You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे: देवेंद्र फडणवीसांनी मुंबईला स्वतंत्र करण्याची घोषणा खरंच केली होती का?
"मुंबई तोडण्याचा डाव सुरू आहे. तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी मुंबई तुटणार नाही. मुंबई स्वतंत्र करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मनातलं ओठावर आलं", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. बीकेसी इथे झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.
मुंबईला स्वतंत्र करण्याची घोषणा खरंच देवेंद्र फडणवीस यांनी केली होती का? याचा घेतलेला आढावा. मुंबईत महाराष्ट्रदिनी (1मे) सोमय्या मैदानावर भाजपने जाहीर सभा घेतली होती. या सभेद्वारे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची नांदी केली होती.
त्या सभेत बोलताना फडणवीस म्हणाले होते, "मुंबईची निवडणूक महत्त्वाची आहे. कारण आपल्याला मुंबईकरांकरता संघर्ष करायचा आहे. ही मुंबई मुंबईकरांची आहे. मुंबईकरांना पुन्हा ती परत करायची आहे. मुंबईला लुटण्याचं काम यांच्या माध्यमातून होतं आहे. आता लढाई मुंबईच्या स्वातंत्र्याची. मुंबईच्या स्वातंत्र्याची म्हटल्यावर यांचे पोपट म्हणतील बघा- आम्ही म्हणत होतो, मुंबईला हे तोडणार. महाराष्ट्रापासून वेगळं करणार. कुणाच्या बापात हिंमत नाही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची. ही मुंबई महाराष्ट्राची आहे आणि आजन्म महाराष्ट्राची राहील".
ते पुढे म्हणाले, "मा.बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास ठेऊन आम्ही ही मुंबई शिवसेनेच्या हाती दिली होती. त्याकाळी आम्हाला वाटायचं की इथे भगव्याचं राज्य आहे. पण बंधुभगिंनीनो आता ती शिवसेना राहिलेली नाही आणि ते राज्यही राहिलेलं नाही. आता मुंबईला लुटण्याचं काम यांच्या माध्यमातून होतं आहे. भावनिक गोष्टी बोलून तुम्ही मुंबईतल्या मराठी माणसाला लुबाडलं आहे. आता यापुढे हे चालणार नाही. ज्याप्रकारे मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढली गेली. आता तसंच मुंबईला माफियांच्या हातातून, लुटणार करणाऱ्यांच्या हातातून याठिकाणी काढायचं आहे. मुंबईकरांना, खऱ्या मराठी माणसाला खरं हिंदुत्व सांगणाऱ्या या जनाजनाला ही मुंबई सोपवायची आहे. तुम्हाला एवढंच आवाहन करतो महाराष्ट्रदिनी सज्ज व्हा. लढण्यासाठी तयार व्हा".
"तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, आता तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. तुमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे. तुमचे मंत्री तुरुंगात गेले. त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे", असं फडणवीस म्हणाले.
"बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो. मशिदीवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी आम्ही पाडली. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तिथे होतो.
बाबरी पाडली त्याबद्दल ज्या 32 जणांना आरोपी केले होते त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याची समावेश नव्हता. ते सर्व भाजपेचे नेते होते. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत", असा टोला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
"राज्यात आता हनुमान चालिसा म्हटलं की राजद्रोहाचा गुन्हा होतो. मग तुम्ही कोणाच्या बाजूचे- रामाच्या की रावणाच्या? असा सवाल फडणवीसांनी केला.
"शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. वीज जोडण्या तोडल्या जात आहेत. भारनियम आहे. कोरोना काळात सरकारने बिल्डर, बारमालक यांना मदत केली. परंतु सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडलं. हिंमत असेल तर त्यांनी भ्रष्टाचारावर तुटून पडावं. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ", असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान शनिवारी बीकेसी इथे झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली. "मुंबई ओरबाडण्यासाठी नकोय. मुंबई तोडण्याचा डाव सुरू आहे. तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी मुंबई तुटणार नाही. मुंबईचा लचका तोडण्याचा मनसुबा आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)