You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे म्हणतात, मी आजच मुख्यमंत्रिपद सोडायला तयार, पण....
"मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे, पण पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला मान्य आहे," असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे फेसबुकद्वारे जनतेशी बोलले. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं.
"काँग्रेस-राष्ट्रवादीनं विश्वास ठेवला, पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेन तर काय करायचं?" असा भावनिक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "गायब झालेल्यांपैकी एकाने सांगितलं की, आम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर मी लगेच राजीनामा देतो. पण हे सगळं माझ्यासमोर येऊन बोला. गायब आमदारांनी इथं यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनात जावं. यात कुठेही आगतिकपणा नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी तर अजिबात नाही, कारण आजपर्यंत अशी अनेक आव्हानं बिनसत्तेची पेलली आहेत."
तसंच, "ज्या शिवसैनिकांना वाटत असेल, मी शिवसेनेचं नेतृत्त्व करायला नालायक आहे, तर हेही पद सोडायला तयार आहे. पण हे सांगायला विरोधक नको, शिवसैनिक हवा. कारण मी शिवसैनिकाला बांधील आहे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे -
- आजच सकाळी माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझा आवाज असा झाला आहे.
- शिवसेना आणि हिंदुत्त्व हे जोडलेले शब्द आहेत, एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही
- मला जे काही करायचं तेव्हा मी केलं. देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये आमची गणना झाली.
- मी काही वेगळे मुद्दे घेऊन आलो आहे.
- मुख्यमंत्री भेटत नव्हते हे गेल्या काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली. नंतरचे दोन तीन महिने शक्य नव्हतं. त्यानंतर आता मी भेटायला सुरुवात केली
- शिवसेना हिंदुत्वापाासून दूर होऊ शकत नाही, कारण शिवसेनाप्रमुखांनी मंत्र दिला आहे की, हिंदुत्व आमचा श्वास आहे.
- विधानसभवनात हिंदुत्त्वावर बोलणारा मी एकटा आहे.
- शिवसेना कोणाची आहे, काही जण भासवतात की ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्या वेळेला जे विचार होते आताही तेच विचार आहे.
- अडीच वर्षात जे मिळालंय, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेनंच दिलंय.
- एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचे फोन येतायत, आम्हाला परत यायचंय, असं म्हणतायेत.
- शिवसेनेचे आमदार गायब झाले. काही सुरत ला गेले मग गुवाहाटी ला गेले. काल परवा जी विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हा मी हॉटेलमध्ये गेलो होतो.
- बाथरुमला गेलो तरी शंका. शंकेला गेलो तरी लघुशंका, म्हणजे शंका, ही लोकशाही मला आवडत नाही
- मला कोणताही अनुभव नव्हता. वेगळा मार्ग पत्करावा लागला. त्यानंतर जे घडलं, पवार साहेबांनी एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की उद्धव तुला जबाबदारी घ्यावी लागेल. मी त्यांना सांगितलं की, महापौर झालो नाही, मग मुख्यमंत्री कसा होणार?
- राजकीय वळणं कसेही घेऊ शकतात. पण त्या वळणाला एक अर्थ पाहिजे. राजकारण रडकुंडीचा घाट नको.
- काँग्रेस-राष्ट्रवादीनं विश्वास ठेवला, पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेन तर काय करायचं?
- आजपर्यंत या सगळ्यांनी मला सहकार्य केलं आहे. प्रशासनाने कमाल केली आहे.
- आजसुद्धा कमलनाथने फोन केला, शरद पवारांनी विश्वास ठेवला, पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय करावं?
- त्यांच्यापैकी एकाने सांगितलं की आम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर मी लगेच राजीनामा देतो. हे सगळं माझ्यासमोर येऊन बोला.
- गायब आमदारांनी इथं यावं आणि माझ्या राजीनाम्याचं पत्र घेऊन राजभवनात जावं.
- कुठेही आगतिकपणा नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी तर अजिबात नाही, कारण आजपर्यंत अशी अनेक आव्हानं बिनसत्तेची पेलली आहेत
- ज्या शिवसैनिकांना वाटत असेल, मी शिवसेनेचं नेतृत्त्व करायला नालायक आहे, तर हेही पद सोडायला तयार आहे. पण हे सांगायला विरोधक नको, शिवसैनिक हवा. कारण मी शिवसैनिकाला बांधील आहे.
- मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे, पण पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला मान्य आहे.
- पदं येतात-जातात, आयुष्याची कमाई काय तर, पदावरून तुम्ही काय काम करता आणि त्यातून जनतेची प्रतिक्रिया, ही कमाई आहे.
- लोक म्हणतात की आम्हाला वाटतं की आमच्या कुटुंबातले वाटतात असं लोक म्हणतात . हीच माझ्या आयुष्याची कमाई आहे.
- एकदा मला समोर येऊन सांगा, एकदा ठरवूया, मी फेसबुक लाईव्ह पाहिलं ते सांगा, आम्हाला यायला संकोच वाटतो असं सांगा, मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे.
- संख्या किती कुणाकडे हा विषय गौण आहे. संख्या अधिक असते तो लोकशाही जिंकतो. मी ज्यांना माझे मानतो, त्यातल्या एकानं जरी माझ्याविरोधात मत दिलं तरी मला ते लाजिरवाणं असेल.
एकनाथ शिंदेंचं बंड
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाराष्ट्राचं राजकीय वातावरणच ढवळून काढलं आहे. एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक मानले जातात.
ठाणे जिल्ह्यातल्या राजकारणात एकनाथ शिंदेंचा दबदबा आहे. किंबहुना, ठाण्यातील शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे असं समीकरण जवळपास तयार झालंय. त्यामुळे या बंडांच्या बातमीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
आधी राज्यसभेच्या निवडणुकीत आणि नंतर विधान परिषदेत महाविकास आघाडीला मिळालेल्या धक्क्यानंतर सावरण्याचा वेळ मिळतो न मिळतो तोच एकनाथ शिंदेंचा फोन नॉट रिचेबल आला.
सकाळ उजाडयाच्या आत बातम्या पसरल्या की एकनाथ शिंदे सुरतमध्ये आहे. त्यांच्यासोबत 11 आमदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक ठेवलेली असतानाच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मनसुब्यांचे तीन तेरा वाजवले.
पुन्हा बातम्या येऊ लागल्या की एकनाथ शिंदेंसोबत 11 नाही तर 20 हून अधिक आमदार आहेत नंतर तो आकडा 30 च्या पार गेला. सुरतहून शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुवाहाटीत पोहोचले. तिथे पोहोचल्यावर एकनाथ शिंदेंनी आणखी एक धक्का दिला. ते म्हणाले, आमच्यासोबत 31 नाही तर 40-41 आमदार आहेत.
एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार -
ही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)