उद्धव ठाकरेः मुख्यमंत्री बनणं हे माझं स्वप्न नव्हतं, मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा झाला पाहिजे हे स्वप्न होतं #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. मुख्यमंत्री बनणं हे माझं स्वप्न नव्हतं, मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा झाला पाहिजे हे स्वप्न- मुख्यमंत्री
"मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं. मी मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलंही नव्हतं, पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि मी मुख्यमंत्री झालो. आता मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहिल, हे ही माझं स्वप्न आहे", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या रौप्य महोत्सव समारंभास उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, "मुख्यमंत्री बनणं हे माझं कधीच स्वप्न नव्हतं, मी मुख्यमंत्री बनेन असं माझ्या स्वप्नातही आलं नाही. पण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि माझ्यावर राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आली. मी मुख्यमंत्री होईल, असं जरी मला वाटलं नव्हतं तरी मुख्यमंत्री माझ्या पक्षाचाच असेल हे माझं स्वप्न होतं. तसेच मी असेपर्यंत सीएम माझ्या पक्षाचा होत राहील, हे ही माझं स्वप्न आहे."
2. हनुमानाचं नाव ऐकून रावणच सूडाने पेटला असेल- चित्रा वाघ
एका महिला खासदाराला ठाकरे सरकारने दिलेली अमानवीय वागणूक ऐकून अंगावर शहारे आले व मनात संतापाचा डोंब उसळला. हनुमानाचे नाव ऐकून फक्त रावणच एवढा सूडाने पेटला असेल नवनीत राणा एकट्या नाहीत आणि अबलाही नाहीत हे विसरू नये सरकारने.. असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार नवनीत राणा यांची भेट घेतल्यानंतर म्हटलं आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK/NAVNEET
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार नवनीत राणा यांची लिलावती रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याबरोबरच राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा गुरुवारी अखेर कारागृहाबाहेर पडले. मानदुखीचा त्रास जाणवत असल्याने नवनीत राणा या थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
राणा दाम्पत्याला बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला होता. पण, न्यायालयाच्या आदेशाची प्रत साडेपाच वाजेपर्यंत कारागृहात न पोहोचल्यामुळं त्यांना बुधवारची रात्रही कारागृहात काढावी लागली. नवनीत यांना भायखळा कारागृहात, तर रवी राणा यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. नवनीत राणा यांना मणका आणि कंबरदुखीसह स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे.
3.राज्यातील आमदार खासदारांची वीजबिलांची लाखोंची थकबाकी
राज्यातील मोठ्या संख्येने खासदार व आमदार वीज बिल भरत नसून महावितरण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. कंपनीची थकबाकी आता सुमारे 65,000 कोटी रुपये आहे. महावितरणाने थकबाकीदार खासदार आणि आमदारांची जिल्हानिहाय यादी तयार केली आहे.
या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठा नेते संभाजीराजे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात अशा अनेक मंत्र्यांचा समावेश आहे. 'न्यूज18 लोकमत'ने याबाबत बातमी दिली आहे.
माण (जि. सातारा) येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे हे सर्वात मोठे थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे महावितरणचे 7 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. अनेक राजकारण्यांचे अनेक कनेक्शन आहेत आणि त्यांनी त्यापैकी एकाचेही बिल भरलेले नाही. हे कनेक्शन बहुतेक निवासी आणि कृषी आहेत. तर काही व्यावसायिक देखील आहेत.
4.रुग्णालयात भरती करताना योग्य वागणूक नाही- नवाब मलिक
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांनी रुग्णालयात भरती करताना योग्य वागणूक मिळाली नाही असं म्हटलं आहे. पाण्याची बाटली देतानाही हलगर्जीपणा करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने जेजे रुग्णालयातील डॉक्टरांकडून डिस्चार्ज मिळवला. रुग्णालयात सलाईन सुरू असताना कुठलीच पूर्वसूचना न देता अचानक सलाईन काढण्यात आलं.
डिस्चार्ज पेपरवर सही घेण्यात आली असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. 'टीव्ही9 मराठी'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK
ईडीकडून मलिकांना आरोपपत्राची प्रत देण्यात आलेली नाही ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. जामिनासाठी मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारली नाही.
5.आयएएस अधिकाऱ्याच्या घरात पैशांची खाण
अवैध उत्खननाप्रकरणी ईडीने शुक्रवारी सकाळी पाचच्या सुमारास देशभरात छापेमारी केली. ही कारवाई झारखंडच्या वरिष्ठ सनदी अधिकारी पूजा सिंघल व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या 20 ठिकाणांवर करण्यात आली. त्यात सिंघल यांच्या निकटवर्तीय सीएच्या घरी तब्बल 25 कोटींची रोकड आढळल्याचे वृत्त आहे. 'दिव्य मराठी'ने ही बातमी दिली आहे.
ईडीच्यावतीने ही रोकड मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने एकाचवेळी झारखंडच्या रांची, धनबाद, खूंटी, राजस्थानचे जयपूर, हरयाणाच्या फरिदाबाद व गुरुग्राम, पश्चिम बंगालच्या कोलकाता, बिहारच्या मुजफ्फरपूर व दिल्ली-एनसीआरमध्ये छापेमारी केली टाकले
ईडीने मनरेगा घोटाळ्यातील एका प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. ईडीने या शपथपत्राद्वारे कोर्टापुढे झारखंडच्या खूंटी जिल्ह्यातील मनरेगातील 18.06 कोटींच्या घोटाळ्यावेळी पूजा सिंघल त्या ठिकाणी उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या असले स्पष्ट केले होते.
पूजा सिंघल यांनी 2 एनजीओंना मनरेगांतर्गत 6 कोटींची आगाऊ उचल दिल्याचा आरोप आहे. यात वेल्फेअर पॉइंट व प्रेरणा निकेतन या 2 स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे. ही रकम मुसळीच्या शेतीसाठी वाटप करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात तिथे कोणतेही कार्य झाले नव्हते. त्याची चौकशी अद्याप सुरू आहे.
याशिवाय, पलामू जिल्ह्याच्या उपायुक्तपदी असताना पूजा सिंघल यांच्यावर जवळपास 83 एकर वनभूमी एका खासगी कंपनीला उत्खनन करण्यासाठी हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. हे कठौतिया कोल माइंसशी संबंधित प्रकरण आहे. ईडीने कोर्टाला या प्रकरणाचाही तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








