक परिस्थिती माहिती आहे. बाहेरची परिस्थिती त्यांना माहिती नाही."
दरम्यान, गुवाहाटी येथे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकमुखाने आपल्याबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांचे आभार मानून त्यांच्याशी संवाद साधला.
बंडाचा तिसरा दिवस
एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा तिसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
शिंदे गटानं 24 तासात परत यावं, असंही ते म्हणाले. वेगळा विचार करण्याची गरज असेल तर तेही करू, असंही राऊत म्हणाले.
कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांच्यासोबत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते.
यावेळी कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी आपल्या सुटकेची कथित कहाणी सांगितली. आपल्याला अंधारात ठेवून सुरतला नेण्यात आलं. पण वस्तुस्थिती समजल्यानंतर आपण तिथून काढता पाय घेतला, असा आशय दोघांच्याही वक्तव्यात दिसून आला.
यावर पत्रकारांनी दोघांना आणखी काही प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले. यावर संजय राऊत म्हणाले, "त्यांना जे सांगायचं होतं. ते त्यांनी सांगितलं. आता शेवटचा मिनिट मी घेतो. जे आमदार सध्या महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्यांनी हिंदुत्वाचा वगैरे मुद्दा उपस्थित केला आहे. या सर्व आमदारांची इच्छा आणि भूमिका असेल, की शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे आणि वेगळा विचार केला पाहिजे."
"या सर्व आमदारांची इच्छा असेल महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवं, त्यांनी आधी मुंबईत यावं, शिवसेना प्रमुखांसोबत बोलावं. इथं येऊन भूमिका मांडा. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल," असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
संजय राऊत असं का म्हणाले, हे मुख्यमंत्र्यांना विचारणार - अजित पवार
सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याबाबत महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बैठकीत घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
शरद पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
यावेळी संजय राऊत यांच्या वक्तव्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, संजय राऊत यांनी काय म्हणावं, हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी ते वक्तव्य का केलं असेल याची काही कारणे असू शकतात. पण त्यांनी तसं का म्हटलं, हे आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारू, असं अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने राऊत यांच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होईल असे वर्तन कोणताही सच्चा शिवसैनिक करणार नाही, असा मला विश्वास आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं की, "संजय राऊत यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचं वक्तव्य करण्याआधी महाविकास आघाडीच्या इतर सहयोगी पक्षांशी चर्चा करायला हवी होती. शिवसेना निश्चितपणे स्वतंत्र पक्ष आहे. उद्या जरी सरकार अडचणीत तरी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसायला तयार आहे."
शिवसेनेची नेमकी भूमिका काय, आम्हाला कळत नाही - पृथ्वीराज चव्हाण
कांग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, "शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे, आम्हाला कळत नाहीय. आमच्या नेतृत्वाशी आज काही बैठक झाली. काल असा काही मुद्दा मांडला नव्हता. शिवसेनेला पुन्हा भाजपसोबत जायचं आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं."
तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र हा शिवसेनेची अंतर्गत विषय असल्याचं म्हटलं आहे. शिंदेकडे असलेलं संख्याबळ निव्वळ दिखावा असून त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी परत यावं, असं आवाहन पटोले यांनी केलं आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले, "आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही शिवसेनेच्या पाठीशी आहोत. जर मुख्यमंत्र्यांना त्या पदावर राहायचं नाहीय आणि जर इतर कुणाला तिथे बसवायचा त्यांचा विचार आहे, तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही भाजपला सत्तेपासून दूर ठेवायला या सरकारमध्ये सामील झालो होतो. आम्हाला काही सत्तेचा फार मोह आहे, अशातला भाग नाही.""आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि त्यांच्यासोबतच राहू. पण जर त्यांना दुसऱ्या कुणासोबत युती करायची असेल तर आम्ही त्यात फार काही बोलणार नाही," असंही ते म्हणाले.
काँग्रेसचा महाविकास आघाडीला पाठिंबा कायम
काँग्रेस नेत्यांची एक बैठक मुंबईच्या सह्याद्री गेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण काही वेळ लवकर बाहेर पडले.
बैठकीविषयी माहिती देतना ते म्हणाले, बैठक अद्याप सुरू आहे. महाविकास आघाडीला काँग्रेसचा पाठिंबा कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)