वीणा गवाणकर यांची मुलाखत: मराठीला ज्ञानभाषा कशी बनवणार?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

(प्रख्यात लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत पुन्हा प्रसिद्ध करत आहोत)

'साहित्य हा समाजाचा आरसा आहे, असं मी लहानपणापासून ऐकलंय. मग का नाहीत यांची प्रतिबिंबं त्याच्यात?' लेखिका वीणा गवाणकर पर्यावणाच्या ऱ्हासामुळे निर्माण झालेल्या संकटाविषयी बोलताना हा प्रश्न विचारतात.

'एक होता कार्व्हर' या पुस्तकामुळे वीणा गवाणकरांचं नाव महाराष्ट्रातल्या अनेक घरांत पोहोचलं. पण त्यांनी केवळ कार्व्हरच नाही तर रोझालिंड फ्रँकलिन, लिझ माईटनर ते रिचर्ड बेकर अशी विज्ञान-संशोधन-पर्यावरणाच्या जगातली व्यक्तीमत्त्व मराठीत आणली आहेत.

यंदा उदगीर इथे होणाऱ्या साहित्य संमेलनात 23 एप्रिलला वीणा गवाणकरांचाही सत्कार होणार आहे. त्यानिमित्तानं बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश आहे.

प्रश्न - चार दशकं तुम्ही शोधांच्या मागच्या व्यक्तींच्या गोष्टी मराठी वाचकांसमोर आणता आहात. पण आजही अशा पद्धतीच्या वाङ्‌मयाची उणीव का जाणवते?

वीणा गवाणकर- विज्ञान लेखनाला एवढं ग्लॅमर नाहीये, जितकं ललित साहित्याला एक ग्लॅमर असतं. विज्ञान वाचणारा एक विशिष्ठ वर्गच आहे अशी आपली समजूत आहे.

विज्ञान हा ज्यांचा अभ्यासाचा विषय नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ललित पद्धतीनं लिहावं लागतं. पण तसं मराठीत होत नाही. लिहिलं गेलं, तरी आपल्याकडे मुळात तेवढे शोध लागत नाहीत. त्यामुळे त्याविषयीचं लिखाणही होत नाही.

एक कारण असंही आहे की विज्ञानावरच्या लिखाणासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो, संशोधन करावं लागतं. मलाही खटपट करावी लागते, कारण माझी पार्श्वभूमी विज्ञानाची नाही, मराठी साहित्य घेऊन मी बी.ए झाले आहे.

माझ्या लहानपणी मायकल फॅरेडे, मेरी क्युरी, जगदीशचंद्र बोस अशी छोटी छोटी पुस्तक वाचूनच विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली. पण मोठी झाल्यावर या विषयात तेवढी मराठी पुस्तकं वाचायला मिळाली नाहीत. जेवढं आपल्याला इंग्रजी साहित्यात विज्ञानावरचं वाचायला मिळतं, तितकं मराठीत मिळत नाही.

विज्ञानाला पर्याय नाही, कारण शेवटी समाजाला प्रगती करायची आहे, ती विज्ञानाधारीतच असेल.

प्रश्न - अमिताव घोष यांनी त्यांच्या लिखाणात एक खंत व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, पर्यावरणाचा ऱ्हास आणि तापमानवाढ ही मानवजातीसमोरची एवढी मोठी समस्या आहे, पण कादंबरीत किंवा साहित्यिक रुपात त्याचं प्रतिबिंब फारसं दिसत नाही. मराठीतही अशीच परिस्थिती आहे. यामागचं कारण काय असावं? हा विषय लोकांच्या आवाक्याबाहेरचा आहे की आपण संकुचित विचारांच्या डबक्यात आहोत आणि आपल्याला विश्व दिसेनासं झालंय?

वीणा गवाणकर-याचं कारण आपल्याला सगळं सोपं हवं आहे. हे काहीसं असं आहे- दात आहेत तिथे चणे नाहीयेत. हे विषय कथा कादंबऱ्यांत दिसत नाहीत म्हणून मी चरित्रं लिहिते. मला कादंबरी येत असती, तर मी जरूर लिहिल्या असत्या.

दुसरी गोष्ट म्हणजे कादंबरी हे फिक्शन (fiction) आहे म्हणजे त्यात कल्पित गोष्टी असतील. पण पर्यावरण हा विषय आपल्याकडे फारसा हाताळला जात नाही, हे सत्य आहे. फारच क्वचित हा विषय येतो.

अलिकडच्या काळात आलेली शर्मिला फडकेंची फोर सीझन्स कादंबरी किंवा बारोमास (सदानंद देशमुख यांची कादंबरी), तहान अशा काही कादंबऱ्या आहेत. त्यातून ग्रामीण भागात हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचं प्रतिबिंब दिसतं.

पण त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न हाती घेऊन जलव्यवस्थापन कसं करावं, हे कोणी लिहित नाही. असे जे थोडे कोरडे, किचकट पण जीवनाशी जोडले गेलेले विषय आहेत, ते कादंबरीत कसे आणायचे?

प्रश्न - ही मराठी साहित्यिकांमधली आजवरची एक त्रुटी आहे असं वाटतं का?

वीणा गवाणकर-मला वाटतं, म्हणावं तेवढ्या गांभीर्यानं अजूनही हे विषय घेतले जात नाहीत. कदाचित मी चुकत असेन.

पण साहित्य हा समाजाचा आरसा आहे असं मी लहानपणापासून ऐकत आले आहे. मग का नाही या गोष्टींची प्रतिबिंब त्याच्यात? विज्ञान जे तयार करतंय, त्याचं उपयोजन शेवटी कोणासाठी आहे? समाजासाठीच ना?

समाज हे जर महावस्त्र आहे, त्याचा पोत मजबूत असावा लागतो. मग त्यावर तुम्ही वेलबुट्टी काढू शकता. विचार करणारे, शोध लावणारे, काही वेगळा रस्ता दाखवणारे हे लोक हा या वस्त्राचा पोत मजबूत करतात.

प्रश्न - मग मराठी भाषेचं वस्त्र मजबूत करायचं असेल तर तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी लढा द्यायचा की तिला ज्ञानभाषा बनवणं जास्त महत्त्वाचं वाटतं?

वीणा गवाणकर-आपल्याकडे भूगोलावर, इतिहासावर, अर्थशास्त्रावर लिहिणारेही लोक आहेत. मारुती चितमपल्लींनी तर मला वाटतं हजारएक शब्दांची देणगी दिली आहे मराठीला.

हे सगळे विषय मराठी भाषेचं मूल्यवर्धनच करतात. मग असं लिखाण करणाऱ्यांचाही या साहित्य संमेलनातून त्यांचाही गौरव व्हायला हवा. मराठीला ज्ञानभाषा व्हायचं असेल तर ती व्यवहारात आली पाहिजे, शिक्षणात आली पाहिजे आणि तुमच्या जीवनाशी तिचा संबंध जोडला असला पाहिजे.

आणि त्यात अशा वेगवेगळ्या विषयांवर लिखाण पण व्हायला पाहिजे. लिहायला लागलं विज्ञानावर की अडकायला झालं तर नवे शब्द तयार करावे लागतात.

मुळात मराठीला ज्ञानभाषा बनायचं असेल, तर तुमच्या भाषेत आधी शोध लागले पाहिजेत. तुमच्याकडे कॅमेऱ्याचा शोध लागला नाही, त्यामुळे तुम्ही त्याला कॅमेराच म्हणणार ना? भले मोबाईलला दूरचलभाष असा शब्द आणला असेल, तरी तो तुम्ही तयार केलेला शब्द आहे.

मुळात विज्ञानाविषयी आपल्याकडे आस्थाच कमी आहे. किती आपल्याकडे शास्त्रज्ञ होतात, किती नोबेल विजेते झाले आहेत? विज्ञानावाषयी अनास्था आहे, विज्ञान आणि तर्कशास्त्र बाजूला ठेवल्याचे परिणाम तुम्हाला समाजाच्या इतर भागांवर दिसतील.

आता जल-वायू-ध्वनी किंवा किरणोत्सारी प्रदूषण आहे, ते काय धर्म बघून किंवा जात, लिंग बघून त्रास देणार आहे का? मग त्यात धर्मकारण, राजकारण, अर्थकारण का आणलं जातं? आम्ही विज्ञानाची तर्काची साथ सोडतो, याचंच हे लक्षण नाही का?

सध्याचं वातावरण पाहिलं तर कुठल्याही गोष्टीचं राजकारण होतं. आता हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आहे. हनुमान जयंतीच्या यात्रा निघतात, त्यावरून दंगल होते. कोणी एकच नाही तर सगळेच पक्ष त्या मार्गानं जाताना दिसतात...

यांना सोपी उत्तरं हवी असतात सगळ्यांना. म्हणून लोकांनी शहाणं व्हायचं आणि कुणाच्या मागे जायचं, हे ठरवायला हवं.

तुम्हाला स्वतःचा मेंदू वापरण्यासाठी दुसऱ्या माणसांनी काही का सांगायला हवं? तुमच्याकडे रिकामा वेळ असेल, तरच तुम्ही हे असे खेळ खेळणार.

कोण असतात या झुंडशाहीत? ज्याच्या हाताला काम आहे तो कामच करेल.

केवळ राजकारणासाठी राजकारण करू नये. धर्म, जात हे कृत्रिम भेद कमी केले पाहिजेत.

प्रश्न - पण मग अशा परिस्थितीत लेखन करताना त्रास होतो? तुम्ही एक मोठा काळ पाहिला आहे, त्यातले बदल पाहिले आहेत. आत्ताच्या काळात कुठली आव्हानं जाणवतात किंवा कुठली गोष्ट टाळावी लागते का?

वीणा गवाणकर- आव्हानं म्हणजे खूप बंधनं स्वतःवर घालावी लागतात. कारण समाजमाध्यमांमध्ये तुम्ही बोलता, पण तुमचा बोलण्याचा उद्देश बाजूला पडतो. तुम्हाला चुकीचं ठरवण्यासाठी जे लिहिलं जातं, त्याला मी प्रत्युत्तर दिलेलं कधीच पुढे येत नाही. फक्त तो झगडा तेवढा दिसतो.

समाजमाध्यमं तुम्हाला कुठेही पुढे नेत नाहीत. त्यामुळे मी समाजमाध्यमात असले तरी तिथे पुस्तकं सोडून कशावरही प्रतिक्रिया देत नाही. याचं कारणच तुमच्या मनातलं मी बोलते की नाही, एवढंच ते बघत असतात. मी काय बोलतेय आणि त्याचा अर्थ काय याच्याशी कुणालाही काही घेणं-देणं नसतं.

मी याच्या मनातलं बोलते की त्याच्या मनातलं बोलते एवढंच ते बघत असतात. हा एक खेळ झाला आहे. त्यातून प्रबोधन होत असेल असं नाही वाटत मला. कारण व्यक्त व्हायचं आणि विसरून जायचं एवढंच उरलंय.

कालचं आज तिथे काही नसतं. समाजमाध्यमात, वृत्तपत्रांत, बातम्यांत रोज नवीन विषय येतात. दोन-चार दिवसांनी काहीतरी नवा फुगा, नवा खुळखुळा मिळाल्यासारखं ते चालू असतं. त्यातलं गांभीर्यही कमी झालंय.

समाजमाध्यमानं सगळेच लेखक झालेत, सगळेच फोटोग्राफर झालेत आणि सगळेच बोलायला लागले आहेत. पण मला वाटतं ती बहुतांश वेळा केवळ प्रतिक्रिया असते. माझ्या कोर्टात चेंडू आला की तुमच्याकडे टोलवणार एवढंच उरलंय.

प्रश्न - तुमचं ताजं पुस्तक 'अवघा देहची वृक्ष झाला' हे एका पर्यावरणप्रेमीवर, रिचर्ड बेकर यांच्यावर लिहिलेलं आहे. आजच्या जमान्यातही अनेकांना पर्यावरणाविषयी तेवढी आस्था नसते. हवामान बदलाचे परिणाम नाकारणारेही काहीजण आहेत. अशा परिस्थितीत सत्तर एक वर्षांपूर्वी रिचर्ड बेकर यांनी केलेलं कार्य किती महत्त्वाचं आणि प्रेरणादायी आहे?

वीणा गवाणकर-हेच तर त्याचं वेगळेपण आहे ना. 'बघणं आणि दिसणं' यात फरक आहे. दिसतं सगळ्यांनाच पण बघून प्रयत्न करणारे क्वचितच असतात.

आपल्याला अनेक गोष्टी दिसत असतात, तसं रिचर्ड बेकरलाही ते कॅनडातलं जंगल कापलं जाताना दिसत होतं. पण तो बारकाईनं बघत होता. त्याला प्रश्न पडला की हे जंगल कापतो आहोत ते पुन्हा कधी उगवणार? म्हणून तो वनविद्या शिकला. दोन पावलं पुढे गेला. कुतुहल घेऊन जगला.आपण तापमान बदल, पर्यावरणाचे प्रश्न असतील, मानवनिर्मित वाळवंटं असतील, हे सगळे प्रश्न त्याला दिसले. या प्रयत्नांची जगभर गरज आहे हे त्याला कळलं.

तो सांगतो, की हे जे वाळवंट पसरतंय, त्याला थोपवायचं असेल, तर त्याला हिरवी वेसण घालायला पाहिजे. ते कोणी ऐकलं नाही. पण साठ वर्षांनंतर आज आफ्रिकन देश एकत्र येऊन ग्रीन बेल्ट उभा करतायत.

प्रश्न - विज्ञानाविषयी बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे विज्ञानातलं महिलांचं योगदान. रोझालिंड फ्रँकलिन, लिझ माईट्नर अशा महिलांची चरित्रं तुम्ही लिहिली आहेत. या सगळ्यांना जे श्रेय मिळायला हवं होतं ते मिळू शकलं नाही. हे मराठीतही होताना दिसतं का?

वीणा गवाणकर-स्त्रियांच्या बाबतीत बंधनं होती, त्यांना मज्जावच होता अनेक ठिकाणी. त्यातही कोणी धाडस केलंच तर विज्ञान पुरुषांचं क्षेत्र आहे, विज्ञान कठीण आहे, बायकांना त्यात काय समजतं ही धारणा सगळीकडेच होती.ऑस्ट्रियात मुलींचं शिक्षण चौदा वर्ष कायद्यानंच बंद होतं. तिथे लिझ माईटनर तेविसाव्या वर्षी कॉलेजची प्रवेशप्रकिया देऊन पुढे शिक्षण पूर्ण करते. लिझ म्हणजे बाई आहे हे कळेल म्हणून एल माईटनर नावानं ती लिहिते.

आता शिक्षणानं दरवाजे मोकळे झाले आहेत. आपल्याकडे भारतातही अशा संशोधकांना त्रास सहन करावा लागला. कमलाबाई सोहोनी असतील, दुर्गाबाई देशमुख असतील. दुर्गाबाईंना तर स्त्री कशाला राज्यशास्त्र शिकते असा प्रश्न विचारला गेला.

बाईनं घर सांभाळणं याला इतकं महत्त्व दिलंय की, तिचं विज्ञानात किती डोकं आहे ती काय करू शकते याचं घेणं-देणं नसतं. आपण निसर्गाच्या पर्यावरणाविषयी बोलतो, पण समाजाचं पर्यावरणही राखलं पाहिजे. स्त्रियांना ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)