उत्तर प्रदेश निवडणूक निकाल: या निरक्षर सासू-सुनांनी मला उत्तर प्रदेशचं राजकारण समजावून सांगितलं

उत्तर प्रदेश
    • Author, आशिष दीक्षित
    • Role, संपादक, बीबीसी मराठी

हे इंटरॲक्टिव्ह पाहायला जावास्क्रिप्ट असलेलं आधुनिक वेब ब्राऊझर आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन लागेल.

सकाळपासून उन्हात भटकून आता थकायला झालं होतं. दुपारचे 3 वाजून गेले होते. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात आम्ही पायपीट करत होतो.

'बस एक और बस्ती में जाते हैं. ये जाटवों की बस्ती है.' आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या स्थानिक पत्रकाराने सांगितलं. आता इथवर आलो आहोत आणि गावातल्या विविध समाजातल्या लोकांना भेटायचं ठरवलं आहे तर ही वस्ती महत्त्वाची आहे, हे 'जाटव' शब्द ऐकताच लक्षात आलं.

जाटव ही उत्तर भारतातली एक मागास जात. या समाजातल्या लोकांनी आतापर्यंत भरभरून मायावतींना मतदान केलं. 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीत मायावतींच्या बसपाचं पानिपत झालं, पण तरीही त्यांना तब्बल 22 टक्के मतं मिळाली. गेल्या 5 वर्षांत तर मायावती कुठेही फिरकल्या नाहीत. तरीही त्यांचा मतदार त्यांना प्रामाणिक आहे, अशा कथा मी ऐकल्या होत्या.

आता या जाटव वस्तीत जाऊन पाहायचं होतं की त्यांचा मतदार खरंच एवढा 'लॉयल' आहे का?

सासू सुना

चिंचोळ्या गल्ल्यांमधून आणि न झाकलेल्या गटारांवरून वाट शोधत आम्ही एका अरुंद चौकात येऊन थांबलो. तिथे एक हापसा होता आणि समोर शेणाने सारवलेली छोटी मोकळी जागा होती. शेजारच्या झोपडीबाहेर एक तरुण उभा होता.

आम्ही बोलण्यासाठी त्याच्याजवळ गेलो. तो निरक्षर असल्याचं त्याने सांगितलं. 24-25 वर्षांचा अंगठा बहाद्दर तरुण सापडणं खरं तर आताच्या काळात कठीण आहे. त्या वयोगटात किमान नाव लिहिण्याएवढी तरी अक्षरओळख नक्कीच झालेली दिसते. तो बेरोजगार होता आणि प्रचंड चिडलेला होता.

निवडणुकांबद्दल विचारताच तो तावातावाने बोलू लागला. त्याला काम मिळालं नाही आणि कोणत्याही योजनेअंतर्गत खात्यात रोखरक्कम आली नाही म्हणून तो योगी सरकारवर रागावलेला होता.

तो आणि त्याची बायको झोपडीत राहत होते. तर शेजारीच बांधलेल्या सिमेंटच्या खोलीत त्याची आई राहत होती. याचा आवाज ऐकून म्हातारी आई बाहेर आली. त्या हिंदीच्या ज्या स्थानिक बोलीत बोलत होत्या, ती मला अगम्य होती. एका सहकाऱ्याच्या मदतीने त्या माऊलीशी मी संवाद साधला.

वाराणसी

त्या म्हणाल्या, "सायकलचं (समाजवादी पार्टीचं) सरकार आलं की यादव दमदाटी करतात. फुलाचं (भाजपचं) सरकार आलं की ठाकूर दादागिरी करतात. पण आमचं हत्तीचं (बसपाचं) सरकार आलं तेव्हा मी ताठ मानेने कुणालाही न भीता फिरायचे."

या बाईंना लिहिता वाचता येत नाही. त्यांच्याकडे मोबाईलही नव्हता. त्यामुळे मायावती प्रचार करत आहेत की नाही, हे त्यांना माहीत असण्याचं कारण नाही. बसपावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप होतोय, हे त्यांच्या गावी असण्याचं कारण नाही. पण पूर्वांचलच्या कोपऱ्यावरच्या या आडगावात या महिलेला हे वाटत होतं की 'बहनजींचं' सरकार आलं की तिला समाजात मानाने वावरता येतं.

तिचा मुलगा मात्र प्रॅक्टिकल होता. निरक्षर होता, पण त्याच्याकडे मोबाईल होता. मायावती यावेळी धड प्रचारही करत नाहीयेत, हे त्याला ठाऊक होतं. "इस बार वोट खराब नहीं करना है," असं तो दोनदा म्हणाला. म्हणजे हरणाऱ्या व्यक्तीला मत देणार नाही, असं त्याने ठरवलं होतं. "या वेळी वस्तीतल्या आम्ही तरुणांनी अखिलेशला मत द्यायचं ठरवलं आहे," असं तो वेगाने हातवारे करत सांगत होता. अखिलेश यादवांनी दिलेलं नोकऱ्यांचं आश्वासन त्याला पटलं होतं.

वाराणसी

इतक्या वेळ त्याची बायको आमचं संभाषण शांतपणे ऐकत होती. ही तरुणी सासूच्या मागे जाईल की नवऱ्याच्या हे जाणून घ्यायची उत्सुकता निर्माण झाली.

पण तिच्याजवळ बोलायला गेलो तर ती लाजून झोपडीत जाऊ शकत होती. म्हणून माझ्या महिला सहकारीला विनंती केली. मग सुनबाईंशी गप्पा सुरू झाल्या. तिची निराळीच कथा होती.

भाजप सरकारमुळे दर महिन्याला 'मुफ्त राशन' मिळत असल्यामुळे ती खुश होती. "हमने उनका नमक खाया है" असं ती म्हणाली. कोव्हिडच्या काळात मोदी सरकारने धान्यासोबत तेल आणि मीठही दिलं. त्यातल्या मिठाची आठवण निवडणुकीआधी अनेक मतदारांना करून देण्यात आली होती.

नंतर आम्ही त्या वस्तीतल्या इतर अनेक घरांमध्ये फिरलो. कमीअधिक फरकाने असेच सूर ऐकायला मिळाले. दलितांमधला एक गट (वयोवृद्धांचा) मायावतींच्या मागे उभा होता, पण तरुण मात्र इतर मार्गांचा विचार करत होते. महिलांना मोफत धान्याचं कौतुक होतं.

'आडनाव विचारा, पक्ष कळेल'

4 दिवसांत आम्ही पूर्वांचलच्या अनेक जिल्ह्यांमध्ये फिरलो. वारणसी, चंदौली, मिर्झापूर, गाझीपूर, सोनभद्र या जिल्ह्यांमध्ये काही गोष्टी समान होत्या.

एक म्हणजे कोणतीही लाट जाणवली नाही. हिंदू राष्ट्रवाद वगैरे मुद्दे ठळकपणे पुढे आले नाहीत. ते बॅकग्राउंडला होते. शहरांमध्ये भाजपला अनुकूल अनेक लोक भेटले. विकास होत आहे, असं त्यांचं मत होतं. गुन्हेगारी कमी झाली, असंही त्यांचं म्हणणं होतं.

उत्तर प्रदेश

पण शहर सोडून गावांमध्ये शिरलं की योगी विरुद्ध अखिलेश अशी लढाई रंगू लागते. योगींना विरोध करणारे मोठ्या संख्येने भेटू लागतात. फक्त मुस्लीम आणि ब्राह्मणांना गुंड म्हणून जेलमध्ये टाकलं असा ते आरोप करतात. विकासाच्या नावाखाली फक्त फुकट गोष्टी वाटल्या, असा ते दावा करतात.

जात, रोजगार, विकास हे मुद्दे स्पष्टपणे सर्वत्र जाणवत होते. वाराणसी जिल्ह्यात हायवेवरून जात असताना आम्ही चहा प्यायला एके ठिकाणी संध्याकाळी थांबलो होतो. तिथे टपरीवर गावातले तरुण जमले होते. त्यांच्याशी आम्ही बोलू लागलो.

या तरुणांचा कौल कुणाला आहे, हे आम्ही आडून आडून विचारत होते. आमचा तो द्राविडी प्राणायाम पाहून चहावाल्या माणसाने मला हाक मारली. तो म्हणाला, "एवढं फिरून फिरून काय विचारता. त्यांना आडनाव विचारा. तुम्हाला कळेल ते कोणत्या पक्षाला मतदान करतील."

दिव्यासारख्या पसरट कुल्हडमध्ये चहा भरत भरत त्या चहावाल्या 'भैय्याने' युपीच्या राजकारणातलं अंतिम सत्य सांगितलं होतं. 'You don't cast your vote, you vote your caste' हे वाक्य जणू युपीच्या राजकारणासाठीच लिहिलं गेलं आहे.

2017 सालच्या निवडणुकीत विविध जातींच्या हिंदूंनी हिंदू म्हणून मोदींना मतदान दिलं. त्यामुळे भाजपला तीन चतुर्थांश बहुमत मिळालं. पण यावेळी जातींनी पुन्हा डोकं वर काढलंय. यादव अखिलेशच्या बाजूने बोलत होते. ठाकूर योगींच्या बाजूने बोलत होते. भाजपला पाठिंबा देणारा यादव किंवा अखिलेशची पाठराखण करणारा ठाकूर आम्हाला साडपला नाही. त्यामुळे जातींच्या भिंती पुन्हा भक्कम झालेल्या जाणवल्या.

बिगर-यादव ओबीसींची मोट बांधायचा अखिलेखने प्रयत्न केला आहे. त्याला किती यश येईल, हे आज मतपेट्या उघडल्यावर कळेलच. ब्राह्मणांची योगींवर असलेली नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. पण ते मोदींवर नाराज नव्हते. योगींविरोधात असलेला नाराजीचा सुर मोदींमुळे बोथट झालेला जाणवला.

उत्तर प्रदेशात भाजपच्या बाजूने जशी कोणतीही लाट जाणवली नाही, तशी भाजपच्या विरोधातही लाट नव्हती. काही लोक नाराज होते. त्यामुळे भाजपला थोडा फटका बसू शकतो. सध्या भाजपकडे इतक्या जागा आहेत की थोडा फटका बसला तरी पुन्हा ते सत्तेत सहज येऊ शकतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)