हस्तमैथुनाबद्दल हे 5 विचित्र गैरसमज आणि वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे का?

मानवी शरीर आणि त्यासंदर्भातील क्रियांसदर्भात आपल्याकडे अनेक गैरसमज असतात. या गैरसमजांमुळे मोठे प्रश्नही तयार होत असतात. सेक्स आणि मानवी शरीर यांबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे, त्यावर सखोल शास्त्रीय पातळीवर चर्चा होत नसल्यामुळे गैरसमज वाढीला लागतात. एएनआय या वृत्तसंस्थेनी यावर लेख लिहिला आहे. तो या ठिकाणी देत आहोत.

असेच गैरसमज हस्तमैथुनाबद्दलही असतात. त्यामुळेच या बातमीत आपण हस्तमैथुनासंदर्भात लोकांमध्ये पसरलेल्या 5 गैरसमजांवर चर्चा करणार आहोत.

1. हस्तमैथुनानंतर लिंग आक्रसते

या गैरसमजाला कोणताही शास्त्रीय आधार किंवा संशोधनाचे पाठबळ नाही. पुरुषाने आपले लिंग उद्दिपित करुन हस्तमैथुन करणं किंवा स्त्रीने आपल्या योनीजवळील भागाला बोटांनी उद्दिपित करणं याने दोघांच्याही अवयवांना इजा होत नाही.

अर्थात सेक्स टॉयचा वापर किंवा फारच दीर्घकाळ हस्तमैथुन करत राहिल्यास तेथील जागेवर खाज किंवा सूज, पुरळ येऊ शकते.

2. हस्तमैथुनामुळे सेक्सवर परिणाम होतो

हस्तमैथुन आणि संभोग या लैंगिक सुख देणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हस्तमैथुनामुळे सेक्सची इच्छा मरत नाही. पुरुष आणि स्त्रिया तसेच व्यक्तिपरत्वे लैंगिक उद्दिपनात फरक असतो.

3. हस्तमैथुनामुळे नपुंसकत्व येते

नपुंसकत्व येण्याची अनेक कारणं आहेत. हस्तमैथुनामुळे नपुंसकत्व येत नाही. हस्तमैथुनामुळे कोणतेही शारीरिक नुकसान होत नाही. त्यामुळे प्रजननावर, वीर्यनिर्मितीवर परिणाम होत नाही किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं असे बदलही होत नाहीत.

हस्तमैथुनामुळे प्रतिकारक्षमतेवर आजिबात परिणाम होत नाही. कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा येत नाही.

4. हस्तमैथुन म्हणजे फसवणूक

अनेकदा हस्तमैथुन करणे म्हणजे आपल्या जोडीदाराची फसवणूक समजले जाते. पण हा प्रत्येक व्यक्तीचा निवडीचा मामला आहे. एकटे असोत वा जोडीदारासह एखादया नात्यात असणारे लोक हस्तमैथुन करतात. काही ठिकाणी हस्तमैथुनामुळे लैंगिक जोम म्हणजे स्टॅमिना वाढण्यास मदत होते असे दावे केले गेलेत.

गरोदरपणाच्या पूर्ण काळात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच वर्तन करावं. बाळाची स्थिती, आरोग्य हे विचारूनच सेक्स करावे किंवा थेट पूर्ण 9 महिने हस्तमैथुनाचा पर्याय वापरायला हरकत नाही.

भौगोलिकदृष्ट्या पती-पत्नी एकमेकांपासून दूर असतील तर नवरा-बायको हस्तमैथुनाचा आधार घेऊ शकतात. नवरा-बायको यांच्यापैकी एखाद्या व्यक्तीला तात्पुरती किंवा दीर्घकालीन व्याधी असेल, आजारपण असेल तर अशा काळात सेक्सच्या ऐवजी हस्तमैथुन करता येऊ शकतं

हस्तमैथुनामध्ये वाईट काहीही नाही. व्यक्तीने स्वतःच शारीरसुखाचा आनंद मिळवण्यात काहीही चूक नाही. ही अत्यंत खासगी, वैयक्तिक बाब आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करणं गुन्हा आहे.

5. हस्तमैथुनामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या तयार होतात

हस्तमैथुनाबद्दल बोलणं त्याज्य समजलं जातं. लोक त्यावर उघडपणे बोलत नाहीत. हा विषय लोकांसमोर बोलला जात नसल्यामुळे तसेच त्याबद्दल असणारे अज्ञान आणि काही लोकांना त्याबद्दल वाटणारी शरम यामुळे हा विषय अधिकच कोपऱ्यात पडतो. परंतु हस्तमैथुनामुळे मानसिक आरोग्याची समस्या निर्माण झाल्याचं समोर आलेलं नाही. ही गोष्ट व्यक्तीची स्वतःची निवडीची गोष्ट आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)