साई पल्लवी : 'काश्मिरी पंडितांचं पलायन आणि गोरक्षकांडून होणाऱ्या हिंसेत काय फरक आहे?' #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Instagram/Sai Pallavi
आज सकाळी विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. 'काश्मिरी पंडितांचं पलायन आणि गोरक्षकांडून होणाऱ्या हिंसेत काय फरक आहे?'
अभिनेत्री साई पल्लवीने धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसेचा निषेध करताना काश्मिरी पंडितांचं पलायन आणि गोरक्षकांकडून होणाऱ्या हिंसेची तुलना केली आहे.
'वीरता पर्वम' या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर एक तेलुगू यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने ही तुलना केली आहे.
"काश्मीर फाईल्समध्ये दाखवलं गेलं आहे की त्यावेळी कशा पद्धतीने काश्मिरी पंडितांना मारलं गेलं होतं. हा मुद्दा जर तुम्ही धार्मिक दृष्टिकोनातून घेत असाल तर अलिकडेच गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम ड्रायव्हरला मारलं आणि 'जय श्रीराम'चा नारा देण्यास भाग पाडलं गेलं. या दोन्ही घटनांमध्ये काय फरक आहे?" असा सवाल साई पल्लवीने केला आहे.
या भूमिकेनंतर साई पल्लवीवर सोशल मीडियातून टीका केली जात आहे, तर काही लोकांनी तिचं समर्थन देखील केलं आहे.
द क्विंटने हे वृत्त दिलं आहे.
2. सहारनपूरमध्ये पोलीस कोठडीत मुस्लिम युवकांना मारहाण
उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये शुक्रवारी नमाजनंतर झालेल्या हिंसेत अटक करण्यात आलेल्या मुस्लिम युवकांना पोलीस मारहाण करत असल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
सहारनपूर पोलिसांनी हा व्हीडिओ सहारनपूरचा नसल्याचं म्हटलंय.
एनडीटीव्ही इंडियाने मात्र त्यांच्या वृत्तात हा व्हीडिओ सहारनपूर पोलीस स्टेशनचाच असल्याचा दावा केला आहे. व्हीडिओतील तरुणांची ओळख पटवून वृत्तवाहिनीने त्यांच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधला आहे.
भाजपचे आमदार आणि प्रवक्ते शलभमणी त्रिपाठी यांनी हा व्हीडिओ ट्वीट करत 'बलवाइयों को रिटर्न गिफ्ट' म्हटलंय.
3. जमात-ए-इस्लामीच्या शाळांवर बंदी
जमात-ए-इस्लामी संघटनेच्या शाळंवर काश्मीर खोऱ्यात बंदी घालण्यात आली आहे. जमात-ए-इस्लामी संघटनेशी संबंधित फलाह-ए-आम ट्रस्टकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांना 15 दिवसांमध्ये सील करण्याचे आदेश जम्मू-काश्मीर सरकारने दिले आहे.
न्यूज18ने या संबंधीचं वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, EPA
बंद हाणाऱ्या शाळांमधल्या विद्यार्थयांना इतर शाळांमध्ये सामावून घेतलं जाणार आहे. या शाळांमधून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी कट्टरवादाकडे वळत असल्याचं तपासात आढळून आल्याचं वृत्तात म्हणण्यात आलं आहे.
परिणामी प्रशासनाने या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.
4. अजितदादांचं भाषण झालं नाही त्यामागे फडणवीस मास्टरमाईंड - सुनिल शेळके
"देहूतील कालचा कार्यक्रम भाजप अध्यात्मिक आघाडीचा होता. त्या कार्यक्रमात वारकऱ्यांना कुठलंही स्थान दिलं गेलं नाही. दिखाव्यासाठी त्यांना मोदींच्या भाषणाला बसवलं गेलं, मात्र त्यांचा कुठलाही मान सन्मान ठेवला गेला नाही.
प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण काल व्हायला हवं होतं. पण त्यांचं भाषण न होण्यामागे तसेच संपूर्ण प्रोटोकॉल बदलण्याचं काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं, तेच यापाठीमागचे मास्टरमाईंड आहेत. त्यांच्या बरोबर तुषार भोसले यांनीही उपद्व्याप केले", असा आरोप मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहूतील तुकोबारायांच्या शिळा मंदिराचं उद्घाटन झालं. त्यावेळी अजित पवार यांना भाषणापासून वंचित ठेवलं गेलं. याच घटनेला राष्ट्रवादीचे नेते भाजपला जबाबदार धरुन टीकेचे झोड उठवत आहेत.
5. राज्यात करोनाचा नवीन व्हायरस नाही - राजेश टोपे
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतेय, पण ही रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित असचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
लोकसत्ताने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये ओमिक्रॉन या व्हायरसचे व्हेरियंट आढळून येत आहेत, त्यामुळे राज्यात अद्याप कोणताही नवीन व्हायरस आढळून आलेला नाही, असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी ती मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या मर्यादित क्षेत्रात वाढत आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर हा आजच्या दिवसाला 40 टक्क्यांवर गेल्यामुळे या रुग्णवाढीकडे आरोग्य विभाग लक्ष देऊन आहे.
राज्यात रुग्णवाढ जरी होत असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याची टक्केवारी ही दोन ते तीन टक्के इतकीच असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








