Navneet Rana: हनुमान चालिसा आणि रामाचं नाव घेणं गुन्हा असेल तर मी 14 वर्ष तुरुंगात राहू शकते

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

"मी असं काय केलं ज्याची मला शिक्षा देण्यात आली? हनुमान चालिसा आणि रामाचं नाव घेणं गुन्हा असेल तर मी 14 वर्ष तुरुंगात राहू शकते", असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हटल्याप्रकरणी नवनीत राणा यांना तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आज (8 मे रोजी) लीलावतीतून डिस्चार्ज देण्यात आला होता.

आज नवनीत राणा यांनी रुग्णालयात बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याबाबत सरकारने कोर्टात जामीन रद्द करण्याबाबत याचिका करण्याचा निर्णय घेतलाय.

"14 दिवसात मी हार मानणार नाही. मी मागे हटणार नाही. क्रूरबुद्धीने कारवाई करण्यात आली ती जनतेने पाहिली आहे. महिला म्हणून, खासदार म्हणून मला तुरुंगात त्रास देण्यात आला. ठाकरे सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला," असं राणा म्हणाल्या.

ठाकरेंनी माझ्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी. मी मुंबईची लेक आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचाराला येईन. भ्रष्टाचाराची लंका रोखणार आहे असं राणा यांनी सांगितलं.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संजय राऊतांची तक्रार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे, असं निरीक्षण मुंबई सेशन्स कोर्टानं जामीन देताना आपल्या आदेशात नोंदवलं होतं.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना गुरूवारी (4 मे) सेशन कोर्टाकडून जामीन देण्यात आला.

सेशन्स कोर्टाने राणांविरोधात राजद्रोहाचं कलम चुकीचं आहे असं म्हणतानाच, राणा दाम्पत्याने राज्यघटनेत दिलेली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सीमा ओलांडली असंही मत व्यक्त केलंय.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करणार, असं आव्हान राणा दाम्पत्याने दिलं होतं. मुंबई पोलिसांनी नोटीस देऊनही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

'राणा दाम्पत्याच्या वक्तव्यामुळे दोन धर्मात तेढ निर्माण झाली. त्यांनी सरकारी व्यवस्थेला आव्हान दिलं,' या आरोपांतर्गत मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.

कोर्टाने आदेशात काय म्हटलं?

'राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्याबाबत वापरलेले शब्द अयोग्य आहेत. राजकीय नेते समाजात शांतता राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. लोक त्यांना फॉलो करतात. त्यामुळे राजकीय नेत्यांची जबाबदारी जास्त असते. राजकीय नेत्यांच्या भाषणाचा प्रभाव जास्त असतो. हे स्पष्ट आहे की, राणा दाम्पत्याने राज्यघटनेत दिलेली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सीमा ओलांडली'

'पण फक्त अयोग्य आणि बदनामीकारक शब्दांचा वापर राजद्रोहाचं कलम 124(A) लावण्याकरता पुरेसा नाही. एखाद्या व्यक्तीने जाणीवपूर्वक काही लिहिलं किंवा बोललं, ज्यामुळे समाजात अशांतता पसरण्याची शक्यता आहे. अशावेळी या कलमाचा वापर होऊ शकतो.'

'राणा दाम्पत्याची वक्तव्य चुकीची आहेत. पण ही वक्तव्य केल्यामुळे राजद्रोहाचं कलम लावणं चुकीचं आहे.'

दुसरीकडे, गुरूवारी (5 मे) सुप्रीम कोर्टातही देशद्रोह या कलमाच्या वापराबाबत सुनावणी झाली. केंद्र सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टात उत्तर देण्यासाठी काही कालावधीची मागणी केलीय.

राणांवर राजद्रोहाचा गुन्हा का?

'मातोश्री'समोर हनुमान चालीसा म्हणण्यावरून सुरू झालेल्या वादाचं पर्यवसन राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यात झालं होतं.

पण हा गुन्हा राणा दाम्पत्यावर का दाखल करण्यात आला होता? काही दिवसांपूर्वी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची 4 कारणं बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली.

  • सरकारी व्यवस्था कोलमडून पडावी यासाठी प्रयत्न आणि सरकारला आव्हान दिलं तर हे कलम लागू होतं.
  • नवनीत राणा आणि रवी राणा यांनी नोटीस देऊनही त्यांनी अट्टाहास सोडला नाही
  • हे घर मुख्यमंत्र्यांचं आहे, पक्षाच्या प्रमुखाचं आहे. तुम्ही तिथे गेलात तर कायद्याचा प्रश्न निर्माण होईल याची तुम्हाला कल्पना होती तरीही तुम्ही तिथे गेला. याचा अर्थ तुमचा हेतू प्रामाणिक नाही. तुम्हाला सरकारला कोंडीत पकडायचं आहे.
  • मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरता येत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)