उद्धव ठाकरेंचे एमआयएमकडून कौतुक, 'तुमचा नम्रपणा हीच तुमच्या आमदारांना चपराक' #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. तुमचा नम्रपणा हीच तुमच्या आमदारांना चपराक- एमआयएमने केलं ठाकरेंचं कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबूक लाइव्हमधून संवाद साधत बंडखोर आमदारांना समोरासमोर येऊन चर्चा करण्याचा सल्ला दिला.

गेले दोन दिवस सरकारसमोर राजकीय संकट उभं राहिलं आहे. एकनाथ शिंदे यांना एकामागोमाग एक आमदार जाऊन मिळू लागल्यावर हे संकट अधिकच गहिरे होत गेले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलेल्या भावनिक आवाहनाचं एमआयएमने कौतुक केलं आहे, 'तुमचा नम्रपणा हीच तुमच्या पक्षातल्या बंडखोरांना चपराक आहे.'

'तुमच्याबद्दल माझ्या मनात असलेला आदर वाढला,' असं कौतुक एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं आहे. ही बातमी सकासकाळने दिली आहे.

एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील असताना त्या जिल्ह्याच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणं हा एक वेगळ्याच चर्चेचा विषय झाला आहे.

2. मविआ म्हणजे सडलेलं फळ, ते पडायलाच हवं- उमा भारती

उद्धव ठाकरे यांचं सरकार संकटात आल्यावर आता त्यांच्यावर चौफेर टीका होत असल्याचं दिसून येत आहे. इतकं मोठं बंड झाल्यावर त्यांनी सत्ता सोडायला हवी अशीही चर्चा सुरू आहे. त्यातच भाजपा नेत्यांनीही सरकारवर टीका सुरू ठेवलीच आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनीही महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

त्या म्हणाल्या, "महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे सडकं फळ आहे, ते पडायलाच हवं. महाराष्ट्रात स्थापन झालेलं महाविकास आघाडी सरकार चुकीच्या पद्धतीनं स्थापन झालं आहे. कारण काँग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र होऊ शकत नाही. त्यामुळे ते सरकार हे सडकं फळ आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं, हाच त्यांचा एकमेव हेतू होता."

शिवसेनेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "महाविकास आघाडीमधील शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना नाहीये, ती काँग्रेसची बी टीम असलेली शिवसेना आहे. त्यामुळे हे सरकार पडायलाच हवं, कारण ते हिंदुविरोधी आणि महिलाविरोधी सरकार आहे. शिवसेनेनं आपलं नाव बदलून 'काँग्रेस सेना' ठेवावं"

ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.

3. मुख्यमंत्र्यांभोवतीचे बडवे वाईट- देवेंद्र भुयार

राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणूक या काळात अपक्ष आमदार देवेंद्र भुयार चांगलेच चर्चेत आले आहेत. संजय राऊत यांनी त्यांच्या मतदानावर शंका घेतल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर थेट टीका करायला सुरुवात केली.

गेल्या दोन दिवसांमध्ये शिवसेनेत बंड झाल्यानंतर भुयार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भोवती असलेल्या बडव्यांमुळे ही फूट पडली असं ते म्हणाले आहेत. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

ते म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणजेच आमचा 'विठ्ठल' चांगला आहे. मात्र त्यांच्या अवतीभवतीचे बडवे वाईट आहेत. शिवसेनेत याच बडव्यांमुळे फूट पडली आहे. हे बडवे मुख्यमंत्र्यांना कोणाशी भेटू देत नाहीत, कामे होऊ देत नाहीत."

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अवतीभवतीचे वातावरण आणि माणसं लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. आमचा विठ्ठल चांगला आहे, मात्र त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरलंय. त्या बडव्यांमुळेच मातोश्री बदनाम होत आहे, अशी टीका आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.

4. पक्ष चालवणं हे उद्धव ठाकरेंचं काम नाही- निलेश राणे

शिवसेनेत बंड झाल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ट्वीटरवरुन त्यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

"शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थीती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे 11/12 घेऊन IPL team साठी तयारी करा... मातोश्री 11 बनवा"

असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचं वर्षा निवासस्थान सोडल्यावरही निलेश राणे यांनी त्यांना टोला लगावलाय. ते ट्वीट मध्ये म्हणतात, 'दुसऱ्यांची घरं पाडणार्‍या व्यक्तीला आज नियतीने घर सोडायला लावले.'

5. विधिमंडळात शिवसैनिक नाही आमदार मतदान करतात- भाजपा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हमधून भावनिक आवाहन केल्यानंतर भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

विधिमंडळात शिवसैनिक नाही तर आमदार मतदान करतात याची आठवण भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना करुन दिली आहे. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

भातखळकर ट्वीटमध्ये लिहितात, "बहुमत गमावल्यानंतर भावनिक साद कसली? विधिमंडळात शिवसैनिक नाही आमदार मतदान करतात. पुरे झालं, जनता विटली आहे, खिशातला राजीनामा बाहेर काढा आता..."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)