Tesla in India: टेस्ला भारतात कारखाना थाटणार? इलॉन मस्क यांचं स्पष्ट उत्तर...

इलॉन मस्क यांची टेस्ला गाडी भारतात कधी येणार, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो?

देशात टाटा, MG, ह्युंदाई आपल्या इलेक्ट्रिक गाड्या विकत असताना जगातली सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी टेस्ला भारतात का येत नाही?

नुकतंच एका ट्विटर युजरने जेव्हा विचारलं की टेस्ला त्याची फॅक्टरी भारतात का टाकत नाही, त्यावर मस्क यांनी असं उत्तर दिलं - "टेस्ला त्या देशात कारखाना टाकणार नाही, जिथे आम्हाला आधी गाड्या विकायची आणि त्यांच्या सर्व्हिसिंगची परवानगी मिळणार नाही."

म्हणजे काय, तर इलॉन मस्क आधी त्यांच्या टेस्ला इलेक्ट्रिक गाड्यांना भारतात मागणी किती आहे, त्या इथे विकून काही फायदा आहे की नाही, याची शहानिशा करू पाहत आहेत. जर सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण इथे फॅक्टरी थाटू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

पण ही पहिलीच वेळ नाहीय जेव्हा त्यांना भारतात टेस्ला बनवण्याची मागणी किंवा विचारणा कुणी केली आहे. यापूर्वीसुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्लाच्या अमेरिकेतील फॅक्ट्रीला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी इलॉन मस्क यांना विनंती केली होती की या इलेक्ट्रिक गाड्या टेस्लाने चीनऐवजी भारतात बनवाव्यात आणि विकाव्यात.

इलॉन मस्क हे भारतात टेस्ला गाड्या का बनवत नाही, असं एका युजरने मागेसुद्धा विचारलं होतं. तेव्हा त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं होतं, "अजूनही सरकारकडून बरीच आव्हानं आहेत."

त्यांच्या या ट्वीटनंतर लगेच महाराष्ट्राचे जयंत पाटील यांच्यासह चार राज्यांच्या नेत्यांनी थेट मस्क यांना ट्वीट करून, त्यांच्या राज्यात प्लांट थाटण्याचं निमंत्रण दिलं होतं. यात तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि पंजाबचाही समावेश आहे -

टेस्ला भारतात गाड्या का विकत नाही?

पण टेस्लाचं भारतात अद्याप शोरूम का नाहीय? तर प्रश्न असा आहे की टेस्लासारख्या गाड्या भारतात इंम्पोर्टच केल्या जाऊ शकतात. आणि त्यावर लागणारा आयात कर गाडीच्या किमतीवर अवलंबून असते. तीस लाखांपर्यंतच्या गाडीवर 60 टक्के आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या गाडीला आयात करायला 100 टक्क्यांचा आयात कर लागतो.

म्हणजे जर एखाद्या गाडीचं मूल्य अमेरिकेत 35 लाख रुपये असेल तर भारतात ती आपल्याला कमीत कमी 70 लाख रुपयांना मिळू शकेल. त्यामुळे टेस्ला गाडीला भारतात पुरेशी मागणी असेल तरच कंपनीला इथे शोरूमचं नेटवर्क थाटणं परवडेल.

सध्या भारतात टाटा मोटर्स, MG, ह्दुयाई, मर्सेडीज, ऑडी सह अनेक कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या विकत आहेत. त्यांची किंमत पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या तुलनेत 30 ते 60 टक्क्यांनी जास्त आहे, मात्र हळूहळू ही मागणी वाढतेय. आता या वाढत्या मागणीला दाद देऊन इलॉन मस्क भारतात किमान गाडी विकायला येतील का, हे पाहावं लागेल.

हेही नक्की वाचा

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)