ज्ञानवापी मशिदी प्रकरणातील मुस्लीम पक्षकारांच्या वकिलांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

फोटो स्रोत, Getty Images
वाराणसीत चालू असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणातल्या अंजुमन इन्तेजामिया मशिदीचे मुख्य वकील अभय नाथ यादव यांचा रविवारी, 31 जुलैला रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक निधन झालं.
ज्ञानवापी प्रकरणातले त्यांचे सहकारी रईस अहमद आणि बनारस सत्र न्यायालयाच्या आलोक शुक्ला यांनी त्यांचं निधन झालं असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
अभय नाथ यादव ज्ञानवापीशी संबंधित श्रृगांर गौरीची पूजा आणि दर्शनाच्या मागणीवरून कोर्टात चालू असलेल्या केसमध्ये मुख्य वकील होते.
मे आणि जुलै महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी दीर्घकाळ प्रतिवाद करत ज्ञानवापीच्या परिसरात कोणताही बदल करणं 'प्रार्थना स्थळ अधिनियम 1991' चं उल्लंघन आहे.
यानंतर हिंदू पक्षाचे वकील जिल्हा सत्र न्यायालयात आपली बाजू मांडत होते आणि त्या लिखित मुद्द्यांच्या आधारावर अभय नाथ यादव यांना प्रतिवाद करायचा होता.
या प्रकरणी पुढची सुनावणी 4 ऑगस्टला होणार होती.

फोटो स्रोत, Ramesh Kumar Verma
अभय यादव 2022 साली झालेल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेतही सहभागी झाले होते. त्यांनी या सर्व्हेचा विरोध केला होता.
यानंतर या सर्व्हेबदद्ल अॅडव्होकेट कमिशनर यांचा अहवाल लीक झाला आणि व्हीडिओग्राफी फुटेजही लीक झालं. हेच फुटेज नंतर न्यूज चॅनल्सवर दाखवलं गेलं.
आता अंजुमन इन्तेजामिया मशिदीची बाजू कोण मांडेल हे पाहावं लागेल.
यापूर्वीच्या सुनावणीत काय झालं होतं?
ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाऐवजी जिल्हा न्यायालयात करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसंच या प्रकरणाची सुनावणी उत्तर प्रदेशातील अनुभवी न्यायाधीशांसमोर करण्यात यावी, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
न्यायमूर्ती डी. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर ही सुनावणी होत आहे. पीठात न्या. सूर्यकांत आणि न्या. पी. एस. हरसिंहा यांचाही समावेश आहे.
आठ आठवड्यात जिल्हा न्यायालयात ही सुनावणी घ्यावी, यानंतर जुलै महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पुन्हा सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होईल, असं कोर्टाने म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
ज्ञानवापी मशिदीत सुरू असलेल्या सर्वेक्षणात हस्तक्षेप करण्यासही सुप्रीम कोर्टाने नकार दिला.
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. पण याबाबत जो नॅरेटिव्ह सेट केला जात आहे, तो चुकीचा आहे. सर्वेक्षण समितीचा अहवाल सातत्याने लीक केला जात आहे. सामाजिक सौहार्दाच्या दृष्टीने हे योग्य नाही, असंही कोर्टाने म्हटलं.
काय आहे प्रकरण?
काशीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या भीतींवर हिंदू मूर्ती आहेत आणि तिथे प्रार्थना करण्याची परवानगी मिळाली अशी याचिका पाच महिलांनी केली होती. प्रकरण कोर्टात गेलं. सुनावणी झाली. मशिदीचं सर्वेक्षण झालं आणि आता तिथं शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. आता प्रकरण कोर्टात गेलं आहे. पण हा बाबरीप्रमाणेच ज्ञानवापी मशिदीचाही वाद आहे का? औरंगजेबाने विश्वनाथ मंदिर पाडून तिथे मशीद बांधली असं म्हणतात यात किती तथ्य आहे? पाहूया याच संदर्भातल्या 10 प्रश्नांची उत्तरं...
1. ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे?
वाराणसीतलं काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशीद प्रकरण तसं अनेक वर्षांपासून चर्चेत असलेलं प्रकरण आहे. 18 ऑगस्ट 2021 रोजी दिल्लीतल्या 5 महिलांनी वाराणसीच्या एका न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. राखी सिंह या महिलांचं नेतृत्व करत होत्या.त्यांचं म्हणणं आहे की, मशिदीच्या परिसरात श्रृंगार गौरी, भगवान गणेश, भगवान हनुमान, आदि विश्वेश्वर, नंदीजी आणि मंदिर परिसरात दिसत असलेली इतर देवी-देवतांचं दर्शन, प्रार्थना करण्याची परवानगी मिळायला हवी.
ऋंगार देवी, भगवान हनुमान आणि गणेश आणि इतर देवी देवता दशाश्वमेध पोलीस स्टेशनच्या वॉर्डमधील प्लॉट क्रमांक 9130 मध्ये उपस्थित आहेत. हा प्लॉट विश्वनाथ कॉरिडोरला लागून आहे, असा या महिलांचा दावा आहे.
सध्या या ठिकाणी कोर्टाच्या आदेशानंतर सर्वेक्षण करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात तिथं 'शिवलिंग' सापडल्याचा दावा हिंदू पक्षाकडून केला जात आहे. तर ते कारंजं असल्याचा दावा मुस्लिम पक्षाकडून केला जात आहे. सध्या त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे.
2. मशिदीत काय काय साडपल्याचा दावा करण्यात आला आहे?
16 मे 2022 रोजी सर्वेक्षण पूर्ण झाल्या झाल्या हिंदू पक्षाच्या काही लोकांनी मशिदीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला. मशिदीच्या वजूखान्यात म्हणजेच जिथं हातपाय धुवले जातात त्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला. त्याचे काही व्हीडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हिंदू पक्षाच्या दाव्यानंतर लगेचच कोर्टानं वजुखान्याचा परिसर सील करण्याचे आदेश दिले .
3. हिंदू पक्षाची नवी मागणी काय?
सर्वेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्यानंतर आता हिंदू पक्षानं आणखी काही मागण्या वाराणसीच्या कोर्टात केल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे आहेत.
- नंदी आणि मशिदीच्या पूर्व भिंतीबाजूला असलेली तळघराची भिंत पाडली जावी.
- सापडलेल्या कथित शिवलिंगाची लांबी आणि रुंदी मोजली जावी.
हिंदू पक्षानं केलेला दावा आणि त्यांच्या मागण्यांसंदर्भात म्हणणं मांडण्यासाठी कोर्टानं मुस्लिम पक्षाला २ दिवसांचा अवधी दिला आहे.
4. मुस्लिम पक्षाचा दावा काय आहे?
मुस्लिम पक्षानं मात्र हिंदू पक्षानं केलेल्या दाव्याला आक्षेप घेतला आहे. वजू खान्यात सापडलेली रचना ही कारंज्याची आहे, ते शिवलिंग नाही असा दावा अंजुमन इंतेजामियाने केला आहे.
मशिदीमध्ये झालेल्या सर्वेक्षणाच्या विरोधात अंजुमन इंतेजामियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ज्यावर सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे.

ज्ञानवापीमध्ये नमाज पडणं सुरूच राहील असं आधीच कोर्टानं स्पष्ट केलंय. पण वजूखाना सील करण्याला आता मुस्लिमपक्ष कोर्टात आव्हान देऊ शकतं.
5. सध्याची याचिका नेमकी कुणी कुणी दाखल केली आहे?
पाच वेगवेगळ्या महिलांनी एकत्र येत ज्ञानवापी मशिदीच्या मागच्या दिशेला असलेल्या शृंगार गौरीची दररोज पूजाअर्चा करता यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी वाराणसी कोर्टात याचिका दाखल केली. तसंच त्यांनी प्लॉट नंबर 9130चं सर्वेक्षण आणि व्हीडिओग्राफीची मागणी केली होती. याच प्लॉटवर सध्या ज्ञानवापी मशीद आहे. त्यांची ही मागणी मंजूर करत कोर्टानं सर्वेक्षण आणि व्हीडिओग्राफीचे आदेश दिले होते.
राखी सिंग, लक्ष्मीदेवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक या पाच महिलांनी मिळून ही याचिता दाखल केली आहे.
कोर्टानं नेमलेल्या अॅडव्होकेट कमिशनरने 14 मेच्या सकाळपासून हे सर्वेक्षण सुरू केलं आणि 16 मेच्या संध्याकाळी हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं
6. सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं आहे?
सध्या हा वाद आता सुप्रीम कोर्टात गेला असून कोर्टानं वाराणसी सत्र न्यायालयानं दिलेल्या सर्व आदेशांवर स्थगिती आणत यावर सुनावणी घेण्यास मनाई केली आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणी शुक्रवारी दुपारी 3 वाजता सुनावणी करणार आहे.
7. आतापर्यंत कोर्टात काय काय झालंय?
एप्रिल 2021 मध्ये वाराणसीच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने मशीद परिसरात पुरातत्व विभागाला तपासणीचे आदेश दिले.
त्यासाठी डिसेंबर 2019 मध्ये विजय रस्तोगी यांनी सिव्हिल जज यांच्या कोर्टात स्वयंभू (भगवान) विश्वेश्वर यांच्यावतीने एक अर्ज दाखल केला होता. या अर्जात ज्ञानवापी परिसरात पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यांनी भगवान विश्वेश्वर यांचा 'वाद मित्र' म्हणून याचिका दाखल केली होती.

फोटो स्रोत, UTPAL PATHAK
याआधी वाराणसीच्या सत्र न्यायालयात 1991 मध्ये स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान विश्वेश्वर यांच्यावतीने ज्ञानवापीमध्ये पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.
जानेवारी 2020 मध्ये ज्ञानवापी मशीद प्रशासन अंजुमन इंतजामिया मशीद समितीने, ज्ञानवापी मशीद आणि परिसरात पुरातत्व खात्याकडून सर्वेक्षणाच्या मागणीविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती.
8. इतिहास नेमका काय सांगतो?
सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की काशी विश्वनाथ मंदिर औरंगजेबाने तोडलं होतं आणि तिथे मशीद बांधली होती. पण ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की दिसतंय, त्यापेक्षा हे प्रकरण बरंच गुंतागुतीचं आहे. नेमका इतिहास काय आहे हे वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
9. वादग्रस्त प्रार्थना स्थळांचा कायदा काय आहे?
प्रार्थना स्थळांवरून देशात जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी १९९१ मध्ये नरसिंह राव सरकारने एक कायदा आणला. या कायद्यानुसार, "देशातील कुठल्याही प्रार्थना स्थळाची धार्मिक ओळख - देशाचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 - रोजी होती तीच कायम ठेवण्यात यावी. कुठल्याही प्रार्थना स्थळाचं रुपांतर/धर्मांतर करण्यास मनाई आहे."
मुस्लिम पक्ष सध्या ज्ञानवापी मशीद प्रकरणात याच कायद्याचा आधार घेत आहे.
नेमका हा काय काय आहे. त्यात बदल करता येईल का? ज्ञानवापी मशिदीचं मंदिरात रुपांतर होऊ शकतं का? अधिक वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
10. इतर कुठल्या कुठल्या ऐतिहासिक वास्तू वादात?
ज्ञानवापी बरोबरच सध्या ताज महाल, मथुरेतली मशीद, कुतुबमिनार आणि दिल्लीची जामा मशीद वादात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ताज महाल एका शिव मंदिरावर बांधण्यात आल्याचा दावा करणारी याचिका सध्या कोर्टात दाखल करण्यात आली आहे. ताज महालाच्या तळघरातल्या 22 खोल्या उघडून त्याची पुष्टी करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे. त्याबाबत तुम्ही इथं अधिक वाचू शकता.
तसंच कुतुबमिनारचं नाव विष्णूस्तंभ करण्याची मागणी काही हिंदू संघटनांनी केली आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी आंदोलनदेखील केलं.
याच हिंदू संघटनांनी दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये सर्वेक्षणाची मागणी केली आहे. तिथं काही हिंदू देवीदेवतांच्या मूर्ती दडल्या असल्याचा त्यांचा दावा आहे.
तर मथुरेच्या मशिदीवर आधीपासूनच कोर्टात सुनावणी सुरू आहे.
याआधी अयोध्येतल्या बाबरी मशिदीचा वाद सर्वश्रूत आहे. आता तिथं राममंदिर बांधल जात आहे. त्याचा सविस्तर इतिहास वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








