राज्यसभा निवडणूक : संभाजी राजेंचा राज्यसभेचा मार्ग खडतर?

फोटो स्रोत, Facebook/Sambhajiraje
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 24 मे रोजी या राज्यसभा निवडणूकीची अधिसूचना जारी होऊन 13 जूनला ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यात संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढविणार आहेत. पण त्यासाठी संभाजी राजे छत्रपती यांना सर्वपक्षीय आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजी राजेंना पाठिंबा जाहीर केला असं संभाजीराजेंच्या कार्यालयातून सांगितलं गेलं असलं तरी शरद पवार यांचं प्रत्यक्ष वक्तव्य पाहिलं तर त्यांनी थेट पाठिंबा जाहीर करण्यावर भाष्य करणं टाळल्याचं दिसत आहे.
शिवसेनेकडून या जागेवर उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून जर पाठिंबा मिळाला नाही तर संभाजी राजे छत्रपती यांचा राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्ग खडतर होऊ शकतो. याची काय कारणं आहेत यासंदर्भातला हा आढावा...
मतांची गणितं काय आहेत?
आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपला 2, शिवसेनेला 1, कॉंग्रेसला 1, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 अशा जागा मिळू शकतात. राज्यसभेसाठी निवडून येण्यासाठी 41 आमदारांच्या मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे 27 मतं अतिरिक्त आहेत तर भाजपकडे 22 मतं बाकी राहतात. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांच्या उरलेल्या संख्याबळाने जर संभाजी राजेंना पाठिंबा दिला तर संभाजी राजे निवडून येऊ शकतात.
तसं आवाहन संभाजी राजे छत्रपती यांनी यापूर्वी केलं आहे. 12 मे रोजी संभाजी राजेंनी 'स्वराज्य' नावाच्या संघटनेची घोषणा केली. त्याचबरोबर राज्यसभेची निवडणूक ही अपक्ष लढणार असून सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. या पाठिंब्यासाठी त्यांनी सर्व आमदारांना खुलं पत्र लिहून आवाहन केले आहे. महाविकास आघाडीची मतं संभाजीराजेंसाठी निर्णायक ठरणार आहेत. पण शिवसेना यासाठी तयार नसल्याचं दिसतंय.
शिवसेना सहावी जागा लढणार...!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संभाजी राजेंना पाठिंबा देण्याविषयी विचारलं असता ते म्हणाले, "महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाचा 1 खासदार निवडून येऊ शकतो. अधिकची मतं ही प्रत्येक पक्षाकडे राहतात. त्या मतांबाबत आमची इतर पक्षाची अद्याप चर्चा झालेली नाही. आमच्या सहकारी पक्ष कॉंग्रेसला जर मतांची गरज भासली तर आम्ही त्यांनाही मदत करू" शरद पवारांनी संभाजी राजे यांच्या पाठिंब्यावर थेट बोलणं टाळलं असलं तरी संभाजी राजेंच्या कार्यालयातून शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
या निवडणुकीबाबत ट्विट करत शिवसेना सहावी जागा लढविणार असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. ते या ट्विटमध्ये म्हणतात, "राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्ष्या दिसू लागली आहे. भ्रष्टाचारातून पैसा आणि त्यातून घोडेबाजार हे दृष्टचक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडेमोड करावी. आकडे आणि मोड दोन्ही शिवसेनेकडे आहे. लढेंगे जितेंगे...!"
शिवसेनेचा विरोध कशासाठी?
2009 साली संभाजी राजे छत्रपती यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला. संभाजीराजे छत्रपती हे 2016 साली राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर निवडून गेले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा विस्तार व्हावा या उद्देशाने मराठा नेत्याची निवड करून संभाजी राजेंना राज्यसभेवर पाठवण्याची खेळी केली होती. जरी ते राष्ट्रपती नियुक्त खासदार असले तरी त्यांचे नाव सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपकडून देण्यात आले होते. त्यामुळे संभाजी राजे हे भाजपच्या जवळ आहेत असं शिवसेनेला वाटतं.

फोटो स्रोत, Facebook/Sambhajiraje
याबाबत अधिक बोलताना लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "राज्यसभेची निवडणूक ही आतापर्यंत बिनविरोध झाली आहे. आगामी निवडणुकही बिनविरोध होणार यात काही शंका नाही. पण संभाजी राजेंना जर खासदारकीसाठी मदत करायची असेल तर त्यांच्याकडून काहीतरी हमी मिळावी यासाठी शिवसेना दबावतंत्राचा वापर करत असू शकेल. याचं कारण संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यात मराठा आंदोलनात ते सक्रिय आहेत. जर आज पाठिंबा दिला आणि उद्या ते सरकारविरोधात उभे राहिले किंवा भाजपच्या बाजूने उभे राहिले तर अडचण होऊ शकते. त्यामुळे काहीतरी हमी मिळवण्यासाठी हे दबावतंत्र असू शकतं. यासाठी संभाजी राजेंना शिवसेनेत प्रवेश मग पाठिंबा अशी अट घातली गेली असेल. जेणेकरून त्यांना पक्षाची बंधनं लागू होतील. "
राज्यसभा निवडणुकीचं स्वरुप
राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच वरीष्ठ सभागृह किंवा काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही संबोधलं जातं. पण वरीष्ठ सभागृह असं संबोधण्यात येत असलं तरी राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेचे अधिकार थोडे जास्त आहेत.
राज्यसभेत जास्तीत जास्त 250 जागा असू शकतात. यापैकी 12 सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात. तर 236 सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि 2 सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात.
सध्या राज्यसभेची सदस्य संख्या 245 इतकी आहे. यापैकी 233 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात.
राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले उमेदवार प्रामुख्याने कला, विज्ञान, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडीत असतात. अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राष्ट्रपतींनीच राज्यसभेकरिता नामनिर्देशित केलं होतं, हे आपल्याला आठवत असेल.
राज्यसभा स्थायी सभागृह आहे. हे कधीच भंग होत नाही. भारताचे उपराष्ट्रपती या सदनाचे सभापती असतात. इथल्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो. त्यांच्या जागी नवे उमेदवार राज्यसभेवर निवडून जातात.
भारतीय संविधानातील कलम 84 नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
संबंधित उमेदवार देशाचा नागरिक असावा ही पहिली अट आहे. त्याने वयाची 30 वर्षं पूर्ण केलेली असावीत. तसंच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केल्या पाहिजेत.
राज्यसभेत कोणत्या राज्यातून किती जागा निवडून जातील हे त्या राज्याच्या लोकसंख्येवरून ठरवलं जातं.
राज्यसभेच्या सदस्यांची निवड विधानसभेत निवडून गेलेल्या आमदारांकडून केली जाते. प्रत्येक राज्यातील विधानसभा आमदारांची संख्या तिथल्या लोकसंख्येवर आधारित असते.
उदाहरणार्थ, महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा आहेत. उत्तर प्रदेशात त्या 31 आहेत. अरूणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालय, गोवा, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा यांसारख्या लहान राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागा आहे.
पण राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते.
राज्यसभा निवडणूक विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला ठराविक मतं आवश्यक असतात. या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते. ही निवड प्रक्रिया आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊ.
महाराष्ट्रात 288 विधानसभा आमदार आहेत तर राज्यसभेच्या एकूण 19 जागा आपल्या राज्यात आहेत.
पण एकाच वेळी सर्वच्या सर्व जागांवर राज्यसभेच्या निवडणुका होत नसतात. ठराविक कालावधीनंतर ठराविक जागांसाठी निवडणूक होते.
राज्यसभा निवडणुकीसाठीच्या जागांच्या संख्येत 1 ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक ती मतसंख्या आपल्याला मिळते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








