You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दुखापत झालेल्या नीरजने जेव्हा शिव खेरांचं पुस्तक वाचून केलं होतं पुनरागमन
अमेरिकेतील ओरेगॉन येथे सुरू असलेल्या वर्ल्डअॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने रोप्य पदकाची कमाई करत आणखी एक इतिहास रचला आहे. या स्पर्धेत कित्येक वर्षांपासून असलेल्या दुष्काळ त्याने दूर केला आहे.
याआधी, ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकविजेता नीरज चोप्राने जूनमध्ये फिनलँडमध्ये सुरू असलेल्या पावो नूरमी गेम्समध्ये राष्ट्रीय विक्रम रचला होता. या स्पर्धेतला एकमेव भारतीय स्पर्धक असलेल्या नीरजने 89.30 मीटर दूर भाला फेकत रौप्यपदकाची कमाई केली होतीय
नीरजने स्वत:चाच विक्रम मोडत नव्या विक्रमावर नाव कोरलं होतं. याआधी पतियाळा 88.07 मीटर अंतरावर भाला फेकत राष्ट्रीय विक्रम रचला होता.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने 7 ऑगस्ट 2021 रोजी 87.58 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदकावर कब्जा केला होता.
टोकियो ऑलिम्पिकनंतर नीरजची ही पहिलीच स्पर्धा आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर नीरजचं आयुष्यचं पालटलं. केंद्र सरकार तसंच विविध राज्य सरकारतर्फे सन्मान, क्रीडा एनजीओंतर्फे गौरव, विविध कॉर्पोरेट, सामाजिक, राजकीय संस्था-संघटनांनी नीरजवर कौतुकाचा वर्षाव केला. विविध सत्कार कार्यक्रमांमुळे नीरजला घरी परतणंही शक्य झालं नव्हतं.
तब्बल दहा महिन्यांनंतर नीरज पुन्हा मैदानात उतरला होता. या स्पर्धेनंतर नीरज कुर्आतेने गेम्स तसंच डायमंग लीग स्पर्धेत सहभागी झाला. आणि आता जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्य पटकावले.
ऑलिम्पिक पदकाने दिलेला आत्मविश्वास कायम राखत नीरजने दमदार कामगिरी साकारली आहे. पण भालाफेकीसारख्या अवघड खेळात नीरजची कारकीर्द दुखापतीमुळे स्थगित झाली होती. प्रदीर्घ काळ मैदानापासून त्याला लांब राहावे लागले होते.
जेव्हा शिव खेरांचं पुस्तक वाचून नीरजने केलं होतं पुनरागमन
मोटिव्हेशनल स्पीकर शिव खेरा यांचं 'जीत आपकी' हे आवडीचं पुस्तक असल्याचं शिव खेराने स्पष्ट केलं होतं. 2019 मध्ये कोपऱ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर नीरजला 16 महिने रिहॅबिलिटेशन करावं लागलं. या काळात नीरजने हे पुस्तक वाचलं.
शिव खेरा यांचं 'यू कॅन विन' या प्रसिद्ध पुस्तकाचा हा हिंदी अनुवाद आहे. देशभरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही शिव खेरा यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे.
योग, ध्यानधारणा यांच्याबरोबरीने नीरजने या पुस्तकाच्या साह्याने एकाग्रचित्त व्हायला मदत होत असल्याचं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं होतं.
दररोज ध्यान, योग आणि शिव खेरा यांचं पुस्तक वाचलेल्या नीरजने दक्षिण आफ्रिकेतल्या पॉचशेफ्ट्सरुम इथे झालेल्या स्पर्धेद्वारे यशस्वी पुनरागमन केलं. पहिल्या प्रयत्नात नीरजने 81.63 अंतरावर भाला फेकला. यावेळी प्रतिस्पर्धी भालाफेकपटूंना 75 मीटर अंतरावरही भाला फेकता येत नव्हता.
दुसऱ्या प्रयत्नात 82 तर तिसऱ्या प्रयत्नात 82.57 मीटर अंतरावर भाला फेकत नीरजने फिट असल्याचं दाखवून दिलं. चौथ्या प्रयत्नात नीरजने 87.86 मीटर अंतरावर भाला फेकत खणखणीत कामगिरीची नोंद केली.
2 मे 2019 रोजी नीरजच्या कोपरावर शस्त्रक्रिया झाली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता प्रक्रिया सुरू झाली होती. पाच महिन्यांनंतर अॅथलेटिक्स महासंघाने नीरज रांचीत होणार असलेल्या राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार असल्याचं जाहीर केलं. मात्र दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने नीरजने या स्पर्धेतून माघार घेतली.
'मोगली' टोपण नाव पडलेला हरियाणाचा सुपुत्र
नीरजची कहाणी सुरू होते पानीपतच्या एका छोट्याशा खेड्यातून. लहानपणी नीरजचं वजन खूप जास्त होतं. जवळपास 80 किलो. गावात सगळे त्याला सरपंच म्हणायचे.
शारीरिक तंदुरुस्तीसाठी नीरजने पानीपतच्या स्टेडियममध्ये जायला सुरुवात केली. तिथेच भालाफेक खेळाची ओळख झाली आणि इथूनच करिअरची सुरुवातही झाली.
खेळाच्या चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी नीरज पानीपतहून पंचकुलाला शिफ्ट झाला. पंचकुलामध्ये पहिल्यांदा त्याचा सामना राष्ट्रीय खेळाडूंशी झाला. तिथे खेळासाठीच्या अधिक चांगल्या सोयी-सुविधा होत्या. राष्ट्रीय पातळीवर खेळायला सुरुवात केल्यावर हातात उत्तम दर्जाचा भालाही आला. हळूहळू नीरजच्या खेळात सुधारणा होऊ लागली.
2016 साली एकीकडे ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधू आणि साक्षी मलिकवर कौतुकाचा वर्षाव सुरू होता त्याचवेळी अॅथलेटिक्स विश्वास भारतातच एका कोपऱ्यात नवीन ताऱ्याचा उदय होत होता.
याच वर्षी नीरजने पोलंडमध्ये अंडर-20 जागतिक स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं.
बघता बघता या खेळाडूचं नाव आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये झळकू लागलं.
नीरजने गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 86.47 मीटर भालाफेक करत गोल्ड मेडल पटकावलं. तर 2018 साली एशियन गेम्समध्ये 88.07 मीटर भालाफेक करत राष्ट्रीय विक्रम नोंदवला आणि गोल्ड मेडलही पटकावलं.
मात्र, 2019 साली नीरज चोप्रासाठी आव्हानात्म ठरलं. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो खेळापासून दूर गेला आणि सर्जरीनंतर अनेक महिने सक्तीचा आराम करावा लागला. 2020 ची सुरुवातच कोरोनाच्या जागतिक संकटाने झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या.
मात्र, दुखापतीमुळे खेळापासून काही काळ दूर राहण्याची नीरजसाठी ही पहिलीच वेळ नव्हती.
2012 साली बास्केटबॉल खेळताना त्याच्या मनगटाला दुखापत झाली होती. या मनगटाच्याच जोरावर नीरज भालाफेक करत. त्यामुळे मनगटाला दुखापत झाल्यावर यापुढे आपण कधीच भालाफेक करू शकणार नाही, अशी भीती वाटल्याचं नीरज सांगतो.
मात्र, नीरजने घेतलेले परिश्रम आणि त्याच्या टीमच्या प्रयत्नांमुळे नीरजने त्या संकटावरही मात केली.
आज त्याच्याकडे परदेशी प्रशिक्षक आहेत, बायोमेकॅनिकल एक्सपर्ट आहेत. मात्र, 2015 सालापर्यंत नीरजने एकप्रकारे स्वतःच स्वतःला ट्रेन केलं. अशावेळी दुखापतीची जोखीम जास्त असते. त्यानंतरच त्याला उत्तम प्रशिक्षक आणि इतर सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या.
रियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरण्यासाठी जो थ्रो नीरजला करायचा होता तो करायला उशीर झाल्याने नीरजची ती संधी हुकली. नीरजसाठी हा अत्यंत दुःखद अनुभव होता. मात्र, टोकियो ऑलिम्पिकवेळी त्याने ही संधी गमावली नाही.
भालाफेकसोबतच नीरजला बाईक रायडिंगचा छंद आहे. तसंच हरियाणवी रागीनी या विशिष्ट संगीत प्रकाराचीही आवड आहे.
शाकाहारी असणारा नीरज खेळ सुधारण्यासाठी आता मांसाहारही करतो.
खेळाडूंना आपल्या डाएटवर विशेष आणि कटाक्षाने लक्ष द्यावं लागतं. पण, पानीपुरी आपलं आवडतं जंक फूड असल्याचं नीरज सांगतो.
लांब केसांमुळे नीरजला सोशल मीडियावर मोगली म्हणूनही संबोधलं जातं. लांब केसांसोबतच नीरज मोगलीसारखाच चपळही आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)