You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अवैध बांधकाम का तोडलं जाऊ नये? मुंबई महापालिकेचा नवनीत-रवी राणांना सवाल
नवनीत आणि रवी राणा दाम्पत्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेने घरात अनधिकृत बांधकामासंदर्भात नोटीस बजावली आहे. अनधिकृत बांधकामाच्या संशयावरून बीएमसीने राणा दाम्पत्याला याआधीही नोटीस बजावली होती.
बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची पाहणी केली होती. त्यावेळी राणा दाम्पत्य तुरुंगात होते. घरातील अवैध बांधकामाबाबत 7 दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत.
अवैध बांधकाम का तोडलं जाऊ नये? असा सवाल महापालिकेनं राणा दाम्पत्याला केला आहे. घरातील बांधकाम करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी नोटीस दिल्याचं बीबीसीशी बोलताना सांगितलं.
'हॉस्पिटलमधून बाहेर येताच राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसा प्रकरणावरून पुन्हा एकदा चिथावणीखोर वक्तव्य केलेली आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडेल असं वक्तव्य केलंय,' असं म्हणत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्यासाठी सेशन कोर्टात अर्ज दाखल केला आहे.
राणा दाम्पत्यानं कोर्टानं जामीन देताना ठेवलेल्या अटी-शर्थींचं उल्लंघन केल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय.
राणा दाम्पत्याला अजामीनपात्र वॉरंट जारी करावा, जेणेकरून आम्ही त्यांना कोर्टासमोर हजर करू, अशीही मागणी सरकारी वकिलांनी केलाय.
यावर कोर्टानं राणा दाम्पत्याला उद्देशून नोटीस बजावली आहे आणि 'तुमचा जामीन रद्द का करू नये?' असा प्रश्न या नोटिशीतून विचारला आहे.
यावर कधी सुनावणी होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, त्यावेळी किंवा त्यापूर्वी राणा दाम्पत्य काय भूमिका मांडतायत, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
'राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं' - नवनीत राणा
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊ असं राणा यांनी निघण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हटलं.
'लॉक-अप ते तुरुंगात जाईपर्यंत महिला म्हणून माझ्यासोबत जे घडलं त्याची माहिती मी दिल्लीतील नेत्यांना देणार आहे. तसंच 'बीस फूट गाढ देंगे' अशी भाषा करणाऱ्यांविरोधातही दिल्लीत तक्रार नोंदवणार आहे,' असं नवनीत राणा म्हणाल्या.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
त्यांनी म्हटलं, "उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं की राज्य कसं चालवायचं. देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष यशस्वीपणे राज्य चालवून दाखवलं. त्यांनी विरोधकांवर अशी कारवाई केली नाही. सत्तेचा गैरवापर केला नाही. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी मला नैतिकता शिकवू नये. बाळासाहेबांची नैतिकता हे विसरले. आम्ही लढणारे लोक आहोत, घाबरणारे नाही."
रविवारी (8 मे) जामीन मिळाल्यानंतर राणा दाम्पत्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. न्यायलयाने सशर्त जामीन दिला असताना नवनीत राणा या माध्यमांशी बोलल्यामुळे त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणा दाम्पत्याला माध्यमांशी बोलण्यास मनाई केली होती. माध्यमांशी बोलल्याने राणा दाम्पत्याने न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केलं आहे, असं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलंय. यासंदर्भात सरकारी पक्ष आज न्यायालयात जाणार असून राणांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहोत असंही प्रदीप घरत यांनी स्पष्ट केलं.
यासंदर्भात बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, "आम्ही कुठल्याही अटींचं उल्लंघन केलेलं नाही. न्यायालयाने दाखल गुन्ह्यासंदंर्भात बोलणं टाळायला सांगितलं होतं. त्यावर आम्ही कोणतंही भाष्य केलेलं नाही. पण माझ्यासोबत जे झालं ते बोलणं माझा अधिकार आहे."
यावेळी नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे. "अजित पवार मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त काम करतात. त्यांनी चौकशी करावी माझ्यासोबत काय घडलं, मग त्यांना माहिती मिळेल."
नवनीत राणा यांनी रविवारी (8 मे) माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. आपण उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीला उभे राहू असंही त्या म्हणाल्या. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती.
"उद्धव ठाकरे यांनी आपलं सरकार आणलं आणि तुम्ही काय त्यांच्याविरोधात निवडणुकीला उभं राहण्याच्या गप्पा करता. मला वाटतं आदित्य ठाकरेही पाऊण लाख मतांनी निवडून आलेत." असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)