इंदूर : मुस्लीम असल्याने बांगडीवाल्याला मारहाण? नेमकं सत्य काय?

फोटो स्रोत, SHURAIH NIYAZI/BBC
- Author, शुरैह नियाजी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी इंदूरमध्ये बांगड्या विकणाऱ्या एका मुस्लीम विक्रेत्याला विक्रीसाठी हिंदू भागात न येण्याची धमकी दिल्याचं कथित प्रकरण समोर आलं आहे.
रविवारी (22 ऑगस्ट) संध्याकाळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमधील व्यक्तीचं नाव तस्लीम आहे आणि तो उत्तर प्रदेशातील हरडोई इथला राहणारा आहे. बांगड्या विकण्यासाठी तो इंदूर येत होता.
इंदूर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परंतु मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी असा दावा केला आहे की या व्यक्तीने हिंदू नाव सांगत बांगड्या विकल्या आहेत. तसंच त्याच्याकडे दोन बनावट आधार कार्ड असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
व्हायरल व्हीडिओमध्ये एक माणूस तस्लीमची बॅग तपासताना आणि बॅगेतून बांगड्या बाहेर काढताना दिसत आहे. तसंच तो म्हणतोय की 'मुलींनो आणि बहिणोंनो या आणि सगळं घेऊन जा' याच व्हीडिओमध्ये तस्लीम यांना धमकी दिली जात आहे की 'यापुढे कोणत्याही हिंदू भागात दिसू नकोस.' व्हीडिओमध्ये अनेकजण त्यांना मारहाण करत आहेत आणि शिव्या देत आहेत. तसंच एक आवाजही ऐकू येतो 'मुसलमान आहे.'

फोटो स्रोत, SHURAIH NIYAZI/BBC
सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सेंट्रल कोतवाली परिसरात रात्री काही लोकांनी गर्दी केली आणि कारवाईची मागणी केली. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार न आल्याने नोंद करण्यास नकार दिला पण नंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
एफआयआरमध्ये काय म्हटलं आहे?
पोलिसांच्या एफआयआरमध्ये लिहलं आहे की, "तस्लमी अली जेव्हा गोविंद नगर ठाणे बाणगंगा क्षेत्रात बांगड्या विक्रीसाठी गेला तेव्हा 5 ते 6 जणांनी त्याचं नाव विचारलं आणि नाव सांगितल्यानंतर त्याला मारहाण केली. त्यांनी तस्लीमकडून रोख 10 हजार रुपये आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. तसंच आधारकार्ड आणि इतर कागदपत्र सुद्धा घेतली. 25 हजार रुपयांचा माल आणि बांगड्याची लूट केली गेली."
एफआयआरनुसार, तस्लीमला धर्मावरून शिवीगाळ करण्यात आली आणि मारहाण केली.

फोटो स्रोत, SHURAIH NIYAZI/BBC
इंदूर पूर्वचे पोलीस अधीक्षक आशुतोष बागरी म्हणाले, "व्हायरल व्हीडिओ प्रकरणात एफआयआर केला आहे. याप्रकरणात आयपीसी 14 कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सुरुवातीला अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता पण आता व्हीडिओच्या आधारे पोलिसांना तीन आरोपींची ओळख पटली आहे. या तिघांनीच इतरांना फूस लावली."
ते पुढे म्हणाले, "दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून इतरांचा शोध सुरू आहे. त्यांनाही अटक केली जाईल."
राज्याच्या गृहमंत्र्यांचं म्हणणं काय आहे?
राज्याच्या गृहमंत्र्यांनी मात्र हे प्रकरण वेगळ्या प्रकारे मांडले आहे.
भोपाळमध्ये पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, "संबंधित इसम हिंदू नावाने तिथं माल विकत होता. तो दुसऱ्या समाजातील होता. दोन आधार कार्ड आढळले आहेत. श्रावणात मुलींना आणि सुनांना आमच्याकडे बांगड्या भरण्याची परंपरा आहे. यावरुन वादाला सुरुवात झाली. आता दोन्ही बाजूच्या लोकांवर कारवाई केली आहे."

फोटो स्रोत, @DrNarottamMisra
काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी यांसंदर्भात ट्वीट केलं आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी या प्रकरणात जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी
इम्रान प्रतापगढी म्हणाले, "हा व्हीडिओ अफगाणिस्तानचा नसून इंदूरचा आहे, शिवराज चौहानजींच्या स्वप्नातील मध्यप्रदेशात बांगड्या विकणाऱ्या मुस्लीम विक्रेत्याचे सामान लुटले जाते आणि जमावाकडून जाहीर मारहाण होते. नरेंद्र मोदीजी, तुम्हाला हा भारत उभा करायचा होता का? या दहशतवाद्यांवर कारवाई कधी होणार आहे?"
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे वकील एहतेशाम हाश्मी म्हणाले की, या प्रकरणात एनएसए लागू केले पाहिजे.

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, जर हा व्यक्ती हिंदू नावाने तेथे बांगड्या विकत होता तर त्याचं खरं नाव कसं समोर आलं आणि त्याच्याकडे दोन आधार कार्ड असतील तर पोलिसांनी कारवाई करावी, लोकांनी नाही.
ते पुढे म्हणाले, "त्याला मारण्याचा कोणालाही अधिकार नाही. या प्रकरणात एनएसएअंतर्गत कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








