Seed Germination process : बियाण्यांची उगवण क्षमता पेरणीआधीच कशी तपासायची?

गोणपाट पद्धत वापरून बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याची पद्धत.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, गोणपाट पद्धत वापरून बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याची पद्धत.
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

दुकानातून बियाण्यांची खरेदी केल्यानंतर शेतकरी त्यांची थेट शेतात पेरणी करतो आणि मग जवळपास आठवड्याभरानं ते पाहायला जातो. त्यावेळी त्याची निराशा होते.

कारण, बहुतेक ठिकाणी बियाणं उगवून आलं नसल्याचं त्याच्या लक्षात येतं. अशावेळी शेतकऱ्याला पुन्हा एकदा बियाणं खरेदी करावं लागतं. यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो.

थोडक्यात काय शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट येतं. पण, हे टाळण्यासाठी शेतकरी घरबसल्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासू शकतो. म्हणजे पेरणी करण्याआधीच आपण जे बियाणं पेरणार आहोत, त्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पाहू शकतो.

ते कसं याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

उगवण क्षमता तपासण्याच्या पद्धती

बियाण्यांची उगवण क्षमता किंवा जर्मिनेशन पॉवर म्हणजे एखाद्यात बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे, ते तपासणं.

बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याच्या तीन पद्धती अशा आहेत, ज्या शेतकरी स्वत: घरी करून पाहू शकतात.

पहिली म्हणजे गोणपाट पद्धत. या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता तपासू शकतात.

शेंद्रा कमंगर गावात उगवण क्षमतेचं प्रशिक्षण देताना कृषी विभागाचे कर्मचारी.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, शेंद्रा कमंगर गावात उगवण क्षमतेचं प्रशिक्षण देताना कृषी विभागाचे कर्मचारी.

दुसरी पद्धत आहे पेपर पद्धत. इथं जर्मिनेशन पेपर विकत आणून शेतकरी त्यावर बियाणे ठेवू शकतात आणि त्यांची उगवण क्षमता जाणून घेऊ शकतात.

तिसरी म्हणजे कुंडी पद्धत. एखाद्या कुंडीत बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता या पद्धतीद्वारे तपासली जाते.

यापैकी सगळ्यात सोपी आहे ती गोणपाट पद्धत. आता ही पद्धत वापरून उदाहरण म्हणून सोयाबीनच्या बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासायची ते 3 टप्प्यांमध्ये जाणून घेऊया.

पहिला टप्पा -

सगळ्यांत आधी आपल्याला एक मोठ पोतं आणि पाण्यानं भरलेली बकेट घ्यायची आहे. पोत्याला कात्रीच्या साहाय्यानं कापायचं आहे. त्यानंतर ते पोतं पाण्यात भिवजून आणि नंतर व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे.

दुसरा टप्पा -

सोयाबीनच्या बॅगेत मध्यभागी हात घालून एक मूठ सोयाबीन घ्यायची आहे. त्यापैकी 100 दाणे तपासणीसाठी लागणार आहेत. हे 100 दाणे त्या पोत्यावर व्यवस्थित 10 * 10 ची लाईन घेऊन ठेवायचे आहेत. त्यानंतर त्या पोत्याची गुंडाळी करून घ्यायची आहे. ते रबर किंवा दोरीनं बांधून घ्यायचं आहे.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देताना कृषी सहाय्यक एस.जी.मिर्झा आणि प्रतिभा गिते.

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देताना कृषी सहाय्यक एस.जी.मिर्झा आणि प्रतिभा गिते.

तिसरा टप्पा-

ही गुंडाळी माठ किंवा रांजण अशा थंड ठिकाणी ठेवायची आहे. त्यावर दररोज दोन टाईम पाणी शिंपडायचं आहे. आठव्या दिवशी ही गुंडाळी उघडायची आहे. आठव्या दिवशी बियाण्याची उगवण झालेली असते. बियाणं एकदम सरळ उगवलं की समजायचं ते व्यवस्थित आहे.

उगवण क्षमता तपासणीचा फायदा

कृषी विभागाकडून पेरणीपूर्वी बियाण्यांच्या उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिके गावागावांत आयोजित केले जातात.

औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा कमंगर गावात आयोजित प्रात्यक्षिकाला महिला शेतकरी उमा नाईकवडे उपस्थित होत्या.

महिला शेतकरी उमा नाईकवडे

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, महिला शेतकरी उमा नाईकवडे

त्या सांगतात, "आम्ही पूर्वी बियाण्यांची थेट शेतात पेरणी करायचो. पण आता दरवर्षी पेरणीआधी हे प्रशिक्षण आमच्या गावात होत आहे. त्यांनी आम्हाला उगवण शक्तीची जी प्रक्रिया दाखवून दिली आहे, त्यामुळे आम्हाला दुबार पेरणी करण्याची गरज पडत नाही."

तक्रार कुठे करायची?

शेतकरी एकतर घरच्या बियाण्यांची किंवा दुकानातून खरेदी केलेल्या कंपनीच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पाहू शकतात.

ज्यावेळी शेतकरी दुकानातून बियाण्यांची बॅग खरेदी करतो, त्यावेळी त्या बॅगवर जर्मिनेशन असं लिहिलेलं असतं.

उगवण क्षमता चाचणी

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, उगवण क्षमता चाचणीनंतर उगवून आलेलं बियाणं

उदाहरणार्थ तुम्ही खरेदी केलेल्या बॅगवर 75% इतकं जर्मिनेशन नमूद केलेलं असेल, तर त्याचा अर्थ त्या कंपनीच्या बियाण्यांचे 100 पैकी 75 इतके बियाणे उगवून येणं अपेक्षित असतं.

पण, तुम्ही केलेल्या उगवण क्षमतेच्या चाचणीत त्यापेक्षा कमी बियाणे उगवून आल्याचं दिसल्यास तुम्ही कृषी विभागाकडे तक्रार दाखल करू शकतात, असं औरंगाबादचे जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी संतोष चव्हाण सांगतात.

दरम्यान, सामान्यपणे 70% उगवण क्षमता असेल तर ते बियाणं चांगलं आहे, असं समजलं जातं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)