You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे 'हे' आहेत 5 अर्थ
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी (14 मे) मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्यांसह अनेकांवर निशाणा साधला.
हिंदुत्त्वापासून हनुमान चालीसा आणि अगदी ईडीपर्यंत उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यावर सडेतोड भाष्य केलं.
उद्धव ठाकरेंच्या या भाषणाचे नेमके अर्थ काय, हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
1) 'राज ठाकरेंमध्ये केमिकल लोचा'
1 मे 2022 रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा झाली. त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांचीही सभा मुंबईत झाली होती. मात्र, चर्चा झाली ती राज ठाकरेंच्या सभेची. महाराष्ट्रभर हनुमान चालीसाबाबत आंदोलनंही राज ठाकरेंच्या भाषणानंतर झाली. मात्र, असं असतानाही उद्धव ठाकरेंनी बीकेसी मैदानातील सभेत मात्र राज ठाकरेंचा एक उल्लेख सोडल्यास दुर्लक्ष केल्याचंच दिसून आलं.
राज ठाकरेंबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी अभिनेता संजय दत्तच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमाचं उदाहरण दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, "संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात, तशी एक केस आहे आपल्याकडे. स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात, शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळतं की, डोक्यात केमिकल लोचा झालाय. असे मुन्नाभाई फिरताहेत."
उद्धव ठाकरेंनी हा टोमणा राज ठाकरेंना उद्देशून मारला होता.
यावर बोलताना लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी अनेक राजकीय विश्लेषकांना कोड्यात टाकणारा अंदाज व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात राज ठाकरेंना दुर्लक्षित करण्याचं कारण सांगताना म्हटलं की, "हिंदुत्त्वाचा मुद्दा पूर्णपणे भाजपकडे जाऊ नये, ठाकरे ब्रँडकडे राहावा, यासाठी तर दोन भावांनी छुपी हात मिळवणी केली नाही ना, अशी शंका घ्यायला जागा आहे."
संदीप प्रधान म्हणाले, "मुंबई म्हणजे 'तुम्ही नाही', असं भाजप म्हणते, तेव्हा 'तुम्ही नाही' म्हणजे 'ठाकरे नाही' असं असतं. त्यामुळे या 'ठाकरे ब्रँड'साठी दोन ठाकरे येऊ शकतात."
2) फडणवीस हेच मुख्य टारगेट?
उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या मुद्द्यावरून आणि बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केल्याचं दिसून आलं.
यातील मुंबईच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या 1 मे रोजीच्या भाषणाचा दाखला दिला आणि म्हणाले की, "एक मे रोजी भाजपची सभा झाली. तिथं फडणवीस म्हणाले, आम्ही मुंबई स्वतंत्र करणार, जे पोटात तेच ओठावर आले. अरे, तुमच्या साठ पिढ्या आल्या तरी जमणार नाही. हौतात्म्य पत्करून मुंबई मिळवलेली आहे. हा मुंबई तोडण्याचा डाव."
त्यानंतर याच भाषणात फडणवीसांना टार्गेट करताना उद्धव ठाकरेंनी बाबरी मशिदीचा मुद्दाही उपस्थित केला. यात उद्धव ठाकरे म्हणाले की, "बाबरीच्या वेळी शिवसैनिक नव्हतेच, असं फडणवीस म्हणतात. आम्ही गेलो होतो म्हणे. अरे, तुमचं वय किती? शाळेच्या सहलीला गेला होतात की कॉलेजच्या सहलीला गेला होतात? तुमचं वय किती? बोलता किती? जर खरंच तुम्ही गेला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती."
अशा विविध ठिकाणी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या एक मे रोजीच्या सभेचा आणि त्यातील मुंबईसंबंधी वक्तव्याचा नि हिंदुत्त्वाच्या मुद्द्याचा आधार घेत टीकास्त्र सोडलं.
बीकेसीतील या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनाच आपला निशाणा केल्याचं दिसून आलं.
3. मुंबई महापालिकेच्या प्रचाराला सुरुवात?
"मुंबई तोडण्याचा डाव सुरू आहे. तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी मुंबई तुटणार नाही. मुंबईचा लचका तोडण्याचा मनसुबा आहे," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबईशी संबंधित अनेक मुद्दे या भाषणात उपस्थित केले.
बुलेट ट्रेन, कोव्हिड काळात मुंबईनं केलेली कामगिरी, मुंबई महापालिकेच्या शाळा इत्यादी मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी मुंबईबाबतची शिवसेनेची भूमिका ठळकणपणे सांगण्याचा प्रयत्न केला आणि मुंबई महापालिकेची कामं सांगत शिवसेनेच्या पालिकेतील सत्तेचंही कौतुक केलंय. यातून त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचीच सुरुवात केल्याचं विश्लेषकांचं मत आहे.
या मुद्द्यावर ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या की, "मुंबई-गुजरातचा मुद्दा उपस्थित करताना आपण यावर विचार केला पाहिजे की, गुजरातमधील उद्यमशीलता मराठी माणसांमध्ये रुजवली का, हा प्रश्न नवी पिढी विचारेल. त्याची उत्तरं काय येतील, हे येणाऱ्या काळात कळेल."
"शिवसेनेसाठी महापालिका निवडणुका अॅसिड टेस्ट आहेत. त्यांना जोरानं उतरावं लागेल. त्यासाठीच ही वातावरणनिर्मिती आहे," असंही नानिवडेकर म्हणाल्या.
4. हिंदुत्व सिद्ध करण्याची धडपड?
संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरेंनी विविध ठिकाणी हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून, भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.
हिंदुत्वावर उद्धव ठाकरे म्हणाले की, "हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का? हिंदुत्व नेसण्याची, सोडण्याची गोष्ट नाही."
"फडणवीसांनी मंदिर टिकेल कसं हा विचार केला नाही, त्याऐवजी मोडता घातला आहे. अशी खाती आहेत, ज्यांना तत्त्वं नाही, त्यांना पुरा तर पुरातत्व खाती होतील. मंदिर दीर्घकाळ टिकेल यासाठी जीर्णोद्धार करत आहोत," असं म्हणत महाविकास आघाडी सरकारनं मंदिरांसाठी काय केलं हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
तसंच, "लोकांची माथी भडकावू नका. लोकांच्या हाती धोंडे देऊ नका, ते तुमच्या माथी हाणतील. ही सभा वाटतच नाहीये, हिंदुत्वाचा महासागर आहे. भगवी टोपी घालून हिंदुत्व दाखवत असाल तर मग संघाची टोपी काळी का?" असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला.
शिवाय, "तुमचं विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. हे लोक मनोरुग्ण आहेत," अशी जळजळीत टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
यावर मृणालिनी नानिवडेकर म्हणाल्या, "हिंदुत्वाच्या राजकारणाच्या गजरात शिवसेना मागे नाही, हे यातून उद्धव ठाकरेंनी सांगण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्त्वाबाबत त्यांनी ठळकपणे सांगितलं, याचं कारण काँग्रेस-राष्ट्रवादी या उघडपणे हिंदुत्वाचा राजकारण न करणाऱ्या पक्षांसोबतची युती आणि राज ठाकरेंची टीका, हे पाहता स्वत:ची हिंदुत्त्वाची भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता वाटली असावी."
संदीप प्रधान म्हणाले की, "भाजप हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेवर टीका करताना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसल्याचं म्हणते. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी युक्तिवाद केला की, तुमचा पक्ष सुद्धा अटलजींचा पक्ष राहिला नाही."
याच भाषणात उद्धव ठाकरेंनी काश्मीरमधील पंडितांचा मुद्दाही उपस्थित केला. राहुल भट यांच्या हत्येचा मुद्दा काढून त्यांनी भाजपच्या हिंदुत्त्वाच्या व्याख्येवर सडकून टीका केली आणि त्या तुलनेत शिवसेनेचं हिंदुत्त्व किती खरं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.
5. केतकी चितळे आणि भाषा
अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्टचाही उद्धव ठाकरेंनी या भाषणात उल्लेख केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "आज एका बाईची फेसबुक पोस्ट पाहिली. काय ती भाषा. घरी आई-वडील, आजी-आजोबा आहेत की नाही? तुमच्यावर संस्कार होतात की नाही? बाई तुझा संबंध काय, तुझं बोलणं काय? सुसंस्कृतपणा लोप पावत चाललाय."
तसंच, त्यांनी किरीट सोमय्यांवर टीका करताना, सोमय्यांच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्यामुळे कुणाच्या भाषा, व्यंगाबाबत राजकारणातील दिग्गजांनी बोलणं बरोबर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यावर संदीप प्रधान म्हणाले की, "उद्धव ठाकरे फारच सोबर बोलतात. जर बाळासाहेब असते ना, तर काय झालं असतं, याचा मी विचार करत होतो. बाळासाहेब असते ना, तर वेगळ्याच भाषेत समाचार घेतला असता. काही लोकांना तोंड लपवायला लागला असता."
मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत खालावला यात शंका नाही आणि त्यांना माध्यमंही जबाबदार असल्याचं प्रधान म्हणाले.
तर यावर मृणालिनी नानिवडेकरांनी प्रखर भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, "चौकीदार चोर आहे आणि चहावाल्याचा मुलगा आहे, ही मोदींवर केलेली टीका 'सामना'तून झालीय. त्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्वत:ला प्रश्न विचारावा."
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ढासळलीय, असं म्हणतानाच मृणालिनी नानिवडेकर पुढे म्हणाल्या की, "किरीट सोमय्यांचे आरोप हेतूत: केले असतील, तर चौकशी करावी. पण त्यांच्या शारीरीक क्षमतेवर किंवा त्यांच्या वाणीवरून टीका करणं योग्य नाही."
उद्धव ठाकरे यापूर्वी अशी भाषा बोलत नसत, असंही नानिवडेकरांनी नमूद केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)