You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काशीतील ज्ञानवापी मशिदी आणि श्रृंगार गौरी प्रकरण : 'या' 5 याचिकाकर्त्या महिला कोण आहेत?
- Author, अनंत झणाणे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, वाराणसीहून
6 मे 2022 पासून ज्ञानवापी मशीद आणि माँ श्रृंगार गौरी यांच्या सर्वेक्षणाच्या प्रकरणातल्या महिला याचिकाकर्त्या पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या.
या महिला याचिकाकर्त्यांनी त्यांचे वकील सुधीर त्रिपाठींच्या उपस्थितीत बीबीसीशी बातचित केली. एकूण पाच याचिकाकर्त्यांपैकी चार याचिकाकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी आम्ही त्यांच्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, त्या नेमक्या कोण आहेत आणि वाराणसी कोर्टापर्यंत त्या त्यांची मागणी कशा पद्धतीने घेऊन गेल्या.
याचिकाकर्त्या क्रमांक एक - राखी सिंग
या प्रकरणातल्या कागदपत्रांमध्ये या खटल्याची 'राखी सिंग आणि इतर विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार' अशी नोंद आहे. मात्र, माध्यमांशी बोलताना राखी सिंग हजर नव्हत्या.
कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये लिहिलंय की, राखी सिंग दिल्लीच्या हौज खास इथल्या रहिवासी आहेत. त्यांच्या पतीचं नाव इंद्रजीत सिंग आहे आणि लखनऊमधील त्यांचा स्थानिक पत्ताही आहे. त्यात लखनऊच्या हुसैनगंजचा उल्लेख आहे.
जेव्हा आम्ही पत्रकार परिषदेदरम्यान इतर याचिकाकर्त्यांना राखी सिंग यांच्याबद्दल विचारलं, तर कुणीतरी सांगितलं की, त्या दिल्लीतच आहेत. कुणीतरी असंही सांगितलं की, त्यांचं बाळंतपण झाल्यानं त्या वाराणसीत येऊ शकल्या नाही. सर्वांनी सांगितलं की, राखी सिंगना त्या दोन-तीनवेळाच भेटल्या आहेत.
एका याचिकाकर्त्यांनी सांगितलं की, "त्या दर्शनासाठी आल्या होत्या, तेव्हाच सर्वजण त्यांना भेटू शकले होते."
याचिकाकर्त्या क्रमांक दोन - लक्ष्मीदेवी
वाराणीसत राहाणाऱ्या लक्ष्मीदेवी शहराच्या महमूरगंज परिसरात राहतात. डॉ. सोहनलाल आर्य हे त्यांचे पती. डॉ. आर्य यांनीही 1996 साली वाराणसी कोर्टात आताच्या खटल्याशी मिळती-जुळती याचिका दाखल केली होती आणि त्या खटल्याच्या आधारावर अॅडव्होकेट कमिश्नरच्या सर्वेक्षणाचा आदेश देण्यात आला होता.
1996 मधील वृत्तपत्रांची कात्रणं दाखवत डॉ. सोहन लाल आर्य सांगतात की, मे 1996 मध्ये सर्वोक्षणाची कारवाई होऊ शकली नव्हती.
लक्ष्मीदेवी म्हणतात की, पती डॉ. सोहनलाला आर्य यांच्या जुन्या खटल्यामुळेच त्याही माँ श्रृंगार गौरी प्रकरणात याचिकाकर्त्या बनल्या. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "माँ श्रृंगार गौरीचा मुद्दा महिलांचा मुद्दा आहे. त्यामुळेच यात आम्ही सर्व महिला जोडल्या गेल्या आहोत."
शुक्रवारी झालेल्या सर्वेक्षणादरम्यान लक्ष्मीदेवीही तिथं गेल्या होत्या. चौथऱ्याबाबत त्या म्हणतात की, "तिथं सर्वेक्षण होतं होतं आणि लोक पाहत होते. तुटलेल्या दगडाला उलटं करून ठेवलं होतं, जेणेकरून कुणीही पाहू नये आणि लोकांच्या नजरेत येऊ नये. मात्र, जेव्हा सर्वेक्षण झालं तेव्हा पाहिल्यावर लक्षात आलं की, शिलापट पूर्ण मंदिरावर होते."
दुसरीकडे, अंजुमन इंतेजामिया मशिदीचे वकील अभय यादव यांनी यावर नाराजी व्यक्त केलीय की, शुक्रवारी सर्वेक्षणादरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील दगडांना खरवडत होते. अभय यादव यांचं म्हणणं आहे की, कोर्टाच्या आदेशात यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती.
याचिकाकर्त्या क्रमांक तीन - सीता साहू
सीता साहू यासुद्धा वाराणसीच्या चेतगंज परिसरातील राहणाऱ्या आहेत. त्यांच्या पतीचं नाव बाल गोपाल साहू आहे.
मंजू व्यास यांच्याप्रमाणेच सीता साहू स्वत:ला समाजसेविका म्हणवतात. सीता साहू म्हणतात की, त्या माँ श्रृंगार गौरीची अनेकदा पूजा करण्यास गेल्या होत्या.
त्या दावा करतात की, माँ श्रृंगार गौरीचं मंदिर ज्ञानव्यापी मशिदीच्या आत आहे आणि जिथं लोकांना पूजा करण्यास परवानगी आहे, तिथं केवळ चौथरा आहे.
त्या म्हणतात की, "आम्हा लोकांची अपरिहार्यता आहे की, आम्ही आत जाऊ शकत नाही आणि केवळ बाहेरूनच स्पर्श करून येऊ शकतो."
जेव्हा आम्ही सीता साहूंना विचारलं की अंजुमन इंतेजामिया मशिदीत जर चौथऱ्यावर माँ श्रृंगार गौरी दिसते, तर आतमध्ये जाण्याची आवश्यकता का भासते?
यावर सीता साहू म्हणाल्या की, "हे खरं नाहीय. खरं हे आहे की, आम्ही जिथं जातो तिथं आमची आराध्य देवी आहे. मात्र, आमचं मंदिर मशिदीच्या आतील भागात आहे."
याचिकाकर्त्या क्रमांक चार - मंजू व्यास
मंजू व्यास वाराणसीच्या रामधर मोहल्ल्यात राहणाऱ्या आहेत आणि त्यांच्या पतीचं नाव विक्रम व्यास आहे. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या की, त्या काशी विश्वनाथ मंदिराशेजारी राहतात. त्या स्वत:ला समाजसेविका म्हणतात.
मंजू व्यास म्हणतात की, त्या माँ श्रृंगार गौरीचं दर्शन घेतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, तिथं रोज दर्शनाची परवानगी असायला हवी. त्या म्हणतात की, आम्ही चौथऱ्याचं दर्शन घेऊन परततो.
माँ श्रृंगार गौरीची प्रतिमा ज्ञानवापी मशिदीच्या पश्चिमेकडील भिंतीच्या मागील बाजूस असलेल्या चौथऱ्यावर असल्याचं सांगितलं जातं.
मंजू व्यास म्हणतात की, दर्शनाच्या मागणीसाठी विश्व वैदिक सनातन संघाचे अध्यक्ष जितेंद्र सिंह बिसेन यांच्याशी चर्चा करून याचिका दाखल केली आहे.
त्यांनी सांगितलं की, दुसऱ्या याचिकाकर्त्या महिलांसोबत त्यांची मंदिरात भेट होत असे.
सर्व महिला याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, मशीद प्लॉट नंबर 9130 वर आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार, त्यांना आत जाऊन सर्वेक्षण करण्याची आणि त्याची व्हीडिओग्राफी करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
प्लॉट नंबर 9130 चा नकाशा कधी पाहिला आहे का, असं जेव्हा बीबीसीनं मंजू व्यास यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की, "हो, पाहिलाय."
मग त्यांना विचारलं की, त्यात किती भाग येतो, तर त्या म्हणाल्या की, "ही माहिती आमचे वकील देऊ शकतील."
शेवटी त्या म्हणाल्या की, "आम्ही आता मागे हटणार नाही आणि आम्ही एका एका गोष्टीची पडताळणी करू."
याचिकाकर्त्या नंबर पाच - रेखा पाठक
रेखा पाठक वाराणसीच्या हनुमान फाटकच्या राहणाऱ्या आहेत आणि त्यांच्या पतीचं नाव अतुल कुमार पाठक आहेत. रेखा पाठकही शुक्रवारी सर्वेक्षणादरम्यान हजर होत्या.
अंजुमन इंतेजामिया मशिदीच्या अॅडव्होकेट कमिश्नरच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करण्यावर रेखा पाठक म्हणतात की, "हा आरोप चुकीचा आहे. आमच्या समोर पुरावे मिळाले. त्यांना न्यायालयानंच नेमलंय. आमचा कोणताही चुकीचा हेतू नाहीय. दुसऱ्या बाजूला भीती आहे की, सत्या बाहेर येईल. मी माँ श्रृंगार गौरीचं दर्शन करते. मंदिर आम्हा लोकांच्या रक्तात आहे."
स्वत:बद्दल सांगताना रेखा पाटक म्हणतात की, "मी वाराणसीच्या लाट भैरवचे महंत दया शंकर त्रिपाठींची मोठी मुलगी आहे आणि मी एक गृहिणी आहे."
बीबीसीनं विचारलं की, पाचही याचिकाकर्त्या महिला एकत्र कशा आल्या, त्यावर रेखा पाठक म्हणाल्या की, "आम्ही मैत्रिणी आहोत. मंदिरात भेटतो. त्यातूनच आम्ही मैत्रिणी झालो. आम्ही एकमेकींकडे चर्चा केली की, आपण असं काहीतरी करू की, माँ श्रृंगार गौरीचं मंदिर उघडलं जाईल आणि आपल्याला नियमित दर्शन करू शकू."
आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की, कोर्ट या प्रकरणात पुढील आदेश काय देतं आणि सर्वेक्षण पुन्हा सुरू होतंय की नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)