'मुसलमानच मुसलमानाला मारत आहे, हा कसला जिहाद?' अमरिना भट्टच्या वडिलांचा सवाल

    • Author, माजिद जहांगीर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, बडगाममधून

"माझ्या मुलीला मारुन माझं घर उद्धवस्त केलं. माझं चांगलं चाललेलं आयुष्य विस्कटलं. माझं घर मुलीच्या कमाईवरच चालत होतं. मला अगदीच जमीनदोस्त करुन टाकलंय. माझी मुलगी माझ्याजवळ होती तेव्हा मी राजासारखा होतो, तिला मारुन मला एकदम फकीर करुन टाकलंय."

हे शब्द होते दुःखात बुडालेल्या खिजर मोहम्मद भट्ट याचे. अमरिना भट्टचे ते वडील. तिच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसलाय. जम्मू-काश्मीरमधल्या बडगाममध्ये हुशरू हे त्यांचं गाव. या गावातल्या घरात एका खोलीत बसून ते वारंवार चेहऱ्यावर हात फिरवत स्फुंदत बोलत होते.

ते म्हणाले, "मी जिच्या सावलीत जगत होतो, तिलाच संपवून टाकलं गेलं. मी एक आजारी माणूस आहे. थंडीत माझी मुलगी सगळा खर्च करुन मला जम्मूला नेत असे. पण आता मला कोण नेईल? कोण माझ्या उपचाराचा भार उचलेल?"

बोलताबोलता त्यांनी विचारलं? "मुसलमानच मुसलमानाला मारत आहे, हा कसला जिहाद?"

काश्मीरमध्ये सोशल मीडियावर अत्यंत अल्पावधीत स्वतःची ओळख बनवणाऱ्या कलाकार अमरिना भट्टची गेल्या बुधवारी हत्या करण्यात आली. ती 30 वर्षांची होती. त्या रात्री दोन कट्टरवादी आले. त्यांनी तिला बाहेर बोलावलं आणि तिच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या.

या हल्ल्यात त्यांचा दहा वर्षांचा एक भाचाही जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

अमरिना भट्ट अत्यंत कमी काळात प्रसिद्ध झाली होती. सोशल मीडियावर तिचे व्हीडिओ लाखोवेळा पाहिले गेलेत तसेच तिचे हजारो फॉलोअर्स होते.

काश्मीरमध्ये सध्या टार्गेटेड म्हणजे लक्ष्य ठरवून केलेल्या हत्यांची मालिका सुरू आहे. याच काळात अमरिनाचीही हत्या झालीय. काही दिवसांपूर्वी काश्मीरी पंडित राहुल भट्ट यांचीही हत्या करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी सौरामध्ये एक पोलीस कर्मचारी आणि त्याच्या मुलीवर संशयित कट्टरवाद्यांनी हल्ला केला होता.

हत्येच्या या मालिकेमुळे काश्मीरमध्ये दहशतीचं वातावरण तयार झालंय. अमरिना यांच्या घरातही ते जाणवलं. त्यांच्या घरातले अनेक लोक कॅमेरापासून लांब राहात होते.

जम्मू आणि काश्मीरमध्ये काल सुरक्षारक्षक आणि पोलिसांमध्ये चकमकीच्या दोन घटना घडल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार पहिल्या चकमकीत श्रीनगर येथे लष्कर-ए-तय्यबाचे दोन कट्टरवादी मारले गेले आहेत. दुसरी चकमक अवंतीपुरामध्ये झाली. या चकमकीत अमरिनाच्या हत्येशी संबंधित दोन कट्टरतावादी मारले गेल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुख्ती यांनी शुक्रवारी बडगाममध्ये अमरिनाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जम्मू-काश्मीर प्रशासनाने अमरिनाच्या कुटुंबाला मदत करावी असं त्यांनी आवाहन केलं आहे.

अमरिनाच्या घरात सध्या शोकमय वातावरण आहे. बीबीसीची टीम तिच्या घरी गेली तेव्हा घराबाहेर उभारलेल्या तंबूत अनेक महिला गोळा झाल्याचं दिसलं. अमरिनाच्या हत्येनंतर तिची बहीण रझिया अगदीच कोलमडून गेलीय.

ती सांगते, "आम्ही सगळे आत बसलेलो, दोन व्यक्ती आल्या त्यांनी माझ्या मुलाला, अमरिनाला बाहेर बोलावलंय असा निरोप द्यायला सांगितलं. त्याने आत येऊन तिला बोलावलं. ते तिला म्हणाले, आम्ही याच भागात राहतो तुम्ही लग्नामध्ये गाणं गायला यायचं आहे. अमरिना म्हणाली, मी गात नाही. त्यानंतर त्या लोकांनी अमरिनावर गोळ्या झाडल्या. अमरिना धावतपळत आतल्या खोलीत गेली आणि कोसळली. त्यानंतर माझ्या डोळ्यांसमोर काळोख दाटला. नंतरचं मला काहीच माहिती नाही."

अमरिनाला का मारलं हे समजत नाही असं रझिया सांगते. तिच्या माहितीनुसार, अमरिना फक्त दूरदर्शनबरोबर काम करत होती. तीन महिन्यांपुर्वी तिनं सोशल मीडियावर 'भट्ट अमरिना' नावाचं चॅनल सुरू केलेलं, गेल्या एक वर्षापासून ती गातही होती.

अमरिना दिवसभर मजुरी करत होती संध्याकाळी घरी येत असे. तिच घरासाठी कमवून आणत असे आता कोण कमवेल असं रझिया विचारते.

अमरिनाबरोबर काम करणारे तिचे सहकारीसुद्धा चिडले आहेत, अशाप्रकारे हत्या करणं निंदनीय असल्याचं ते सांगतात.

तिचे एक सहकारी हस्सान जावेद म्हणतात, "अमरिना असं काय केलं होतं की तिला एवढी मोठी शिक्षा देण्यात आली? तिची हत्या करण्यात आली. घरी येऊन गोळ्या घालणं हे सगळं काय आहे. या घटनेमुळे मी व्यथित झालोय. मी या घटनेची निंदा करतो."

जावेद म्हणतात, "कोणतीही चूक नसणाऱ्या कलाकाराला किंवा कोणत्याही व्यक्तीला मारणं निंदनीय आहे. तिचं सोशल मीडियावरचं काम पाहिलंत तर ती कोणाहीविरोधात बोलत नसल्याचं दिसेल. तीसुद्धा माझ्यासारखी लोकांना हसवणारी कलाकार होती."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)