राफेल नदालला झालेला 'मूलर-वैस सिंड्रोम' आजार नेमका काय आहे?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

डाव्या पायात अजिबात संवेदना जाणवत नसतानाही, राफेल नदालने 22वं ग्रॅंड स्लॅम जिंकलं.

नदाल गेल्याकाही काळापासून पायाच्या दुखापतीचा सामना करतोय. खेळताना त्रास जाणवू नये, यासाठी त्याने फ्रेंच ओपनमध्ये अनेकवेळा पाय बधिर करण्यासाठी अॅनेस्थेशिया (भूल) इंजेक्शनचा वापर केला.

राफेल नदाल पायात असहाय्य वेदना होणाऱ्या 'मूलर-वैस सिंड्रोम'ने ग्रस्त आहे. पायाच्या या त्रासामुळे गेल्यावर्षी यूएस ओपन आणि विम्बल्डनमध्ये नदाल खेळला नव्हता.

हा आजार नेमका आहे तरी काय? हा आजार खेळाडूंनाच जास्त होतो का? आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर नदाल काय म्हणाला?

रविवारी (5 जून) राफेल नदालने नॉर्वेच्या कॅस्पर रूडला नमवून फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलं. फ्रेंच ओपन जिंकणारा सर्वांत वयोवृद्ध खेळाडून होण्याचा मान राफेल नदालने पटकावला.

हा विजय अगदी सहज दिसून आला असला तरी यामागे पायाची दुखापत किती गंभीर होती, हे विसरून चालणार नाही. खेळताना त्रास होऊ नये म्हणून फ्रेंच ओपन दरम्यान नदालने अनेकवेळा पाय बधिर करण्यासाठी अॅनेस्थेशिया (भूल) इंजेक्शनचा वापर केला होता.

फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर नदाल म्हणाला, "मला यापुढे पायाच्या दुखापतीमुळे पाय बधिर करण्यासाठी इंजेक्शन घेण्याची गरज भासली. तर मी खेळणार नाही. मी ज्या परिस्थितीत खेळतो आहे. या परिस्थितीत, मी खेळू शकत नाही आणि मला हे सुरू ठेवण्याची इच्छा नाही."

"माझ्या पायात मला अजिबात संवेदना जाणवत नाहीत. याचं कारण, माझ्या डॉक्टरांनी नसांमध्ये अॅनेस्थेशियाचं इंजेक्शन दिलं होतं. त्यामुळे माझ्या पायातील संवेदना नष्ट होतात," नदाल पुढे म्हणाला.

'मूलर-वैस सिंड्रोमट' काय आहे?

हा एक दुर्मिळ आजार असून यात पायातील हाडांना दुखापत होते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा दिवसेंदिवस वाढत जाणारा आजार आहे.

अमेरिकन जर्नल ऑफ रेअॅन्टोनोलॉजीच्या माहितीनुसार, ही एक अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती आहे. यात प्रौढ व्यक्तीच्या 'टारसल न्हॅविक्युलर'मध्ये म्हणजेच हाडात (Tarsal Navicular) दुखापत झाल्याने असहाय्य वेदना होतात किंवा त्याचा आकार बदलतो.

फ्रेंच ओपन सुरू होण्याच्या 10 दिवस आधी नदाल लंगडत चालताना दिसून येत होता. तर, फायनलमध्ये अनेकवेळा डावा पाय बेस-लाईनवर घासत-घासत पुढे सरकवताना दिसून आला.

त्याच्या पायाच्या दुखापतीबाबत नदाल पुढे सांगतो, "मी पाय बधिर करण्यासाठी नसांमध्ये इंजेक्शन घेऊन खेळत होतो. त्यामुळेच मी गेले दोन आठवडे खेळू शकलो."

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रौढ व्यक्तीच्या पायात 26 हाडं असतात. यातील एक हाड म्हणजे पायाच्या मध्यभागी असणारं न्हॅविक्युलर हाड. यामुळे पाउल आणि वरच्या पायाला जोडणाऱ्या सांधा (घोटा) याला मजबूती मिळते.

मुंबईच्या रहेजा रुग्णालयाचे सल्लागार अस्थिविकारतज्ज्ञ डॉ. सिद्धार्थ शाह सांगतात, "'मूलर-वैस सिंड्रोम'ने ग्रस्त रुग्णाला खूप वेदना होतात. याचं कारण, न्हॅविक्युलर हाडांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण होतात. यामुळे हाडे खराब होतात. ज्याला Bone Death म्हणतात."

डॉ. शाह पुढे सांगतात, "ही परिस्थिती हळूहळू वाढत जाते. हाडं खराब झाल्यामुळे पायाचा आकार बदलतो आणि संधिवात होतो."

'मूलर-वैस सिंड्रोम' का होतो याचं खरं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. ही परिस्थिती खूप दुर्मिळ आहे आणि याबाबत अनेक थिअरिज सांगितल्या जातात.

नानावटी रुग्णालयाच्या स्पॉर्ट्स सर्जरी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. नागराज शेट्टी म्हणाले, "यात हाडं आणि सांधे यांच्यातील रक्तपुरवठा अडथळा निर्माण झाल्याने बंद होतो. ज्यामुळे हाडांची झीज होते किंवा हाडं खराब होतात."

पायाच्या या सततच्या त्रासामुळे नदाल गेल्यावर्षी यूएस ओपन आणि विम्बल्डनमध्ये खेळला नव्हता. आपलं टेनिस करिअर संपुष्टात येईल या भीतीने त्याने यावर उपचार करण्यासाठी काहीकाळ टेनिस खेळणं बंद केलं होतं.

हा आजार कोणाला आणि कधी होतो?

अमेरिकन जर्नल ऑफ रेअॅन्टोनोलॉजीच्या माहितीनुसार 'मूलर-वैस सिंड्रोम' 40 ते 60 वर्षं वयोगटातील प्रौढ व्यक्तींना सामान्यत: झालेला दिसून येतो.

पायाचा हा आजार कोणाला आणि कधी होऊ शकतो. याबाबत माहिती देताना डॉ. शाह पुढे सांगतात, "हा आजार प्रामुख्याने वयाच्या चाळीशीत किंवा पन्नाशीत होतो. प्रामुख्याने महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आढळून येतं."

तज्ज्ञांच्या माहितीनुसार पायाला अचानक झालेली गंभीर दुखापत किंवा वारंवार पायावर पडणारा ताण यामुळे न्हॅविक्युलर हाडांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते.

"पायाचा हा आजार वाढत्या वयात म्हणजे 15-16 वर्षी सुरू होण्याची शक्यता असते. ज्यावेळी शरीरातील विविध अवयवांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. प्रौढावस्थेत पायांवर येणारा ताण किंवा हाडांवर पडलेलं जास्त वजन यामुळे हा त्रास पुन्हा वाढू शकतो," असं डॉ. शेट्टी पुढे म्हणाले.

राफेल नदाल पायाच्या या दुखापतीमुळे ग्रस्त आहे. हा आजार पायांवर जास्त ताण पडल्याने होत असेल तर मग तो खेळाडूंना जास्त होतो का? याबाबत माहिती देताना डॉ. शाह सांगतात, "अॅथलिस्ट्सना किंवा काही विशिष्ठ लोकांना हा त्रास जास्त होतो याबाबत काही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत."

पायाच्या या वेदनेवर उपचार काय आहेत?

27 जूनपासून टेनिस जगतात प्रतिष्ठेची मानली जाणारी विम्बल्डन स्पर्धा सुरू होणार आहे. याबाबत विचारल्यानंतर नदाल म्हणाला, "पुढील आठवड्यात होणाऱ्या नर्व्ह-बर्निंग (Nerve-burning treatment) उपचारांनी फायदा झाला नाही. तर, मी विम्बल्डन खेळणार नाही."

तज्ज्ञ सांगतात पायाचं हे दुखणं पहिल्या स्टेजमध्ये असेल तर औषध आणि काहीकाळ हालचाली कमी करून यावर उपचार करता येतात. मात्र, त्रास जास्त असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते.

नदाल अॅनेस्थेशियाचं इंजेक्शन घेऊन फ्रेंच ओपन खेळला होता. "पायाच्या ज्या नसेत दुखत असेल त्यात अॅनेस्थिशियाचं इंजेक्शन देणं हा तात्पुरता उपाय आहे," डॉ. सिद्धार्थ शाह पुढे सांगतात. जेणेकरून पाय बधीर होईल आणि दुखणं कमी होण्यास मदत मिळेल.

तज्ज्ञ म्हणतात, काही प्रकरणात ज्या नसांमुळे वेदना जाणवत असतील असे टिश्यू किंवा पेशी उष्णतेच्या मदतीने नष्ट केल्या जातात.

डॉ. शेट्टी पुढे म्हणतात राफेल नदाल याच प्रकरचे उपचार करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. जेणेकरून यापुढे खेळताना त्याला त्रास होणार नाही किंवा वेदना जाणवणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)