नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी होण्याची काय कारणं आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिश्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दीर्घकाळ मतदारांमध्ये लोकप्रिय होते.
भारतीय जनता पार्टीसारख्या देशातल्या एका श्रीमंत आणि शिस्तबद्ध, काटेकोर नियोजनाने चालणाऱ्या राजकीय पक्षाचं पाठबळ त्यांच्याकडे आहे. आणि त्याच्या जीवावर लागोपाठ दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या. अंगभूत राजकीय धूर्तपणाचा वापर करत, लोकांना बनावट हिंदू राष्ट्रवादाची साद घालत त्यांनी मतदारांना भुलवलं आणि विरोधकांना नेस्तनाबूत केलं.
यात नशिबानेही त्यांना साथ दिली. त्यांच्या समर्थकांनी 2016मध्ये मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या चुकीच्या निर्णयाकडे कानाडोळा केला. कोरोनाच्या आरोग्यसंकटानंतर देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. पण, तरीही समर्थकांचा पाठिंबा कमी झालेला नाही. अर्थात, याचं आणखी एक कारण देशात सक्षम विरोधी पक्षाचा अभाव हे ही आहे.
असं असतानाही अलीकडे नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरू लागली आहे का?
इंडिया टुडे साप्ताहिकाने जुलै महिन्यात केलेल्या एका सर्वेक्षणात 14,600 लोकांपैकी फक्त 24% लोकांनी पुढचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला कौल दिला आहे. पुढच्या सार्वत्रिक निवडणुका 2024मध्ये होणार आहेत.
गेल्यावर्षी झालेल्या अशाच एका सर्वेक्षणाच्या तुलनेत मोदींच्या लोकप्रियतेत 42 टक्क्यांची घट झालेली दिसत आहे.
"वीस पेक्षा जास्त वर्षं मी सर्वेक्षणांचा अभ्यास केला आहे. पण, कुठल्याही पंतप्रधानाच्या लोकप्रियतेत इतकी मोठी घट झाल्याचं मी कधी पाहिलं नाही," अशी प्रतिक्रिया निवडणूक विश्लेषक आणि राजकीय नेते योगेंद्र यादव यांनी दिली आहे.
नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी कशामुळे झाली?
2020 हे वर्षं नरेंद्र मोदींसाठी तसं कठीणच गेलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात जी परिस्थिती उद्भवली आणि तिचा सामना करण्यात प्रशासन कमी पडलं यामुळे मोदींच्या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय पातळीवर तडा गेला. देशात हजारो लोकांना ऑक्सिजन अभावी, औषधांअभावी, रुग्णालयां अभावी रस्त्यावर जीव गेला. अर्थव्यवस्थेवर याचा ताण पडलाय, महागाईचा दर दिवसेंदिवस वाढतोय, इंधनाचे दर गगनाला भिडलेत, भर म्हणून रोजगार कमी झालाय आणि बाजारमालाला मागणी कमी झालीय.

फोटो स्रोत, EPA
लोकांच्या मनातलं हे दु:ख आणि अविश्वास काही प्रमाणात अशा सर्वेक्षणांमधून दिसून येतोय. 70% पेक्षा जास्त लोकांनी असं म्हटलंय की, कोरोनाच्या काळात त्यांचा रोजगार गेला. तर तेवढ्याच लोकांना असंही वाटतंय की कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा अधिकृत 4.30.000च्या आकड्यापेक्षा कितीतरी मोठा असावा.
36% लोक मात्र असे आहेत ज्यांना वाटतंय की, मोदींनी आरोग्य संकट 'ठीक' हाताळलं. फक्त 13% लोकांना असं वाटतं की, आरोग्य संकट असमर्थपणे हाताळण्याचा सगळा दोष मोदी सरकारलाच दिला पाहिजे. 44% लोकांच्या मते कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र आणि राज्यसरकारं दोन्ही कमी पडली.
मोदी ध्रुवीकरण आणि सामाजिक तेढ पसरवणारे नेते?
कोरोना आरोग्य संकटा व्यतिरिक्त आणखी कुठले मुद्दे आहेत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जात आहेत?
महागाई आणि रोजगार ही मोदींची लोकप्रियता घसरण्यामागची दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक तृतीयांश लोकांनी सरकारला वस्तू आणि सेवांच्या किमती पूर्ववत करण्यात अपयश आल्याचा कौल दिला. आणि लोकांच्या मते हे नरेंद्र मोदी सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत झालेली घट ही तशी आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नाही," दिल्लीतल्या धोरणविषयक अभ्यास करणाऱ्या एका संस्थेचे फेलो राहुल शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
नरेंद्र मोदी हे ध्रुवीकरण करणारे नेते आहेत. त्यांच्या राजवटीत, अनेक राजकीय विरोधकांच्या मते, प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आली - पंतप्रधानांनी स्वत: 2014मध्ये सत्ते आल्यापासून एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही - विरोधकांचा विरोध ते मोडून काढतात.

फोटो स्रोत, AFP
खुद्द नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षावर अनेकदा समाजात जातीय आणि सामाजित तेढ पसरवणारं राजकारण केल्याचा आरोप झाला आहे.
वादग्रस्त नागरिकत्व कायदा आणि प्रस्ताविक कृषि कायद्यांच्या विरोधात झालेलं आंदोलन चिरडून टाकल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या एरवी अजेय वाटणाऱ्या प्रतिमेला तडा गेला असावा. मे महिन्यात भाजपाचा पश्चिम बंगालमध्ये झालेला दारुण पराभवही याला कारणीभूत असावा. कारण, त्यामुळे विरोधकांना बळ मिळालं.
नरेंद्र मोदींचे फोटो जाहिरात फलक, लस प्रमाणपत्र, वर्तमानपत्र आणि टीव्हीवरील जाहिराती अशा सगळीकडे झळकतात. अशा नेत्यासाठी लोकप्रियतेला लागलेली ओहोटी ही त्यांची जनमानसात तयार केलेल्या अवास्तव प्रतिमेचा बुरखा फाडणारी असू शकते.
सर्वेक्षण किती खरी, किती खोटी?
पण, अशा सर्वेक्षणातून जनतेच्या अंतरंगाचा खरा आरसा दिसू शकतो का? हे सर्वेक्षण किती खरं मानायचं?
मॉर्निंग कन्सल्ट ही संस्था 13 देशातील लोकनियुक्त नेत्यांचं राष्ट्रीय रेटिंग मोजत असते. त्यांच्या सर्वेक्षणानुसार, नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता गेल्यावर्षीच्या मे महिन्यापासून 25 अंशांनी घसरली आहे. तरीही मेच्या मध्यावर 47% लोकांचा कौल अजूनही मोदींच्याच बाजूने आहे. आणि इतर नेत्यांच्या ते कितीतरी पुढे आहेत.
भारतातील प्रश्नम या संस्थेनं जून महिन्यात केलेल्या एका सर्वेक्षणात 2024मधील पंतप्रधान पदाचे लाडके उमेदवार म्हणून मोदींच्या नावाला 33% भारतीयांनी पसंती दिली आहे.
दिल्ली स्थित सी-व्होटर ही प्रसिद्ध सर्वेक्षण संस्था दर आठवड्याला 543 राष्ट्रीय मतदारसंघांमध्ये 10,000 लोकांच्या मुलाखती घेत असते. त्यांच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यात मोदींचं रेटिंग 33% होतं. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यात 22%ची घट झाली आहे. मे महिन्यात भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. आणि त्याच सुमारास देशात दुसरी लाटही पसरत होती.

फोटो स्रोत, Getty Images
पण, तेव्हापासून नरेंद्र मोदींच्या रेटिंगमध्ये आता सुधारणाही दिसत आहे. आणि सी-व्होटरच्या यशवंत देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे या घडीला मोदींचं रेटिंग 44%वर आहे.
यशवंत देशमुख यांनी सर्वेक्षणांबद्दल बीबीसीशी बोलताना काही मार्मिक गोष्टीही सांगितल्या.
"मला वाटतं, घडायचं ते वाईट घडून गेलं आहे. मोदींची लोकप्रियता 37% पेक्षा खाली कधीच आली नव्हती. कारण, त्यांचा निष्ठावान मतदार त्यांच्याबरोबर आहे."
पण, देशमुख यांच्यामते वरचे वर सर्वेक्षण घेतल्यामुळे देशाचा बदलता आवाज आणि राजकीय कल समजून घ्यायला मदत होते. भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिमाही जनमानसात खालावली आहे. पण, त्याचवेळी भाजपा व्यतिरिक्त इतर पक्षाच्या 10 पैकी 9 मुख्यमंत्र्यांनाही रेटिंगमध्ये फटका बसला आहे. आणि त्याच्याशी तुलना करता नरेंद्र मोदींची कामगिरी चांगलीच म्हणावी लागेल,असं देशमुख यांना वाटतं. "अजूनही लोकांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटतो. त्यांचा हेतू चांगला होता, असं लोकांना वाटतं," देशमुख यांनी स्पष्ट केलं.
नरेंद्र मोदी यांचं सध्याचं रेटिंग त्यांचं सगळ्यात तळाला गेलेलं रेटिंग असलं तरी ते सरकार बदलण्यासाठी पुरेसं नाही. मोदींना सत्तेतून हुसकावून लावेल इतकं ते सक्षम नाही. मोदींचा प्रमुख विरोधी नेता राहुल गांधी यांच्यापेक्षा त्यांचं रेटिंग कायम दुपटीने जास्तच होतं आणि आहे. म्हणजेच पुरेसा सक्षम विरोधी पक्षनेता नसल्याचा फायदा नरेंद्र मोदींना मिळत असावा.
"नरेंद्र मोदी अजूनही शर्यतीत सगळ्यात पुढे आहेत. पण, रेटिंगमध्ये झालेली घट थोडी काळजी करण्यासारखी नक्की आहे," राहुल शर्मा यांनी रेटिंगच्या मुद्याचा सारांश काढताना सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









