ज्ञानवापी मशीद: भारतातल्या धार्मिक स्थळांवरच्या हल्ल्याचा जाणून घ्या इतिहास

फोटो स्रोत, ROBERT NICKELSBERG/GETTY IMAGES
- Author, विनीत खरे
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा.
ताजमहाल हा तेजो महालय मंदिर असल्याचं वर्णन, बंद असलेल्या 22 खोल्यांवरून वाद.
कुतुबमिनार परिसरातील कुव्वातुल इस्लाम मशिदीत पूजा करण्याची मागणी.
मथुरेतील जिल्हा न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी याचिकेवर सुनावणी करण्यास परवानगी दिली.
हिंदू महासभेचा दावा - दिल्लीच्या जामा मशिदीखाली देवतांच्या मूर्ती, उत्खननासाठी लिहिलं पत्र.
अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 नोव्हेंबर 2019 रोजी देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणात ते म्हणाले होते, "या निर्णयानंतर आता नवीन पिढी नव्या पध्दतीने 'न्यू इंडिया'च्या उभारणीला सुरुवात करेल. चला एक नवा संकल्प करूया."
तीन वर्षांनी पुन्हा एकदा
'ये-मस्जिद-कभी-मंदिर-था' असा वाद सुरू आहे. कोर्टात आता याचिकांचा पूर आलाय. धार्मिक राष्ट्रवादाचे संशोधक शमसुल इस्लाम म्हणतात, "लोक 5,000 वर्षांपूर्वीच्या जुन्या सभ्यतेशी खेळत आहेत."
युक्रेन-रशिया युद्धामुळे जगात धोरणात्मक बदल होत असताना, कोरोनामुळे 6.2 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही या विषाणूचा धोका कायम आहे. 2019 मध्ये तर भारतात हवेचे प्रदूषण जगात सर्वाधिक होते. यात 23 लाख लोक मारले गेले.
आज देशासमोर गंभीर आर्थिक, सामाजिक आणि जागतिक आव्हाने उभी असताना त्यावेळी भारतात हिंदू - मुस्लिम, मंदिर - मस्जिद, 400, 500, 600 किंवा हजार वर्षांपूर्वी कोणी, किती मंदिर तोडली आणि का या चर्चेला वेग आला आहे
12 मे रोजी भाजपच्या प्रवक्त्या अनिला सिंह यांनी ताजमहालचा फोटो ट्विट करत म्हटलं, 'मकबरा, महल कसा बनला?'
दुसर्या ट्विटमध्ये त्या म्हणतात की, "मूलभूत अधिकार फक्त अल्पसंख्याक समुदायासाठी आहेत का? जेव्हा बहुसंख्य समुदाय आपल्या हक्कांसाठी बोलतो तेव्हा त्याला जातीयवादी का म्हणतात?"
ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या बातमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी #GyanvapiTruthNow हॅशटॅगसह ट्विट करत म्हटलंय, "तुम्ही 'सत्य' किती ही लपवा, पण एक दिवस ते बाहेर येईलच. कारण 'सत्य हेच शिव' आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ज्ञानवापी मशिदीवरून पुन्हा वाद सुरू
सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे काशीची ज्ञानवापी मशीद. इथं असा दावा केला जातोय की ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर एकेकाळी मंदिर होतं.
ब्रिटीश लायब्ररीत एक माहिती दिली आहे. त्याप्रमाणे विश्वनाथ मंदिराच्या चित्रासह असलेल्या या माहितीमध्ये हे मंदिर 17 व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबने पाडलं होतं. सध्याचं मंदिर इंदूरच्या अहिल्याबाई होळकर यांनी 1777 मध्ये बांधलं.
इतिहासकार हरबंस मुखिया सांगतात, "काशी आणि मथुरेचे मंदिर औरंगजेबाने उद्ध्वस्त केले होते, ते त्याच्या आदेशाने तोडण्यात आले. त्याच औरंगजेबाने आपल्याला माहीत नसेल किती मंदिरे आणि मठांना दान दिलं. एकीकडे तो मंदिर उद्ध्वस्त करत होता, तर दुसरीकडे, तो मंदिरे आणि मठांना दान, जमीन आणि पैसा देत होता."
पण आजच्या घडीला इतिहासाची गुंतागुंत समजून घेणं आणि तो इतिहास समजावून सांगणं फारसं सोपं राहिलं नाही. आणि अशा वातावरणात इतिहास मागे कुठपर्यंत नेणार आणि त्यातून काय साध्य होणार हा प्रश्न उरतो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ऐतिहासिक सुधारणा कुठपर्यंत करणार ?
लेखक आणि प्राध्यापक पुरुषोत्तम अग्रवाल विचारतात की, "अशा ऐतिहासिक सुधारणा तुम्ही कुठपर्यंत कराल, हा प्रश्न संपूर्ण समाजाने स्वतःला विचारावा लागेल"
टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने आपल्या संपादकीयमध्ये लिहिलंय की, "इतिहास सुंदर नसतो. परंतु आधुनिक देश, विशेषत: वैविध्यपूर्ण लोकशाही, जो एक प्रमुख जागतिक आर्थिक शक्ती बनू इच्छित आहे, त्याने इतिहासाचे खटलं चालवण्यात आपली शक्ती खर्च करायला नको."
वृत्तपत्रात पुढे लिहिलंय की, देश आधीच अनेक सांप्रदायिक गोष्टींना तोंड देतोय. आणि यात आता परत एक 'मशीद-आधी-मंदिर-होतं' अशा घटना सुरू राहिल्या तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
जेव्हा ज्ञानवापी प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा वृत्तपत्राने लिहिलं की, "सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाशी थेट बोललं पाहिजे. कोणत्याही याचिकेवर सुनावणी करताना, 1991 च्या कायद्याचे (प्रार्थना स्थळे विशेष तरतूद कायदा) पालन करताना कोणतही न्यायालयीन उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही."
प्रार्थना स्थळे (विशेष तरतुदी) अधिनियम, 1991 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 1947 रोजी असणाऱ्या धार्मिक उपासना स्थळ आहे त्याच स्थितीत राहावे.
लेखक प्रताप भानू मेहता यांच्या मते, 'अयोध्येनंतर काशी आणि मथुरेतील मंदिर परत करण्याची चर्चा म्हणजे बहुमताचा वापर करण्यासारखं आहे. आणि आता सत्ता बहुसंख्यांकांकडे आहे.'
ते लिहितात, "ही पवित्र स्थळ परत घेण्याचा उद्देश धर्मात सांगितलेला नाही. ज्ञानवापी मशिदीच्या अस्तित्वामुळे काशी विश्वनाथाप्रती असलेली भक्ती कमी झालेली नाही. ती परत घेण्यामागचा उद्देश हा आहे की हिंदूंकडे ताकद आहे आणि मुस्लिमांना त्यांची जागा दाखवली पाहिजे."
दुसरीकडे, 'रिक्लेम टेंपल्स' नावाच्या गटाशी संबंधित असलेल्या विमल व्ही यांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम राज्यकर्त्यांनी त्यांची 'संस्कृती' आणि 'वैचारिक श्रेष्ठता' दाखवण्यासाठी एक लाख हिंदू मंदिरं नष्ट केली. त्यामुळे आता हिंदूंची मंदिर परत घेण्याकडे 'ऐतिहासिक न्यायाच्या' दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे."

फोटो स्रोत, facebook
विमल व्ही यांच्या मते, ज्या लोकांनी कथितरित्या या मंदिरांवर 'अतिक्रमण' केलं आहे त्यांना आता हाकलून लावलं पाहिजे. त्यांच्या मते, 'रिक्लेम टेंपल्स' ही स्वयंसेवी संस्था आहे आणि त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. भूतकाळात हिंदू मंदिरांवर झालेल्या कथित अत्याचारांबद्दल बोलणारी अशी अनेक हँडल सोशल मीडियावर पाहायला मिळतील.
अगदी माजी मंत्री आणि भाजप नेते केएस ईश्वरप्पा यांनी म्हटलंय की, 'मुघलांनी 36 हजार हिंदू मंदिरं पाडली. आता ती कायदेशीररित्या परत घेतली पाहिजेत'.
मुस्लिम शासकांनी सुमारे 60 हजार हिंदू मंदिरे पाडली असल्याचा दावा काही हिंदू संघटना करतात. पण डी.एन झा आणि रिचर्ड ईटन या इतिहासकारांच्या मते, 80 हिंदू मंदिरांचं नुकसान झालं आहे.
नष्ट झालेल्या हिंदू मंदिरांच्या संख्येबाबत इतिहासकार हरबंस मुखिया म्हणतात, "60 च्या दशकात काही वृत्तपत्रांमध्ये 300 मंदिरे पाडण्यात आल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यानंतर पुढील दोन-तीन वर्षांत ही संख्या 300 ते 3,000 पर्यंत वाढली. त्यानंतर 3,000 ते 30,000 बनली आहे."
हिंदूंकडून मंदिरांची लूट?
पूर्वी भारतातील हिंदू मंदिरं केवळ बाहेरून आलेल्या गैरहिंदू आक्रमकांनी लुटली आहेत असं नाही.
इतिहासकार रिचर्ड ईटन लिहितात की, "भारतात पूर्वी मंदिरांमध्ये असलेले देव आणि त्यांचे राजेशाही संरक्षक यांच्यात घनिष्ट संबंध असायचे. आणि मध्ययुगीन भारताच्या सुरुवातीच्या काळात शाही घराण्यांमधील कलहांमुळे मंदिरांचा अपमान व्हायला सुरुवात झाली."
ईटन लिहितात की, स्थानिक मान्यतेनुसार सन 642 मध्ये पल्लव राजा नरसिंह वर्मन-प्रथम याने चालुक्य राजधानी वातापीमधून (बदामी) गणेश मूर्ती लुटली.
आठव्या शतकात, बंगाली सैन्याने राजा ललितादित्यविरुद्ध सूड उगवला. याच दरम्यान काश्मीरमधील ललितादित्यच्या राज्यतील राजदेव विष्णू वैकुंठाची मूर्ती नष्ट केल्याचं त्यांना वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "काश्मीरचा राजा हर्षाने तर अजब कमालच केली. त्याने मुर्त्या नष्ट करण्यासाठी एक अधिकारी नेमला होता."
ईटन लिहितात की नवव्या शतकात राष्ट्रकूट राजा गोविंद-तृतीय याने कांचीपुरमवर हल्ला करून ते शहर काबीज केलं. यामुळे श्रीलंकेचा राजा इतका घाबरला की त्याने सिंहल देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक (कदाचित भगवान बुद्ध) मूर्ती पाठवल्या ज्या राष्ट्रकूट राजाने त्याच्या राजधानीतील शिव मंदिरात स्थापित केल्या.
त्याच सुमारास, पंड्या राजा श्रीमारा श्रीवल्लभ याने श्रीलंकेवर हल्ला केला आणि रत्नजडित महालात स्थापित केलेली सोन्याची बुद्ध मूर्ती आपल्या राजधानीत आणली.
इतिहासकार ईटन लिहितात की, 11 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात चोल राजा राजेंद्र प्रथम याने अनेक राजांकडून घेतलेल्या मूर्त्यांनी आपली राजधानी सजवली होती. यामध्ये चालुक्य राजाकडून हिसकावून घेतलेल्या दुर्गा आणि गणेशाच्या मूर्ती, ओरिसातील कलिंगातून काढून घेतलेल्या भैरव, भैरवी आणि काली यांच्या मूर्ती आणि पूर्व चालुक्यांकडून नंदी यांचा समावेश होता.
1460 मध्ये, ओडिशातील सूर्यवंशी गजपती राजघराण्याचे संस्थापक कपिलेंद्र यांनी युद्धाच्या वेळी शिव आणि विष्णूची मंदिरे पाडली.
ईटन लिहितात की, बहुतेक प्रकरणांमध्ये तर राजे शाही मंदिरं लुटून देवाच्या मूर्ती न्यायचे. परंतु हिंदू राजांनी त्यांच्या विरोधकांची राजेशाही मंदिरे उद्ध्वस्त केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
इतिहासकार हरबंस मुखिया यांच्या म्हणण्यानुसार, 'राजघराण्यांना मंदिरांमधून वैधता मिळायची. आणि विरोधकांची मंदिरं नष्ट करणं म्हणजे विरोधकांच्या शक्ती आणि वैधतेवर हल्ला करण्यासारखं होतं'.
ते म्हणतात, "त्यावेळी असे प्रश्न विचारले जायचे की, तू कसला राजा जो आपलं मंदिर ही वाचवू शकला नाहीस." हरबंस मुखिया यांच्या म्हणण्यानुसार, 'मंदिरांवरील हल्ल्याचं आणखी एक कारण म्हणजे तिथून मिळणारं सोनं, हिरे आणि दागिने'.
ईटन म्हणतात की 'किती हिंदू मंदिरांचा अपमान झाला हे निश्चितपणे सांगता येत नसलं तरी पण 12 व्या शतकापासून ते 18 शतकापर्यंत 80 हिंदू मंदिरांचा अपमान झाल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत. अनेक राष्ट्रवादी हिंदूंसाठी हा आकडा 60 हजारांच्या आकड्यापासून खूपच लांब आहे.'

फोटो स्रोत, Getty Images
ईटन पुढे असं ही म्हणतात की, जेव्हा मुस्लीम तुर्क आक्रमकांनी आक्रमण केलं तेव्हा त्यांनीही तेच केले. मग यात तुघलक साम्राज्याचे राज्यकर्ते असोत की लोधी साम्राज्याचे.
हिंदू राजांकडून बौद्ध तीर्थक्षेत्रांचा विनाश?
इतिहासकार डीएन झा यांनी त्यांच्या 'अगेन्स्ट द ग्रेन- नोट्स ऑन आयडेंटिटी अँड मेडिव्हल पास्ट' या पुस्तकात ब्राह्मण राजांच्या हातून बौद्ध स्तूप, विहार आणि तीर्थक्षेत्र नष्ट झाल्याचं सांगितलं आहे. मात्र, त्यांनी केलेल्या दाव्यालाही आव्हान देण्यात आलंय.
हिंदूंमधील अत्याचारी जातिव्यवस्था आणि गुंतागुंतीच्या कर्मकांडांमुळे प्राचीन भारतातील लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले होते. आणि असं मानलं जातं की हिंदू धर्माचे अनुयायी या गोष्टीकडे एक धोका म्हणून पाहू लागले.
याला सामोरं जाण्यासाठी हिंदूंनी बौद्धांवर अत्याचार केले असा एक मतप्रवाह आहे. बौद्ध त्यांच्याकडे परत यावे म्हणून, बौद्ध धर्माच्या काही पैलूंचा वापर करण्यात आला. जसं की, बुद्धाचे वर्णन हिंदू देव विष्णूचा अवतार म्हणून करू दिला. हिंदू धर्माच्या पुनर्जागरणात आचार्य शंकर यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते.
डीएन झा लिहितात की, 'सम्राट अशोक भगवान बुद्धांवर विश्वास ठेवणारा होता. तर दुसरीकडे त्याचा मुलगा आणि भगवान शिवाचा उपासक जलौक याने बौद्ध विहारांची नासधूस केली.'
डीएन झा यांनी राजा पुष्यमित्र शुंगाचं वर्णन बौद्धांवर अत्याचार करणारा म्हणून केलं आहे. त्याने बौद्ध स्तूप नष्ट केले, बौद्ध मठांना आग लावली आणि सागल (सध्याचे सियालकोट) या ठिकाणी बौद्धांची हत्या केली असं मानलं जातं.
डीएन झा पुष्यमित्र शुंगाबद्दल लिहितात की, त्याने पाटलीपुत्र (आजचे पाटणा) येथील बौद्ध विहार नष्ट केले असावेत. झा लिहितात की, शुंगाच्या राजवटीत करण्यात आलेल्या सांची येथील बौद्ध स्थळांसह अनेक इमारतींच्या तोडफोडीचे पुरावे सापडले आहेत.
चीनी प्रवासी ह्युएन त्सांगच्या भारत भेटीचा हवाला देत झा म्हणतात की, शिवभक्त मिहिरकुलने 1,600 बौद्ध स्तूप आणि विहार नष्ट केले आणि हजारो बौद्धांना मारले.
झा प्रसिद्ध नालंदा विद्यापीठाविषयी लिहितात की, तिथल्या ग्रंथालयांना 'हिंदू कट्टरतावाद्यांनी आग लावली' आणि नाव मात्र बख्तियार खिलजीचं पुढं करण्यात आलं. जो कधी तिथे गेला ही नव्हता.

फोटो स्रोत, RSTV
झा पुढे लिहितात की, पुरी जिल्ह्यात स्थित पूर्णेश्वर, केदारेश्वर, कांतेश्वर, सोमेश्वर आणि अंगेश्वर हे एकतर बौद्ध मठांवर बांधण्यात आलेत किंवा त्यातील साहित्य वापरले गेले होते यात कोणतीच शंका नाही.
मात्र, दिल्ली विद्यापीठातील बुद्धिस्ट स्टडीजचे माजी प्राध्यापक केटीएस सराव यांनी डीएन झा यांच्या मतांना "पक्षपाती" आणि "संशयास्पद" म्हटल आहे.
ते म्हणतात, "बौद्धिक स्तरावर ब्राह्मण आणि बौद्ध यांच्यात मतभेद होते. परंतु त्यांच्यात आपापसात कोणत्याही प्रकारची हिंसा होत होती असं म्हणणं योग्य नाही. मला आश्चर्य वाटतं की लोक म्हणतात की हजारो लोक मारले गेले. पण तसं कधी झालंच नाही. "
'द डिक्लाईन ऑफ बुद्धिझम इन इंडिया'चे लेखक प्रोफेसर सराव यांच्या मते, 'स्थानिक किंवा वैयक्तिक पातळीवर दोन्ही बाजूंमध्ये हिंसा झाली असेल, पण मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झालेला नाही.'

प्रोफेसर सराव यांच्या म्हणण्यानुसार, नालंदा विद्यापीठ बख्तियार खिलजी आणि त्याच्या माणसांनी नष्ट केले किंवा मग पुष्यमित्र शुंग सारख्या ब्राह्मण राजाच्या काळात बौद्धांवर किंवा त्यांच्या तीर्थक्षेत्रांवर हल्ले झाल्याचे किंवा मग ब्राह्मणांनी बौद्धांचा छळ केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
ही विचारसरणी म्हणजे व्हिक्टोरियन इंडोलॉजिस्टनी पसरवलेले 'विष' असल्याचं ते म्हणतात. "प्राचीन काळात, अल्पसंख्याकांवर संस्थात्मक दडपशाही नव्हती" असं ते म्हणतात.
मात्र, स्वत:चा धर्म सत्य असल्याचं मानणाऱ्या लोकांकडून अन्य धर्मीय लोकांवर होणारे अत्याचार केवळ भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही पाहायला मिळतात. बौद्ध धर्मात अहिंसा केंद्रस्थानी आहे. मात्र आपण पाहिलंय की, श्रीलंका आणि म्यानमारमधील बहुसंख्य लोकांवर इतर धर्मीय लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहेत.
भारताच्या शेजारील पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानचीही गोष्ट काही वेगळी नाही. अलीकडेच इस्तंबूलमधील हागिया सोफिया, या कॅथेड्रलचे मशिदीत रूपांतरित करण्यात आले. युरोपातील धार्मिक युद्धांमध्ये चर्चमध्ये होणार हिंसाचार ही दिसून आला.
पण आजच्या घडीला भारतात इतिहासातील जटिल भाग टीव्हीवरील चर्चेत कसे मांडले जातात यावर इतिहासकार हरबंस मुखिया म्हणतात, "लोकप्रिय इतिहास सोपा असतो. तर व्यावसायिक इतिहास गुंतागुंतीचा असतो. एक व्यावसायिक इतिहासाचे पुस्तक 1,000 लोक वाचतील. टीव्ही चॅनेल 10 लाख लोक पाहतील. त्यामुळे तुम्ही 1,000 लोकांसाठी लिहित रहा, आम्ही 10 लाख लोकांपर्यंत पोहोचू."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








