साई पल्लवीचं काश्मिरी पंडितांबाबत वक्तव्यावर स्पष्टीकरण, वाचा ती काय म्हणाली?

फोटो स्रोत, @Sai_Pallavi92
गोरा रंग, देखणं रूप, नितळ त्वचा अशा सौंदर्याच्या तथाकथित व्याख्यांना छेद देत आपल्या अभिनयाच्या जोरावर साऊथ फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी.
आपल्या स्वतःच्या टर्म्स आणि कंडिशन्सवर जगणारी ही अभिनेत्री तिने केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
साई पल्लवी तिच्या विराट पर्वम या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तिने एक मुलाखत दिली.
या मुलाखतीत ती म्हणाली, "द काश्मीर फाईल्स या सिनेमात काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला. धार्मिक वादावर बोलायचं झाल्यास गाईंची तस्करी करून घेऊन जाणाऱ्या मुस्लिम चालकाला मारण्यात आलं, जय श्रीराम या घोषणा देण्यात आल्या. काश्मीरमध्ये जे घडलं त्यात आणि मॉब लिंचिंगच्या घटनेत काय फरक आहे? दोन्ही घटना सारख्याच आहेत.''
तिच्या या वक्तव्यानंतर ती ट्रोल तर झालीचं, पण लगेचंच ती लोकांच्या सर्च लिस्टमध्ये ही आली होती.
साई पल्लवीचं स्पष्टीकरण
या प्रकरणानंतर दोन दिवसांनी साई पल्लवीने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं. आपल्या इन्स्टाग्रॅम पोस्टमध्ये ती म्हणाली,
"आज पहिल्यांदाच मी एखाद्या विषयावर स्पष्टीकरण देण्यासाठी तुमच्याशी संवाद साधत आहे. आज पहिल्यांदाच मी दोनवेळा विचार करून माझं म्हणणं मांडत आहे. कारण माझ्या वक्तव्याचा पुन्हा विपर्यास करण्यात येऊ नये, याची भीती माझ्या मनात आहे. त्यामुळे माझं म्हणणं लांबलचक वाटत असल्यास मला माफ करावं.
नुकतेच मला एका मुलाखतीत मी उजव्या विचारांची आहे की डाव्या विचारांची आहे, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावेळी मी तटस्थ आहे, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं.
कोणतेही विचार स्वीकारण्याआधी आपण एक चांगला माणूस असणं गरजेचं आहे, असं मी त्यावेळी म्हणाले होते. पुढे मुलाखतीत सविस्तर बोलत असताना मी दोन संदर्भ दिले. या दोन गोष्टींचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला होता.
खरं तर, काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर मला चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी बोलण्याची संधी मिळाली होती. तीन महिन्यांपूर्वी हा चित्रपट पाहत असताना त्यांची ती दशा पाहून पाहून मी विचलित झाले होते. या नरसंहाराच्या घटनेचा परिणाम त्यांच्या पुढच्या पीढ्यांवर झाला आहे, त्यांच्या वेदनांची मला कल्पना आहे. तसंच त्यावेळी मी कोव्हिड काळात झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांचाही उल्लेख केला होता. ते व्हीडिओ पाहूनही मला धक्का बसला होता.
हिंसा मग ती कोणत्याही स्वरुपात असो, ती चुकीची आहे, असं मला वाटतं. कोणत्याही धर्माच्या नावे होणारी हिंसा ही चुकीचीच आहे, इतकंच मला म्हणायचं होतं. पण नंतर काहीजण मॉब लिंचिंगचं ऑनलाईन समर्थन करत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं.
मला वाटतं, कुणाचाही जीव घेण्याचा अधिकार आपल्या कुणालाच नाही. वैद्यकीय पदवीधर असल्याने सगळे जीव समान आहेत, सगळेच जीव महत्त्वाचे आहेत, हे मला चांगलंच माहिती आहे.
असा दिवस येऊ नये की एखादा जीव जन्माला आला, पण त्याला त्याच्या ओळखीबाबत भीती वाटावी, अशी मी प्रार्थना करते.
14 वर्षांच्या माझ्या शालेय जीवनात मी सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझं माझ्या देशावर प्रेम आहे, ही प्रतिज्ञा मी रोज म्हणायचे. ही प्रतिज्ञा अजूनही माझ्या मनात खोलवर घर करून आहे. आपण शाळकरी मुलं असताना कोणत्याही प्रकारचा सांस्कृतिक किंवा जातीय भेदभाव करायचो नाही.
म्हणून मी काहीही बोलत असताना अतिशय तटस्थपणे बोलत असते. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास होत असल्याचं पाहून मला धक्का बसला.
अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, वेबसाईट यांनी पूर्ण मुलाखत न पाहता माझ्या बोलण्याचा विशिष्ट संपादित भाग काढून त्यावर टीका केली. यामुळे माझ्या वक्तव्याचा मूळ अर्थ निघून गेला.
यादरम्यान, काही लोक माझ्यासोबत ठामपणे उभे होते. त्यांचे मी आभार मानते. मी काय चुकीचं केलं असा विचार मी करत असताना हे लोक माझ्यासोबत असल्याचं पाहून मला बरं वाटलं. मी नेमकी काय आहे, हे त्यांना माहिती आहे, हे पाहून मला अभिमान वाटला. धन्यवाद. सर्वांना प्रेम."
घराबाहेर पडायला घाबरणारी साई आता मेकअपशिवाय करते सिनेमे...
साई पल्लवी ही दाक्षिणात्य सिनेमांमधली आघाडीची अभिनेत्री आहे. साईचं पूर्ण नाव आहे साई पल्लवी सेंतमराई. साई लहान असताना तिच्या चेहऱ्यावर असणाऱ्या मुरमांमुळे ती घराबाहेर पडायला घाबरायची.
एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साई सांगते, "मी शाळेत असताना, घराबाहेर जाणं मला आवडायचं नाही. कारण लोकांचं लक्ष माझ्या चेहऱ्याकडे आणि त्यातल्या त्यात माझ्या चेहऱ्यावर असणाऱ्या पिंपल्सकडे जायचं."
तिच्या करिअरच्या सुरुवातीला मुरुमाने भरलेला चेहरा पाहून "ही अभिनेत्री म्हणून शोभते का?" असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. पण टीकाकारांचे सर्व अंदाज फोल ठरवत साई ही अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.
गोरा रंग, देखणं रूप, नितळ त्वचा अशा सौंदर्याच्या तथाकथित व्याख्यांना साईने छेद दिला. चेहऱ्यावर मेकअप लावून मुरूम लपवण्याचा तिने कधी प्रयत्नचं केला नाही.
साईच्या फिल्मी करियरची सुरुवात
साईला कधी अभिनेत्री व्हायचंच नव्हतं. तिला व्हायचं होतं डाॅक्टर. वैद्यकीय क्षेत्राची तिला आवड होती. तिबिलिसी, जॉर्जिया इथे तिने वैद्यकशास्त्रात पदवी घेतली.
साई म्हणते, "मी अभिनेत्री नसती झाली, तर कार्डिओलाॅजिस्ट नक्कीच झाले असते."
प्रेमम हा तिचा पहिला चित्रपट नव्हता
साई पल्लवीने कंगना रनौतसोबत 'धाम धूम' या चित्रपटामध्ये तिची मैत्रीण म्हणून ऑन-स्क्रीन पदार्पण केलं. या चित्रपटात साईने केलेल्या भूमिकेला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण तिचा हा पहिलाचं ऑन स्कीन अपियरन्स होता.

फोटो स्रोत, Instagram/Sai Pallavi
त्यानंतर 2015 मध्ये तिने 'प्रेमम' या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. त्यादरम्यान ती तिचा डॉक्टरकीचा अभ्यास करतंच होती. तिनं सहज करून बघू म्हणत सिनेमात काम केलं. यामध्ये तिने साकारलेली मलारची भूमिका खूप गाजली. आणि त्या वर्षीचा फिल्म फेअर अवार्डही पटकावला.
त्यानंतर 2017 मध्ये वरुण तेजासोबत तिचा 'फिदा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. मिडल क्लास अब्बाइ, मारी 2, पडी पडी लेचे मनसू, एनजीके अशा एकाहून एक दमदार चित्रपटांत तिने काम केलं.
अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी तिने 2008 मध्ये एका डान्स शोमध्ये भाग घेतला होता. या डान्स शोची ती विजेती ठरली होती.
अभिनयासोबत दमदार नृत्यकौशल्य अंगी असणारी साई तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि भूमिकांसाठी ओळखली जाते.
अभिनयासोबतचं साईला नृत्याची आवड आहे. तिनं नृत्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. पण तरीही तिचा परफॉर्मन्स कमाल आहे. आऊटलूक या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत साई म्हणते, "मी माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय यांचं नृत्य बघत बघत मोठी झाले. त्यामुळेच कदाचित मला प्रभावी नृत्यांगना व्हावं वाटतं."
साईच्या कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन नसतो. ती चित्रपट स्वीकारण्याआधीच दिग्दर्शकांपुढे 'नो किसिंग सीन' 'नो शॉर्ट ड्रेस' अशा दोन अटी ठेवते. तिचं मतं आहे की, 'जेव्हा तिचे आई वडील तो चित्रपट पाहतील तेव्हा त्यांना आपल्या लेकीचा अभिमान वाटला पाहिजे.'
'श्याम सिंघा रॉय' या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तिने एका पत्रकाराला फटकारलं होतं. सहकलाकार नानी आणि क्रिती शेट्टी यांना संकोच वाटेल असा प्रश्न पत्रकाराने विचारल्याचं तिने म्हटलं होतं.
चित्रपटाच्या ट्रेलरमधील किसिंग सीनवरून, "किसिंग सीनसाठी कोण कम्फर्टेबल होतं आणि कोण नव्हतं" असा प्रश्न त्या पत्रकाराने विचारला. त्यावेळी साईने पत्रकाराला मधेच थांबवलं आणि ती म्हणाली, "माझ्या मते हा प्रश्नच खूप अनकम्फर्टेबल आहे. एकमेकांशी मोकळेपणे बोलल्यानंतर, सीनविषयी चर्चा केल्यानंतर त्यांनी कथेची गरज म्हणून तो सीन केला. आता जर त्यावरून तुम्ही आता प्रश्न विचारलात तर ते नक्कीच अनकम्फर्टेबल वाटेल."

फोटो स्रोत, TWITETR
पुढे पत्रकाराने चित्रपटातील रोमँटिक सीन्सबद्दल पुन्हा प्रश्न विचारला. तेव्हा साई त्या पत्रकारला जवळपास झापलंच. ती म्हणाली, "तुम्ही एकच प्रश्न वेगळ्याप्रकारे विचारत आहात आणि ते खूप चुकीचं आहे."
साईचा हा व्हिडीओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी तिचं कौतुक केलं होतं.
फेअरनेस क्रिमच्या कोट्यवधींच्या जाहिरातींना धुडकावलं
एकीकडे आपण पाहतोय मोठमोठे सुपरस्टार्स तंबाखूच्या जाहिराती करतात. तिकडे साई मात्र फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करायला ही नकार देते. क्रीम गोरं करण्याचा दावा करणाऱ्या जाहिरात ती नाकारते.
साईचं म्हणणं आहे की, "मला काॅस्मेटिक्स आवडत नाहीत. लोकांना संभ्रमित करणाऱ्या गोष्टी मी प्रमोट करणार नाही. जे नैसर्गिक आहे, तेच खरं आहे."
साई सिनेमात ही कॅमेऱ्याच्या गरजेपुरताचं मेकअप करते. म्हणूनचं तिच्या या लुकवर सगळे फिदा होतात.
साईच्या अशा बोल्ड पण तितक्याच जबाबदार स्वभावामुळे साऊथमध्येचं नाही तर संबंध भारतात तिचा चाहता वर्ग आहे.
(संकलन - स्नेहल माने)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








