राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोरोनामुक्त; हॉस्पिटलमधून घरी सोडलं

भगतसिंह कोश्यारी

फोटो स्रोत, Twitter/Governor of Maharashtra

फोटो कॅप्शन, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोरोनामुक्त झाले असून, त्यांनी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.

राज्यपाल राजभवनात परतले असून, पुढील दोन दिवस भेटीगाठी टाळणार असल्याची माहिती राजभवन कार्यालयाने दिली आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. 40पेक्षा जास्त आमदारांचा शिंदेना पाठिंबा असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे.

एकीकडे शिवसेनेने 16 आमदारांना नोटीसा पाठवत आमदारकी रद्द होण्याची धमकी दिली आहे तर दुसरीकडे शिंदे गट वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी हालचालीही सुरु झाल्या असून शिंदे गटाकडून 'बाळासाहेब शिवसेना' हे नाव सुचवण्यात आले आहे. मात्र, शिवसेनेने या नावावर आक्षेप घेतला आहे. गद्दारांनी बाळासाहेबांचे नाव वापरु नये, असा इशारा बंडखोर आमदारांना देण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या या राजकीय घडामोडींमध्ये राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. भाजपा एकनाथ शिंदे गटासोबत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बडोदा इथे भेट झाल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिलं होतं.

राज्यपाल कोरोनामुक्त झाल्याने ते आता लोकांना भेटू शकतात. राज्यपालांची कोण भेट घेणार, काय दावा करणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कोश्यारी यांना एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. राज्यपालांचा अतिरिक्त कार्यभार अन्य राज्यपालांकडे देण्यात आला नव्हता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमदारांचा समूह मंगळवारी रात्री सुरतहून गुवाहाटीत दाखल झाला आहे. गुवाहाटी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

"आम्ही शिवसेना सोडलेली नाही, सोडणार नाही. बाळासाहेबांनी देशाला हिंदुत्वाचा विचार दिला, त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही", असं एकनाथ शिंदे यांनी सुरत विमानतळावर सांगितलं होतं.

"मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. शिवसेना आमदारांनी पक्षाविरुद्ध भूमिका घेतलेली नाही. हिंदुत्व आणि आनंद दिघेनचे विचार यांचा राजकीय फायद्यासाठी वापर कधीही करणार नाही", असं शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नेमके किती आमदार याविषयी सुरुवातीला स्पष्टता नव्हती. सुरत इथल्या हॉटेलमधला एक फोटो समोर आला होता. त्यातून आमदारांची मोठी फौज शिंदे यांच्याबरोबर असल्याचं स्पष्ट झालं.

सोमवारी संध्याकाळी मुंबईत सुरू झालेलं हे थरारनाट्य मंगळवारी सुरतमध्ये जाऊन पोहोचलं. सुरतमधल्या ली मेरेडियन हॉटेलात दिवसभर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत याचा अंदाज घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या वतीने मिलिंद नार्वेकर आणि फाटक यांना चर्चेसाठी सुरतला पाठवण्यात आलं. दरम्यान भाजपचे आमदार संजय कुटे हे याच हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. कुटे यांच्याबरोबरीने भाजप नेते मोहित कंबोज हेही या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांबरोबर असल्याचं दिसून आलं.

गुवाहाटी विमानतळावर पोहोचल्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, "आम्ही 40 आमदार आहोत, अजून 10 आमदार यामध्ये सहभागी होतील."

"एकनाथ शिंदे आमचे सहकारी आणि मित्र आहेत. अजूनही आम्ही त्यांचे वाट पाहतोय. आम्हाला खात्री आहे की, ते सर्व आमदारांसह परत येतील," असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

"आमदारांना परत यायचंय. पण येऊ दिलं जात नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशाप्रकारे राज्य आणू पाहत असेल, तर देशासाठी गंभीर बाब आहे. अमित शाह यांनी यात लक्ष घालून, देशाचे लोकप्रिय गृहमंत्री असल्याचे त्यांनी दाखवून द्यावं."

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेमानं मुंबईत यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू, असंही राऊत म्हणाले आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)