You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस: 'बैल जोडीने येतो आणि नांगरासकट येतो' #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. बैल जोडीने येतो आणि नांगरासकट येतो- फडणवीस
"बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो अन् ते पण नांगरासकट," असे सूचक उद्गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चिखली जाधववाडी इथे बैलगाडी शर्यतीच्या शेवटच्या दिवशी फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मुळशी पॅटर्नचा संदर्भ देत उद्गार काढले. हा नांगर कुणासाठी तर बैलगाडी शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
कुणी त्रास दिला तर त्याला जशास तसेच नव्हे तर त्याहून जास्त ताकदीचे उत्तर देण्यास आपण तयार आहोत अशा अर्थाचा डायलॉग मुळशी पॅटर्नमध्ये आहे.
"कुर्ता जॅकेट आणि पायजमामध्ये अशा पोशाखात फडणवीस आले होते. शर्यतीत बैलांना झूल घालत नाहीत कारण त्यांना पळायचं असतं. मात्र मुख्य अतिथींना झूल घालून मिरवायला लावले. आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडी शर्यतीसाठी मला कपडे शिवून दिले आणि घालायला लावले," असंही फडणवीस म्हणाले.
"बैलगाडी शर्यत सुरू झाली हे महेश लांडगेंचं श्रेय आहे. सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की बैल पळणारा प्राणी आहे आणि त्यामुळे शर्यत सुरू झाली. बैलगाडी शर्यत बंद झाल्याने अनेकांचं नुकसान झालं. मात्र आता काहीही झालं तरी बंद होऊ देणार नाही,"असं फडणवीस म्हणाले.
2. राज ठाकरे यांना कोरोना, शस्त्रक्रिया लांबणीवर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना डेड सेलमुळे त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. पायाच्या शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान या शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
राज ठाकरे यांना मागच्या काही दिवसात ठाणे, औरंगबाद आणि पुणे येथे सभा घेतल्या होत्या, पुण्यातील सभेत त्यांनी त्यांच्या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली होती.
दरम्यान कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे.
मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू होती, मात्र उत्तर प्रदेशच्या भाजप खासदाराने विरोध केल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा स्थगीत केला होता. तसेच यानंतर राज ठाकरे यांना मनसे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा तो एक सापळा होता असे सांगितले होते. तसेच पुण्यातील सभेत बोलताना त्यांनी त्यांच्या प्रकृतीसंबंधी देखील माहिती दिली होती. तसेच राज्यातील जनतेसाठी एक पत्रक देणार असल्याचे देखील सांगितले होते.
3. काहीही करा, ज्ञानवापी मशीदच राहील- ओवैसी
"व्हीडिओ बनावटही असू शकतो हा व्हिडिओ खरा असला तरी ज्ञानवापी मशीद होती, आहे आणि राहील", असे एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले. ज्ञानवापी मशिदीत केलेल्या सर्वेक्षणाचा व्हिडिओ लीक झाल्याबद्दल त्यांनी आक्षेप व्यक्त केला. तसेच हे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचे ओवैसी म्हणाले. 'सकाळ'ने ही बातमी दिली.
माध्यमांमध्ये व्हिडिओ चालवला जात आहे. ते मोठी चूक करीत आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींनी व्हिडिओ दाखवू नका असे सांगितले आहे. हे निवडकपणे कोण देत आहे? तुम्ही लीक करा व काहीही करा. 1991 चा कायदा आहे. या कायद्यानुसार 1947 मध्ये मशीद होती आणि राहील, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस पक्ष गप्प का आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
4. केंद्राकडून राज्याला 14 हजार कोटी जीएसटीचे अनुदान, अजूनही 12 हजार कोटींची थकबाकी
वस्तू आणि सेवा कराच्या अनुदानाची 86,912 कोटींची रक्कम केंद्र सरकारने मंगळवारी राज्यांना वितरित केली. यापैकी महाराष्ट्राच्या वाटय़ाला सर्वाधिक 14,145 कोटी रुपये आले आहेत. राज्याची 26,500 कोटींची थकबाकी असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केला होता. यानुसार अद्यापही 12 हजार कोटींची राज्याची थकबाकी केंद्राकडे कायम आहे. तर राज्यांची नुकसानभरपाईची सर्व रक्कम वितरित केल्याचा दावा केंद्राने केला आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कराची नुकसानभरपाईची वितरित केलेल्या रकमेपैकी 14,145 कोटी रुपयांची रक्कम महाराष्ट्राच्या वाटय़ाला आली आहे. राज्यांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेपैकी सर्वाधिक रक्कम ही राज्याला मिळाली आहे. केंद्र सरकारने मेपर्यंत सर्व राज्यांची नुकसानभरपाईची रक्कम वितरित केल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकात केला आहे. मात्र गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीच्या वेळी राज्याची 26,500 कोटींची रक्कम केंद्राकडून येणे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. वस्तू आणि सेवा कराच्या थकबाकीवरून केंद्र व राज्यात अधिक संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
5. हिंमत असेल तर आघाडीतून बाहेर पडून दाखवा- आठवले
"काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीत राहू नये. जर काँग्रेस पक्षात हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडावं", असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. इंदापूर शहरातील शासकीय विश्रामगृहात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.
"काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढला तर आम्ही सरकार बनवण्यास तयार असून या राज्याला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटल्याप्रमाणे राज्याला ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस योग्य आहेत. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक चांगलं काम करून निर्णय घेऊ शकतात", असं आठवले म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)