नितेश राणे : 'औरंगजेबाची कबर हवीच कशाला' #5मोठ्याबातम्या

विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा

1. औरंगजेबाची कबर हवीच कशाला? - नितेश राणे

औरंगजेबाच्या कबरीला मनसेने आक्षेप घेतल्यानंतर या कबरीला संरक्षण देण्यात आलं आहे. ही कबर पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यावरून पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे.

कबर बंद केली जात असेल तर ती हवीच कशाला, असा प्रश्न भाजप नेते नितेश राणे यांनी विचारला आहे. टीव्ही 9 ने ही बातमी दिली आहे.

"औरंगजेबाच्या कबरीसमोर माथा टेकवणाऱ्यांना आपण दोन पायावर जाऊ देतो हीच आपली शोकांतिका आहे. संभाजी महाराजांचा ज्यांनी छळ केला त्यांची कबर हवीच कशाला," असा प्रश्नही त्यांनी पुढे उपस्थित केला.

नितेश राणे यांनी ही भूमिका घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चानेही याबाबत ठाम भूमिका घेतली आहे. औरंगजेबाची कबर कायमस्वरुरपी बंद करा, ओवैसी यांना महाराष्ट्रात येण्यास बंदी घालावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

2. जितेंद्र आव्हाडांच्या घोषणेमुळे शिवसेनाला तोटा?

वरळीतील बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या पोलिसांना घरं देण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात त्यांना या घरांसाठी 50 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीच यासंदर्भातील घोषणा केली आहे. या निर्णयामुळे एकीकडे पोलिस कुटुंबांमध्ये अस्वस्थता पसरलेली असतानाच, दुसरीकडे शिवसेनेसाठी देखील ही मोठी अडचण होऊन बसली आहे.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक बीडीडी चाळी येत असल्याने या निर्णयाचा सर्वाधिक मोठा फटका त्यांना मतांच्या रूपाने बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यामध्ये शिवसेना नेतृत्व नेमकी काय मध्यस्थी करणार याविषयी उत्सुकता आहे. महाराष्ट्र टाइम्स ने ही बातमी दिली आहे.

3.वस्तू व सेवा कराबाबत राज्यांना समान अधिकार

वस्तू व सेवा कराबाबत (जीएसटी) कायदे करण्याचा केंद्र आणि राज्यांना समान अधिकार असल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी भारतासारख्या लोकशाही देशात 'सहकारी संघराज्य' व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केलं.

जीएसटी परिषदेच्या शिफारशी केंद्र आणि राज्यावर बंधनकारक नाहीत, असंही न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं

'जीएसटी'च्या मुद्यावर अनेक राज्यं आणि केंद्र यांच्यातील संबंध ताणलेले आहेत या पार्श्वभूमीवर गुजरात उच्च न्यायालयाने 'जीएसटी'च्या एका प्रकरणात दिलेला निकाल कायम राखत सर्वोच्च न्यायालयाने 'जीएसटी'च्या मुद्यावर 153 पानांचा तपशीलवार निकाल दिला. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

4. काँग्रेसचा महापौर होताच कधी- संजय राऊत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुंबई अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर होता, त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही, असं म्हणत खोचक टोला लगावला होता. यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एबीपी माझा ने दिलेल्या बातमीनुसार, नाना पटोले यांनी मुंबईतील प्रभागरचने आक्षेप घेतला. त्यावर प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की,

"मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता हे नाना पटोले यांना तरी आठवतं का? त्यांनी काँग्रेसचा अभ्यास केला पाहिजे. अजूनही काही गोष्टी त्यांच्या अभ्यासातून सुटले आहेत. काँग्रेसच्या वाढीबद्दल आम्हालाही आस्था आहे. एकेकाळी काँग्रेसचं मुंबईवर राज्य होतं पण तेव्हा मुंबई काँग्रेसला नेतृत्व होतं."

"पण मुंबईचा राजा शिवसेनाच आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मुंबई कधी तुंबली याची माहिती हवी असेल तर शिवसेनेच्या संदर्भ विभागातून मी पाठवतो,"असंही राऊत म्हणाले.

5. मनसेची सभा पहिल्यांदाच सकाळी होणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा 21 ते 28 मे दरम्यान पुण्यात होणार असल्याची माहिती मनसेने दिली होती. मात्र ठिकाणावर एकमत होत नव्हतं. अखेर गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. रविवारी गणेश कला क्रीडा मंचात सकाळी दहा वाजता ही सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिली.

लोकमत ने दिलेल्या बातमीनुसार शनिवारी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे राज ठाकरेंच्या सभेचा दिवस बदलण्यात आला. स्थळ आणि तारीख याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली होती. अखेर गणेश कला क्रीडा मंचावर ही सभा घेण्याचं ठरलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)