एका प्रश्नावर 'हनुमानभक्त' नवनीत राणा का ओशाळल्या?

गेले काही दिवस देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात 'हनुमान चालिसा' या शब्दाने राजकारणात मोठं स्थान मिळवलं आहे. कधी राजकारण्यांनी हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्र यात गल्लत केली तर कुणी भर सभेत हनुमान चालिसा म्हणून दाखवली.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे दाम्पत्य या प्रकरणात चांगलंच गाजलं. मुंबईत मातोश्रीसमोर येऊन हनुमान चालिसा म्हणू असं म्हटल्यावर शिवसैनिक त्यांच्यावर त्वेषाने तुटून पडले. मग त्यांना जेलमध्येही जावं लागलं. त्या दोघांनी कारागृहात मग जामीन मिळाल्यावरही त्यांनी हनुमान चालिसा वाचून दाखवली.

जामीन मिळाल्यावर दिल्लीत गेल्यावरही त्यांनी हे थांबवलेलं नाही. दिल्लीत मारुती मंदिरात जाऊनही त्यांनी जोरजोरात याचं वाचन केलं. झालं... आता गेला महिनाभर चर्चेत असणारे हे दाम्पत्य दिल्लीत आल्यावर साहजिकच दिल्लीतल्या पत्रकारांनी त्यांना घेरलं आणि या हनुमान चालिसेत आपल्या परिने भर घातली.

पण एकावेळेस मात्र नवनीत आणि रवी राणा मात्र चांगलेच अडचणीत सापडले. काही दिवस सतत भगवे कपडे, भगवं वस्त्र नेसून इथून तिथे फिरणारे, हातात सतत हनुमान चालिसेचं पुस्तक बाळगणारे हे दोघे उच्चकोटीचे हनुमानभक्त असतील असा समज सहज होऊ शकतो. पण तसं नसल्याचं फक्त एकाच प्रश्नातून आणि त्यावर या दोघांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून दिसून आलं.

त्याचं झालं असं एका वृत्तवाहिनीवर या दोघांनाही मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं. पत्रकार नाविका यांनी इथूनतिथून सगळे प्रश्न विचारताना अचानक एक प्रश्न विचारला आणि सगळीच गाडी घसरली.

नाविका यांनी हनुमानाचं मूळ नाव काय असा प्रश्न या दोघांना विचारला. असा '21 अपेक्षित'च्या बाहेरचा प्रश्न विचारताच नवनीत राणा गडबडल्या. त्या रवी राणा यांच्याकडे पाहू लागल्या. पण एवढा 'ड' गटातला अवघड प्रश्न ऐकताच रवी राणांनी मान खाली घालून स्वतःची सुटका केली होती.

यावेळेस रवी राणा गालातल्या गालात हसत होते की लाजत होते हे शेवटपर्यंत काही लक्षात आलं नाही. ओशाळलेल्या राणांनी तूच विचारमंथन कर आणि त्यातून आलेल्या नवनीतातून उत्तर दे अशी भूमिका घेतली.

आता एकट्या पडलेल्या नवनीत राणा अपक्ष राहून चालणार नव्हतंच त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागणार होतंच. 'हनुमानजी राम के सेवक थे, राम को फॉलो करने वाले थे...' असं काहीतरी पुटपुटण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण नाविका यांनी हनुमानजीका नाम पहलेसे हनुमान नही था, वो कैसे पडा.. असं पुन्हा विचारलं. पण नवनीत राणा यांच्याकडे उत्तर नव्हतंच. त्या म्हणाल्या, हनुमानजी का नाम आप पुछेंगे, पुरा इतिहास मे आप लेकर जाएंगे तो इतिहास भी पढा जायेगा. लेकिन मै तो हनुमान चालिसा पढती हू... असं काहीतरी उत्तर देऊन त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काढला.

अंजनीच्या सुताला रामाचं वरदान मिळालेलं असलं तरी नवनीत राणांना वाचवायला रवी राणाही आले नाहीत. त्यांना स्वतःच वेळ मारुन न्यावी लागली.

पण हे सगळं इंटरनेटच्या जगात लपून राहात नाही. नेमकं हेच त्यांच्या विरोधकांनी हेरलं आणि त्याचा व्हीडिओ व्हायरल केला. ट्वीटर फेसबूकवर असंख्य लोकांनी तो शेअर केला आणि त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)