असदुद्दीन ओवेसी : 'राज ठाकरेंसारख्या मीही महाराष्ट्रभर सभा घेईन' #5मोठ्याबातम्या

विविध वेबसाईट आणि वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे :-

1. राज ठाकरेंनंतर आता ओवेसीही घेणार महाराष्ट्रभर सभा

महाराष्ट्रात मुस्लीमद्वेष सुरू असल्याचं MIM चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी म्हटलंय. नांदेडमध्ये आयोजित एका इफ्तार पार्टीत ते बोलत होते. ABP माझाने ही बातमी दिली आहे.

"हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्वाधिक कोण बोलतंय ते आम्ही पाहातोय, महाराष्ट्रात संविधानाच्या विरोधात बोललं जातंय आणि राजकीय स्पर्धा होतेय," असं ओवेसी म्हणाले.

ओवेसी पुढे म्हणाले, "भोंग्याविषयी राज ठाकरे बोलतात, त्याबद्दल कारवाई होत नाही. मी द्वेषाचं राजकारण करत नाही, पण ज्याप्रमाणे राज ठाकरे यांनी सभा घेतल्या, त्याप्रमाणे आम्हीही महाराष्ट्रभर सभा घेणार आहोत."

दरम्यान, राज ठाकरेंच्या औरंगाबाद इथल्या भाषणानंतर MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, "राज ठाकरेंच्या अल्टीमेटमबाबत महाराष्ट्र सरकार, गृहखातं आणि पोलीस प्रशासन निर्णय घेईल. या अल्टीमेटम मुस्लीम समाजाला दिला नसून सरकारला दिला आहे. त्यावर मुस्लीम समाजाने प्रतिक्रिया देण्याची काहीच गरज नाही." ही बातमी टीव्ही 9 ने दिली आहे.

2. उत्तर प्रदेशात जवळपास 54 हजार भोंगे हटवले

उत्तर प्रदेशात राज्य सरकारच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरून सुमारे 54 हजार बेकायदेशीर भोंगे हटवण्यात आले असून, 60 हजारांहून अधिक भोंग्यांचा आवाज परवानगी असलेल्या मर्यादेत बसवण्यात आला आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

धार्मिक स्थळांवरून अनधिकृत भोंगे हटवण्याची आणि इतर भोंग्यांचा आवाज मर्यादेत बसवण्याची राज्यव्यापी मोहीम 25 एप्रिलपासून सुरू करण्यात आली होती.

या मोहिमेत रविवार सकाळपर्यंत एकूण 53,942 भोंगे हटवण्यात आले, तर 60,295 भोंग्यांचा आवाज परवानगी योग्य मर्यादेत बसवण्यात आला, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सांगितले.

कुठलाही भेदभाव न करता सर्व धार्मिक स्थळांवरून हे भोंगे हटवण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

3. पंतप्रधान मोदी यांचा युरोप दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वर्षातील पहिल्या परदेश दौऱ्यासाठी आज रात्री दिल्लीहून निघाले. 2 ते 4 मे या कालावधीत पंतप्रधान मोदी तीन युरोपीय देश जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सला भेट देणार आहेत. ही बातमी दिव्य मराठीने दिली आहे.

आधी ते जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतील आणि बर्लिनमधील भारतीय समुदायाला संबोधित करतील.

यानंतर 3 मे रोजी ते इंडो-नॉर्डिक परिषदेत सहभागी होतील आणि त्यानंतर डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये भारतीयांना संबोधित करतील. अखेरीस पंतप्रधान मोदी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.

4. महाराष्ट्रात दोन महिन्यांत उष्माघाताचे 25 बळी

एकामागोमाग एक येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे यंदा मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात 25 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली.

मृतांची ही संख्या गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे 44 टक्के मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत.

ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

एप्रिल महिन्यात राज्यभरात 25 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून यात सर्वाधिक 11 मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत, तर याखालोखाल जळगावमध्ये चार, अकोल्यात तीन, जालन्यात दोन आणि अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

5. विदर्भवाद्यांनी 'महाराष्ट्र दिनी' पाळला काळा दिवस

नागपूरसह विदर्भातील 11 जिल्हे आणि मध्यप्रदेशचा काही भाग मिळून स्वतंत्र विदर्भाची मागणी गेली अनेक वर्ष होत आहे.

संपूर्ण महाराष्ट्र्रात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होत असताना विदर्भात मात्र हा दिवस स्वतंत्र विदर्भ वाद्यांकडून काळा दिवस म्हणून पाळण्यात येतो.

महाराष्ट्र दिनी आता विदर्भवाद्यांनी दिवसभर विविध ठिकाणी वेगळ्या विदर्भ मागणीसाठी आंदोलन केले. तसेच, विदर्भातील सर्व शासकीय कार्यालय आणि परिसरात असलेले महाराष्ट्र नाव पुसून त्यांनी विदर्भ नावाचे स्टिकर चिटकवले.

ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

विदर्भवाद्यांच्या या कृतीची दखल घेत पोलिसानी आता कारवाईला सुरवात केली आहे. तसेच, खबरदारी म्हणून शासकीय कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)