इम्रान प्रतापगढी: कॉंग्रेसला महाराष्ट्रातून राज्यसभेवर महाराष्ट्रातला उमेदवार का मिळाला नाही?

फोटो स्रोत, Facebook
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्रातली राज्यसभेची सहावी जागा कोण जिंकणार हा प्रश्न गहन बनलाय आणि त्याचं उत्तर 10 जूनला मिळेल. पण त्याहीअगोदर एक प्रश्न अधिक अवघड बनला आहे, ज्याचं नेमकं उत्तर कधीही मिळणार नाही, पण त्यानं महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये कमालीचा असंतोष निर्माण केला आहे. तो प्रश्न म्हणजे राज्यसभेवरच्या राज्यातल्या त्यांच्या कोट्यातल्या एकमेव जागेवर कॉंग्रेसला एकही मराठी, महाराष्ट्रातला उमेदवार का मिळाला नाही?
कॉंग्रेसच्या निवडीनं सारेच चकित झाले. कॉंग्रेसमधलेही आणि कॉंग्रेसबाहेरचेही. कॉंग्रेसनं उत्तर प्रदेशचे 34 वर्षांचे युवा नेते इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातली एकमेव राज्यसभा जागा द्यायचं ठरवलं. गुलाम नबी आझाद, सलमान खुर्शीद, पवन खेरा, नगमा अशी अनेक वर्षं कॉंग्रेसची खिंड लढवत असलेली नेते मंडळी लांब राहिली.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतले मिलिंद देवरा, संजय निरुपम यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांचा विसर पडला. आणि तुलनेनं अत्यंत नवख्या असणाऱ्या प्रतापगढींचा चेहरा महाराष्ट्रात आणला गेला. त्याचं एकमेव कारण सांगितलं जातं ते म्हणजे ते प्रियांका गांधींच्या जवळचे आहेत.
एकीकडे 'महाविकास आघाडी'मध्ये मित्रपक्ष असलेला शिवसेना कोल्हापूरच्या जिल्हाध्यक्षाला उमेदवारी देतो आहे. भाजपाचे तीनही उमेदवार हे महाराष्ट्रातले स्थानिक आहेत. असं असताना दीर्घकाळ महाराष्ट्रावर राज्य केलेल्या कॉंग्रेसला महाराष्ट्रातून एकही स्थानिक उमेदवार का मिळू नये. ज्यांची जागा रिकामी झाली ते पी. चिदंबरम हेसुद्धा गेल्या वेळेस बाहेरुन आणले गेले होते.
चिदंबरम आता स्वत:च्या मूळ राज्यातून, तामिळनाडूतून, राज्यसभेवर जाणार आहेत. पण त्यांनी मोकळी केलेली महाराष्ट्राची जागा उत्तर प्रदेशला मिळणार आहे.
कॉंग्रेसच्या राज्यसभेच्या नावांमध्ये एक नाव महाराष्ट्रातलं आहे, मुकुल वासनिक. पण इथं चकित करणारी दुसरी गोष्ट आहे. वासनिक यांना कॉंग्रेस राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवत आहे.
कॉंग्रेसमधल्याही अनेकांना हा प्रश्न पडला आहे की वासनिकांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर का नाही पाठवलं. कॉंग्रेसच्या पेल्यातलं हे वादळ राज्यात त्यांच्या पक्षासोबत 'महाविकास आघाडी'लाही डोकेदुखी ठरू शकतं.
महाराष्ट्र कॉंग्रेसच्या गोटात उद्रेक
कॉंग्रेसच्या वाट्याला एकच जागा होती आणि महाराष्ट्रात अनेक इच्छुकही होते. पण तरीही इथल्या कोणाचंच नाव न येता इम्रान प्रतापगढींचं नाव आलं. त्यानंतर लगेचच कॉंग्रेसमधला असंतोष बाहेर येतो आहे. अनेक नेत्यांनी जाहीर प्रश्न विचारले आहेत. म्हणणं एकच आहे की महाराष्ट्रात कॉंग्रेससाठी एकही नाव नव्हतं का?
आशिष देशमुख कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव आहेत आणि विदर्भात देवेंद्र फडणवीसांविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढवून ते चर्चेत आले होते. भाजपातून बाहेर पडून त्यांनी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला होता आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं. त्यांचं म्हणणं हे आहे की त्यांनाही आश्वासन दिलं गेलं होतं आणि 15 दिवसांपूर्वी सोनिया गांधींच्या भेटीतही सकारात्मक संदेश मिळाला होता.
पण आता प्रतापगढींचं नाव येताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे.

फोटो स्रोत, Facebook
'एपीबी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत देशमुख म्हणाले," महाराष्ट्रात कर्तबगार आणि कॉंग्रेसला रिझल्ट्स देऊ शकतील असे नेते आहेत. तरीही एका बाहेरच्या उत्तर प्रदेशच्या नवख्या व्यक्तीला आमच्यावर लादण्यात आलं आहे. याच्या निषेधार्थ मी माझ्या महासचिवपदाचा राजीनामा देतो आहे."
"इम्रान प्रतापगढींचं एकच क्वालिफिकेशन आहे. ते म्हणजे ते कव्वाल आहेत, शायर आहेत आणि ते मुशायरे करतात. त्यामुळे माझी तर अशी विनंती आहे की शिर्डीत हे प्रदेश कॉंग्रेसचं शिबीर आहे तिथे एक वर्कशॉप हा कव्वाली आणि शायरी कशी करावी याचा घ्यावा," असं देशमुख उपहासात्मक, पण रागानं पक्षाला सुनावतात.
आशिष देशमुख आरोपवजा प्रश्न करतात, "हे ठरवतांना सोनियांजींवर कोणाचा दबाव होता का? या दबावाखाली निर्णय चुकत चालले आहेत आणि पक्षाची हानी होते आहे. जर स्थानिक व्यक्तीला ही उमेदवारी दिली असती तर येणा-या निवडणुकांमध्ये नक्कीच पक्षाला मदत झाली असती. उत्तर प्रदेशमध्ये पक्षाचे दोन आमदार निवडून आले आणि तिथले तीन जण राज्यसभेवर चालले आहेत. त्यामुळे प्रश्न हा पडतो की महाराष्ट्रातली पक्षाची स्थिती उत्तर प्रदेशसारखी करायची आहे का?"
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसमधल्या अनेकांचा आक्षेप हा आहे की राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतांना, इथे एक स्थानिक खासदार वाढवून पक्षाला अधिक बळकटी देण्यापेक्षा बाहेरची व्यक्ती इथे आणली गेली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षनेतृत्वाला पत्र लिहून मुकुल वासनिक यांना राजस्थानऐवजी महाराष्ट्रातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.

फोटो स्रोत, Getty Images
"विदर्भातल्या मुकुल वासनिकांना यादीत स्थान मिळालं आहे, पण त्यात विरोधाभास असा आहे की त्यांना महाराष्ट्रातून का नाही पाठवलं? कोणतरी परप्रांतातल्या व्यक्तीला महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवणार आहेत. मी मुकुलजींना म्हटलं की अजूनही वेळ आहे, तुम्ही महाराष्ट्रातून तुमचा अर्ज दाखल करा. मी वैयक्तिकरित्या पक्षाच्या नेतृत्वालाही पत्र लिहिलं आहे की वासनिक यांचा संबंध महाराष्ट्राशी आहे तर तसा विचार व्हावा. खासदार विकासनिधी असतो. ते ज्या राज्यातून येतात तिथं त्यांना तो खर्च करता येतो.
महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या जनतेचं ते म्हणणं असेल. आता वासनिक इथं खर्च करु शकत नाहीत. त्यांना आता तो राजस्थानमध्ये करावा लागेल. स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका यांच्या निवडणुका इथे आहेत. तेव्हा ते प्रचार करु शकतात. आता होईल असं की जयपूरला निवडणुक असेल तर ते जातील," असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहे.
दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या वादावर सबूरीनं घेत पडदा टाकायचा प्रयत्न केला आहे. पक्षनेतृत्वानं विचारपूर्वक निर्णय घेतला असल्याचं म्हणत ही देशाची निवडणूक आहे आणि त्यासाठी सगळे एकत्र मतदान करतील असं म्हटलं आहे. पण स्थानिक उमेदवार का मिळाला नाही यावर उत्तर मात्र राज्यात सत्तेत असलेला कॉंग्रेस पक्ष देऊ शकत नाही आहे.
इम्रान प्रतापगढी आहेत कोण?
इम्रान प्रतापगढी हे नाव महाराष्ट्रात जरी नुकतंच माहिती झालं असलं तरीही उत्तर प्रदेशच्या राजकारणात ते 2019 पासून चर्चेत आहेत. ते कवी आहेत, जाहीर कार्यक्रम करतात. त्यांना युट्यूब, इतर सोशल मीडिया यावर मोठा फॉलोअर वर्ग आहे. पण सध्या 34 वर्षांचे असलेले इम्रान युथ कॉंग्रेसमधनं राजकारणात प्रवेश करते झाले.
मोदी आणि भाजपा यांच्यावर टीका करत ते राहुल गांधींच्या जवळचे बनले. पण लवकरच उत्तर प्रदेशची जबाबदारी आपल्या शिरावर घेतलेल्या प्रियांका गांधीच्याही ते विश्वासातले बनले. 2019 मध्ये त्यांनी मुरादाबादमधून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण त्या निवडणुकीत ते ६ लाखांपेक्षा अधिक फरकानं पराभूत झाले आणि त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं.
पण तरीही प्रतापगढींचं पक्षातलं वजन कमी झालं नाही. 2021 मध्ये त्यांना कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचं प्रमुख करण्यात आलं. आणि आता त्यांना महाराष्ट्रात स्थानिक नावं बाजूला सारुन राज्यसभेची उमेदवारी मिळाली.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते कॉंग्रेसचा असा निर्णय फारसा अनाकलनीय नाही आणि त्यांच्या आजवरच्या इतिहासाला धरुनच आहे.
"त्यांच्याकडे स्थानिक राजकीय नफे-तोटे असं पाहण्यापेक्षा आपल्या माणसांना कुठं बसवायचं असाच विचार केला जातो. नाहीतर आजपर्यंत पी व्हि नरसिंह राव, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, राजीव शुक्ला असे लोक महाराष्ट्रातनं का पाठवले असते? या वेळेस राज्यसभेसाठी लोक महाराष्ट्रातले मराठी वा अमराठी उमेदवार नव्हते अशातली गोष्ट नव्हती. पण त्यांना आपले काही लोक बसवायचे होते. हायकमांडला इतक्या वर्षांनंतर माहिती आहे की इथे काही कुरकुर होत नाही. वास्तविक वासनिकांना इथून लढवलं असतं. पण त्यांनी तेही तसं केलं नाही," देशपांडे म्हणतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








