धनंजय महाडिक: शिवसेना ते भाजपा व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस, असा आहे प्रवास

धनंजय महाडिक

फोटो स्रोत, Facebook

शिवसेनेच्या संजय पवारांना धोबीपछाड देऊन भाजपचे धनंजय महाडिक हे राज्यसभेवर पोहोचले आहेत. याआधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात राहिलेल्या महाडिकांना भाजपने राज्यसभेसाठी संधी दिली आणि ते निवडून आले. आतापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास कसा होता यावर एक नजर...

राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे, पियूष गोयल आणि धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. धनंजय महाडिक यांच्या विजयाने उद्धव ठाकरे यांना आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

महाडिक यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक पक्षाचं सदस्यत्व घेतलं. प्रत्येकाने त्यांना तिकीट दिलं. अखेर भाजपत जाऊन त्यांचा विजय झाला आहे.

या विजयानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही जागा निवडून देत महाराष्ट्राने आपले जनमत भाजपच्या पारड्यात टाकले. आमचे नेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व भाजपा एकसंध आणि मजबुतीने लढली आणि हा ऐतिहासिक विजय साकार झाला.

"माझ्यावर विश्वास दाखवणारे माझे भाजपचे सर्व सहकारी, महाराष्ट्रातील विविध पक्षांचे आणि अपक्ष लोकप्रतिनिधी यांचे मी आभार मानतो. आपला विश्वास मी निश्चितपणे सार्थ ठरवेन हा विश्वास देतो. माझ्यासोबत विजयी झालेले भाजपचे उमेदवार मा. पीयूष गोयलजी आणि डॉ. अनिल बोंडे जी यांचे मनःपुर्वक अभिनंदन ..!"

तीनवेळा लोकसभेच्या रिंगणात

महाडिक यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा शिवसेनेकडून लोकसभा लढवली होती. 2004 मध्ये महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याशी टक्कर घेतली होती. यामध्ये महाडिक यांचा पराभव झाला होता. त्यानंतर महाडिक यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर महाडिक यांना 2009 मध्ये लोकसभा निवडणूक लढवायची होती. पण त्यावेळी राष्ट्रवादीकडून संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यात आली.

धनंजय महाडिक

फोटो स्रोत, facebook

2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय महाडिक यांनी दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

2014 मध्ये त्यांना राष्ट्रवादीकडून त्यांना लोकसभेला संधी देण्यात आली. देशभरात मोदीलाट असतानाही धनंजय महाडिक शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला.

भाजपमध्ये प्रवेश

2019 लोकसभा निवडणुकीत महाडिक पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात होते. पण यावेळी मात्र त्यांचा पराभव झाला.

धनंजय महाडिक

फोटो स्रोत, Facebook

शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे महाडिक यांनी सप्टेंबर 2019 मध्ये भाजप प्रवेश केला. भाजपने त्यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नेमणूक केली होती.

राज्यसभेच्या मैदानात

राज्यसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला भाजपने छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण संभाजीराजे यांनी माघार घेतल्यानंतर भाजपकडून महाडिक यांना मैदानात उतरवण्यात आले..

शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार असलेला संजय पवार यांच्या विरोधात महाडिक यांची लढत झाली.

धनंजय महाडिक

फोटो स्रोत, Facebook

राज्यसभेच्या या निवडणुकीत प्रतिष्ठेची ठरलेली सहावी जागा भाजपनं जिंकली आहे. या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभूत केलं आहे.

संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 32, तर धनंजय महाडिक यांना 25 मतं मिळाली. त्यामुळे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात आता चुरशीची लढत निर्माण झाली. पण, दुसऱ्या पसंतीची मतं महाडिक यांना जास्तीची मिळाल्यानं त्यांचा विजय झाला आहे.

कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याने चर्चेत

2021 मध्ये त्यांच्या मुलाचा लग्नाचा शाही सोहळा पुण्यात पार पडला. त्यात कोरोनाचे नियम न पाळल्याने ते चर्चेत आले होते. या सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. सोशल डिस्टंन्सिग, मास्क घालणे आणि 200 पेक्षा कमी लोकांची उपस्थिती या नियमांचा फज्जा उडवण्यात आल्याचे फोटो आणि व्हीडिओमधून दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.

धनंजय महाडिक यांच्यासोबत जिथे हा विवाह संपन्न झाला, त्या लॉन्सचे मालक आणि मॅनेजर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)