नुपूर शर्मा प्रकरण: आमची मुलं गुन्हेगार नव्हती मग त्यांना गोळी का मारली?

फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
- Author, आनंद दत्ता
- Role, बीबीसी हिंदीसाठी, रांचीहून
रांचीत शुक्रवारी नमाजानंतर उसळलेल्या हिंसाचारात दोन तरुणांचा मृत्यू झाला. अन्य दोन ते तीन लोकांची प्रकृती गंभीर आहे असं सांगण्यात येत आहे.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेला आता 48 तास उलटून गेले आहेत. गोळीबार का झाला यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
झारखंड पोलीस विभागाचे प्रवक्ते अमोल व्ही. होमकर यांनी दोन तरुणांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "शुक्रवारी उसळलेल्या हिंसाचारावेळी आंदोलनकर्त्यांकडूनही गोळीबार झाल्याचं आम्हाला समजतं आहे. भडकलेल्या लोकांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. यामध्ये 12 पोलीस तसंच 12 आंदोलनकर्ते जखमी झाले. एका पोलिसाला गंभीर दुखापत झाली आहे."
ज्या दोन तरुणांचा या गोळीबारात मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांशी बीबीसीने संवाद साधला.
15 वर्षीय मुदस्सिरच्या आईचं दु:ख
"आई तू रडू नकोस, मी कुठेही जाणार नाही. तुला तक्रार करायला वावच देणार नाही. मी यापुढे सुधारेन. तू रडू नकोस. आता इथे जुलूस निघाला आहे. आम्ही इथून जात आहोत, तू फोन ठेव आई".
रांचीमध्ये झालेल्या हिंसाचारात मृत्यू पावलेला मुदस्सिर आणि त्याच्या आईमध्ये फोनवर झालेला हा संवाद.

फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
हे बोलणं आठवून मुदस्सिरची आई निखत परवेज मोठ्याने रडू लागल्या. मुदस्सिरच्या डोक्यात गोळी घातली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रांचीतल्या हिंदपीढी मोहल्ल्यामध्ये भाड्याच्या घरात निखत बीबीसीशी बोलत असतानाच जवळच्या मशिदीत नमाजचे सूर आळवले जाऊ लागले. निखत यांच्या नवऱ्याने त्यांचे डोळे पुसले. नमाज होतो आहे, देवाचं नाव घे, रडू नकोस असं सांगितलं.
नमाज संपला तसं त्या भावाला मिठी मारून रडू लागल्या. शेवटचं बोलणं झाल्यानंतर मुदस्सिरच्या मित्राचा फोन आला. मुदस्सिरला गोळी लागल्याचं त्यानेच सांगितलं.

फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
रडता रडता त्या बोलू लागल्या, "कशी गोळी मारली? तो कुणाचा एवढा मोठा शत्रू झाला? माझा मुलगा निरपराध होता, बिघडलेला नव्हता. तो गुन्हेगार नव्हता. आम्हीही गुन्हेगार नाही. आमच्या मुलाला का मारलं"?
मुदस्सिर आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आईने जन्म दिला असला तरी मुदस्सिरला त्याच्या आत्येने वाढवलं आहे. त्याचे वडील मजुरी करतात. नातेवाईकांचं मुदस्सिरवर प्रचंड प्रेम होतं. शनिवारी दिवसभर घरी सांत्वन करायला येणाऱ्यांची रीघ लागली होती.
वहिनीला डोळे पुसायला लावत मुदस्सिरची आत्या सन्नो परवीन बोलू लागल्या. त्या म्हणाल्या, "तो आमच्याकडेच लहानाचा मोठा झाला आहे. माझी तब्येत बरी नसली की माझ्याजवळच बसत असे. जे घडलं त्याच्याआधी आम्ही विचारलं की कुठे जात आहेस. आम्ही नको जाऊ म्हटलं. पण आजीकडे जातोय असं म्हणाला".

फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
मुदस्सिरचे बाबा परवेझ आलम, बायको आणि बहिणीला सावरत होते. ते म्हणाले, "सरकारला आमची खरंच काळजी असेल तर त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. माझ्या मुलाला ज्यांनी गोळी मारली त्यांना समाजासमोर आणावं."
मुदस्सिरचे काका मोहम्मद शाहीद अयूबी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मुदस्सिर चांगला मुलगा होता. यंदा बोर्डाची परीक्षा देणार होता. सगळ्या नातेवाईकांशी मिळून मिसळून वागायचा. मोठ्यांना नमस्कार करत असे. काल दिवसा कुठे गेला, का गेला कळलं नाही. कोणालाच काही माहिती नाही. गोळी अशी लागली की त्याचं डोकं फाटलं."
"दहशतवाद्यांवर, फुटीरतावादयांवर गोळी चालवावी तसं पोलीस गोळीबार करत होते. जेएमएम सरकारची मानसिकता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारणेशी साधर्म्य साधणारी आहे. कोणाच्या सांगण्यावरून गोळी चालवण्यात आली हा प्रश्न आहे. आम्हाला सरकारकडून कोणीही भेटायला आलेलं नाही.
इथल्या मुस्लिमांच्याविरोधात प्रचंड प्रमाणात द्वेष पसरवण्यात आला आहे. हा सगळा त्याचाच परिणाम आहे. माझा पुतण्या त्याचाच शिकार ठरला आहे. माझ्या भावाने आता कुणाकडे पाहावं, कसं जगावं असा सवाल त्यांनी केला.
एक दिवस आधीच आईचं ऑपरेशन झालं, दुसऱ्या दिवशी मुलगा गेला
रांचीत झालेल्या हिंसाचारात मोहम्मद साहिलचाही मृत्यू झाला होता. त्याच्या आईचं एका दिवसापूर्वी ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या आईला किडनीस्टोनचा त्रास होता.
9 जूनला शुक्रवारी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आई आणि बाबा दुपारी घरी पोहोचले. साहील आणि ते एकत्र जेवले. मोबाईलच्या दुकानात साहील काम करत असे. तिथे तो गेला. डेली मार्केट भागात हे दुकान आहे. याच परिसरात आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत साहीलचा मृत्यू झाला.
वडिलांचं आणि साहिलचं फोनवर बोलणं झालं. त्यावेळी तो त्यांना म्हणाला की, मुख्य रस्त्यावर दंगल उसळली आहे. कसाबसा जीव वाचवून मी घरी येतो असं म्हणाला. थोड्यात वेळात त्याच्या मित्राचा फोन आला की साहिलला गोळी लागली आहे.

फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
कर्बला चौकात साहीलचं छोटंसं घर आहे. त्याचे बाबा रिक्षा चालवतात. अफजल सांगतात, आमचं हातावर पोट आहे. आमच्या या गोष्टींशी काय संबंध? माझा मुलगा तर त्या गर्दीतही नव्हता. तो घरी परतत होता. मला माझा मुलगा कोण परत मिळवून देणार?
सरकारने दोषींना कठोर शिक्षा द्यावी. माझा मुलगा गेला आहे तसा अन्य कुणा गरिबाचा मुलगा जाऊ नये. माझा लाडका मुलगा होता. त्याच्या लग्नाचं सुरू होतं. इतकंच आयुष्य होतं त्याचं. आता काय बोलणार...
गोळी का मारली? वडिलांचा सवाल
त्याचे वडील विचारतात, "पोलीस प्रशासनाला विचारू इच्छितो की गोळी चालवण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताच पर्याय नव्हता का? गर्दी पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला जातो. मग गोळी का चालवली. सरकार माझा मुलगा परत करू शकेल का"?
"रुग्णालयात जाताना तो बोलत होता. साडेचार तास त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण त्याचा जीव वाचू शकला नाही". नुपूर शर्मा यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. हे आंदोलन का सुरू होतं याबाबत माहिती होती.

फोटो स्रोत, ANAND DUTTA/BBC
"कोणाच्या धार्मिक भावना दुखावणं योग्य नाही. आम्ही रोज कमावून खातो, आमचं हातावर पोट आहे. आंदोलन करण्याएवढा वेळ आमच्याकडे नाही. 26 वर्षं पोटाला चिमटा काढून त्याला शिकवलं. तो दहशतवादी नव्हता. मग त्याला गोळी का मारली"?
शस्त्रक्रिया आणि पोटचं पोर गमावणं या दोन्हीमुळे साहिलची आई बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या. मोठ्या मुलाने त्यांना खुर्चीवर बसवलं. त्यानंतर त्यांनी आठवणी सांगितल्या. "माझा मुलगा गेला. सगळ्या घराला सांभाळायचा. आमच्या मुलाला कोण परत मिळवून देणार. सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा. ज्याने गोळी मारली त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. आमच्या मुलाबाबत खूप स्वप्नं होती. ती सगळी धुळीस मिळाली."
साहिलचा मोठा भाऊ मोहम्मद साकीबने सांगितलं की, "आम्हाला आमचा भाऊ परत मिळवून द्या. आम्हाला न्याय हवाय. आम्हा तीन भावांपैकी तो एकमेव कमावता होता. हेमंत सोरेन यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. हवेत गोळीबार केला जातो, डोक्यावर नाही".
शनिवारी दुपारी साहील आणि मुदस्सिर यांच्यावर मुस्लीम रीतीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोहल्ल्यातील बहुतांशजण यावेळी उपस्थित होते.
ज्या तरुणांनी जीव गमावला ते कनिष्ठ वर्गाचे आहेत. एकाचे वडील मजुरी करतात तर एकाचे रिक्षा चालवतात. मुदस्सिर आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता तर साहील तीन भावांपैकी एकमेव कमावणारा होता. या दोघांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








