माकडांनी पळवला हत्येसाठी वापरलेला चाकू आणि पुरावे....

माकड

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मोहर सिंह मीणा
    • Role, जयपूरहून बीबीसी हिंदीसाठी

हत्येच्या एका प्रकरणातील पुराव्याचे कागद आणि हत्येसाठी वापरलेला चाकू एका माकडाने पळवल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं आहे. राजस्थान पोलिसांनी जयपूरमधील एका न्यायालयात ही माहिती दिली आहे.

2016 साली झालेल्या एका हत्येच्या प्रकरणात कोर्टाने पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते.

मात्र पोलिसांनी आता आपल्याकडे पुरावे नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

पोलीस ठाण्यातून माकडाने नेले पुरावे

जयपूर ग्रामीण पोलीस अधिक्षक मनिष अग्रवाल यांनी कोर्टात ही माहिती लेखी स्वरुपात दाखल केली आहे.

मनिष अग्रवाल बीबीसीशी बोलताना म्हणाले, हे प्रकरण 2016चं आहे. तत्कालीन गोदाम इंचार्जने याचा अहवाल 2017मध्ये दिला होता. त्यात पुरावे माकडाने नेल्याचं म्हटलं होतं.

पोलिसांच्या माहितीनुसार हत्येबाबतीतील महत्त्वाचे पुरावे, चाकू, रक्त लागलेले कपडे, हत्येच्या जागेवरुन घेतलेली माती, रक्ताचे नमुने, चप्पल, मोबाईल हे सर्व एका पिशवीत ठेवलं होतं. ही पिशवी जयपूर ग्रामीणच्या चंदवाजी पोलीस ठाण्याच्या पत्र्याच्या शेडखाली ठेवलेलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवर कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जयपूर ग्रामीण एसपींना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे तसेच सर्व पुरावे कोर्टात सादर करण्यास सांगितले आहे.

जयपूर ग्रामीणचे अतिरिक्त एसपी धर्मेंद्र यांनी पुराव्यांचा एसएफएल अहवाल कोर्टात सादर केल्याचं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणावर 13 मे रोजी सुनावणी होणार आहे.

जबाबदार कोण?

चंदवाजी पोलीस ठाण्याचे प्रमुख दिलीप सिंह बीबीसीला म्हणाले, "हत्येचे पुरावे गोदामात होते ते माकडं घेऊन गेले. तसेच त्या गोदामाचे इनचार्जही निवृत्त झाले आहेत.

हत्येसाठी वापरलेला चाकू, कपडे, चप्पल आणि सर्व पुरावे एकत्र ठेवण्य़ात आलं होतं. ही फाइल कोर्टात असल्यामुळे याची पूर्ण कल्पना आपल्याला नाही. पण इथं माकडंही फार आहेत."

माकड

फोटो स्रोत, Getty Images

पोलीस कोर्टात म्हणाले, सर्व पुरावे माकडाने पळवल्यावर गोदामप्रमुख हनुमान यादव यांनी अहवाल दिला होता. हनुमान यादव निवृत्त झाले आणि 2021 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

या सर्व प्रकरणाची चौकशी जयपूर ग्रामीणचे अतिरिक्त एसपी धर्मेंद्र करत आहेत.

माकडांनी पुरावे नेल्याच्या घटनेची चौकशी जयपूरचे ग्रामीण अतिरिक्त एसपी धर्मेंद्र यांनी केली. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, सगळे पुरावे एसएफएल तपासणीसाठी पाठवण्यात आले. तिथून ते पुन्हा आमच्याकडे आले. त्यांनी पुराव्यांची चळत निवारा शेडमधून माकडांनी लंपास केले.

ते पुढे म्हणाले, तत्कालीन यंत्रणेचा हलगर्जीपणा या घटनेकरता कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. चौकशीनंतर हेड कॉन्स्टेबलवर कारवाईची सूचना केली होती. पण निवृत्तीनंतर 2021 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

हेड कॉन्स्टेबल हनुमान सहाय यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली नव्हती.

हत्येचे दोन आरोपी

जयपूर ग्रामीण भागात चंदवाजी परिसरातल्या सीकर इथे राहणारे शशिकांत शर्मा 2016 मध्ये मृतावस्थेत आढळले होते.

त्यांच्या नातेवाईकांनी दिल्ली-जयपूर हायवे रोखला होता. त्यांनी दोषींच्या अटकेची मागणी केली होती.

माकड

फोटो स्रोत, Getty Images

वाद वाढल्यानंतर पोलिसांनी शशिकांत शर्मा यांच्या मृत्यूच्या तपासाचा वेग वाढवला. तपासणीदरम्यान चंदवाजी इथल्याच दोन तरुणांना हत्येच्या आरोपांखाली अटक केली.

घटनास्थळाहून चाकू जप्त करण्यात आला. याच सुऱ्याने हत्या झाली असा आरोप होता. पोलिसांनी अन्यही पुरावे गोळा केले होते.

हत्येचा खटला जयपूरच्या कनिष्ठ न्यायालयात चालला. न्यायालयाने पुरावे सादर करण्यास सांगितलं. पण माकडांनी पुरावे पळवून नेल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)