फेअर अँड लव्हलीच्या नावात आता 'फेअर' नाही : 'या' सेलिब्रिटींनी नाकारली होती फेअरनेस क्रीमची जाहिरात

फोटो स्रोत, Twitter
भारतात स्कीन क्रीममधलं अग्रणी नाव असलेल्या 'फेअर अँड लव्हली या क्रिमच्या नावातून 'फेअर' हा शब्द लवकरच गायब होणार आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचं हे उत्पादन आहे आणि या कंपनीनेच 'फेअर अँड लव्हली'मधून 'फेअर' शब्द काढून टाकण्याचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
'फेअर अँड लव्हली'चं रिब्रँडिंग करणार असल्याचं कंपनीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. नव्या नावासाठी नियामक संस्थेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांच्या मंजुरीनंतर पुढच्या काही महिन्यात नवीन नाव जाहीर करू, असं कंपनीने म्हटलं आहे.
सौंदर्याकडे अधिक सर्वसमावेशक दृष्टीने बघण्याच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. त्वचेचा रंग कुठलाही असला तरी त्याचा आदर करण्याप्रती आम्ही कटिबद्ध असल्याचं कंपनीने सांगितलं.
फेअर अँड लव्हलीला बाजारात फेअरनेस म्हणजेच गोरेपणा देणारी क्रिम म्हणून ओळखतात. मात्र, गेल्या काही वर्षात अशा फेअरनेस क्रीमवर बरीच टीका होऊ लागली आहे.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

गोरेपणा म्हणजे सौंदर्य, तर काळी व्यक्ती कुरूप असं केवळ भारतातच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी मानलं जातं. फेअरनेस क्रिममुळे तर हा (गैर)समज अधिकच घट्ट होऊ लागला आहे. इन्स्टन्ट गोरेपणा नाहीतर पैसे परत, सात दिवसात गोरेपणा अशा कितीतरी जाहिरातींनी गोरेपणाचं आकर्षण वाढलं. फेअरनेस क्रीमचा खप बघितला तर गोरेपणाचा किती हव्यास आहे, याचा अंदाज येतो.
खरंतर या गोरेपणाच्या क्रिमची सुरुवात करणारा ब्रँड 'फेअर अँड लव्हली'च होता. जवळपास 70च्या दशकात बाजारात 'फेअर अँड लव्हली'चा प्रवेश झाला. या क्रिमच्या नावातच फेअर होतं. त्यामुळे हे क्रिम लावताच तुम्ही गोरे व्हाल, अशी खात्री तरुणींना वाटू लागली. तेव्हापासून शेकडो फेअरनेस क्रीम बाजारात आल्या आणि त्यांचा खपही झाला.

फोटो स्रोत, Getty Images
काही वर्षांपूर्वी याच हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने पुरुषांसाठी 'फेअर अँड हँडसम' क्रीम बाजारात आणलं. यावरून तरुणांमध्येही गोरेपणाचं केवढं आकर्षण आहे, हे अधोरेखित झालं.
चेन्नईतल्या 'वुमेन ऑफ वर्थ'ने अशाप्रकारचा गोरेपणाचा अट्टाहास आणि त्याला खतपाणी घालणारी उत्पादनं विशेषतः फेअरनेस क्रिम आणि त्यांच्या जाहिरातींविरोधात 'डार्क इज ब्युटिफुल'अशी मोहिमच उघडली.
अनेकदा आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना अशा उत्पादनांची जाहिरात करताना पाहून ही उत्पादनं विकत घेण्याकडे लोकांचा कल असतो. पण असेही अनेक कलाकार आहेत, ज्यांनी फेअरनेस क्रीमची जाहिरात करायला नकार दिला होता.
कंगना रानौत
"वेगवेगळ्या विषयांवर ठाम भूमिका घेत चर्चेत राहणाऱ्या कंगना रानौतने फेअनेस क्रीमची जाहिरात करायला नकार दिला होता. मी अगदी लहान असल्यापासूनच मला गोरेपणाची व्याख्या कधी समजलीच नाही. सेलिब्रिटी म्हणून अशा उत्पादनांची जाहिरात करून मी तरूणांसमोर काय आदर्श ठेवणार आहे," असं कंगनाने एका मुलाखतीत म्हटलं होतं. एक पब्लिक फिगर म्हणून माझीही काही जबाबदारी आहे, अशी भूमिका कंगनाने घेतली होती.

फोटो स्रोत, Getty Images
माझी बहीण रंगोली सावळी आहे, अशावेळी मी गोरेपणा देणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करणं तिच्यासाठी किती अपमानास्पद असू शकतं, असंही कंगनाने म्हटलं होतं.
अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मानेही आपल्याला फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यात स्वारस्य नसल्याचं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
"मी अशा उत्पादनांची जाहिरात कधीच करणार नाही, जे वर्णभेद करतात आणि लिंगभेदावर आधारित आहे. गोऱ्यापान त्वचेची भलामण करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करण्यात मला काहीच रस नाही. ज्यातून अमुक एक गोष्टच चांगली आहे, असं बिंबवलं जातं, अशी जाहिरात मी करणार नाही" असं अनुष्कानं स्पष्ट केलं होतं.
अभय देओल
ब्लॅक लाइव्हज मॅटर म्हणणारे सेलिब्रिटी हे आपल्या देशातल्या वर्णभेदाकडे दुर्लक्ष करतात, असं म्हणत अभिनेता अभय देओलने भारतात फेअरनेस क्रीमच्या वाढत्या खपाची आकडेवारी दिली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
त्यानंतर अभय देओलनं आपल्या इन्स्टाग्राम अकांउटवरून एक पोस्ट शेअर करताना म्हटलं होतं, की आता तरी भारतीय सेलिब्रिटी फेअरनेस क्रीम वापरणं बंद करतील का? भारतात आता फेअरनेस क्रीम थेट गोरेपणाचा उल्लेख टाळून स्कीन ब्रायटनिंग किंवा व्हायटनिंग, एचडी ग्लो, असे शब्द वापरत असल्याचंही म्हटलं होतं.
साई पल्लवी
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीनं फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारताना म्हटलं होतं, की हा भारतीयांच्या त्वचेचा रंग आहे.

फोटो स्रोत, Instagram/ Sai Pallavi
आपण परदेशी लोकांना जाऊन विचारू शकत नाही, की तुम्ही इतके गोरेपान कसे आहात? आपण त्यांच्याकडे पाहून त्यांच्यासारखं होण्याचा अट्टाहास करू शकत नाही. तो त्यांच्या त्वचेचा रंग आहे. आफ्रिकेतील लोकांच्या त्वचेचा रंग वेगळा आहे आणि तोही सुंदर आहे, असं तिनं म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








