नरेंद्र मोदींच्या भाजपला भारतातील महिला मतं का देतात?

नरेंद्र मोदी, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज, दिल्ली

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक महिला असते, अशी एक प्रचलित उक्ती आहे.

पण नुकत्याच पार पडलेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पार्टीच्या मागे लाखोंच्या संख्येत महिला उभ्या असल्याचे चित्र आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपनं सत्ता मिळवली. या राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी भाजपला अधिक मतदान केलं. यात भारतातील सर्वांत मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचाही समावेश आहे.

1962 पासून निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाची लिंगनिहाय विभागणी करतं. 1962 पासून सर्वाधिक महिला काँग्रेसला मतदान करताना दिसून येत होत्या. मात्र, 2019 साली पहिल्यांदा भाजपनं काँग्रेसची जागा घेतली. म्हणजेच, भाजपला महिलांची सर्वाधिक मतं मिळाली.

भाजप हा भारतातील इतरही राजकीय पक्षांप्रमाणेच स्त्रीवादी पक्ष नाही, तसंच त्यांचा दृष्टिकोन सुद्धा महिलांना आवडेल असा नाहीये.

भाजपचे अनेक नेते तर अनेकदा स्त्रियांबद्दल द्वेष व्यक्त करणारी मतं व्यक्त करतात. तसंच, भाजपप्रणित अनेक राज्य सरकारं बलात्कारासारखी प्रकरणं अत्यंत वाईट पद्धतीनं हाताळता आणि टीकेचे धनी होतात.

भारत सरकारनं आणलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधातील सर्वधिक दिवस चाललेलं आणि सर्वांत मोठं आंदोलन महिलांनी चालवलं होतं.

हे सर्व एकीकडे असताना, महिलांचं सर्वाधिक मतदान भाजपला होताना दिसतंय.

मग भारतीय महिलांसाठी भाजप हा पर्याय का ठरतोय?

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) चे प्रमुख संजय कुमार म्हणतात की, "नरेंद्र मोदींमुळे. महिलांना भाजप जवळचा पक्ष वाटू लागणं, हे काही अचानक घडलं नाहीये. नरेंद्र मोदी हा यातला महत्वाचा आणि मोठा फॅक्टर आहे."

नलीन मेहता हे राजकीय तज्ज्ञ आहेत. त्यांनी 'द न्यू बीजेपी' या त्यांच्या पुस्तकासाठी बरंच संशोधन केलं. त्यांच्या मते, 1980 च्या सुमारास महिला विंग स्थापन करून भाजपनं तेव्हापासूनच महिलांना पक्षाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

"तेव्हाही भाजपकडे महत्वाच्या आणि ताकदवान महिला नेत्या होत्या. त्यांनी महिलाकेंद्रित मुद्द्यांवर आश्वासनं दिली होती, आवाज उठवला होता. मात्र, तरीही नंतरची काही दशकं महिलांनी भाजपला फारसं मतदान केलं नाही. भाजपकडे पितृसत्ताक पुरुषांचं वर्चस्व असलेला पक्ष म्हणून पाहिलं जाई आणि महिला या पक्षाकडे आकर्षित होत नसत."

2019 साली राष्ट्रीय स्तरावर मोठा बदल झाला, असं संजय कुमार म्हणतात.

नरेंद्र मोदी, भाजप

फोटो स्रोत, Getty Images

निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये मोदी अनेकदा '56 इंचाची छाती' असे शब्द वापरतात. ताकदवान म्हणून हिंदी पट्ट्यात हे शब्द लागू होतात.

"ते जेव्हा जेव्हा हा शब्द वापरत तेव्हा महिला बसलेल्या ठिकाणी शांतता दिसे. मात्र, त्याचवेळी ते म्हणत, मी तुमचा भाऊ आहे, मी तुमचा मुलगा आहे, मला मत द्या आणि मी तुमच्या हिताच्या गोष्टी करेन," असं नलीन मेहता सांगतात.

मात्र, "पुरुषत्वाला काही मर्यादाही आहेत. त्यामुळे त्यांनी महिलाकेंद्रित विचार करणाऱ्या आणि विकास धोरणं आखणाऱ्या पुरुषाची प्रतिमा समोर आणली. या प्रतिमेचा त्यांना गुजरातमध्ये 2007 साली आणि 2012 साली झाला."

2014 साली त्यांनी लोकसभा निवडणुका जिंकताना ही स्ट्रॅटेजी पूर्णत्वास नेली.

2014 च्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान म्हणून देशवासियांसमोर पहिलं भाषण करताना मोदींनी म्हटलं की, ते स्त्रीभ्रूण हत्येविरोधात बोलले, बलात्कार प्रकरणांचा निषेध केला आणि आपल्या मुलांना चांगल्या संस्कारात वाढवण्याचं आवाहन केलं.

नलीन मेहता सांगतात की, "मोदींनी सार्वजनिक सभांमध्ये महिलांसंबंधी विषयांवर भाष्य केलं. 2014 ते 2019 दरम्यानच्या सभांचा अभ्यास केल्यास त्यांच्या भाषणांमधील टॉप-5 मुद्द्यांमधील सर्वाधिक मुद्दे हे महिलांशी संबंधित असत."

नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक करिष्मा होताच, सोबत भाजपनंही पक्ष म्हणून महिलांना राजकारणात अधिकाधिक प्रतिनिधित्व दिलं.

2019 मध्ये भाजपनं इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक उमेदवार दिले. मंत्रिमंडळातही आधीच्या कुठल्याही मंत्रिमंडळांपेक्षा सर्वाधिक महिला मंत्री केले. भाजपनं पक्षसंघटनेतही बदल करत महिलांना पुढे आणलं आणि त्यातही ग्रामीण, सामाजिकदृष्ट्या मागास महिलांनाही प्रतिनिधित्व दिलं.

भाजपला समर्थन देणाऱ्या महिलांमधील मोठा भाग हा ग्रामीण भागातील आणि त्यातही दारिद्र्य रेषेखालील आहे. पक्षाच्या कल्याणकारी योजनांनी याच वर्गाला लक्ष्य केलंय, असं मेहता सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

पितृसत्ताक वृत्ती खोलवर रुजलेल्या भारतात, जिथं महिलांना संपत्तीचे सर्वांत कमी अधिकार आहेत, अशा देशात 2014 ते 2019 दरम्यान मंजूर झालेल्या गरिबांसाठीच्या 1.7 दशलक्ष घरांपैकी सुमारे 68% घरे एकट्या किंवा पुरुषांसोबत एकत्रितपणे महिलांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

केंद्र सरकारनं लाखोंच्या संख्येत शौचालयं बांधली. महिलांच्या नावानं बँक अकाऊंट्स उघडली, ज्यात अनुदानं किंवा इतर लाभार्थी योजनांचे पैसे थेट जमा होऊ शकले.

नलीन मेहता म्हणतात, या सगळ्यांमुळे महिलांना इतर पक्षांच्या तुलनेत भाजप जवळचा पक्ष वाटू लागलाय.

मात्र, "एखाद्या पक्षाचा लिंग-आधारित पाठिंबा जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वामुळे चालतो, तेव्हा त्याचे आयुष्य कमी असू शकते," असं माया मिरचंदानी म्हणतात. त्या ज्येष्ठ पत्रकार आणि अशोका विद्यापीठातील माध्यम विभागाच्या प्रमुख आहेत.

"मोदींचा करिष्मा अफाट आहे आणि त्यांना सहानुभूतीही मोठी आहे. त्यांच्याकडे सर्वसाधारण आयुष्य जगणारा माणूस म्हणून पाहिलं जातं. ते दिखाऊ नाहीत, असं त्यांना मानलं जातं. ते फिट असतात, ते सार्वजनिक आयुष्यात निष्कलंक असल्याचं मानलं जातं. मात्र, ते आता 71 वर्षांचे आहेत, आणि यातले काही गुण हळूहळू कमी होतील," असंही त्या म्हणतात.

"बेरोजगारी वाढत असताना, महागाई उच्चांक गाठत असताना, आणि इंधनाच्या किंमती सातत्यानं वाढत असताना, केवळ एकच गोष्ट त्यांच्या समर्थकांना बांधून ठेवत आहे ती म्हणजे धार्मिक ओळख. पण जर धार्मिक हिंसा हाताबाहेर गेल्यास आर्थिक क्षेत्राला त्याचा फटका बसेल. याचा अप्रत्यक्ष फटका महिलांनाही बसेल, त्या बऱ्याचदा घर चालवतात. मग हे सर्व भाजपच्याही विरोधात जाऊ शकेल."

"तो क्षण अद्याप आला नाहीय, पण ते येऊ शकेल," असंही त्या म्हणतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)