एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस, सीडीबद्दल ते म्हणाले...

फोटो स्रोत, facebook
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. एकनाथ खडसे यांनीच स्वत: याबाबत माहिती दिली आहे."30 डिसेंबर 2020 रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स मला ED ने दिले आहेत. त्यानुसार मी हजर राहणार आहे," अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.
"भोसरी भूखंडप्रकरणी ही नोटीस आली आहे. मुळात तो भूखंड माझ्या पत्नीने खरेदी केला आहे. याची आतापर्यंत चारवेळा चौकशी झाली आहे. आता ही पाचव्यांदा चौकशी होतेय. हा व्यवहार पाच कोटींचा आहे. त्या पाच कोटींप्रकरणी ही चौकशी आहे," अशी माहिती खडसेंनी दिली.
ईडी चौकशी लावली तर सीडी लावेन, असं एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावेळी म्हणाले होते. त्याबाबत माध्यमांनी आज प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, "नंतर मी तुम्हाला याबाबत सांगेन. हे सीडीचं प्रकरण सर्व जगाला माहिती आहे."
कालपासून काय झालं?
एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी ईडी चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याच्या चर्चा शुक्रवार संध्याकाळपासून येत होत्या. 30 डिसेंबर रोजी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं जातं. त्या चर्चांवर आधारित आणि सूत्रांच्या हवाल्याने विविध माध्यमांमध्ये शनिवारी या बातम्या छापूनही आल्या. पण या संपूर्ण प्रकरणात एकनाथ खडसे यांना खरंच ईडीची चौकशीची नोटीस आली की नाही हे आज 26 तारखेला दुपारपर्यंक स्पष्ट झालेलं नव्हतं.
तसेच एकनाथ खडसे यांनीच इंडियन एक्सप्रेस समूहाशी बोलताना याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. "गेल्या दोन-तीन दिवसांपासून याबाबत चर्चा ऐकून आहे. आपल्याला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. पण ही नोटीस येणार असल्याची माहिती मिळाली आहे, असं खडसे म्हणाले होते.
"कदाचित ख्रिसमसच्या सुट्टीमुळे नोटीस अद्याप आपल्यापर्यंत पोहोचली नाही. कोणत्याही तपास यंत्रणेने नोटीस पाठवली तरी मी चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे. मी कोणतंही चुकीचं काम केलं नाही," असंही खडसे यांनी म्हटलं होतं.
"माझ्याविरोधात सुरु असलेल्या चौकशांमुळे आश्चर्य वाटत आहे. मला नेहमी वाटायचं की ईडी 100 कोटी किंवा त्याहून अधिकच्या प्रकरणांमध्ये लक्ष घालतं. जर हे पुणे जमीन प्रकरणाबद्दल असेल तर त्यात चार कोटींहून कमी व्यवहार आहे. ज्या जमिनीबद्दल चर्चा आहे ती माझी पत्नी आणि जावयाने विकत घेतली होती. या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आहे," असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं होतं.
'ईडी दाखवली तर सीडी बाहेर येणार'
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. फडणवीस यांच्या त्रासाला कंटाळूनच आपण भाजप सोडत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
तसंच,माझ्यामागे ईडीची चौकशी लावाल तर मी सीडी लावेन असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे आता ईडीची नोटीस आल्यावर खडसे काय करतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

फोटो स्रोत, Twitter
मात्र, याच नोटीसवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. "भाजपची ही हुकुमशाही सुरु आहे. ईडीची नोटीस ही सूडबुद्धीने देण्यात आली आहे", असा आरोप त्यांनी केला.
"ज्यादिवशी खडसेंनी राष्ट्रादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचदिवशी त्यांची ईडी किंवा इतर चौकशी होईल, हे गृहित होतं. कारण जे कुणी भाजपच्या विरोधात जातात त्यांना या न त्या प्रकारे कसा न त्रास दिला जातो, मग ते ईडी किंवा इतर माध्यम असेल, चौकशा सुरु केल्या जातात. याआधी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यासोबत केलं. आता एकनाथ खडसे यांना नोटीस दिली.
एकनाथ खडसे भक्कम आहेत. ते ईडीच्या चौकशीला सामोरे जातील, त्या चौकशीतून काहीच निषपण्ण होणार नाही. पण भाजपने हे गलिच्छ आणि सूडबुद्धीचं राजकारण सोडलं पाहिजे", अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.
शिवसेना नेते संजय राऊत यांनीही यावरून भाजपवर टीका केली. शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे," असं संजय राऊत लोकसत्ताशी बोलताना म्हणाले.
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमके काय बिनसले?
2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली. खरं तर कोणत्याही ज्येष्ठ नेत्यासाठी सत्ता येणं ही जमेची बाब. पण खडसेंच्या बाबतीत विपरीत घडले असे म्हणावे लागेल.
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला येण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्री पदासाठी त्यांची दखल न घेतल्याने ते नाराज होते असे समजले जाते.
खडसेंनी शपथविधीला हजेरी लावावी यासाठी त्यांची नाराजी दूर करण्यात आली. ते महसूल मंत्री झाल्यानंतर अगदी दोनच वर्षात त्यांना राजीनामा द्यावा लागला.
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राजीनाम्यानंतर एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये होत असलेली कोंडी त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर जाहीर टीका केली होती. ते म्हणाले, "आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का आहे," असा प्रश्न खडसेंनी विचारला होता.
काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी पहिल्यांदाच खडसेंवर प्रतिक्रिया दिली होती.
ते म्हणाले, "माझ्यामध्ये फार संयम आहे. मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही."
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना मार्गदर्शक भूमिकेत येण्याचाही सल्ला दिला होता. या वक्तव्यावरही खडसेंनी नाराजी व्यक्त केली होती.
2016 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून द्यावा लागणारा राजीनामा असेल, विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारणे, विधान परिषदेसाठीही डावलणे, मुलगी रोहिणी खडसेंचा विधानसभा निवडणुकीतला पराभव अशा सर्वच कारणांमुळे एकनाथ खडसे भाजपमध्ये एकाकी पडले.
आता येत्या काळात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंनासोबत घेऊन विरोधकांवर कसा निशाणा साधणार हे पहाणं महत्त्वाचे ठरेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








