अविनाश भोसले यांप्रमाणेच हे 4 आमदार आधी होते रिक्षा चालक

फोटो स्रोत, facebook
- Author, स्नेहल माने
- Role, बीबीसी मराठीसाठी
सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली. पोटापाण्यासाठी पुण्यात एकेकाळी रिक्षादेखील चालवलेल्या अविनाश भोसलेंनी आज ABIL या आपल्या कंपनीच साम्राज्य उभं केलंय. आज त्यांच्या घराच्या छतावर देखील हेलिकॉप्टर लँड होतं. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत.
वादांशी जोडले गेले असले तरी अविनाश भोसले हे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील एक महत्त्वाचं नाव आहे हे नक्की. पण फक्त अविनाश भोसलेचं नाही तर महाराष्ट्रात असे अनेक नेतेमंडळी आहेत ज्यांनी रिक्षा चालवण्यापासून सुरुवात केली आणि आपलं नाव गाजवलं. राजकारणातील अशाच काही व्यक्तिमत्त्वांबद्दल जाणून घेऊ.
1. अठराव्या वर्षी शिवसैनिक
यात पहिल्या क्रमांकावर आहेत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षं शिवसेनेत कार्यरत आहेत. ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून ते निवडून आलेत. ठाणे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर 2004 पासून ते विधानसभेवर निवडून जात आहेत. पण त्यांचा हा प्रवास सुरु झाला होता रिक्षाचालकापासून.
ठाणेवैभव या वृत्तपत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ एकनाथ शिंदेची ओळख 'आक्रमक शिवसैनिक ते शाखाप्रमुख ते जबाबदार मंत्री' अशी करून देतात.

फोटो स्रोत, Eknath Shinde / facebook
मिलिंद बल्लाळ एकनाथ शिंदेंविषयी सांगतात, "सातारा हे एकनाथ शिंदेंचं मूळ गाव. ते ठाण्यात आले ते आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी. मात्र घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना आपलं शिक्षण अर्ध्यातचं सोडावं लागलं. आता हाताला नोकरी हवी म्हणून त्यांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली. पुढे ते ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले."
"वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात हिरहिरीने सहभाग घेऊन आक्रमक भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपादृष्टी झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.
त्यानंतर 1997 मध्ये आनंद दिघेंनी शिंदेंना ठाणे महापालिकेचं तिकीट दिलं. आपल्या पहिल्याच प्रयत्नांत शिंदेंनी महापालिकेत बाजी मारली आणि ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. 2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. इथे सुद्धा पहिल्याच प्रयत्नात ते निवडून आले. 2004 सालापासून सलग चार वेळा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेत. शिंदे यांनी या आधी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. सध्या ते नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
2. रिक्षाचे स्टेअरिंग ते कोटींचे मालक… प्रताप सरनाईक
ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापेमारी केल्यावर ते प्रचंड चर्चेत आले होते. कथित एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 3254 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं ईडीनं म्हटलं होतं.
ठाण्यातील राजकारणामध्ये दबदबा असणाऱ्या प्रताप सरनाईक यांनी कोटींची उड्डाण भरण्याआधी त्यांच्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग होतं.

फोटो स्रोत, FACEBOOK/PRATAP SARNAIK
प्रताप सरनाईक यांचा जन्म वर्ध्याचा. लहानपणीचं ते वर्ध्याहून मुंबईला स्थायिक झाले. मुंबईतच त्यांनी आपलं दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ रिक्षाही चालवली. त्यानंतर सरनाईक राष्ट्रवादीचे सदस्य झाले आणि 1997 साली त्यांनी सक्रिय राजकरणामध्ये उडी घेतली.
1997 सालच्या ठाणे महापालिका निवडणुकीत ते विजय होऊन पहिल्यांदा नगरसेवक झाले. ठाणे महापालिकेत ते सलग दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले.
मग 2008 साली प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला आणि शिवसेनेत प्रवेश केला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते ठाण्यातील ओवळा-माजीवडा मतदारसंघातून आमदारही झाले. याच मतदारसंघातून ते सलग तीनवेळा म्हणजे 2009, 2014 आणि 2019 साली आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले.
3. कामगार नेते ते ऊर्जामंत्री...
"राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रवासही खडतर आहे. सुरवातीला कोराडी ते नागपूर या मार्गावर बावनकुळे रिक्षा चालवायचे. त्यानंतर कोराडी मधील कोराडी महाऔष्णिक विद्युत केंद्रातील लहान मोठे कंत्राट घेऊन त्यांनी कंत्राटदार म्हणून काम सुरु केले.
"औष्णिक वीज केंद्रात कंत्राटदार म्हणून काम करतांना प्रकल्पातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न ते उचलू लागले. पुढे त्यांनी स्वतःची ओळख कोराडी औष्णिक वीज केंद्रातील कामगार नेते म्हणून तयार केली," असं नागपूरमधील वरिष्ठ पत्रकार प्रवीण मुधोळकर सांगतात.

फोटो स्रोत, Facebook
मुधोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कामगार आंदोलनातूनच त्यांना नितीन गडकरी यांच्यासाखे मार्गदर्शक लाभले आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. बावनकुळे राजकारणात जेव्हा नवखे होते तेव्हा महाराष्ट्रात भाजपचं एवढं प्रस्थ नव्हतं. पण तरी ही त्यांनी गडकरींच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली.
"दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणूका लागल्या. बावनकुळेंना भाजपने उमेदवारी दिली. त्यांनीही संधीच सोनं केलं आणि ते निवडून आले. त्यावेळी जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता होती. ही निवडणूक त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. जिल्हा परिषदेतील सर्वाधिक सक्रिय सदस्य म्हणून अल्पावधीतच त्यांना प्रसिद्धी मिळाली.
"पुढे जेव्हा विधानसभेच्या निवडणूका लागल्या तेव्हा कामठी विधानसभा मतदारसंघासाठी इतर पक्षांकडून रिंगणात तगडे उमेदवार देण्यात आले होते. काँग्रेसने दिग्गज नेते मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिली. तर तत्कालीन आमदार व राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बहुजन रिपब्लिकन एकता मंच नावाचा पक्ष स्थापन करून निवडणुकीत उडी घेतली.
"भाजपकडे फारसे तगडे उमेदवार नव्हते. तेव्हा बड्या नेत्यांच्या लढाईत बावनकुळे यांना भाजपने उतरवले. त्यावेळी बावनकुळेंना डमी उमेदवार म्हणून हिणवलं गेलं मात्र त्यांनीच विजयाचं निशाण रोवलं. तेव्हापासून त्यांनी सलग तीन निवडणुका जिंकल्या.भाजपची सत्ता येताच मंत्रिपदाचा कुठलाही अनुभव नसताना त्यांना ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री करण्यात आलं," मुधोळकर सांगतात.
4. फुगे विकणे, रिक्षा चालवण्यापासून ते आमदारकी पर्यंत झेप घेणारे संजय शिरसाट
'औरंगाबादमध्ये एकदा महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध मोर्चा निघाला होता. त्या मोर्चात संजय शिरसाट होते. त्यावेळी ते रिक्षाचालक म्हणून काम करत होते. पण या मोर्चानंतरच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली,' असं दिव्य मराठीचे औरंगाबाद सिटी इंचार्ज श्रीकांत सराफ सांगतात.
शिरसाट यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही तितकीशी चांगली नव्हती. त्यांचे वडील एस.टी. मध्ये चालक होते. पाच भाऊ आणि एक बहीण असा परिवार. कमावणारे एकटे वडील अन पदरी सहा मुलं. हलाखीच्या परिस्थितीत भाकरी शोधण्यासाठी संजय घराबाहेर पडले. सुरुवातीला भाजीपाला विकला, गॅसचे फुगे विकले. त्यानंतर 7 रुपये रोजंदारीवर कॉसमॉस कंपनीत काम केलं. पुढे ते ऑटो रिक्षाचालकाचं काम करू लागले.

फोटो स्रोत, Sanjay Shirsat / facebook
औरंगाबादमध्ये तेव्हा परिस्थिती फार वाईट होती. मराठी लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, या विचाराने त्यांनी शिवसेनचं काम सुरू केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाडच्या अधिवेशनात घोषणा केली होती की, शिवसेनेचा विस्तार राज्यभर करायचा. त्यावेळी संजय शिरसाट शिवसेनेसोबत जोडले गेले असल्याची माहिती सरकारनामा या पोर्टलने दिली आहे.
सराफ सांगतात, "शिरसाट यांचा संपर्क खासदार असणाऱ्या मोरेश्वर सावे यांच्याशी आला. 1995 ला जेव्हा विधानसभेच्या निवडणूका लागल्या तेव्हा सावे म्हटले होते की, बाळासाहेब ठाकरे सत्तास्थापनेचं दिवा स्वप्न पाहतायंत. शिरसाट यांनी त्यावेळी सावेंच्या या विधानाला पाठिंबा दिला होता. पण 1995 मध्ये युतीची सत्ता आली. त्यामुळे शिरसाट पक्षात बाजूला पडले. पण आपल्या हुशारीने आणि सातत्याने त्यांनी राजकरणात यशस्वी झेप घेतलीच.'
शिरसाट 2000 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. पुढे ते 15 वर्ष ते नगरसेवक होते. 2009 ला पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 लाही निवडून आले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








