कालीचरण महाराज कोण आहेत, त्यांना जनआक्रोश मोर्चाला का सतत बोलवलं जात आहे?

कालीचरण महाराज, हिंदू धर्म, धर्मसंसद, महात्मा गांधी

फोटो स्रोत, CG KHABAR/BBC

फोटो कॅप्शन, कालीचरण महाराज

( मे 2022 मध्ये कालीचरण महाराजांबाबत बीबीसी मराठीने हा लेख प्रसिद्ध केला होता तो पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)

महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चे निघत आहेत. हिंदू सकल समाज या संघटनेकडून हिंदूंना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे. वादग्रस्त वक्तव्य करुन प्रकाशझोतात आलेले कालीचरण बहूतांश हिंदू जनआक्रोश मोर्चांमध्ये सहभागी होताना आणि सभेला संबोधित करताना दिसत आहेत. यवतमाळ, अहमदनगर, बारामती, तळेगाव दाभाडे अशा ठिकाणी झालेल्या मोर्चांमध्ये कालीचरण महाराज दिसून आले. यामुळे या मोर्चांमधून जहाल हिंदुत्ववादी चेहरा म्हणून कालिचरण महाराजांचं नावं पुढे येताना दिसत आहेत. हिंदू जन आक्रोश मोर्चांमध्ये कालीचरण महाराज हे एक आकर्षण असून त्यांना ऐकण्यासाठी गर्दी होते, असं कालीचरण महाराजांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. "महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात हिंदू जनआक्रोश मोर्चा निघत आहेत, ते कोणत्या एका संघटनेतर्फे तर होत नाहीये. प्रत्येक हिंदू व्यक्ती ज्याचे स्वत:चे काही मुद्दे आहेत, ते त्यात सहभागी होत आहेत. कालिचरण महाराज त्यांचे आयडॉल आहेत. त्यामुळे ते कालिचरण महाराजांना बोलवू इच्छितात, जेणेकरुन त्यांच्या मोर्चामध्ये एक आकर्षण असेल.

"याशिवाय हिंदुत्ववादी, धर्मगुरू यांनाही तिथे बोलावलं जातं. कालिचरण महाराजांना प्रत्येक ठिकाणाहून आमंत्रण असतंच. ते सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात. आता 21 मार्चला सिल्लोडला हिंदू जन आक्रोश मोर्चा होणार आहे. तिथे कालीचरण महाराज जाणार आहेत," असं कालीचरण महाराजांच्या एका सहकाऱ्याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. कोणत्याही हिंदुत्ववादी विषयांवरच्या कार्यक्रमांसाठी कालीचरण महाराजांना आमंत्रण असतं असंही त्या सहकाऱ्याने सांगितलं. या मोर्चांमध्ये सहभागी होण्यासोबतच, कालीचरण महाराज हे हिंदू धर्म जागरण सभा या कार्यक्रमांमध्येही दिसत आहेत. नुकतंच पुण्यात त्यांची हिंदू धर्म जागरण सभा झाली. या सभेच्या निमित्ताने त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हिंसेचं समर्थन करणारी वक्तव्य केली. याआधीही प्रक्षोभक विधानं केल्याप्रकरणी कालिचरण महाजांवर कारवाई झालेली आहे. कालीचरण महाराज कोण आहेत आणि अकोल्यातल्या एका तरुणाचा कालिचरण महाराज होण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला ते जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण पाहू की त्यांनी कोणतं वक्तव्य केलं होतं.

'धर्माच्या आधारे मत द्या'

काही महिन्यांपूर्वी, अलिगडमधील संत समागममध्ये बोलताना कालिचरण महाराजांनी म्हटले होते की "हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एक व्हायला हवं. धर्माच्या आधारे मत द्यायला पाहिजे.

"हिंदूंनाच मतदान द्या, भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे धर्मच नाहीत," असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

अलिगडमधल्या या कार्यक्रमात कालिचरण यांनी हिदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य सुद्धा केलंय. भारत पाकिस्तान युद्ध झालं तर इथले मुसलमान पाकिस्तानला साथ देतील असा दावासुद्धा केला.

इराक, इराण, अफगानिस्तान आणि पाकिस्तानसह जगातील अनेक देश भारताच्या हातातून गेले आणि मुस्लिम राष्ट्र झाले, असाही त्यांनी दावा केला आहे.

याआधी छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं भरलेल्या धर्मसंसदेमध्ये महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना कालीचरण महाराज यांनी गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेला वंदन केलं. त्यावेळी काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या होत्या. त्यावेळ त्यांना अटकही करण्यात आली होती.

कालीचरण महाराज कोण आहेत?

यापूर्वी शिवतांडव स्त्रोताचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं कालीचरण महाराज प्रकाशझोतात आले होते. कालीचरण महाराज नावाने प्रसिद्ध असलेल्या या महाराजांचं मूळ नाव हे अभिजित सराग असं आहे.

ते मूळचे अकोल्याचे असून येथील शिवाजीनगर भागात भावसार पंचबंगला याठिकाणी ते राहतात आणि अकोल्यामध्ये त्यांचं बालपण गेलं आहे, असं स्थानिक पत्रकार उमेश अलोणे सांगतात.

कालीचरण महाराजांच्या शिक्षणाबाबत नेमकी माहिती मिळाली नाही मात्र आठवीपर्यंत त्याचं शिक्षण झालं असल्याचं काही स्थानिकांनी सांगितलं आहे. त्यांच्या जुन्या आयुष्याविषयी माहिती देणं ते शक्यतो टाळतात असं स्थानिकाचं म्हणणं आहे.

कालीचरण महाराज, हिंदू धर्म, धर्मसंसद, महात्मा गांधी

फोटो स्रोत, ALOK PUTUL/BBC

फोटो कॅप्शन, कालीचरण महाराज

कालीचरण महाराजांनी स्वतः माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, "लहानपणापासूनच मला शाळेत जायला आवडत नव्हतं, शिक्षणात मन लागत नव्हतं. बळजबरीने शाळेत पाठवलं तर मी आजारी पडायचो. सगळ्यांचा लाडका असल्यानं सगळे माझं सगळं ऐकत होते. त्यानंतर धर्माविषयी आवड निर्माण झाली आणि अध्यात्माकडे वळालो."

मनपा निवडणुकीत पराभव

कालीचरण महाराज कमी वयाचे असतानाच इंदूरला गेले होते. त्या ठिकाणी धार्मिक कार्यात ते सहभाग घेत होते. इंदूरमध्ये भय्यूजी महाराजांच्या ते संपर्कात आले होते. मात्र काही काळातच ते त्यांच्या आश्रमातून बाहेर पडले आणि पुन्हा अकोल्यात आले. "कालीचरण महाराज 2017 मध्ये ते अकोल्यात परतले आणि त्यांनी या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक लढवली. मात्र त्यात या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला," असं पत्रकार उमेश अलोणे सांगतात. कालीचरण महाराज यांनी अभिजीत सराग ते कालीपुत्र कालीचरण महाराज बनण्याची कथाही अत्यंत रंजक आहे. कालीमातेनं स्वतः प्रकट होऊन माझं एका अपघातात संरक्षण केलं, असा दावा ते करतात.

कालीचरण महाराज, हिंदू धर्म, धर्मसंसद, महात्मा गांधी

फोटो स्रोत, BBC/VARSHA SINGH

फोटो कॅप्शन, हरिद्वार धर्म संसद

"वयाच्या दहाव्या वर्षी एका अपघातात माझा पाय तुटला होता. माझा पाय 90 अंशांमध्ये वाकडा झाला. दोन्ही हाडं तुटली होती. मात्र त्याचवेळी स्वतः कालीमाता प्रकट झाली आणि मातेनं माझा पाय ओढून तो पुन्हा जोडला." "एवढा भयंकर अपघात घडल्यानंतरही पायाचं ऑपरेशन करावं लागलं नाही, रॉड टाकावा लागला नाही, हा मोठा चमत्कार होता. तेव्हाच मला कालीमातेचं दर्शन झालं आणि मी कालीमातेसाठी वेडा झालो.

"रात्री झोपेतही मी कालीमातेचा धावा करायचो असं माझी आजी म्हणायची. त्यानंतर कालीमातेची पुजा मी करू लागलो आणि धर्माविषयी मला आवड निर्माण झाली. मी कालीपुत्र कालीचरण बनण्याची सुरुवात तिथंच झाली होती," अशी कथा कालीचरण सांगतात. महर्षी अगस्त्य ऋषी हे माझे गुरू असल्याचं कालीचरण वारंवार सांगतात. विशेष म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी अगस्त्य ऋषींनी प्रकट होऊन दर्शन दिलं होतं, असा दावाही ते करतात. महर्षी अगस्त्यांनी मला लाल कपडे घालायला सांगितले असंही ते म्हणतात. पण ते साधू नाहीत असंही ते म्हणतात. त्याचं कारण देताना ते म्हणतात: "साधू शृंगार करत नसतात. मात्र मला जरीचे कपडे आवडतात, मी कोरून कुंकू लावतो, दाढी करतो त्यामुळं मी स्वतःला साधू म्हणत नाही."

एका व्हीडिओनं प्रसिद्धी

कालीचरण गेल्या वर्षी म्हणजे जून 2020 मध्ये एक व्हीडिओ व्हारल झाल्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात प्रसिद्ध झाले. मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये असलेल्या भोजेश्वर मंदिरात त्यांनी गायलेल्या शिवतांडव स्त्रोताचा हा व्हीडिओ होता.

कोरोनाबाबत अवैज्ञानिक प्रचार

काही दिवसांपूर्वीच कालीचरण महाराजांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जागतिक आरोग्य संस्था (WHO) ही बनावट संस्था आहे आणि या संस्थेतील कर्मचारी डॉक्टर, वैज्ञानिक सगळे आमच्या दृष्टिकोनातून बनावट आहेत, असं ते म्हणाले होते.

कालीचरण महाराज, हिंदू धर्म, धर्मसंसद, महात्मा गांधी
फोटो कॅप्शन, देशाच्या विविध भागात धर्म संसद आयोजित करण्यात आली आहे.

लशीच्या कंपन्यांबरोबर त्यांचं संगनमत आहे. ठराविक लस विकली जावी म्हणून मोठ्या प्रमाणात भीती पसरवण्याचं काम करण्यात आलं, असंही ते म्हणालं. लोकांना मारून त्यांचे मृतदेहही कुटुंबीयांना दिले नाही. त्यामुळं त्यांचे किडनी किंवा डोळे असे अवयव काढले असू शकतात, अशी शंकाही त्यांनी मांडली होती. पण एवढे आरोप करताना याबद्दलचा एकही पुरावा ते देऊ शकले नाहीत.

गांधीजींबाबत केले होते वक्तव्य

गांधीजींबद्दलच्या वक्तव्यानंतर कालीचरण महाराजांवर समाजात द्वेष पसरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या अटकेची मागणी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी केली होती.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

पण छत्तीसगडमध्ये काँग्रेसचीच एकहाती सत्ता आहे. ते सरकार एका हिंदू धर्मगुरूविरोधात कारवाई करेल का, असा प्रश्न काहींनी सोशल मीडियावर विचारला गेला होता.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

AltNews या फॅक्ट चेक साईटचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर विचारतात की - हे सरकार तरी अटक करेल की हरिद्वारच्या धर्मसंसदेप्रमाणेच इथेही बहाणे दिले जातील?

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटलंय की, "गांधीजींना शिवी देऊन आणि समाजात विष पसरवून जर कुणा ढोंगी माणसाला वाटत असेल की त्याची इच्छा पूर्ण होईल तर तो त्याचा भ्रम आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)