एकनाथ शिंदे : शिवसेना फुटत असताना शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस एवढी शांत का?

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

एकनाथ शिंदे यांना पुरवण्यात येणाऱ्या लॉजिस्टिकबाबत खोलात जाण्याची गरज नाही, कोण त्यांना पोसतंय याबाबत आज काही बोलण्याची गरज नाही.

अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची हौस नाही, जर आमचं बहुमत गेलं तर आम्ही विरोधात बसू.

राष्ट्रवादीच्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही.

शरद पवार क्रायसीस मॅनेजमेंट कायम करत आले आहेत. पण आमदार ब्लॅक कॅट कमांडोच्या सुरक्षेत आहेत त्यात क्रायसिस मॅनेजमेंट काय करायचं?

हे सरकार वाचवण्याचाच आमचा प्रयत्न असेल.

आमचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा आहे.

ही सगळी वक्तव्यं आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची. मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेरसुद्धा त्यांनी तेच म्हटलं.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठला नेता पुढे येऊन एवढ्या स्पष्टपणे बोलला आहे. याआधी मंगळवारी सकाळी एकनाथ शिंदे यांचं बंड समोर आल्यानंतर शरद पवार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी मदत मागितली तर आम्ही देऊ असं म्हटलं होतं.

त्यानंतर मंगळवारी रात्री उशीरा पवार मुंबई पोहोचले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेतली. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर शरद पवार, सुप्रीया सुळे आणि इतर नेत्यांनी वर्षावर जाऊन त्यांची भेट घेतली.

त्यानंतर आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका सुरू आहेत. पण राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका असेल हे अजूनही स्पष्टपणे पुढे आलेलं नाही.

अडीच वर्षांपूर्वी जेव्हा अजित पवार यांनी बंड केलं होतं तेव्हा शरद पवारांनी सर्व सूत्र हातात घेऊन सर्व आमदारांना परत आणलं होतं आणि अजित पवारांचं बंड मोडून काढलं होतं. त्यावेळी अजित पवारांबरोबर गेलेले आमदार परत आणण्यात एकनाथ शिंदेंनीसुद्धा राष्ट्रवादीला मदत केली होती.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

पण त्याच एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मात्र राष्ट्रवादीकाढून फारशी हालचाल दिसत नाहीये. बैठका आणि भेटीगाठींपुढे त्यांचं राजकारण गेलेलं नाही.

एवढ्या वेगवान आणि धक्कादायक घडामोडी घडत असताना शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एवढी शांतता का आहे?

हाच प्रश्न आम्ही ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, "शिवसेनेतील बंड हाताबाहेर गेल्याचं शरद पवारांच्या लक्षात आलं आहे. याआधी 2019 मध्ये अजित पवारांनी बंड केलं होतं, ते थांबवण्यात शरद पवारांना यश आलं. कारण अजित पवार हे पवार कुटुंबीयांपैकीच एक आहेत. पण आता मात्र तसं नाहीये. एकनाथ शिंदे हे काही पवार कुटुंबाचा भाग नाहीयेत. तसंच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचं इक्वेशनही फारसं चांगलं नाहीये."

"दुसरं म्हणजे शरद पवारांबरोबर सत्तेत जायचं नाही, अशीच एकनाथ शिंदेंची भूमिका आहे. कारण शरद पवारांबरोबर सत्तेत गेल्यास ठाणे आणि इतर निवडणुकांमध्ये भारी पडेल, असंही शिंदेंना वाटत असावं. त्यामुळे मग हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असं महाविकास आघाडीतले घटक पक्ष सांगत आहेत," देसाई पुढे सांगतात.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राही भिडे यांच्या मते, "शरद पवार किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस काहीच करू शकत नाही. कारण त्यांच्याकडे नंबर्सच नाहीयेत, संख्याबळच नाहीये. त्यामुळे हे नेते चूप आहेत आणि अस्वस्थही आहेत. महाविकास आघाडीत शिवसेनेचे सगळ्यांत जास्त आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मिळून सरकार बनवू शकत नाही. त्यामुळे आता या पक्षांतील नेते शांत आहेत."

शरद पवार, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

राजकीय विश्लेषक दीपक भातुसे याविषयी बोलताना सांगतात, "एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा पूर्ण परिणाम दिसेपर्यंत तरी राष्ट्रवादी यात थेट काहीच भूमिका घेऊ शकत नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे असं शरद पवार बंडाच्या पहिल्या दिवशीच म्हणाले ते त्यामुळेच.

"कारण हे शिवसेनेचं अंतर्गत बंड आहे. ते शमवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून विविध मार्गाने प्रयत्न सुरू असणार. बुधवारी जाहीर आवाहन करून ठाकरेंनी पहिला प्रयत्न केलाय. त्यापुढे इतर मार्गानेही प्रयत्न होतील, या प्रयत्नांना यश येईल की नाही हे भविष्यात स्पष्ट होईल. पण तोपर्यंत यात राष्ट्रवादीने थेट काही भूमिका घेतली तर ते शिवसेनेसाठी अडचणीचं ठरू शकतं.

"राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर सत्तेत राहू नये, अशी भूमिका घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आहे. जर राष्ट्रवादीने यासंदर्भात काही भूमिका घेतली किंवा राष्ट्रवादीचे एखाद्या बड्या नेत्यानं एखादं विधान केलं आणि ते विधान एकनाथ शिंदे यांना किंवा बंड केलेल्या आमदारांना दुखवणारं असेल तर त्याचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांवर होऊ शकतो, याची कल्पना असल्याने कदाचित राष्ट्रवादीचे नेते शांत असतील.

"राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उघडपणे कोणतीही भूमिका जाहीर करत नसले तरी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना कशा पद्धतीने यश मिळू शकेल यासाठी आतून हालचाली करत असणार हे निश्चित."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)