मध्यप्रदेशात कमलनाथांचं विरोधीपक्ष नेतेपद गेलं, शिवराज सिंह मुख्यमंत्रिपद वाचवू शकणार?

शिवराज सिंह चौहान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मध्यप्रदेशात उष्णतेचा पारा वाढलाय आणि सोबतच राजकीय वातावरण ही चांगलंच तापलंय. त्याचं कारण म्हणजे पुढच्या वर्षी मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुका लागणार आहेत. आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या गोटात मंथन आणि परिवर्तनाचा काळ सुरू झालाय.

दोन्ही गोटांत सुरू असलेल्या हालचालींवरून तरी आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची ठरणार हे मात्र निश्चितच सांगता येईल. मात्र यात एक दिलासादायक बाब अशी आहे की भाजपच्या हायकमांडने सध्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पदावरून हटवण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

पण, इथं काँग्रेस पक्षाने एक महत्त्वाचा निर्णय घेत विरोधी पक्षनेतेपदी असणाऱ्या माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना हटवून त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते गोविंद सिंह यांची नियुक्ती केली आहे. कमलनाथ आता प्रदेश काँग्रेस कमिटीची धुरा सांभाळणार असून आगामी विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचंही स्पष्ट होतंय.

शिवराजसिंह चौहान यांच्या हकालपट्टीवर चर्चा?

एप्रिल महिन्याच्या 22 तारखेला भोपाळमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अनेक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात त्यांनी आदिवासींसाठी राज्य सरकारच्या योजना सुरू केल्या. त्यानंतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत विचारमंथन केले. अमित शहांच्या या भेटीनंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पदावरून हटवलं जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

मात्र गुरुवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना हटवण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट झालं. पण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच व्हावा, तसंच रिक्त असलेल्या महामंडळांवर लवकरात लवकर पद भरती करण्यात यावी याबाबत चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या या विस्तारात 'समाजातील सर्व घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व' देण्याबाबतही ही चर्चा झाली.

2018 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची कामगिरी तुलनेने खराब होती. त्यावेळी पक्षाने फक्त 109 जागा जिंकल्या होत्या. त्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या खात्यात 165 जागा होत्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारीही घटली होती.

या सर्व मुद्द्यांवर कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला संघाच्या वतीने अरुण कुमार आले होते. गेल्या निवडणुकीत भाजपला आदिवासीबहुल भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं, या भागावर अधिक भर देण्यासंबंधी चर्चा झाली.

कमलनाथ

फोटो स्रोत, Getty Images

आदिवासीबहुल भागात भाजपला 82 आरक्षित जागांपैकी केवळ 33 जागा जिंकता आल्या. कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, मात्र काही दिवसांतच ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी निष्ठावान असलेल्या 22 आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण या पराभवाचं खापर मात्र त्यांच्यावरचं फोडण्यात आलं होतं.

आगामी निवडणूक मोदींचा चेहरा समोर ठेवूनच लढली जाणार

भारतीय जनता पार्टीच्या मध्यप्रदेश युनिटच्या नेत्यांनी दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीवर फार काही सांगण्यास नकार दिला. मतांची टक्केवारी कशी वाढवता येईल यावरचं विचारविनिमय झाल्याचं त्यांनी सांगितलं.

ज्येष्ठ पत्रकार राकेश दीक्षित यांच्या मते, शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असले तरी आगामी निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर ठेवूनच लढली जाणार असल्याचे संकेत मिळतायत.

ते म्हणतात, "उत्तर प्रदेशातही असंच घडलं. मध्य प्रदेशच्या दौऱ्यावेळी गृहमंत्री अमित शहा म्हणाले, शिवराजसिंह चौहान यांनी पंतप्रधानांच्या योजना राबविण्याचं काम चांगल्याप्रकारे केलंय. याचा अर्थ असा होतो की, शिवराजसिंह चौहान यांच्या पदावर तात्काळ कोणती टांगती तलवार नाही, पण नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढवली जाईल."

आदिवासीबहुल भागात लागू करण्यात आलेल्या पेसा कायद्यावरही कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं स्थानिक भाजप नेत्यांच म्हणणं आहे. मध्यप्रदेशातील एकूण लोकसंख्येपैकी 37 टक्के आदिवासी आहेत. आणि या लोकसंख्येला आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केलाय.

कोअर कमिटीच्या बैठकीत मध्यप्रदेश सरकारच्या कामगिरीवर चर्चा झाली नाही, ही बाब खूपच रोचक असल्याचं दीक्षित सांगतात. या बैठकीत जेपी नड्डा, पक्षाचे सरचिटणीस बी. एल. संतोष आणि मध्य प्रदेशचे प्रभारी पी .मुरलीधर राव यांच्याशिवाय महत्त्वाचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्माही उपस्थित होते.

काँग्रेसची रणनीती काय आहे?

काँग्रेसमध्ये मात्र सध्या बदलांची प्रक्रिया सुरू झाली आहे. गोविंद सिंह यांनी गुरुवारी विधिमंडळ पक्षनेतेपदाची सूत्रं स्वीकारली. पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 'कमलनाथ यांनी त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.'

काँग्रेस आगामी निवडणूक कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालंय. काँग्रेसचे प्रवक्ते पियुष बाबेले बीबीसीशी बोलताना म्हणाले की, काँग्रेसच्या सर्व नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

ते म्हणतात, "गोविंद सिंह हे सात वेळा आमदार राहिलेत. ते काँग्रेसचे एकनिष्ठ नेते आहेत. याशिवाय ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जाण्याने निर्माण झालेली संघटनेतील पोकळीही ते दूर करतील. त्यांनी ही पोकळी बर्‍याच प्रमाणात भरून काढली आहे."

नरोत्तम मिश्रा

आगामी निवडणूक कशी लढवायची यासाठी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे मुख्य सूत्रधार असतील. त्याचप्रमाणे अरुण यादव, अजय सिंह यांसारख्या बड्या नेत्यांनाही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याचे बाबेले सांगतात.

यावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राकेश दीक्षित म्हणतात की, "काँग्रेसने घेतलेला निर्णय हा सर्वोत्तम निर्णय आहे. कारण कमलनाथ यांची विजय मिळवून देणारा नेता अशी ख्याती आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ते हिरो ठरले आहेत."

ते म्हणाले, "काँग्रेसला यापेक्षा चांगला निर्णय घेता आला नसता. आता याचा परिणाम आगामी निवडणुकीतही दिसून येईल. कमलनाथ यांनी तोडीस तोड रणनीती आखली तर ते भाजपला कांटे की टक्कर देऊ शकतात."

आगामी विधानसभा निवडणुका हे भाजप आणि काँग्रेससाठी मोठं आव्हान असणार आहे. कारण या निवडणुकांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया सोबतच कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)