बहुविवाह : 'तुम्ही कधी अशा मुस्लीम व्यक्तीला भेटला आहात का ज्याला चार पत्नी आहेत?'

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'माझ्या पतीला दुसऱ्या महिलेशी विवाह करण्यापासून रोखा,' अशी मागणी 28 वर्षांच्या एका मुस्लीम महिलेने दिल्ली उच्च न्यायालयाकडे केली आहे. यावरून भारतात पुन्हा एकदा मुस्लीम समुदायाच्या बहुविवाह प्रथेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

रेश्मा नावाच्या या महिलेने उच्च न्यायालयात यासंदर्भात एक याचिका दाखल केली आहे. बहुविवाह प्रथेवर निर्बंध आणणारा कायदा आणावा असा आदेश सरकारला न्यायालयाने द्यावा असं या याचिकेत म्हटलं आहे.

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, रेश्मा यांचा विवाह जानेवारी 2019 मध्ये मोहम्मद शोएब खान यांच्याशी झाला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांना एक मूल झालं. रेश्माने आपल्या पतीविरोधात कौंटुबिक हिसांचार, क्रूर व्यवहार तसंच हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या पतीनेही रेश्मावर असेच आरोप केले आहेत. तसंच पतीने आपल्याला आणि मुलाला सोडलं असून ते दुसरा विवाह करणार असल्याचंही रेश्मा यांनी सांगितलं आहे.

आपल्या पतीचा हा निर्णय घटनाबाह्य, शरिया विरोधी, बेकायदेशीर, मनमानी करणारा, कठोर आणि अमानवी आहे, असं रेश्मा यांचं म्हणणं आहे. मुस्लीम महिलांच्या हितासाठी बहुविवाह प्रथेवर निर्बंध आणले पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेनंतर बहुविवाह प्रथेवरून आता नव्या वादाला सुरूवात झालीय. मुस्लीम आणि आदिवासी समाज वगळता भारतात एक पत्नी असताना दुसरा विवाह करणं बेकायदेशीर आहे.

प्यू रिसर्च सेंटरने 2019 मध्ये आपल्या अहवालात म्हटलंय की, जगभरात 2 टक्के लोकसंख्या बहुविवाह कुटुंबात राहते. तुर्की आणि ट्यूनीशिया मुस्लीम बहुल देशांसह जगातील बहुकांश देशांनी या प्रथेवर बंदी आणली आहे.

संयुक्त राष्ट्राने ही प्रथा म्हणजे 'महिलांसोबत अमान्य असा भेदभाव' असं म्हटलं आहे. तसंच ही प्रथा बंद करण्याचंही आवाहन केलं आहे.

दरम्यान, भारतात मात्र कायम या मुद्यावरून राजकारण होताना दिसतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजपच्या हिंदू राष्ट्रवादी सरकारने संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

खरं तर गेल्या सात दशकांपासून या कायद्याचा प्रस्ताव वादग्रस्त राहिला आहे. कारण हा कायदा अस्तित्वात आला तर विवाह, घटस्फोट आणि संपत्तीचा वारसा हक्क हे नियम वेगवेगळ्या धर्माच्या कायद्यानुसार लागू राहणार नाहीत तर सर्वांना एकच कायदा लागू असेल.

देशाचं सांप्रदायिक वातावरण सध्या विभागलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कोणत्याही अशा बदलांचा प्रस्ताव ठेवल्यास देशातील बहुतांश मुस्लीम त्याकडे हा आपल्या धर्मावर झालेला हल्ला आहे असंच मानतील.

मुस्लिम पुरुषांना चार विवाहाची परवानगी, पण...

देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इस्लामचे जाणकार डॉ. एस.वाय. कुरेशी सांगतात, "मोठ्या संख्येने लोकांची अशी धारणा आहे की मुस्लिमांच्या चार पत्नी आणि त्यांना खूप मुलं असतात. यामुळे एक दिवस मुस्लिमांची संख्या ही हिंदूंपेक्षा जास्त होईल. परंतु हे सत्य नाही."

भारताच्या सुमारे 140 कोटी लोकांच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिमांची संख्या केवळ 14 टक्के आहे आणि हिंदूंची लोकसंख्या 80 टक्के आहे.

मुस्लीम पुरुषांना चार महिलांशी विवाह करण्याची परवानगी आहे. बहुविवाह करण्याची परवानगी त्यांना कुराणने दिली आहे. पण त्यासाठी काही 'कठोर अटी आणि निर्बंध' आहेत. याकडे बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की या अटी पूर्ण करणं जवळपास अशक्य आहे.

डॉ. कुरेशी म्हणाले, "कुराणमध्ये म्हटलंय की पुरूष दोन, तीन किंवा चार विवाह करू शकतो. पण तिन्ही वेळेला हा निकाह केवळ अनाथ आणि विधवा महिलांसोबतच केला जाऊ शकतो. पुरुषाने आपल्या सर्व पत्नींसोबत समान व्यवहार केला पाहिजे. हे मान्य न करणं म्हणजे नियमांचं उल्लंघन आहे."

ते पुढे सांगतात, "एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास सर्वांना एकसमान वागणूक देणं जवळपास अशक्य आहे. सर्वांना एकच ड्रेस खरेदी करण्या एवढं हे सोपं नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे."

अरबमध्ये काबीलांच्या युद्धात मोठ्या संख्येने तरुण पुरुषांचा मृत्यू झाल्यानंतर सातव्या शतकात कुराणमध्ये एकापेक्षा जास्त विवाह करण्याची सूचना सामील करण्यात आली. म्हणून त्यावेळी विधवा आणि त्यांच्या मुलांच्या भल्यासाठी बहुविवाह करण्याची परवानगी देण्यात आली, असं डॉ. कुरेशी सांगतात.

"नाहीतर प्रत्यक्षात कुराणमध्ये एकापेक्षा अधिक पत्नीसाठी परवानगी दिली नसती आणि हे मान्यही केलं नसतं." असंही ते म्हणाले.

'मुस्लीम समुदायाने आपल्यात काळानुरुप बदल केले पाहिजेत'

बहुविवाह प्रथेवर टीका करणाऱ्या आणि महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या जाकीया सोमन यांचं असं म्हणणं आहे की, सध्या भारतात कोणतंही युद्ध सुरू नाही, त्यामुळे 'महिला विरोधी आणि पितृसत्ताक' प्रथेवर बंदी आणली पाहिजे.

जाकीया सोमन या मुंबईतील भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाच्या (BMMA) संस्थापक आहेत. त्या सांगतात, "बहुविवाह नैतिक, सामाजिक आणि कायद्याच्यादृष्टीने घृणास्पद आहे. पण सर्वात मोठी समस्या ही आहे की कायद्याने याला मान्यता दिली आहे."

एका पुरुषाला एकाहून अधिक पत्नी असाव्यात असं तुम्ही कसं म्हणू शकता? असा प्रश्नही त्या उपस्थित करतात.

त्या म्हणाल्या, "मुस्लीम समुदायाने आपल्यात काळानुरुप बदल केले पाहिजेत. आजच्या काळात ही प्रथा म्हणजे कोणत्याही महिलेचा सन्मान आणि मानवी हक्काचे उल्लंघन करणं आहे."

बीएमएमए या संस्थेने 2017 मध्ये बहुविवाह संबंधात असलेल्या 289 महिलांशी चर्चा केली. त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. यापैकी 50 महिलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक परिस्थितीवर अहवाल प्रसिद्ध केला.

यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, "या महिला अशापद्धतीने अडकल्या आहेत की त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे हे आमच्या निदर्शनास आलं. त्यांच्यासोबत घडलेल्या अनेक घटनांमुळे त्यांचं मानसिक आरोग्य ढासळलं आहे असंही आमच्या लक्षात आलं."

तीन तलाक देण्याच्या प्रथेविरोधात देशभरात मोहीम सुरू केलेल्या बीएमएमए संस्थेने 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत बहुविवाह प्रथेवर बंदी आणण्याची मागणी केली होती.

हा धर्मातला हस्तक्षेप?

वकील आणि भाजप नेते अश्विनी कुमार दुबे या प्रकरणात कायदेशीर आव्हान काय आहे हे सांगतात. ते म्हणाले, "भारतातील परंपरावादी मुस्लिमांना असं वाटतं की ही प्रथा बंद करणं म्हणजे त्यांच्या धर्मात हस्तक्षेप केल्यासारखं आहे. "

या याचिकेला ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल बोर्डने विरोध केला आहे. या बोर्डाच्या महिला विंगच्या प्रमुख अस्मा जोहरा सांगतात, "इस्लाममध्ये कायदा अल्लाहने बनवलेले आहेत. आम्ही कुराण आणि हदीस यांच्याकडून निर्देश घेतो. कोणालाही अल्लाहने बनवलेले कायदे बदलण्याचा अधिकार नाही."

त्या सांगतात, मुस्लीम समुदायात बहुविवाह दुर्मीळ आहेत आणि हा मुद्दाच होऊ शकत नाही. भाजपला 'मुस्लीम समाजावर हुकूम चालवायचा असल्याने बहुसंख्याकवादी अजेंडा' चालवण्याचा प्रयत्न केला जातोय असाही आरोप त्यांनी केला आहे.

"तुम्ही कधी अशा मुस्लीम व्यक्तीला भेटला आहात का ज्याला चार पत्नी आहेत? 2022 मध्ये बहुतांश पुरुषांचं म्हणणं आहे की, एका पत्नीच्या खर्चाची जबाबदारी घेणं कठीण आहे, चार पत्नींचा खर्च कसा परवडणार. मुस्लीम समाजात एकापेक्षा अधिक लग्न करण्याचं प्रमाण सर्वात कमी आहे." असंही त्या सांगतात.

त्यांचा हा दावा सर्व धर्मांमध्ये प्रचलित बहुविवाह आकड्यांच्या आधारावर आहे. 1961 मध्ये भारतात एक लाख विवाह प्रकरणांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यानुसार मुस्लीम समाजात बहुविवाहाचं प्रमाण केवळ 5.7 टक्के होतं. इतर धर्मांच्या तुलनेत सर्वात कमी.

यानंतर झालेल्या जनगणनेत मात्र अशी आकडेवारी गोळा करण्यात आलेली नाही. बहुविवाहसंबंधी शेवटची ताजी आकडेवारी म्हणजे 2005-6 मध्ये करण्यात आलेलं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-3). सर्व धर्मात बहुविवाहचं प्रमाण खूप कमी झाल्याचं या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आलं.

एसवाई कुरेशी सांगतात, "ही आकडेवारी जुनी असल्याने आपल्याला ट्रेंड पहावा लागेल. आपण 1930 ते 1960 पर्यंत जनगणनेची आकडेवारी पाहिली तर सर्वच समुदायांमध्ये बहुविवाहाचं प्रमाण सातत्याने कमी होत आलं आहे. प्रत्येक दशकात सर्वात कमी आकडा मुस्लीम समुदायाचाच आहे. एनएफएचएसची आकडेवारी फक्त याला अपवाद आहे."

कुरेशी यांचं 2021 मध्ये प्रदर्शित झालेलं 'द पॉप्यूलेशन मिथ: इस्लाम, फॅमिली प्लॅनिंग अँड पॉलिटिक्स इन इंडिया' या पुस्तकात त्यांनी बहुविवाह प्रथेवर बंदी आणण्याची मागणी केली होती. ते विचारतात, "जर ही प्रथा सर्वत्र पाळली जात नाहीय मग ती बंद झाली तरी तुमचं काय नुकसान आहे."

यामागे धार्मिक आणि राजकीय कारण आहे असं डॉ. जोहरा यासंदर्भात बोलताना म्हणतात. "लोक असं मानतात की मुस्लीम कठोर आहेत. पण या तरतूदी कुराणमध्ये आहेत. म्हणून या कोणी बदलू शकत नाहीत. पूर्वोत्तर राज्यात आदिवासी समाजात पुरुषांना अनेक पत्नी आहेत. पण त्यांच्याविषयी कोणी आक्षेप घेत नाही. मग तुम्ही फक्त आम्हालाच का टार्गेट करता? खरं तर हा इस्लामोफोबिया आहे."

त्या म्हणाल्या, बहुविवाह प्रथा बंद करणं म्हणजे इस्लामवर 'हल्ला आणि त्यांच्या वैयक्तिक धार्मिक कायद्यात हस्तक्षेप' करणं आहे.

जाकीया सोमन मानतात की, देशच धार्मिक व्यवस्थेवर विभागला गेला असताना भाजपच्या सरकारच्या हेतूवर मुस्लिमांना शंका आहे.

त्या पुढे सांगतात, "जर आम्ही आमचं कुटुंब सांभाळलं नाही तर बाहेरचे येऊन ते सांभाळणार आणि असं करणं त्यांचा हेतू असू शकतो. पण तरीही बहुविवाह ही प्रथा महिलांच्या हक्कांचं उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे ही प्रथा बंद झाली पाहिजे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)